अबब! मायकेल फेल्प्स याच्या नावावर इतके विक्रम!
विश्वातला सर्वोत्तम जलतरणपटू मायकेल फेल्प्सचा जन्म ३० जून १९८५ रोजी अमेरिकेतील रॉजर फोर्जमध्ये झाला. ऑलिम्पिकमध्ये त्याच्या नावावर १८ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदकांची नोंद आहे. जलतरणात त्याने सात विश्वविक्रम नोंदविले होते. मायकेल फेल्प्सविषयी अनेकांनी हे माहीत नाही, की २००६ मध्ये त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी सांगितले, की त्याला आता पाण्यात अजिबात उतरू देऊ नका. यानंतर दोनच वर्षांनी २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. यामुळे मायकल फेल्प्सचे स्वप्न धुळीस मिळणार होते. त्याने डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, की मी पाण्यात जाणारच. पोहण्यासाठी हातांचा नाही, तर पायांचा उपयोग करीन. त्याच्या हितचिंतकांनी त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की अरे बाबा, तुझा सामना शेजारपाजाऱ्यांशी नाही, तर विश्वातील सर्वोत्तम जलतरणपटूंशी आहे. त्यामुळे पायाने पोहण्याचा अट्टहास करू नकोस. मायकेलने कोणाचेही ऐकले नाही. त्याने सराव सुरूच ठेवला आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदके जिंकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. या आठ सुवर्णपदकांमध्ये एक इव्हेंट १०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक या प्रकारचा होता. यात तो केवळ पायाच्या शेवटच्या स्ट्रोकमुळेच जिंकला. पायाने स्ट्रोक लावण्याच्या सरावाचा त्याला इथे फायदा झाला, ज्याला त्याचे हितचिंतक विरोध करीत होते. याच बीजिंग ऑलिम्पिकमुळे मायकेल फेल्प्स सर्वाधिक चर्चेत आला. त्याने मार्क स्पिट्झचा ३६ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला.
मायकेल फेल्प्सविषयी हे माहिती आहे काय? |
मायकेल फेल्प्सचा जन्म ३० जून १९८५ रोजी रिलँडच्या रॉजर फोर्ज (अमेरिका) येथे झाला. |
मायकेल फेल्प्सने पहिले ऑलिम्पिक पदक २००४ मध्ये अथेन्समध्ये जिंकले. |
मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत २३ सुवर्णपदकांसह २८ पदके जिंकली आहेत. जागतिक स्पर्धेत त्याने २६ सुवर्णपदकांसह ३३ पदके जिंकली आहेत. |
मायकेल फेल्प्सचे पाय १५ डिग्रीने झुकलेली आहेत. त्यामुळे त्याला वेगाने पोहण्यास सहाय्यभूत ठरतात. |
मायकेलची उंची सहा फूट ४ इंच आहे. त्याच्या नावावर सात विश्वविक्रमांची नोंद आहे. |
ऑलिम्पिक स्पर्धेत उतरण्याचे मायकेल फेल्प्सचे स्वप्न कदाचित धुळीस मिळाले असते. २००६ मध्ये त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी त्याला पुन्हा स्वीमिंग न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो २००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेस मुकला असता. मात्र, जिद्दीच्या जोरावर तो बीजिंग ऑलिम्पिक खेळलाच नाही तर विश्वविक्रम प्रस्थापित केले. |
मायकेल फेल्प्सने १९७२ मधील म्युनिक ऑलिम्पिकमधील मार्क स्पिट्जचा ३६ वर्षांपूर्वीचा ७ सुवर्णपदकांचा विक्रम मोडीत काढला. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मायकेलने ८ सुवर्णपदके जिंकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. |
मायकेल फेल्प्स याने केले 39 जागतिक विक्रम
मायकेल फेल्प्स जलतरणपटूंमध्ये सर्वश्रेष्ठ का आहे, हे त्याच्या विक्रमी कामगिरीवरून स्पष्ट होते. मायकेल फेल्प्स याने 39 जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यापैकी 29 वैयक्तिक, तर 10 रिले प्रकारातील विक्रमांचा समावेश आहे. फिना (FINA) या जलतरणातील सर्वोच्च संघटनेच्या मान्यताप्राप्त जलतरणपटूपेक्षा हे सर्वाधिक विक्रम आहेत. फिना म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डी नेशन. फ्रेंच भाषेतील नावाच्या आद्याक्षरांपासून बनलेला हा शब्द आहे. यालाच इंग्रजीत इंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशन म्हणून ओळखले जाते. फेल्प्सने मार्क स्पिट्झचा (Mark Spitz) 33 विश्वविक्रमांनाही (26 वैयक्तिक, 7 रिले) मागे टाकले.
