चेस रोबोट संतापला? प्रतिस्पर्धी सात वर्षीय बालकाची बोटे तोडली!
एक चेस रोबोट संतापलाच नव्हे, तर हिंसक झाला आणि त्याने चक्क सात वर्षीय बालकाची बोटे तोडली.

चेस रोबोट संतापला? तोडली बालकाची बोटे
माणसं बुद्धिबळ खेळताना पटासमोर किती एकाग्र होतात! व्यूहात्मक विचारात गढलेली, शांतपणे, आवाज न करता खेळणारी माणसं बुद्धिबळात कधी हिंसक झालेली मी तरी पाहिलेली नाही. मात्र, तुम्ही मशीनबाबत म्हणाल तर ते धाडसाचं ठरू शकेल. कारण जुलै 2022 मध्ये एक चेस रोबोट संतापलाच नव्हे, तर हिंसक झाला आणि त्याने चक्क प्रतिस्पर्धी सात वर्षीय बालकाची बोटे तोडली.
मॉस्को येथे जुलै 2022 मध्ये एका स्पर्धेत ही घटना घडली. रशियन प्रसारमाध्यमांनी या घटनेचा व्हिडीओ समोर आणला आहे. त्यात बुद्धिबळ खेळणारा एक रोबोट प्रतिस्पर्धी सात वर्षीय बालकाच्या झटपट प्रतिक्रियेने अस्वस्थ होता. रोबोट खेळायच्या आत बालकाने त्वरित प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करताच चेस रोबोट मशीनने बालकाची बोटे पकडून तोडली.
मॉस्को चेस फेडरेशनचे अध्यक्ष सर्जी लाझारेव यांनी एका न्यूज एजन्सीला सांगितले, की रोबोटने बालकाची बोटे तोडली. ते म्हणाले, की या चेस रोबोटचे यापूर्वी अनेक प्रदर्शनीय सामन्यांत सादरीकरण झाले आहे. त्यात त्याने कोणालाही इजा पोहोचवली नव्हती. या वेळी काय झालं कुणास ठावूक, पण ही घटना दुर्दैवी आहे.
बाझा टेलिग्रामने 19 जुलै 2022 रोजी हा व्हिडीओ व्हायरल केला. त्यात चेस रोबोटच्या चालीनंतर त्वरित बालकाने चाल खेळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बालकाने चाल खेळताना मोहऱ्यावर हात ठेवताच रोबोटने त्याच्या पोलादी हातांनी त्याची बोटे पकडली आणि तोडली. बालक विव्हळल्यानंतर एक महिला आणि तीन माणसं त्याच्या बचावासाठी धावली आणि बालकाची बोटे रोबोटच्या तावडीतून सोडवली.
रशियन चेस फेडरेशनचे उपाध्यक्ष सर्जी स्मॅजिन यांनी ‘बाझा’ला सांगितले, की रोबोटची चाल संपण्यापूर्वीच बालकाने चाल खेळण्याचा प्रयत्न केला. रोबोटसोबत खेळताना काही सुरक्षा नियम आहेत. या नियमांचे बालकाने उल्लंघन केले आहे. जेव्हा रोबोटने चाल खेळली तेव्हा बालकाने ती चाल पूर्ण होईपर्यंत वाट पाहायला हवी होती. तसे न करता त्वरित चाल खेळण्याचा प्रयत्न संकटास कारणीभूत ठरला आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे, जी मी पहिल्यांदाच पाहिली.
लाझारेव यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही चाल खेळता तेव्हा रोबोटला विचार करण्यासाठी वेळ द्यायला हवा. मात्र, बालकाने त्वरित प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केल्याने रोबोटने त्याची बोटे पकडली. रोबोट निर्मात्याने याबाबत आता नव्याने विचार करायला हवा.
‘बाझा’ने या बालकाचे नावा ख्रिस्तोफर असल्याचे सांगितले. तो मॉस्कोतील नऊ वर्षांखालील वयोगटात सर्वोत्तम 30 खेळाडूंपैकी एक होता. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मदत करून रोबोटच्या तावडीतून सोडवले खरे, पण बालकाच्या बोटांचे फ्रॅक्चर टाळता आले नाही.
लाझारेव म्हणाले, की ख्रिस्तोफरच्या बोटांना प्लास्टर केले असून, हल्ला जास्त तीव्र नव्हता. त्यामुळे बालकाने दुसऱ्या दिवशी स्पर्धेत सहभाग घेत ती पूर्ण केली. स्पर्धेतील स्वयंसेवकांनी चाली लिहिण्यासाठी त्याला मदत केली. या घटनेनंतर बालकाच्या पालकांनी थेट वकिलांचे ऑफिस गाठले. स्मॅजिन यांनी मात्र ही घटना एक संयोग असून, रोबोट खरोखर सुरक्षित होता, असे नमूद केले.