पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर

श्रीकांत नावरेकर यांना पर्यावरणपुरुष हा शब्द अगदी परफेक्ट बसतो. त्यांचं काम इतकं मोठं आहे, की घाणीकडे पाहण्याची दृष्टीही स्वच्छ होते. अलीकडेच टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाने टॉयलेटचं महत्त्व मांडलं खरं, पण याच सदोष टॉयलेटमुळे आणखी नवे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यावर एक नामी उत्तर श्रीकांत नावरेकर यांनी शोधलं. पर्यावरणपूरक टॉयलेट कसं असावं, यावर त्यांनी एक सुंदर मॉडेल तयार केलं आहे. त्यांची ही अफलातून कामं पाहिल्यावर मला एकूणच त्यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रवास जाणून घेण्याची प्रचंड इच्छा झाली. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या साधी राहणी उच्च विचारसरणीतले इतके पैलू समोर आले की थक्क व्हायला होतं. पर्यावरणपुरुष श्रीकांत नावरेकर यांची ही कहाणी खास खेळियाडच्या वाचकांसाठी…

आपल्याकडे ‘प.पु.’ हा शब्द खूपच स्वस्त झाला आहे. अमुक प.पु.चा सत्संग, तमुक ‘प.पु.’चे आशीर्वाद वगैरे वगैरे. बरं, या तुमच्या प.पु. महाराजांना तुम्ही फुलांच्या माळा घालतात. त्याचं जे निर्माल्य होतं, त्याचं तुमच्या महाराजाला सोनं करता येतं का हो? नाही ना? आमच्या या प. पु. कर्मयोग्याला या निर्माल्याचं सोनं करता येतं, संपूर्ण जीवसृष्टी फुलवता येते! बरं, तुमचा हा प. पु. अर्थात स्वयंघोषित परमपुज्य महाराज मानवाचं कल्याण करतो का हो? तुम्ही एका सुरात म्हणाल, हो… मग सिद्ध करून दाखवा बरं… आता तुमचीच नाही, तर तुमच्या महाराजांचीही पंचाईत झाली ना? पण आमचा हा प.पु. कर्मयोगी समस्त मानवजातीचंच नव्हे, तर समस्त जीवसृष्टीचं कल्याण करतो, असं आम्ही दाव्याने सांगू शकतो. केवळ दाव्यानेच नाही, तर सिद्धही करू शकतो. आता बोला…!!!
आता तुमची उत्कंठा शिगेला पोहोचली असेल.. हे प. पु. महात्मा परमपुज्य वगैरे अजिबात नाही, तर पर्यावरणपुरुष या अर्थाने आहे, ज्यांनी तथाकथित प.पु. महाराजांपेक्षाही निष्काम कर्मयोग्याप्रमाणे स्वच्छतेचं व्रत हाती घेतलं आणि समस्त मानवजातीचं कल्याण केलं. हे पर्यावरणपुरुष कर्मयोगी दुसरेतिसरे कोणी नाही, तर तुमच्या-आमच्यासारखाच हाडामांसाचा माणूस आहे. ते म्हणजे श्रीकांत नावरेकर. | Shrikant Navarekar |
श्रीकांतभाऊंची ही कहाणी साधी नि सोपी नाही, तर बरीच वळणावळणाची आहे. जगणं समृद्ध करणारी आणि या जगण्याचा अर्थ उमगून सांगणारी आहे. कचऱ्याचं सोनं होतं, मैल्याचं सोनखत होतं, हे आपल्या कानी कधी तरी पडत असेल; पण ते नेमकं कसं होतं, याचं उत्तर म्हणजे श्रीकांतभाऊंचा प्रवास. त्यांचा हा वाकड्या वाटेवरील प्रवास जाणून घेण्यासाठी मी नाशिकमधील गंगापूर रोडची सरळ वाट धरली. सोमेश्वरच्या पुढे काही अंतरावर गोवर्धन गाव लागतं. रस्त्याच्या कडेलाच एका लोखंडी गेटजवळ फलक दिसतो. त्यावर लिहिलेलं आहे- निर्मलग्राम निर्माण केंद्र. इथूनच श्रीकांतभाऊंचा इलाका सुरू होतो. आत गेल्यावर आजूबाजूला छानशी झाडं दिसली. थोडं आणखी आत आल्यावर शौचालयांची रचना असलेले वेगवेगळे काँक्रीटचे खुल्या पद्धतीचे बांधकाम आढळले. मी चक्रावलो. काही वेळातच त्यांच्या घरासमोर येऊन थांबलो. बाहेर श्रीकांतभाऊ स्वागतासाठी उभेच होते. मनात जो गुंता झाला होता, त्याची एकेक गाठ हळूहळू सुटत गेली, तसतसा श्रीकांतभाऊंचा सगळा पट उलगडत गेला.
