पाचव्यांदा विजेता- 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला
कॅरेबियन बेटांवर (वेस्ट इंडीज) रंगलेला 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्ड कप) भारताच्या युवा संघाने पाचव्यांदा उंचावला. 5 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या या स्पर्धेतील भारताचा युवा संघाचं यश गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सेलिब्रेट करता आलं नाही. या स्पर्धेत भारताने अखेरपर्यंत एकही सामना गमावला नाही हे विशेष. राज बावाची अष्टपैलू कामगिरी आणि शेख रशीद, निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने युवा वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर उमटवली. भारताने हा सामना कसा जिंकला याविषयी…
भारताने अंतिम लढतीत इंग्लंडवर चार विकेटनी मात केली. ज्युनिअर क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतले हे भारताचे पाचवे विजेतेपद ठरले. यापूर्वी भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
इंग्लंडने 97 धावांत भारताचे चार खंदे फलंदाज तंबूत धाडले…
भारताने इंग्लंडला 189 धावांत रोखले. भारताला विजयासाठी हव्या होत्या 190 धावा. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशी (0), हरनूरसिंग (21), यश धुल (17) झटपट बाद झाले. या बिकट अवस्थेतून बाहेर काढले शेख रशीद याने. त्याने 84 चेंडूंत सहा चौकारांसह 50 धावा केल्या. पुढे तो या धावसंख्येत आणखी भर न घालता बाद झाला. भारताची अवस्था झाली 4 बाद 97.
निशांत सिंधू-राज बावा यांच्या भागीदारीने विजय समीप
आता जबाबदारी निशांत सिंधू आणि राज बावा यांच्यावर होती. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी रचली. सिंधू बाद झाल्याने ही जोडी फुटली. निशांतने 54 चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद 50 धावा केल्या. आता विजयासाठी हव्या होत्या फक्त 26 धावा. विजयाचा मार्ग प्रशस्त होत असतानाच राज आणि कौशल तांबे बाद झाले. राजने 54 चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह 35 धावा केल्या.नंतर दिनेश बाणा याने सलग दोन षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले..
रिवचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, हा निर्णय इंग्लंडच्या पथ्यावर पडला नाही. राज बावा आणि रविकुमार यांच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडची 6 बाद 61 अशी अवस्था झाली होती. मात्र, त्यानंतर जेम्स रिव याने अॅलेक्स हॉर्टनच्या साथीने इंग्लंडला शतकाच्या समीप पोचवले. कौशल तांबेने अॅलेक्सला बाद करून ही जोडी फोडली. त्या वेळी भारतीय संघ इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळणार असे वाटत होते. मात्र, जेम्स रिव आणि जेम्स सेल्स यांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडला 189 धावांपर्यंत मजल मारता आली. रिवचे शतक पाच धावांनी हुकले. त्याने 116 चेंडूंत 12 चौकारांसह 95 धावांची, तर सेल्सने 65 चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 34 धावा केल्या.
2022 मध्ये भारतीय संघ विजेतेपदासाठी का होता फेव्हरिट?
भारतीय संघाने दुबईत आशिया कप जिंकला. या विजेतेपदानंतर संघ थेट विंडीजमध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्ड कप) खेळण्यासाठी दाखल झाला होता. उत्तम फॉर्मात असलेल्या युवा भारतीय क्रिकेट संघाने यश धुलच्या नेतृत्वाखालील स्पर्धेतील दोन्ही सराव सामने जिंकले. हरनूरसिंग, दिल्लीचा यश, रशीद, राजवर्धन हंगर्गेकर यांनी आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे युवा भारतीय संघालाच विजेतेपदाचा सर्वाधिक दावेदार मानले जात होते.
प्रत्येक खेळाडूला 40 लाख
अंडर-19 वन-डे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा अहमदाबाद येथे सत्कार करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाख रुपयांचे, तर सहायक वर्गाला 25 लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले. अंतिम फेरीत इंग्लंडला नमविल्यानंतर भारतीय संघ गयाना येथील भारतीय उच्चायुक्ताला भेट दिली. विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय संघाला कॅरेबियनमध्ये फारसा वेळ मिळाला नाही. मायदेशात परतण्यासाठी त्यांना दीर्घ प्रवास करावा लागणार आहे. अहमदाबाद येथे पोहोचल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भारतीय वरिष्ठ संघही सध्या अहमदाबाद येथेच असल्याने त्यांच्याशी युवा खेळाडूंना संवाद साधता येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यश धुलकडे आयसीसी संघाचे नेतृत्व
आयसीसीने अंडर-19 वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून ‘मोस्ट व्हॅल्युएबल’ संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार यश धुलकडे सोपविण्यात आले आहे. यश व्यतिरिक्त राज बावा आणि विकी ओस्तवाल या दोन भारतीय खेळाडूंचाही या भारतीय संघात समावेश आहे. आयसीसी संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार) : हसीबुल खान (पाकिस्तान), टीग विली (ऑस्ट्रेलिया), डेवॉल्ड ब्रेव्हिस (द. आफ्रिका), यश धुल (कर्णधार, भारत), टॉम प्रेस्ट (इंग्लंड), दुनित वेल्लालागे (श्रीलंका), राज बावा (भारत), विकी ओस्तवाल (भारत), रिपन मोंडल (बांगलादेश), अवैस अली (पाकिस्तान), जोश बॉयडेन (इंग्लंड), नूर अहमद (अफगाणिस्तान).
