धक्कादायक! सौराष्ट्राच्या २९ वर्षीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराने निधन
राजकोट/अहमदाबाद
सौराष्ट्राचा फलंदाज आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधाराचं अवघ्या २९ व्या वर्षी निधन झालं. हा दुर्दैवी क्रिकेटपटू आहे अवी बरोट. हृदयविकाराने शुक्रवारी त्याचे निधन झाले. यामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
२०१९-२० च्या सत्रात सौराष्ट्राने रणजी करंडक जिंकला होता. या संघात अवी बरोटचा समावेश होता. सौराष्ट्राव्यतिरिक्त अवी बरोट याने हरयाणा आणि गुजरातच्या संघाचंही प्रतिनिधित्व केलं होतं. अहमदाबाद येथील रहिवासी असलेला अवी बरोट याला घरी शुक्रवारी अस्वस्थ वाटत होतं. त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र, वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. बरोटच्या मागे आई आणि गर्भवती पत्नी आहे.
अवी बरोटच्या निधनाचा सौराष्ट्र क्रिकेट संघटनेलाही (एससीए) मोठा धक्का बसला आहे. संघटनेचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी सांगितले, ‘‘अवीला जेव्हा अस्वस्थ वाटले तेव्हा तो घरीच होता. त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. तो अतिशय उत्साही मुलगा होता. त्याची प्रतिभा पाहूनच मी त्याला हरयाणातून सौराष्ट्रात आणलं होतं. त्याने प्रथमश्रेणी करिअर हरयाणात सुरू केलं होतं.’’
बरोट परिवार पोरका
अवी बरोट याचं निधन चटका लावणारं आहे. त्याच्या वडिलांचं निधन अवघ्या 42 व्या वर्षी झालं होतं. त्यामुळे घराची संपूर्ण मदार अवीवर होती. आता अवीचंही अकाली निधन झाल्याने बरोट परिवारावर दु:खाची कुऱ्हाड कोसळली आहे. आता बरोट परिवारात अवीची आई आणि पत्नीच आहे. अवीची पत्नी चार महिन्यांची गर्भवती आहे. अवीच्या निधनाचा मोठा धक्का आई आणि पत्नीला बसला आहे.
बरोट गेल्या आठवड्यात स्थानिक स्पर्धेत खेळला होता. तो उजव्या हाताचा उत्तम फलंदाज होताच, शिवाय ऑफब्रेक गोलंदाजीही करायचा. संघटनेचे सचिव शहा यांना विश्वासच बसत नाही, की अवी हे जग सोडून गेला आहे. सगळेच त्याच्या निधनाच्या वृत्ताने नि:शब्द झाले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यस्तरीय जीवन ट्रॉफी स्पर्धेत तो खेळला होता. त्या वेळी शहा त्याला म्हणाले, “तू धावा काढतोय, पण आरामात काढ.” त्या वेळी अवी म्हणाला, “जयदेवभाई आपल्या ही स्पर्धा जिंकायचीय.’’
अवी बरोट याने 38 प्रथमश्रेणी सामने, 38 अ श्रेणीचे सामने आणि 20 स्थानिक टी 20 सामने खेळला. तो यष्टिरक्षक फलंदाज होता. अवी बरोट याने प्रथम श्रेणी सामन्यांत 1,547, अ श्रेणीतील सामन्यांत 1,030 आणि टी 20 सामन्यांत 717 धावा केल्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनीही बरोट याच्या निधनावर शोक व्यक्त केला. रणजी करंडक जिंकणाऱ्या सौराष्ट्र संघात अवी बरोट होता. त्याने बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले होते. सौराष्ट्राने दोन वेळा रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या दोन्ही वेळा अवी बरोट संघात होता. सौराष्ट्राच्या संघाने 2015-16 आणि 2018-19 मध्ये रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
बरोट याने सौराष्ट्रासाठी 21 रणजी सामने, अ श्रेणीचे १७ सामने आणि स्थानिक टी20 चे 11 सामने खेळविण्यात आले होते. बरोट 2011 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार होता. तत्पूर्वी त्याने गुजरातसाठी कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेत चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो खेळला होता. गोवा संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 53 चेंडूंत 122 धावांची शानदार शतकी खेळी साकारली होती. या कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा तो फॅन होता. 2013 मध्ये लाहली येथे तेंडुलकरने रणजी स्पर्धेतील कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळला होता. त्या वेळी अवी बरोट हरयाणाच्या संघात होता. अर्थात, त्या वेळी तो सामना खेळला नाही. मात्र, तेंडुलकर संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी आला होता.
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]