श्रीकांतभाऊंचं काम तीन पातळ्यांवर आहे- ते म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामूहिक. सामूहिक म्हणजे त्यांचं निर्मलग्राम निर्माण केंद्र. श्रीकांतभाऊंच्या या निर्मलग्राम निर्माण केंद्रावरून एक स्पष्ट होतं, की ही संस्था स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारी आहे. या संस्थेचं काम प्रामुख्याने ग्रामीण भागावर केंद्रित आहे. त्यांच्या या कामाची सुरुवात तशी म्हंटली तर 1985 पासूनची. तब्बल ३०- ३५ वर्षांपासून निष्काम कर्मभावनेने काम करीत आहेत. मात्र, या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या नावरेकर कुटुंबाचा त्याच्याही आधीचा इतिहास आहे. त्यांचे वडील भाऊ नावरेकर. ते स्वातंत्र्यसैनिक | Freedom Fighter |. त्यांची नाशिक शहरात वाडवडिलांपासून मोठी इस्टेट होती. नाशिकमधील त्यांचा वाडा म्हणजे स्वातंत्र्यचळवळीचं एक केंद्र. भाऊंवर अर्थातच महात्मा गांधी | Mahatma Gandhi |, विनोबा भावे | Vinoba Bhave | आणि साने गुरूजींचा | Sane Guruji | वैचारिक प्रभाव होता. स्वातंत्र्यासाठी खस्ता खाणाऱ्या भाऊंनी स्वातंत्र्यचळवळीनंतरही समाजसेवेचं व्रत काही सोडलं नाही. उलट ते त्यांंनी आणखी तीव्र केलं. त्यासाठी त्यांनी शहरही सोडलं, इस्टेटही सोडलं आणि ग्रामीण भागात जाऊन राहिले. ही गोष्ट आहे १९४८-४९ ची. म्हणजे स्वातंत्र्य मिळून उणेपुरे वर्ष उलटले होते. भाऊ एक कलासक्त व्यक्तिमत्त्व. ते उत्तम गवई होते. म्हणजे शास्त्रीय गायकी ते शिकलेले होते. एवढंच नाही, उत्तम मूर्तिकार, चित्रकारही होते. त्यांचं कागदावरचं कातरकाम तर अद्भुतच. या कलेच्या प्रेमात तर ग्वाल्हेरचे राजेही पडले होते. एका छोट्याशा कात्रीने त्यांनी कागदावर केलेलं कातरकाम देशात त्या वेळी पहिलंच होतं. त्यांनी ठरवलं असतं, तर या कोणत्याही कलेत त्यांनी लौकिकही मिळवला असता. बरंच काही कमावलंही असतं. मात्र, या माणसाला पैशांची आसक्ती कधी नव्हतीच. कारण त्यांनी एक व्रत हाती घेतलं होतं, ते म्हणजे सफाईचं. त्यांचं एक वाक्य होतं- “माझ्या देशाचं चित्र बदलणं ही सगळ्यात मोठी कला आहे.” महात्मा गांधीजीही म्हणायचे, तुम्ही स्वत:मध्ये असे बदल घडवा, जे बदल तुम्ही या विश्वात पाहू इच्छिता. भाऊंना या विश्वातल्या स्वच्छतेबाबतच्या चुकीच्या गोष्टी बदलायच्या होत्या. त्यामुळेच त्यांनी स्वच्छतेचं व्रत घेतलं. ते त्यांनी स्वत:पासून केलं.