हेही स्मरणात असूद्या…
A. 2022 चा 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्डकप) कधी आणि कुठे झाला? |
19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्डकप) स्पर्धेला 14 जानेवारी 2022 पासून सुरुवात झाली, तर 5 फेब्रुवारी 2022 रोजी स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंडमध्ये झाला. यात भारताने विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा कॅरेबियन बेटांवर खेळविण्यात आली. कॅरेबियन बेटांना प्रथमच या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला. या स्पर्धेत एकूण 48 सामने झाले. |
B. भारतीय संघाने युवा वर्ल्डकप कितव्यांदा जिंकला? |
भारतीय संघाने 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्ड कप) सर्वाधिक पाच वेळा जिंकला आहे. 2022 मध्येही भारतीय संघालाच विजेतेपदासाठी फेव्हरिट समजले जात होते आणि झालेही तसेच. भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये युवा वर्ल्ड कप उंचावला आहे. |
C. कोणत्या वर्षी भारतीय संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली? |
भारताने पाच वेळा विजेतेपद मिळवले. मात्र, भारतीय संघ आठ वेळा विजेता राहिला असता. कारण तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही भारत विजेतेपदापासून वंचित राहिला. 2006, 2016 आणि 2020 मध्ये भारताला 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत (युवा वर्ल्ड कप) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. |
2022 च्या युवा वर्ल्डकपविषयी हे माहीत आहे काय?
- 2022 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप (युवा वर्ल्डकप) स्पर्धेवर करोनाचे सावट होते. भारतासह अनेक देशांत ओमायक्रॉन (ओमिक्रॉन) विषाणूचे संकट होते. भारतीय संघाचे पाच खेळाडू कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडले होते.
- कोरोनामुळेच न्यूझीलंड संघाने स्पर्धेतून माघार घेतली. त्याऐवजी स्कॉटलंड संघाचा समावेश करण्यात आला.
- व्हिसाच्या समस्येमुळे अफगाणिस्तान संघ स्पर्धेत उशिरा पोहोचला.
- स्पर्धा जैवसुरक्षित (बायोबबल) वातावरणात होत असली तरी झिम्बाब्वे आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वीच करोनाचा फटका बसला.
- स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून, प्रत्येकी चार संघांचे चार गट तयार करण्यात आले.
- प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.
19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची गटवारी अशी होती
- बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, संयुक्त अरब अमराती
- भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा
- अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे
- ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज
भारताचे सामने कुठे झाले?
15 जानेवारी 2022 | 19 जानेवारी 2022 | 22 जानेवारी 2022 |
वि. दक्षिण आफ्रिका, प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना | वि. आयर्लंड, ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियम, त्रिनिदाद अँड टोबॅगो | वि. युगांडा, ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियम, त्रिनिदाद अँड टोबॅगो |
हे माहीत आहे काय?
480 | 22 | 191 |
युवा वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या. 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाने केनियाविरुद्ध 6 बाद 480 धावा केल्या होत्या. | युवा वर्ल्ड कपमधील नीचांकी धावसंख्या. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला 22.3 षटकांत 22 धावांत गुंडाळले होते. | श्रीलंकेच्या हसिथ बोयागोडाने केनियाविरुद्ध 152 चेंडूंत 191 धावांची खेळी केली होती. ही वर्ल्ड कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. |
भारताच्या पाच विजेत्या संघांचे कर्णधार
वर्ष 2000 | वर्ष 2008 | वर्ष 2012 | वर्ष 2018 | वर्ष 2022 |
महंमद कैफ (त्यानंतर भारतीय संघात) |
विराट कोहली (भारतीय संघाचा कर्णधारही होता) |
उन्मुक्त चंद (भारतीय संघात संधी नाही) |
पृथ्वी साव (भारतीय संघात संधी) |
यश धूल (अद्याप भारतीय संघात स्थान नाही) |
Follow on Facebook page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]