राज्यातील खुल्या मैदानांना निर्बंधांचा कोरोना


उपप्राचार्या व शारीरिक शिक्षण शिक्षिका
सेंट मीरा महाविद्यालय, पुणे
इन मुट्ठियों में चाँद तारे भर के,
आसमां की हद से गुज़र के,
हो जा तू भीड़ से जुदा,
भीड़ से जुदा…भीड़ से जुदा
हे ‘संजू’ चित्रपटातील ‘कर हर मैदान फतेह’ हे गाणं संजूबाबाला कमी आणि खेळाडूलाच अधिक चपखल बसतं. मात्र, मैदान फतेह करण्यासाठी मैदाने तर खुली असायला हवीत ना? गेली दीड वर्षे करोनाच्या जगभरातील प्रादुर्भावामुळे क्रीडाक्षेत्र बंदच होते… आता कुठे हळूहळू हे सर्व सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली होती. काही स्पर्धाही सुरू करण्यात आल्या होत्या. अचानक 8 जानेवारी 2022 रोजी पुन्हा शासन निर्णयानुसार सर्व क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आल्या. क्रीडा क्षेत्राला परवानगी नाकारण्यात आली. यंदाच्या नियमावलीनुसार सरकारने या वेळी निर्बंधाबाबत घोषणा करताना खेळाबाबत थेट निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे खेळाडू व क्रीडा संघटकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या अध्यादेशात मैदानावर खेळायचे नाही, असे कुठेही म्हटलेले नाही; पण मैदानावर खेळण्यास परवानगी आहे, असेही म्हटलेले नाही. त्यामुळे मैदानावर सराव करावा किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. हा संभ्रम इथेच संपत नाही. राज्य सरकारने निर्णय़ घेतला तरी तो लागू करायचा की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. पुण्यात 22 जानेवारी 2022 रोजी स्विमिंगला परवानगी दिली. मात्र, दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. याउलट मैदानांवर खे्ळण्यास परवानगी नाही. तेथेही हाच नियम नसता लावता आला असता का? हा निर्णय पुण्यापुरता आहे. नाशिकसह अन्य जिल्ह्यांत सर्वच खेळ बंद आहेत. त्यामुळे कोविडपेक्षा राज्यात खुल्या मैदानांना निर्बंधांचा कोरोना झाला आहे.
खरे तर या बाबतीत सरकारने क्रीडा क्षेत्राचा विचार करायला हवा. सरसकट सर्व खेळ, (जिम 50 टक्के क्षमतेने) योगा, स्विमिंग पूल, मैदाने बंद केलेली आहेत. सरकारने जर 50 टक्के क्षमतेने जिमला जशी सोशल डिस्टन्सिंग पाळून परवानगी दिली आहे, तशीच खेळाडूंना सरावाची तरी परवानगी देणे आवश्यक आहे. कोरोनामुळे एकीकडे सर्व खेळाडूंचे आधीच प्रचंड नुकसान झालेले असताना परत सर्व मैदाने बंद करणे म्हणजे क्रीडाक्षेत्राचे, पर्यायाने खेळाडूंचे प्रचंड नुकसान होत आहे.
मैदाने सुरू करण्यात यावेत या मागणीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शारीरिक क्षमता व तंदुरुस्तीचे महत्त्व. नियमित सराव केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरोना किंवा ओमायक्रॉन यांचा सामना करण्यासाठी शारीरिक क्षमता वाढवणे हा उत्तम पर्याय आहे. आज कोरोनाचा सामना करण्यास रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. ही रोगप्रतिकारशक्ती मैदाने आणि मैदानावर खेळत जाणारे खेळ, नियमित व्यायाम यामुळेच वाढू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. मात्र, सध्या सर्व मैदानांवर खेळाडूंना बंदी करण्यात आली आहे. हा एक प्रकारे निर्बंधाचा कोरोना आहे, जो खुल्या मैदानांना, पर्यायाने खेळाडूंना झाला आहे.
क्रीडा क्षेत्राद्वारे कोरोना पसरू शकतो असे समजून सगळे बंद करा, अशी भूमिका अयोग्य आहे. मैदाने बंद करणे हा उपाय नाहीच. क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर कसे येईल, याची काळजी घ्यायला हवी. खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये याकरिता क्रीडा क्षेत्रास परवानगी देण्यात यावी.
मागील दीड वर्ष कोव्हिडमध्ये लोकांच्या व्यायामावरही काही मर्यादा पडल्या. मात्र, त्यासाठी आपल्याला काही तरी मार्ग काढावा लागेल. कारण कोरोना वाढण्यामागे कुठे तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणे हेदेखील कारण आहे. आता घरी राहणे ही सक्ती बनली असली तरी मैदानावर कोणताही व्यायाम प्रकार एक तास जरी करता आला तरी आरोग्य उत्तम राहून शरीराचे वजन नियंत्रणात ठेवता येणे शक्य होईल.