स्वच्छतेचा वसा हाती घेतल्यानंतर श्रीकांतभाऊंनी त्याला एक सूत्रबद्ध कामाची दिशा दिली. पर्यावरण आणि स्वच्छतेवर ते चार ‘प्र’वर काम करतात. ते म्हणजे प्रशिक्षण, प्रयोग, प्रचार आणि प्रसार. त्यांनी प्रशिक्षण व्यापक पातळीवर राबविले आहे. कारण एक काळ असा होता, की स्वच्छतेवर कोणीच काम करायला तयार नव्हतं. कुणालाही आपुलकी नव्हती. आता त्याला वेगळे महत्त्व आलं आहे. जनजागृती वाढली आहे. मात्र, श्रीकांतभाऊंनी ज्या वेळी हे काम हाती घेतलं तेव्हा ते नेमकं कसं करायचं, याची कोणतीही तांत्रिक माहिती नव्हती. त्यामुळेच त्यांनी आधी प्रशिक्षण या विषयावर काम सुरू केलं.
सफाई म्हणजे काय, तर घाणीचं काही तरी करणं, टाकाऊ वस्तूंपासून काही तरी करणं. हे काही तरी करणं म्हणजे काय, तर नष्ट करणं. त्यातूनच श्रीकांतभाऊंनी प्रयोगावर भर दिला. त्यांची घाणीकडे बघण्याची दृष्टी एकदम स्वच्छ आहे. त्यांच्या दृष्टीने घाण मुळी घाण नाहीच. टाकाऊ वस्तू नाहीत. त्या रिसोर्स | Resource | आहेत; पण मिसप्लेस आहेत. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पडलेल्या वस्तू आहेत, म्हणून अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच ते याकडे कचरा व्यवस्थापनाच्या | Waste Management | दृष्टिकोनातूनच पाहतात. यातूनच त्यांनी वेगवेगळ्या खतांचे प्रयोग सुरू केले. कुजणारा आणि न कुजणाऱ्या कचऱ्याचे संपूर्ण रिसायकलिंग | Garbage Recycling | कसे करता येईल, यावर त्यांचे प्रयोग अफलातून आहेत. अफलातून म्हणजे या गोष्टी सोप्यात सोप्या आणि सगळ्यांना कशा करता येतील, हे त्यांच्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. त्यातून समृद्ध जगण्याचा आविष्कार अनुभवता येतो म्हणून ते अफलातून.
त्यांचा तिसरा आणि चौथा ‘प्र’ म्हणजे प्रचार आणि प्रसार. यावर त्यांनी काही साहित्यलेखनही केलं आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही त्याचा चांगला उपयोग झाला आहे. तांत्रिक बाबी सोप्या भाषेत लोकांपर्यंत कशा जातील, हाच त्यामागचा हेतू. याव्यतिरिक्त इतरही काही प्रकल्प हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे आश्रमशाळेत, काही संस्थांमध्ये, गावागावांत कचरा व्यवस्थापनाचे त्यांनी बरेच प्रयोग राबविले आहेत.
