गुडबाय डीके
डीके गेले… मन सुन्न झालं. सोमाणीनंतर पटावरचा आणखी एक मोहरा गळाला.
विस्कटलेले पांढरेशुभ्र केस… सुरकुत्या पडलेले कपडे आणि चेहऱ्यावर कमालीची चिंता… ही छबी डोळ्यांसमोरून अजिबात जात नव्हती. डीकेंनी 31 ऑक्टोबरला प्राण सोडले. कोणालाच माहिती नाही. अखेर पाच दिवसांनी एकेकाला समजलं, की डीके गेले. तेव्हा धक्काच बसला.
डीकेंचं पूर्ण नाव माहीत नाही, पण डी. के. पाटील त्यांना म्हणायचे. त्यांचं नाव दत्तात्रेय पाटील (आताच कळलं). एरंडोलवरून ते जळगावात खेळायला यायचे. नाशिकमध्येही ते खेळले. मात्र, जेथे खेळायचे, तेथे ते पाच-पाच दिवसांचा डबा एकदमच बांधून न्यायचे. एकदा तर ते कोलकात्याला खेळायला गेले. फास्ट ट्रेनला पैसे लागतात म्हणून ते पॅसेंजर पाहूनच प्रवास करायचे. हा प्रवास कसा केला असेल त्याचे त्यांनाच माहीत. मात्र, हौशी खेळाडूचं हे खेळावरचं प्रेम शब्दात बांधता येणार नाही…
त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बुद्धिबळाला वाहिलं. जगला मात्र बुद्धिबळातल्या राजासारखा- मर्यादित आणि हेल्पलेस!
डीके एकेक महिना घराबाहेर निघत नव्हते. महाविद्यालयीन जीवनात तर त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. तासन् तास पटावरील चालींचा अभ्यास करायचे. डीकेंचं बुद्धिबळवेड पराकोटीचं होतं. म्हणजे चार-पाच दिवसांची स्पर्धा खेळायला जायचं असेल तर डीके पोटाला चिमटा घेऊनच खेळायचे. एकदा ते एका स्पर्धेला निघाले, तेव्हा त्यांनी चार-पाच दिवसांच्या दशम्या आणि चटणी बांधून आणली होती. चार-पाच दिवस त्यांना हा डबा पुरायचा. कुणाला कळलं तर तो त्यांना जेवायला घेऊन जायचा, चहा प्यायला न्यायचा. कुणीच काही दिलं नाही तर मग त्यांच्या दशम्या होत्याच… काय म्हणावं या आवडीला? अनेकांना यशाचा ध्यास असतो, पण यशाची अपेक्षा न करता निष्काम कर्मयोग्यासारखं डीकेंचं हे खेळावरचं प्रेम तुम्ही कोणत्या यशात मोजणार? पुरस्कार, बक्षिसांच्या राशी जिंकणाऱ्यालाच मिळतात, मात्र खेळासाठी इतकं निरागस आणि पराकोटीचं प्रेम करणाऱ्या अवलियांच्या वाट्याला काहीही मिळत नाही.
डीकेंंचं आयुष्य प्रचंड गरिबीत गेलं. सुरुवातीला तर जमीनही नव्हती. वयाची साठी आली तरी अर्थार्जनाचं काहीच साधन नव्हतं. सातआठ वर्षांपूर्वी त्यांना शेती मिळाली; पण पैसा तर काहीच नव्हता. शेती कसायची. त्यातून काहीही मिळत नव्हतं. पोट भरायला जे काही हाती यायचं त्यावर कसंबसं त्यांचं धकत होतं. अशा परिस्थितीत डीकेंनी बुद्धिबळ खेळ तरी का जपावा? गरिबाने शौक करायचे नसतात. डीकेंनी मात्र बुद्धिबळाचा शौक केला. इतका, की त्यावर अंबानी, अदानींची श्रीमंतीही फिकी पडावी!
डीके गेल्यानंतर प्रत्येकाला फोन गेला. प्रत्येक जण एकमेकांना एकच प्रश्न विचारायचे, तुझ्याकडे डीकेंचा फोटो आहे का?
मी म्हणालो, अरे, डीकेंचा फोटो नाही? मग त्यांच्या घरी विचारून पाहा…
उत्तर… डीकेंच्या घरचेही डीकेंचा फोटो शोधताय!
मी उडालोच.. घरच्यांकडेही फोटो नाही?
उत्तर… नाही ना… त्यांच्याकडे जुना फोटो असेल… अलीकडचा फोटोच नाही.
आता याला काय म्हणावं?
