निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंमुळे श्रीलंका क्रिकेट चिंतेत
गेल्या काही महिन्यांत निवृत्ती घेणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंमुळे श्रीलंका क्रिकेट समिती (एसएलसी) चिंतेत आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंसाठी श्रीलंका क्रिकेट समितीने (एसएलसी) 8 जानेवारी 2022 रोजी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार निवृत्ती घेण्यापूर्वी खेळाडूला तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल. त्याचबरोबर फ्रँचायजी आधारित टी20 लीग खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट समितीचे एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) निवृत्तीनंतर सहा महिन्यांनी मिळेल.
खेळाडूंना सध्या व्यावसायिक क्रिकेटमधून भरघोस पैसे कमावण्याची संधी निर्माण झाल्या आहेत. अलीकडेच जानेवारी 2022 मध्येच भानुका राजपक्षा आणि दनुष्का गुणातिलक यांनी ऐन तिशीत एकापाठोपाठ निवृ्त्ती घेतली. श्रीलंकेत टी20 लीगने तर अनेक खेळाडूंना आकर्षित केले आहे. मात्र, राष्ट्रीय संघातील बंधनामुळे या लीगमध्ये खेळणे अशक्य असल्याने खेळाडू निवृत्तीचा मार्ग पत्करत आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेची तंदुरुस्ती चाचणीही जाचक ठरत आहे. स्थानिक टी20 लीगकडे वाढता ओघ पाहता आता श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार श्रीलंका प्रीमियर लीग (एलपीएल) मध्ये खेळण्यासाठी मोसमात कमीत कमी 80 टक्के सामने खेळावे लागतील.
श्रीलंका क्रिकेट समितीने (एसएलसी) दनुष्का गुणातिलक आणि भानुका राजपक्षा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. गुणातिलक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर राजपक्षा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वच प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.
एसएलसीने 8 जानेवारी 2022 रोजी सांगितले, ‘‘राष्ट्रीय क्रिकेट संघातून निवृत्ती घेण्याची इच्छा असलेल्या खेळाडूंना तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल.’’
त्यांच्या मतानुसार, ‘‘निवृ्त्ती घेतल्यानंतर खेळाडू विदेशी फ्रँचायजी लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) सादर करावी लागते. मात्र, ही एनओसी आता निवृत्ती घेतल्याच्या तारखेनंतर सहा महिन्यांनी दिली जाईल.’’
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले, ‘‘निवृत्ती घेतलेले राष्ट्रीय खेळाडू एलपीएलसारख्या स्थानिक लीगमध्ये खेळण्यास तेव्हाच पात्र ठरतील, जेव्हा लीगच्या पहिल्या सत्रात स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये 80 टक्के सामने खेळले असतील.’’
एसएलसी सध्या खेळाडूंच्या निवृत्तीमुळे चिंताग्रस्त आहे. खेळाडूंच्या निवृ्त्तीमागचे कारण स्कीनफोल्ड फिटनेस चाचणी असल्याचे मानले जात आहे. निवृत्ती रोखण्यासाठी श्रीलंकेला अखेर मार्गदर्शक सूचना जारी करावी लागली आहे. असे असले तरी श्रीलंका या जाचक चाचणीवर पुनर्विचार करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही.
श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षा अवघ्या तिशीत निवृत्त
Follow on facebook page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]