आता अलीकडे स्वच्छतेच्या विषय सरकारनेही अजेंड्यावर घेतला. 2014 पासून तो लोकांच्या आणखी दृष्टिपथात आला. मात्र, त्याच्याही आधीपासून नावरेकर कुटुंब स्वच्छतेच्या कामात जीवतोड मेहनत घेत आहे. हे इतकं निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सुरू आहे, की ते त्यासाठी कोणतंही सरकारी अनुदान घेत नाहीत. जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असं असलं तरी सरकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आणि सहयोग मनापासून आहे. अगदी धोरणं ठरविण्यापासून मार्गदर्शन करण्यापर्यंतचा संपूर्ण सहभाग त्यांचा आहे. तो महाराष्ट्र सरकारसोबतही राहिला आहे. केंद्र सरकारसोबतही राहिला आहे. श्रीकांतभाऊंना यात एक आत्मिक समाधान आहे, ते म्हणजे आपण जे काही करतो, ते सरकारच्या उपयोगात येतंय याचा. या सहयोगातून खूप चांगले कार्यक्रम पुढे आलेले आहेत. एवढेच नव्हे, तर युनिसेफ | Unicef |, वॉटर एड | Water Aid |, वर्ल्ड बँक | World Bank | या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबतही श्रीकांतभाऊंचा सहयोग राहिलेला आहे. असं हे संस्थात्मक पातळीवरचं काम श्रीकांतभाऊंनी देशभर उभं केलं आहे.
गंगापूर रोडवरील गोवर्धन गावात त्यांचं काम पाहिलं, की थक्क व्हायला होतं. या परिसरात पाऊल ठेवलं, की वेगवेगळे मॉडेल पाहायला मिळतात. ‘मॉडेल’ म्हणजे स्वच्छतेचे (काही खुलासे वेळीच केलेले बरे!). या ‘मॉडेल’चा उपयोग प्रशिक्षणासाठी होतो. हेच ते स्वच्छतेचे मॉडेल जे पाहताना मी चक्रावलो होतो. अभ्यास सहली, जिज्ञासू लोकांना माहिती देण्यासाठीच त्यांनी हे स्वच्छतेचे मॉडेल उभे केले आहेत. गोवर्धनमधील त्यांचं वास्तव्य म्हणजे नंदनवनच, जेथे स्वच्छता मोकळेपणाने नांदते. याच परिसरात सेमिनार हॉल आहे, जेथे मार्गदर्शन केलं जातं. अभ्यास सहलीसाठी आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. निर्मलग्राम निर्माण केंद्राच्या कामाचाच तो एक भाग आहे, असं ते मानतात. श्रीकांत नावरेकरांचं संपूर्ण कुटुंबच यात झोकून काम करतात. श्रीकांतभाऊंना पाच बहिणी. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या घरात कुणीना कुणी पर्यावरणाचं वेगळं काही तरी काम करीत असतो. हे झोकून काम करणंच त्यांचं जीवन समृद्ध करीत आहे.
श्रीकांतभाऊंना सहजच विचारलं, तुम्हाला किती मुली-मुलं आहेत?
ते म्हणाले, दोन मुली.
आणि मुलगे?
दोनच..
आणि कुटुंबात एकदम हशा पिकला. श्रीकांतभाऊ मिश्कील आहेत. त्यांचा सूक्ष्म विनोद लक्षात आल्यावर मलाही हसू आवरलं नाही. मुलींना मुलांच्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही माणसं आहेत. त्यांच्या विचारांत ना लिंगभेद, ना जातिभेद, याचीही प्रचीती आली.
मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे. ती पुण्यात असते. बाबांचे संस्कार वाया कसे जाणार? ती तिथल्या झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं समाजोपयोगी काम करीत असते. धाकटी मुलगी बॅचलर ऑफ सायन्स | Bachelor of Science | झालेली आहे. नावरेकर कुटुंबच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कुटुंबाला पर्यावरणाचं भान आहे. हे कुटुंब प्लास्टिक तर अजिबातच वापरत नाही. पण काय आहे, की माणूस प्लास्टिकच्या इतक्या अधीन गेला आहे की, प्लास्टिकबंदी असूनही ते नियम सर्रास धाब्यावर बसविले जातात. नावरेकर कुटुंब मात्र इतकं सजग आहे, की ते टाळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पातळीवर काही प्रयोग केले आहेत. उदाहरणार्थ, किराणा आणायचा असेल तर त्या वस्तूंपाठोपाठ प्लास्टिकही घरात येतं; पण श्रीकांतभाऊंनी त्यावरही उपाय शोधून काढला. या किराणा वस्तूंसाठी त्यांनी वेगवेगळ्या कापडी पिशव्या बनवल्या आहेत. त्या त्यांनी घरीच शिवलेल्या आहेत. त्याला ग्रोसरी बॅग | Grocery Bag | म्हणतात. या बॅगमध्येच ते धान्य घेतात. त्यासाठी त्यांनी अर्ध्या किलोपासून पिशव्या बनवल्या आहेत. किराणाच्या यादीबरोबर दुकानदाराला त्या पिशव्याही देतात. किराणा दुकानदाराला आता त्यांची सवय झाली आहे; पण इतरत्र कुठं गेलं की काही जण कौतुकही करतात, तर काही लोकांच्या थट्टेचा विषयही होतो, श्रीकांतभाऊ त्याकडे लक्ष देत नाहीत. एव्हाना आता अनेकांना चांगलंच ठाऊक झालं आहे, की या माणसाला प्लास्टिकचा | Plastic | भयंकर विटाळ आहे. जर यदाकदाचित सोबत पिशवी नसेल, तर विक्रेता त्यांना कागदातच भाजीपाला बांधून देतील. तेव्हा श्रीकांतभाऊ म्हणतात, “मलाच नाही, तर असंच तुम्ही इतरांनाही देत जा…”

श्रीकांतभाऊंनी वैयक्तिक पातळीवर जे प्रयोग केले ते अभ्यासाअंतीच. त्यासाठी त्यांनी कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही. त्यांच्या अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत. एक सैद्धान्तिक ज्ञान | Theoretical Knowledge |, तर दुसरं प्रयोगशील ज्ञान | Practical Knowledge |. वेगवेगळ्या प्रयोगांतून जे सिद्ध होत गेलं ते स्वच्छतेचं मॉडेल म्हणून त्यांनी समोर आणलं. त्यांंचं शौचालयाचं मॉडेल भन्नाटच आहे. त्याला क्लीन पिट टॉयलेट | Clean Pit Toilet | असं म्हणतात, ज्याच्यामुळे मैल्याचं रूपांतर उत्तम सोनखतात होतं. त्यातून कोणतंही प्रदूषण होत नाही. ही शौचालयाची पद्धत नेमकी कशी कार्यान्वित होईल, त्याची रचना कशी असेल यावर त्यांनी आधी अभ्यास केला आणि मग लोकांना सांगितलं. त्यावर त्यांनी एक माहिती पुस्तकही लिहिलं आहे आणि डीव्हीडीही काढली आहे. ते पाहून, वाचूनही लोकं त्या पद्धतीने शौचालय सहजपणे बांधू शकतील.
कचऱ्याबाबत नवा कायदा आला आहे. बऱ्याच जणांना तो माहितीही नाही. तो म्हणजे तुमच्या सोसायटीतून शंभर किलोपेक्षा अधिक कचरा रोज निघत असेल तर महापालिका तो उचलणार नाही. हे फक्त जैविक कचऱ्याबाबत. मात्र, प्लास्टिकसह इतर जो अजैविक कचरा असेल तोच महापालिका उचलेल. त्यामुळे अपार्टमेंटला कचऱ्याचं व्यवस्थापन करणं अपरिहार्य आहे. सध्या जागृती वाढली आहे हे मान्य आहे. तरीही मनापासून काम करणारे मोजकेच आहेत, तर काही कायद्याच्या धाकाने करीत असतात. ते या कचऱ्याचं व्यवस्थापन किती परिणामकारकपणे करीत असतील याबाबत श्रीकांतभाऊंनाच शंका आहे. एवढंच काय, तर काही जण घंटागाडीत कचरा टाकू शकली नाही म्हणून कचरा कुठे तरी बाहेर फेकतात. हे दुर्दैव आहे, अशी खंतही श्रीकांतभाऊ व्यक्त करतात. कचरा मिसप्लेस होणं काय असतं, तर हे असतं.