मायकेल फेल्प्स याचे हे 39 जागतिक विक्रम माहीत आहेत काय? |
200 मीटर बटरफ्लाय
200 मीटर बटरफ्लाय प्रकारात मायकेल फेल्प्स याने जागतिक विक्रमांच्या राशी रचल्या असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने 30 मार्च 2001 रोजी अमेरिकेतील ऑस्टिन येथे झालेल्या स्पर्धेत 1:54.92 मिनिटांची वेळ नोंदवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीने मायकेलने आपलाच देशबंधू टॉम माल्चाव (Tom Malchow) याचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर मायकेल फेल्प्स याची स्वतःशीच स्पर्धा सुरू झाली. त्याने स्वतःचेच विश्वविक्रम मोडीत काढण्याचा सपाटा लावला. गंमत म्हणजे त्याने स्वतःचेच विक्रम 2001 ते 2009 या नऊ वर्षांच्या कालावधीत आठ वेळा मोडीत काढले. रोममध्ये 2009 मध्ये त्याने 1:51.51 मिनिटांची वेळ नोंदवत त्याने आठव्यांदा स्वतःचाच विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम 10 वर्षांपर्यंत अबाधित होता. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. कारण यापूर्वी जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत विक्रम अबाधित राहिले आहेत. मात्र फेल्प्सचा 2009 मध्ये 1:51.51 ही वेळ कोणालाही मोडीत काढता आली नव्हती. मात्र, हंगेरीच्या क्रिस्तोफ मिलाक (Kristóf Milák) याने दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे 1:50.73 वेळेची नोंद करीत मायकेल फेल्प्स याचा दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
200 मीटर बटरफ्लाय प्रकारातील मायकेल फेल्प्सचे विक्रम |
वेळ | देश | खेळाडू | तारीख | ठिकाण |
1:54.92 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 30 मार्च 2001 | ऑस्टिन, अमेरिका |
1:54.58 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 24 जुलै 2001 | फुकुओका, जपान |
1:53.93 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 22 जुलै 2003 | बार्सीलोना, स्पेन |
1:53.80 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 17 ऑगस्ट 2006 | व्हिक्टोरिया, कॅनडा |
1:53.71 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 17 फेब्रुवारी 2007 | कोलंबिया, अमेरिका |
1:52.09 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 28 मार्च 2007 | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
1:52.03 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 13 ऑगस्ट 2008 | बीजिंग, चीन |
1:51.51 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 29 जुलै 2009 | रोम, इटली |
1:50.73 | हंगेरी | क्रिस्तोफ मिलाक | 24 जुलै 2019 | ग्वांगझू, दक्षिण कोरिया |
400 मीटर वैयक्तिक मिडले
मिडले हा जलतरणातला एक प्रकार आहे, ज्यात चार प्रकारचे स्वीमिंग करावे लागते. बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्रीस्टाइल या चार प्रकारांचं मिश्रण म्हणजे मिडले प्रकार. यात फेल्प्सची हुकूमत त्याच्या विश्वविक्रमी कामगिरीतून स्पष्ट होते. यातही मायकेल फेल्प्स याने स्वतःचेच जागतिक विक्रम आठ वेळा मोडीत काढले आहेत. विशेष म्हणजे त्याचा 10 ऑगस्ट 2008 रोजी नोंदविलेल्या 4:03.84 मि. या वेळेचा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही. 2002 मध्ये अमेरिकेतच झालेल्या एका स्पर्धेत त्याने 4:11.09 अशी वेळ नोंदवत विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर त्याने स्वतःशीच स्पर्धा करीत स्वतःचेच विक्रम मोडीत काढले. त्याने 2002 ते 2008 या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल आठ वेळा विक्रम प्रस्थापित केले आहेत.
