सारा टेलर ही महिला फलंदाज होणार पुरुष संघाची प्रशिक्षक
कालानुरूप बदल अपेक्षितच असतात. महिला संघाचा प्रशिक्षक एक तर पुरुष असतो किंवा महिला. मात्र, पुरुष संघाचा प्रशिक्षक महिला असणे अनेकांच्या पचनी पडत नसायचं. अगदी टेनिसमध्येही असंच होतं. मात्र, काही वर्षांपूर्वी इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरे याने फ्रान्सच्या अमेली मॉरिस्मो या महिलेची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. त्या वेळी तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता आणखी एक क्रांतिकारी पाऊल एका महिलेने टाकले आहे. इंग्लंडची माजी यष्टिरक्षक फलंदाज सारा टेलर एका पुरुष क्रिकेट संघाची प्रशिक्षक झाली आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या कक्षा रुंदावल्या म्हणाव्या की लिंगसमानतेच्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणावे? असो, ही अत्यंत चांगली बाब म्हणावी लागेल यात शंका नाही.
इंग्लंडची माजी यष्टिरक्षक फलंदाज सारा टेलर ‘टीम अबुधाबी’ची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाली आहे. अबुधाबीत 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी10 लीगमध्ये तिचा संघ सहभागी होणार आहे. पुरुषांच्या व्यावसायिक फ्रँचायजी क्रिकेटमध्ये ती पहिलीच महिला प्रशिक्षक आहे. क्रिकेटमध्ये सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक मानली जाणारी टेलर यापूर्वी इंग्लंडमध्ये ससेक्स या पुरुषांच्या कौंटी संघाची पहिली विशेषज्ञ महिला प्रशिक्षक झाली होती. आता टी 10 लीगमध्ये ती टीम अबुधाबीची सहाय्यक महिला प्रशिक्षक झाली आहे. या नियुक्तीनंतर टेलर म्हणाली, की मला आशा आहे, की माझी नियुक्ती जगभरातील महिलांना प्रेरित करेल.
टेलर म्हणाली, ‘‘फ्रँचायजीच्या विश्वात आल्यानंतर तुम्हाला अनेक देशांतील खेळाडू आणि प्रशिक्षकांशी भेटण्याची संधी मिळते. मला फार छान वाटत आहे, की एखादी तरुण मुलगी किंवा महिला मला पाहून विचार करू शकते, की मीही असेच काही तरी करू शकेन. ती म्हणू शकते, की ‘जर सारा असे करू शकते, तर मी का नाही?’।’’
टेलरने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने 10 कसोटी, 126 एकदिवसीय आणि 90 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. ती म्हणाली, ‘‘मला पुरुषांसोबत काम करण्यात कोणतीही अडचण नाही. आव्हाने स्वीकारण्यात मला आनंद वाटतो.’’ सारा टेलर संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांची सहाय्यक असेल.
टीम अबूधाबीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू लान्स क्लुजनर यांचीही सेवा घेतली आहे. सध्या ते टी 20 विश्वकप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″]