खुल्या मैदानांना निर्बंधांचा कोरोना घातक
राज्यात खेळाडूंवर पुन्हा निर्बंध आले आहेत. खुल्या मैदाने बंद केली आहेत. खुल्या मैदानांना निर्बंधांचा कोरोना अधिक घातक आहे. व्यायामाला पर्याय नाही. व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य भाग असलाच पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निकषानुसार, प्रौढांनी शारीरिक हालचालींचा आठवड्यातून 150 मिनिटे हलका व्यायाम किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायाम केला पाहिजे. रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. सर्वच मोबाइलच्या जाळ्यात अडकले असले तरी दुसरीकडे तंदुरुस्तीचे महत्त्वदेखील पटलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा व्यायामाकडे वळण्याचा कल अधिक वाढला आहे. अशा वेळी मैदाने बंद राहिली तर त्यांच्याही व्यायामावर मर्यादा येणार आहेत, याचाही विचार व्हायलाच हवा. मैदाने सुरू ठेवणे हे केवळ खेळाडूंसाठी नाही तर सजग नागरिकांसाठीदेखील आवश्यक आहे.
शाळा (24 जानेवारी 2022 पासून) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, तर महाविद्यालयांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळेच शालेय क्रीडा स्पर्धेसमोर गेली दोन वर्षे प्रश्नचिन्ह आहेच. आता सर्वत्र लसीकरण होत आहे. त्यामुळे धोका थोडा कमी होईल. अद्याप क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, मैदानावर काम करणारे कर्मचारी वर्ग, व्यायामशाळांमधील कर्मचारी वर्ग यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह आहेच. त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या बंदीला कंटाळून अनेकांनी खेळ सोडला आणि इतर क्षेत्रांमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. या सर्व बाबींवर सरकारने विचार करावा आणि सर्व ती काळजी घेऊनच सरावास परवानगी द्यावी ही सरकारला विनंती आहे. त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
पुण्यात म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत डिसेंबर 2018 मध्ये भरलेल्या खेलो इंडिया युवक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने ‘आणखी पाच मिनिटे खेळू दे’ अशी साद घालणारी एक जाहिरात तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘खेलेगा इंडिया तभी तो खिलेगा इंडिया’ हे आवाहनही घराघरांत सर्व प्रसारमाध्यमांतून पोहोचवले गेले होते. हे क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी केलेल पद्धतशीर प्रयत्न होते. खेळ दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. या खेलो इंडिया स्पर्धेच्या वेळेस शालेय अभ्यासक्रमात रोज एक तास तरी खेळण्याकरिता राखून ठेवला पाहिजे, अशी घोषणाही झाली होती. त्या वेळी केलेल्या प्रयत्नाला यश येऊन आजच्या युवकांचा निश्चितच सहभाग वाढला आहे.
तरुणांमध्ये रोज मैदानावर जायची आज तयारी आहे. मात्र, दुर्दैवाने गेले दीड वर्ष आता मैदानेच बंद आहेत. तरुणांचे मानसिक आरोग्य चांगले राहाण्याकरिता त्याने रोज मैदानावर जाऊन घाम गाळला पाहिजे. त्याच्या अंगातील ताकदीचा योग्य वापर झाला तर त्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील व शारीरिक सुदृढता वाढीस लागेल. लॉकडाउननंतर नुकतेच परत सर्व सुरळीत सुरू झाले आहे असे वाटत असताना क्रीडा क्षेत्र परत एकदा बंद करून या खेळाडूंची मोठी अडचण झाली आहे. हे तरुण रोज खेळले तर देशातील अनेक समस्यांना समर्थपणे तोंड देतील.
जलतरण तलावच का? इतरही मैदाने खुली व्हावीत
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. ज्यांनी दोन डोस पूर्ण केले असतील त्यांनाच जलतरण तलावात सराव करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, 15 वर्षांखालील मुलांना जलतरण सराव करता येणार नाही. ज्या पिढीला शिकायचे आहे, त्यांना तर जलतरण बंदच राहणार आहे. म्हणजे नवी पिढी जलतरणाचं कौशल्यच हरवलेली पाहायला मिळेल. आणखी एक निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे उद्याने फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहेत. मात्र, मैदाने बंदच राहतील. काय साध्य होणार आहे या निर्णयाने? मैदानांवर कोरोनाचा धोका आणि उद्यानांत मात्र हा कोरोना फिरकत नाही असे समजायचे का? राज्यातील अन्य शहरांमध्ये तर जलतरण तलाव, मैदाने बंदच आहेत.
मुलांची चिडचिड वाढली
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्र्कीनटाइम निश्चितच वाढलेला आहे. रात्रीचे जागरण वाढले आहे. सतत टीव्ही आणि मोबाइलवर वेळ घालवला जातोय. मित्र-मैत्रिणींशी दुरावा झाला. सारखे घरी राहून त्यांच्यात चिडचिड आणि तणाव वाढतोय. मुलांसाठी ही स्थिती गंभीर आहे. मोबाइल दिला नाही म्हणून नाशिकमध्ये एका बारा वर्षीय मुलाने 21 जानेवारी 2022 रोजी आत्महत्या केली. ही नाशिकमधील दुसरी घटना आहे. वीस दिवसांपूर्वी एका बारा वर्षीय मुलीने शाळेत अस्वस्थ वाटते म्हणून आत्महत्या केली. हे कशाचे द्योतक आहे? मुलांमधील वर्तनात होणाऱ्या या बदलाला कोण जबाबदार आहे? म्हणूनच मुलांचा स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी मैदाने खुली करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून खेळण्यास परवानगी दिली तर खेळाडू अधिक समर्थ व सक्षम होतील.
राज्य सरकारच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
कोरोना संकटकाळात काय आहेत शारीरिक शिक्षणासमोरील आव्हाने?
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]