400 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारातील मायकेल फेल्प्स याचे विश्वविक्रम |
वेळ | देश | खेळाडू | तारीख | ठिकाण |
4:11.09 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 15 ऑगस्ट 2002 | फोर्ट लाउडरडेल, अमेरिका |
4:10.73 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 7 एप्रिल 2003 | इंडियानापोलिस, अमेरिका |
4:09.09 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 27 जुलै 2003 | बार्सीलोना, स्पेन |
4:08.41 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 7 जुलै 2004 | लाँग बीच, अमेरिका |
4:08.26 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 14 ऑगस्ट 2004 | अथेन्स, ग्रीस |
4:06.22 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 1 एप्रिल 2007 | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
4:05.25 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 29 जून 2008 | ओमाहा, अमेरिका |
4:03.84 | अमेरिका | मायकेल फेल्प्स | 10 ऑगस्ट 2008 | बीजिंग, चीन |
4 × 100 मीटर मिडले रिले
बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय, फ्रीस्टाइल अशा चार कौशल्यांचा मिलाफ म्हणजे मिडले रिले. वैयक्तिक मिडले आणि मिडले रिले या दोन्ही प्रकारांत कोणताही फरक नाही. फरक एवढाच, की वैयक्तिक प्रकारात चारही कौशल्यांचा एकच खेळाडू करतो, तर रिले प्रकारात चारही कौशल्यांसाठी वेगवेगळे खेळाडू असतात. मायकेल फेल्प्स बटरफ्लायमध्ये सहभागी झाला होता. त्याने 2002 मध्ये पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग नोंदवत या प्रकारात प्रथमच विश्वविक्रम नोंदवला. त्यानंतर 2008 व 2009 मध्ये मायकेल फेल्प्स याने सलग दोन वेळा जागतिक विक्रम नोंदवले.
वेळ | संघ | खेळाडू | तारीख/स्पर्धा | ठिकाण |
3:33.48 | अमेरिका | आरोन पीर्सोल (54.17), ब्रेंडन हान्सेन (1:00.14), मायकेल फेल्प्स (51.13), जेसन लेझाक (48.04) |
29 ऑगस्ट 2002/ पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिप |
योकोहामा, जपान |
3:31.54 | अमेरिका | आरोन पीर्सोल (53.71), ब्रेंडन हान्सेन (59.61), इयान क्रॉकर (50.39), जेसन लेझाक (47.83) |
27 जुलै 2003/ वर्ल्ड चॅम्पियनशिप |
बार्सीलोना, स्पेन |
3:30.68 | अमेरिका | आरोन पीर्सोल (53.45 WR), ब्रेंडन हान्सेन (59.37), इयान क्रॉकर (50.28), जेसन लेझाक (47.58) |
21 ऑगस्ट 2004/ अथेन्स ऑलिम्पिक |
ग्रीस |
3:29.34 | अमेरिका | आरोन पीर्सोल (53.16), ब्रेंडन हान्सेन (59.27), मायकेल फेल्प्स (50.15), जेसन लेझाक (46.76) |
17 ऑगस्ट 2008/ बीजिंग ऑलिम्पिक |
चीन |
3:27.28 | अमेरिका | आरोन पीर्सोल (52.19), एरिक शांतेऊ (58.57), मायकेल फेल्प्स (49.72), डेव्हिड वाल्टर्स (46.80) |
2 ऑगस्ट 2009/ वर्ल्ड चॅम्पियनशिप |
रोम, इटली |
3:26.78 | अमेरिका | अमेरिका रायन मर्फी (52.31), मायकेल अँड्र्यू (58.49), सीलेब ड्रेसेल (49.03), झाक अॅप्पल |
1 ऑगस्ट 2021/ टोकियो ऑलिम्पिक्स |
जपान |
200 मीटर वैयक्तिक मिडले
200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात मायकेल फेल्प्सने एकदोन नव्हे तर तब्बल 8 वेळा जागतिक विक्रम नोंदवले. त्याने फिनलंडचा जानी सिविनन याचा 1994 चा विक्रम 2003 मध्ये मोडीत काढला. त्यानंतर मायकेल फेल्प्सची स्वतःशीच स्पर्धा सुरू झाली. मायकेल फेल्प्स याने स्वतःचाच विक्रम सात वेळा मोडीत काढत नवनवे विश्वविक्रम प्रस्थापित केले. 2003 मध्ये त्याने दोन महिन्यात तीन वेळा विश्वविक्रम प्रस्थापित केले. 2008 मध्ये त्याने सातव्यांदा विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर पुढच्याच वर्षी अमेरिकेच्याच रायन लॉक्टे (Ryan Lochte) याने 2009 मध्येे त्याचा विक्रम मोडीत काढला. रायननेच 2011 मध्ये स्वतःचाच विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