नलिनी नावरेकर यांच्या पर्यावरणपूरक हस्तकला
श्रीकांतभाऊंचे आणखीही काही प्रयोग आहेत. खरं तर त्यांचा हा स्वच्छतेचा वसाच आहे. तो खाली ठेवता येत नाही आणि त्यांच्याही मनात तसं काही येत नाही. जो कचरा विघटनच होत नाही, ज्याला नॉन डिग्रेडेबल वेस्ट | Non Degradable Waste | म्हंटलं जातं, ज्यात कागद, प्लास्टिकसारख्या घटकांचा समावेश आहे. या कचऱ्याची समस्या तर मोठी आहे. त्यावरही त्यांनी प्रयोग केले आहेत. कागदाच्या कचऱ्याचे रिसायकलिंग | Recycling | कसे करता येईल, याचे प्रयोगही पाहण्यासारखे आहेत. कारण हा कागद भरपूर निघतो. रद्दीतून येतो, शाळेतून येतो, ऑफिसमधून येतो. हा कचराही अमर्याद आहे. ही कागदं जाळून टाकण्याशिवाय लोकांसमोर दुसरा पर्याय दिसत नाही. या कचऱ्याचं रिसायकलिंग कसं करता येईल, याचे प्रयोग श्रीकांतभाऊंच्या भगिनी नीलूताईंनी (नलिनी नावरेकर) केले आहेत. या नीलूताईही वडिलांसारख्याच कलासक्त. त्यांनी ‘सफाईची गाणी’ हे सुंदर पुस्तक लिहिलं आहे. नीलूताईंनी घरातली कागदाची समस्या सोडवली आहे. कागदाचा लगदा करून त्याच्या अप्रतिम वस्तू बनवल्या आहेत. यात दोन पैलू दडलेले आहेत. एक तर कचऱ्याचं रिसायकलिंग, व्यवस्थापनही होतं आणि दुसरं म्हणजे या वस्तू विकताही येतात. खरं तर कागदापासून विविध वस्तू बनविण्याची कला आपल्याकडे पूर्वापार आहे, हे नीलूताई प्रांजळपणे कबूल करतात. हीच कला सुधारितपणे त्यांनी विकसित केली आहे. नीलूताईंनी कागदाच्या लगद्यापासून छोटे बाउल्स, फ्लॉवरपॉट, ट्रे, टीपॉयपर्यंतच्या | Flower Pots, Teapoy from Waste Paper | अनेक वस्तू केलेल्या आहेत. मुळात कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती कागदाच्या लगद्यापासून माणसाच्या मैल्यापर्यंत रिसायकलिंग करण्याचा विचार करीत असते. मी तर म्हणेन, गॅलिलिओच्या दुर्बिणीपेक्षाही लांबचं पाहणारी ही दृष्टी आहे. त्यांनी निसर्गपूरक जीवनशैलीच | Eco Freindly Lifestyle | अवलंबलेली आहे, याचा प्रत्यय ठायी ठायी अनुभवायला मिळतो. कागदाच्या वस्तू कशा तयार करायच्या हेही त्या सहजपणे सांगतात. पाण्यात भिजवून कागदाचा लगदा तयार करणे, तो मऊ झाल्यानंतर वाटणे, त्यात चिकटपणा येण्यासाठी मेथीचं पीठ घालणे आणि नंतर त्याला आकार देणे इतकं ते सोपं आहे. त्यासाठी थोडी मेहनत लागते आणि थोडंफार कौशल्यही आत्मसात करावं लागतं, हे नीलूताई आवर्जून सांगतात.