डीकेनेही कधी फोटोचा अट्टहास धरला नाही. पण एक आहे, डीकेची छबी प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात डीके टिपलेला आहे. काहींच्या फोटोत तो विक्षिप्त असेल, काहींच्या फोटोत भाबडा, तर काहींच्या फोटोत गांजलेला. त्यांची ही नानाविध रूपे प्रत्येकाच्या नेत्रज्योतीच्या लेन्सनुसार असू शकतील. पण डीके प्रचंड बुद्धिबळवेडा होता. तासन् तास तो त्या बुद्धिबळाच्या पटावर काय विचार करायचा कोणास ठाऊक?
खेळतानाही डीकेची छबी प्रचंड विचारात गढलेली असायची. इतकी, की जणू त्याने इस्टेट पणाला लावलीय? (गमतीने)
इस्टेटीवरून आठवलं… डीकेंची तीनचार बिघा शेती कुणी तरी हडपली होती. एरंडोलला लागून ही जमीन आहे. असं म्हणतात, की एकदीड कोटीची ही जमीन आहे. तेव्हा त्यांच्या बहिणीने हिमतीने केस लढली आणि जमीन सोडवली. याच जमिनीवर डीके व त्यांच्या भावंडांनी उदरनिर्वाह केला. एक भाऊ, दोन बहिणी ही तीन भावंडं सोडली तर डीकेच्या मागे तसं कुणीही नाही. ना मुलगा ना बायको. डीके विनापाश होता.
तसंही डीकेंच्या घरात सगळेच विनापाश. कुणाच्याही आगेपीछे कुणी नाही. डीके घरात सहा भावंडांतले सर्वांत थोरले. दोन भावांनी यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. आता डीकेही गेले.
डीकेंच्या भावाशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, की घरात एकाही भावाचं लग्न झालेलं नाही. लाइनच तुटली ती. काही गोष्टी तशा असतात. त्या सामाजिक गोष्टी आहेत. घरात वट लागायचा. जुनी परंपरा आहे ती. आता तसं काही राहिलेलं नाही. पण आता वेळ निघून गेलीय.
मला यातलं काही कळलं नाही. वट लागणं काय असतं काहीच माहीत नाही. पण डीके विनापाश राहिला आणि तसाच जग सोडून गेला. तीन भावंडं सोडली तर एक बुद्धिबळाचा पट आणि पोतंभर बुद्धिबळाची पुस्तकं तेवढी मागे ठेवून गेला.
1700 पेक्षा अधिक एलो रेटिंग असलेल्या डीकेची नंतर खेळात घसरणही झाली. डीके या आकड्यांमध्ये कधीच अडकला नाही. तो फक्त खेळत राहिला- आनंदासाठी.
त्यांच्या भावाला विचारलं, त्याचं वय काय असेल?
भावाला त्यांचं वय सांगता येईना. पण जवळच त्यांचे काका होते.
भाऊ म्हणाले, हे बघा माझ्या काकांपेक्षा ते तीन वर्षांनी मोठे होते असे सांगत काकांना विचारलं, तुमचं वय काय?
काकांच्या वयावरून डीकेंच्या वयाचा आकडा निघाला, तोही फिक्स नाही.
भाऊ म्हणाले, त्याचं वय 68-69 असेल.
मी हे सगळंच ऐकून अचंबित झालो आणि स्वतःलाच दोष देऊ लागलो… आपण एवढी वर्षे डीकेंना पाहत होतो. पण कधीच त्यांची विचारपूसही केली नाही? पटावरची मोहरी कृत्रिम होती, पण त्या मोहऱ्यांची किती काळजी घेत बसायचो! पण या मोहऱ्यांचा कर्ताधर्ता माणूस कधी समजूनच घेतला नाही. जग सोडून गेल्यावर डीकेंची मूर्ती डोळ्यांसमोर तरळून गेली. त्याची छबीही कशी आठवते… तर पटावर प्रचंड विचारात गढलेली! त्यामागची दुसरी छबी कितीही स्मृतींना ताण दिला तरी आठवतच नाही. कशी आठवेल? कधी ती जाणूनच घेतली नाही! मीच काय, कुणीच नाही…!
डीकेंनी अनेकांना बुद्धिबळ शिकवलं. अगदी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता डीके मार्गदर्शन करायचे. म्हसावदचा भरत आमलेलाही डीकेंनीच शिकवलं. हा भरत अनेक ठिकाणी खेळायचा. आता बुद्धिबळाचे क्लासही घेतो. भरतचं गाव डीकेंच्या एरंडोलपासून 15 किलोमीटरवर. डीके त्याला शिकवायला कधी कधी पायीही जायचा. कारण खिशात पैसे नाहीत. मला नाही वाटत, डीकेंसारखं बुद्धिबळप्रेम कुणाकडे असू शकेल? अगदी ग्रँडमास्टरकडेही नसेल. भरतला जेव्हा कळलं, डीके गेले. तेव्हा तो ढसाढसा रडला. कुटुंबात दुःख होतंच… पण रक्ताच्या नात्यापलीकडेही जेव्हा अश्रूंचे पाट वाहतात, तेव्हा डीके कधी विनापाश वाटत नाही. भलेही तो स्वतःला एकटा समजत असेल. पण त्याने नकळत काही माणसंही कमावली होती. अगदी कस्तुरीमृगासारखी. दुर्दैव एवढंच, की ती त्याला शेवटपर्यंत कळली नाहीत.