वेळ | खेळाडू | तारीख | स्पर्धा | ठिकाण |
1:57.94 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 29 जून 2003 | सांता क्लारा इन्व्हिटेशनल | सांता क्लारा, कॅलिफोर्निया |
1:57.52 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 24 जुलै 2003 | वर्ल्ड चॅम्पियनशिप्स | बार्सीलोना, स्पेन |
1:56.04 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 25 जुलै 2003 | वर्ल्ड चॅम्पियनशिप्स | बार्सीलोना स्पेन |
1:55.94 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 9 ऑगस्ट 2003 | यूएसए समर नॅशनल्स | कॉलेज पार्क, मेरीलँड |
1:55.84 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 20 ऑगस्ट 2006 | पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिप्स | व्हिक्टोरिया, कॅनडा |
1:54.98 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 29 मार्च 2007 | वर्ल्ड चॅम्पियनशिप्स | मेलबर्न, व्हिक्टोरिया |
1:54.80 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 4 जुलै 2008 | ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा | ओमाहा, नेब्रास्का |
1:54.23 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 15 ऑगस्ट 2008 | बीजिंग ऑलिम्पिक्स | बीजिंग, चीन |
1:54.10 | रायन लॉक्टे, अमेरिका | 30 जुलै 2009 | वर्ल्ड चॅम्पियनशिप्स | रोम, इटली |
1:54.00 | रायन लॉक्टे, अमेरिका | 28 जुलै 2011 | वर्ल्ड चॅम्पियनशिप्स | शांघाय, चीन |
100 मीटर बटरफ्लायमध्ये औटघटकेचे विश्वविक्रम
100 मीटर बटरफ्लाय प्रकारात मायकेल फेल्प्स याने तीन वेळा विश्वविक्रम नोंदवले आहेत. त्याने या प्रकारात प्रथमच 2003 मध्ये जागतिक विक्रम नोंदवला होता. त्याचीही एक गंमत आहे. स्पेनमधील बार्सीलोना येथे 25 जुलै 2003 रोजी युक्रेनच्या आँद्रिय सर्डिनोव (Andriy Serdinov) याने ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लिम याचा 1999 चा विक्रम मोडीत काढला. आंद्रिय खूश झाला असेलच, पण त्याचा हा आनंद औटघटकेचा ठरला. त्याच दिवशी त्याच स्पर्धेत मायकेल फेल्प्स याने सर्डिनोवचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. मायकेल फेल्प्सही खूश झाला. मात्र तो हा आनंद चोवीस तासांपुरताच टिकला. कारण त्याच्या दुसऱ्याच दिवशी 26 जुलै 2003 रोजी अमेरिकेच्या इयान क्रॉकरने मायकेल फेल्प्सचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. नंतर 2005 पर्यंत सलग तीन वर्षे इयान क्रॉकरने स्वतःचेच विक्रम मोडीत काढले. मायकेल फेल्प्स याने 2009 मध्ये रोममध्ये विश्वविक्रम नोंदवला, जो तब्बल नऊ वर्षे त्याच्या नावावर होता. 2019 मध्ये सीलेब ड्रेसेलने त्याचा विक्रम मोडीत काढला. सीलेबनेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुन्हा नवा विक्रम प्रस्थापित केला.
वेळ | खेळाडू | तारीख | ठिकाण |
51.76 | आंद्रिय सर्डिनोव, युक्रेन | 25 जुलै 2003 | बार्सीलोना, स्पेन |
51.47 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 25 जुलै 2003 | बार्सीलोना, स्पेन |
50.98 | इयान क्रॉकर, अमेरिका | 26 जुलै 2003 | बार्सीलोना, स्पेन |
50.76 | इयान क्रॉकर, अमेरिका | 13 जुलै 2004 | लाँग बीच, अमेरिका |
50.40 | इयान क्रॉकर, अमेरिका | 30 जुलै 2005 | माँट्रिअल, कॅनडा |
50.22 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 9 जुलै 2009 | इंडियानापोलिस, अमेरिका |
50.01 | मिलोराड केव्हिक, सर्बिया | 31 जुलै 2009 | रोम, इटली |
49.82 | मायकेल फेल्प्स, अमेरिका | 1 ऑगस्ट 2009 | रोम, इटली |
49.50 | सीलेब ड्रेसेल, अमेरिका | 26 जुलै 2019 | ग्वांग्जू, दक्षिण कोरिया |
49.45 | सीलेब ड्रेसेल, अमेरिका | 31 जुलै 2021 | टोकियो, जपान |