साध्या कागदाचा प्रश्न सुटू शकतो; पण प्लास्टिकचं करायचं काय? What to do with plastic? । खरं तर ही जगाची समस्या झाली आहे. श्रीकांतभाऊ तर याला ‘गमतीदार समस्या’ म्हणतात. एका बाजूने पाहिलं तर अत्यंत स्वस्त, अत्यंत उपयोगी, वॉटरप्रूफ हे त्याचे जे अंगभूत गुण आहेत, त्याच्यामुळेच त्याने आपल्या जीवनात स्थान मिळवलं आहे; पण या गुणांबरोबर बाकीचे जे दोष आहेत, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते आपल्या डोक्यावर बसलं आहे. म्हणूनच श्रीकांतभाऊंना ही गमतीदार समस्या वाटते. त्याच्यावर एकच उपाय, तो म्हणजे प्लास्टिकचा plastic । विवेकाने वापर करणं. जिथं पर्यायच नाही, तिथं प्लास्टिक plastic । वापरायला हरकत नाही; पण जिथं समर्थ पर्याय उपलब्ध असतानाही प्लास्टिक वापरायला लागलो तर मग ती गंभीर समस्या आहे. साधी गोष्ट म्हणजे कॅरिबॅग. या कॅरिबॅगची खरंच गरज आहे का, तर अजिबातच नाही. 25-30 वर्षांपूर्वी हा प्रकारच नव्हता. जो तो आपली पिशवी घेऊन जात होता. आज मात्र कॅरिबॅगशिवाय लोकं दुसरी पिशवी वापरतच नाही. प्लास्टिकचे मग, प्लास्टिकची बादली, प्लास्टिकचं गवत याची गरजच नाही. हे टाळता येऊ शकतं. तोच या प्लास्टिकवरचा उपाय आहे. आता यावर परिणामकारक काम करायचं असेल तर लोकांची केवळ मानसिकता बदलणं पुरेसं नाही. मानसिकतेबरोबरच कायदाही कठोर व्हायला हवा. केवळ कायदा करूनही उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणीही तेवढीच कडक असायला हवी, असं श्रीकांतभाऊंना मनापासून वाटतं. प्रबोधन व्हायलाच हवे; पण त्या जोडीला कायदाही कठोर व्हायला हवा. या दोन्हींमधून प्लास्टिकला चाप बसू शकेल. गंमत म्हणजे आज सरकारदेखील म्हणतंय, प्लास्टिक बंद झालं पाहिजे. त्यासाठी कायदा केला आहे. मग एवढं वाटतंय, तर त्याचं उत्पादन का बंद करीत नाही? ते तर सुरूच आहे. अशा पद्धतीचा अर्धवट कायदा उपयोगाचा नाही आधी ते उत्पादन थांबवा आणि मग लोकांना सांगा, की आता तुम्ही प्लास्टिकला पर्याय शोधा, असं मत श्रीकांतभाऊ स्पष्टपणे नोंदवतात.
नावरेकर कुटुंबाची जीवनशैलीच पर्यावरणपूरक असल्याने त्यांच्या जीवनात प्लास्टिकला अजिबातच स्थान नाही. अगदी कंगवाही लाकडीच वापरणार, पेनही कागदापासून तयार केलेलाच असेल; पण काही अपरिहार्यताही आहे, जेथे प्लास्टिक त्यांनाही टाळता आलेलं नाही. उदाहरणार्थ, गांडूळखताच्या प्रकल्पासाठी त्यांना प्लास्टिकची पिशवी वापरणे अपरिहार्य आहे. ते टाळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिलेत; पण प्लास्टिकशिवाय गांडूळखत अन्य पर्यायी वस्तूंत यशस्वी होऊ शकले नाही. इथं त्यांना प्लास्टिक अपरिहार्यपणे स्वीकारावं लागलं. मात्र, याव्यतिरिक्तही काही प्लास्टिक अपरिहार्यपणे आलेलं असतं. निर्मलग्राम निर्माण केंद्रात काही लोकं शिबिरासाठी येत असतात. मग त्यांच्यासोबत आलेलं प्लास्टिकही त्यांना टाळता येत नाही. मग असे प्लास्टिक घंटागाडीही घेत नाही आणि बाहेर