स्पर्धा कुठेही असो, डीके तिथे जाण्याचे मनसुबे रचणार नाही तरच नवल. खिशात पैसे असो नसो, स्पर्धा खेळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची. ही तगमग हौशी खेळाडूंशिवाय दुसरं कोणी जाणू शकणार नाही. आनंदासाठी, आवडीसाठी खेळणाऱ्यांचा कोणी वाली नसतो. डीकेंचाही कोणी नव्हताच. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून ते खेळले नाही. आर्थिक विवंचना हे त्यामागचं कारण होतंच, शिवाय या कम्प्युटरच्या जमान्यात त्यांचं खेळण्यावरचं मनच उडालं. अगदी लहानसान मुलंही उत्तम खेळू लागली. डीके मात्र जुनीपानी पुस्तकं खंगाळत बुद्धिबळाच्या नवनव्या चाली शोधायचा. त्यालाही मर्यादा होतीच. त्यामुळे तासन् तास पटावरच्या मोहऱ्या उलटसुलट करून डीकेही विटला… कम्प्युटरयुगात डीके एकटा पडला होता. वयाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत डीकेकडे मोबाइलही नव्हता. त्याला आता वयानुरूप खेळ झेपंना. दोन महिन्यांपासून तर त्यांचं शरीरही त्यांना साथ देईना. शनिवारी, 30 ऑक्टोबरच्या सायंकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. नंतर त्याने कुणाला फार काळजीत ठेवलं नाही. रविवारी, 31 ऑक्टोबरला सायंकाळी 5.57 वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक चालताफिरता माणूस या जगातून अचानक नाहीसा झाला, हे कुणालाही कळलं नाही. त्यांचं दशक्रिया विधी जवळ आला असताना त्यांच्या फोटोची शोधाशोध सुरू झाली नि तेव्हा त्यांच्या इतर मित्रांना कळलं, की डीके या जगातच नाहीत.
आयुष्यभर बुद्धिबळ खेळण्यासाठी धडपडणारा डीके आता पुन्हा कधीच दिसणार नाही. दिवसरात्र तासन् तास बुद्धिबळाचा अभ्यास करूनही डीके या खेळात फारसा पुढे जाऊ शकला नाही ही खंत त्यांनाही सलत असेल. त्यांचं मन त्यांना खात असेल. पण मला डीके नेहमीच जीनिअस वाटले. पटावरच्या गुंतागुंतीच्या चाली शोधणारे डीके जीनिअसच होते. त्यांनी अखेरच्या टप्प्यात एक जीनिअस चाल खेळली, या जगाचा निरोप घेण्याची. एका झटक्यात त्यांनी आयुष्याचं गणित सोडवलं. ही चाल त्यांनी अनेक वर्षे राखून ठेवली होती. त्यांच्यासाठी ही सरप्राइज चाल असेल, पण आमच्यासाठी धक्कादायक.
गुडबाय डीके…
डीकेंच्या आठवणीतला 21 वर्षांपूर्वीचा एक डाव
Event | State Open |
Round | 11 |
White | D K Patil, Erandol |
Black | P K Karankar, Bhusawal |
Date | 13 Jan. 1999 |
1. d4 d5 2. c4 c6 3. Nc3 Nf6 4. Nf3 Bf5 5. Nh4 Bg6 6. Ng6 hg6 7. Qh3 Qc7 8. cd5 Nd5 9. Nd5 cd5 10. g3 e6 11. Bg2 Nc6 12. 0-0 Nd4 13. Qa4 Nc6 14. e4! d4! 15. e5 Bc5 16. b4 Bb6 17. Ba3! 0-0 18. Rac1 Qe5 19. b5 Na5 20. Bb4 a6 21. ba6 Rfb8 22. Rfe1 Qf5 23. ab7 Nb7 24. Qd7 Ra2 25. f4! d3+ 26. Kh1 Kh7 27. Re5 Qg4 28. Qd3 Rd8 29. Qb3 Ra2 30.h3! Rb2! 31. Qb2 Qg3 32. Be1 Qf4 33. Re4 Qd6 34. Rc6 Qd1 35. Qb6 f5 36. Rh4+ Kg8 37. Rc1 Qc1 38. Qe6 Kf8 39. Rh8
1-0
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_hero_8 include_category=”60″ sort_by=”oldest”]
खूप छान आर्टिकल ओघवती भाषा, साधी वाक्यरचना, यामुळे लेख वाचनीय झालाय.
Thank you Anant