अमेरिकन ओपन टेनिस : ब्रिटनची राडुकानू विजेती

ब्रिटनची एमा राडुकानू हिने शनिवारी, 12 सप्टेंबर 2021 रोजी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तिने कॅनडाच्या लेला फर्नांडिस हिला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
ब्रिटनची किशोरवयीन टेनिस खेळाडू एमा राडुकानू प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी झाली होती. यापूर्वी ती केवळ एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी झाली होती. एमा राडुकानू हिने पात्रता मिळविल्यानंतर अमेरिकन ओपनचं तिकीट बुक केलं होतं. जर ती मुख्य फेरीत पोहोचली नसती तर तिला रिकाम्या हाती परतावं लागलं असतं.
आर्थर ऐश स्टेडियमवर अंतिम फेरी ऐतिहासिक ठरली. राडुकानूने 19 वर्षीय लेला फर्नांडिसला 6-4, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तिचा क्वालिफायर ते चॅम्पियन हा प्रवास थक्क करणारा आहे.
विजेतेपद मिळविल्यानंतर एमा राडुकानू म्हणाली, ‘‘मला वाटतं, महिला गटातील मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला स्पर्धा जिंकण्याची संधी होती.’’
ब्रिटनच्या 18 वर्षीय एमा राडुकानू हिने फ्लशिंग मिडोजवर सलग 10 सामने जिंकत जेतेपदावर नाव कोरले. तिने क्वालीफायरमध्ये तीन आणि नंतर मुख्य फेरीत सात सामने जिंकले. ती 2014 नंतर ती पहिलीच महिला टेनिसपटू आहे, जिने एकही सेट न गमावता अमेरिकन ओपनचा किताब जिंकला.
अमेरिकी ओपनच्या इतिहासात 1999 नंतर ही पहिलीच घटना आहे, जेथे दोन किशोरवयीन खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होत्या. 1999 मध्ये 17 वर्षीय सेरेना आणि 18 वर्षीय मार्टिना हिंगिस या दोघींमध्ये अंतिम फेरी झाली होती. 1968 मध्ये व्यावसायिक टेनिस स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही पहिलीच स्पर्धा होती, ज्यात दोन बिगरमानांकित महिला खेळाडू अंतिम फेरीत आमनेसामने आल्या होत्या.
ट्रॉफी वितरण सोहळ्यात लेलाच्या डोळ्यांत अश्रू होते. ती म्हणाली, ‘‘मला आशा आहे, की मी इथे पुन्हा अंतिम फेरीत स्थान मिळवेन आणि त्या वेळी माझ्या हातात जेतेपदाची ट्रॉफी असेल.’’
एमाने दुसऱ्या सेटच्या सहाव्या गेममध्ये लेलाची सर्व्हिस भेद 4-2 अशी आघाडी घेतली. नंतर आपली सर्व्हिस वाचवत 5-2 अशी आघाडी वाढवली. ब्रिटनच्या या खेळाडूला पुढच्या गेममध्ये दोन वेळा चॅम्पियनशिप पॉइंट मिळाले. मात्र तिने दोन्ही वेळा नेटवर शॉट मारून संधी गमावली.
एमा पुढच्या गेममध्ये 5-3 अशा गुणस्थितीत होती. त्या वेळी सर्व्हिस करताना चेंडू परतावण्याच्या प्रयत्नात कोर्टवर कोसळली. यात तिच्या गुडघ्याला जखम झाली. गुडघ्यातून रक्त निघालं. ट्रेनरने तिच्या गुडघ्याला पट्टी बांधली.
चार मिनिटांच्या विलंबानंतर सामना पुन्हा सुरू झाला. त्या वेळी एमाने दोन ब्रेक पॉइंट वाचवले आणि पुन्हा 108 मैल प्रतितास वेगाने चेंडू मारत किताबावर नाव कोरले. जेतेपदाच्या आनंदात एमाने रॅकेट उंच फेकले, कोर्टावरच तिने अंग टाकले. नंतर दोन्ही हातांनी चेहरा झाकला.
1977 च्या विम्बल्डनमध्ये व्हर्जिनिया वेड हिच्यानंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी एमा पहलीच ब्रिटिश महिला खेळाडू आहे. व्हर्जिनिया शनिवारी एमाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थर ऐश स्टेडियमवर आवर्जून उपस्थित होती.
मारिया शारापोवाने वयाच्या 17 व्या वर्षी 2004 च्या विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले होते. शारापोवानंतर सर्वांत कमी वयात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जिंकणारी एमा हिचा क्रमांक लागतो.
लेला हिला या सामन्यात आपल्या सर्व्हिससाठी झुंजावं लागलं. ती आपली सर्व्हिस केवळ 58 टक्के योग्य करू शकली. तिने पाच डबल फॉल्ट केले. याचा फायदा उचलत एमाने 18 ब्रेक पॉइंट मिळवले. यातील चार पॉइंट तर तिने लेलाची सर्व्हिस भेदून मिळवले.
लेलाने सलग चार फेऱ्यांमध्ये अव्वल टेनिसपटूंना पराभूत केले. यात गतविजेती नाओमी ओसाका, 2016 ची विजेती अँजेलिक कर्बर, द्वितीय मानांकित एरिना सबालेंका आणि पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना यांचा समावेश आहे. मात्र, नेमक्या अंतिम फेरीत तिची लय सापडली नाही. विशेष म्हणजे तिने हे सर्व सामने तीन सेटमध्ये जिंकले होते.
लेलाने अंतिम फेरीपूर्वी मुख्य फेरी दरम्यान कोर्टवर साडेबारा तासांपेक्षा अधिक वेळ घालवला आहे. याउलट एमाने सहा फेऱ्यांत केवळ साडेसात तास कोर्टवर घालवले.
एमाने यापूर्वी जुलैमध्ये विम्बल्डनच्या रूपाने पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली होती. त्यावेळी श्वास घेताना त्रास होत असल्याने तिला चौथ्या फेरीतला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला होता. त्या वेळी ती पहिल्या 300 खेळाडूंतही नव्हती.
Follow us