कुठं टाकणंही नावरेकर कुटुंबाच्या रक्तातच नाही. त्यामुळे हे प्लास्टिक टाकायचं कुठं, हा गंभीर प्रश्न या कुटुंबाला पडतो. त्यामुळे आता त्यांनी लोकांना स्पष्टपणे सांगितलं आहे, “तुम्ही जर सोबत प्लास्टिक आणलं असेल तर ते तुम्ही जाताना आठवणीने घेऊन जा.” प्लास्टिकचा असाही विरोधाभास आहे, की ग्रामीण भागात तांब्याची भांडी वापरली जात होती. आता त्याऐवजी प्लास्टिकच्या घागरी दिसतात. शहरी भागात मात्र अभिमानाने सांगितलं जातं, की आम्ही तांब्याच्या भांड्यातूनच पाणी पितो बरं का..! जी तांब्याची भांडी ग्रामीण भागात सामान्य होती, ती आता महाग झाली आहेत. ज्या निसर्गपूरक वस्तू ग्रामीण भागात वापरल्या जात होत्या, त्या शहरात वापरल्या जात आहेत आणि जे प्लास्टिक शहरात होतं ते आता ग्रामीण भागावर थोपवलं आहे. ग्रामीण भागाला ते स्वस्त मिळत असल्याने त्यांनीही ते सहजपणे स्वीकारलं आहे. प्लास्टिक इतकंच सिंथेटिकही घातक आहे. दोन्ही वेगळे नाहीच, हे लोकांना अजूनही कळलेलं नाही. मायक्रो प्लास्टिकच्या | Microplastics | समस्येवरही श्रीकांतभाऊंनी चिंता व्यक्त केली आहे. यातून जे बारीक कण बाहेर पडतात ते डोळ्यांना अजिबात दिसत नाहीत. ते पाण्यात सर्रास मिसळतात. ते माश्यांमध्ये जातं. तेच मासे आपण खातो. म्हणजे जे हानिकारक घटक तुम्ही बाहेर फेकले तेच तुमच्या पोटात नकळतपणे जात आहेत. त्यातून ज्या आरोग्य समस्या उभ्या राहिल्या आहेत, त्या आणखी गंभीर आहेत.
Then is it an option to recycle this plastic? | मग या प्लास्टिकचं रिसायकलिंग करणं हा पर्याय आहे का, या प्रश्नावर श्रीकांतभाऊंना आणखी गंभीर पेच समोर दिसतो. या प्लास्टिकचं रिसायकलिंग करायचं, हा पर्याय जरी पुढे आला तरी त्याचा उपयोग होणार नाही. जर प्लास्टिकपासून तुम्ही सोफासेट बनवला, चप्पल बनवली. ठीक आहे; पण हे किती वर्ष टिकणार आहे? काही वर्षांनी तर फेकूनच द्यावं लागेल. मग पुन्हा या प्लास्टिकचा प्रश्न उभा राहतोच. त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे से नो टू प्लास्टिक (Say no to plastic). त्यामुळे श्रीकांतभाऊ पुन्हा तेच सांगतात, की प्लास्टिकचा विवेकाने वापर हाच त्यावर उत्तम पर्याय आहे.
प्लास्टिकवरील आणखी एका मुद्द्यावर श्रीकांतभाऊ लक्ष वेधतात, ते म्हणजे इंधननिर्मिती आणि रस्तेबांधणी. हे धोरणात्मक पातळीवरही सरकारने स्वीकारलेलं आहे. राज्य सरकारनेही याच दृष्टीने विचार सुरू केला आहे. मात्र, यात धोके आहेत. ते लोकांपर्यंत आलेले नाहीत. प्लास्टिकपासून इंधननिर्मिती होते, हे बरोबर आहे. मात्र, ही इंधननिर्मिती करताना जी प्रक्रिया करावी लागते, जी ऊर्जा लागते, त्याचा विचार कुठे झाला आहे? रस्तेबांधणीत प्लास्टिक वापरणे तर आणखी गंभीर आहे. लोकांना वाटले, की आता प्लास्टिकचा प्रश्न सुटला! पण तसे अजिबात नाही. कारण सर्वच प्रकारचं प्लास्टिक यात वापरता येत नाही. पीयूसी प्रकारचं प्लास्टिकही वापरता येत नाही. कायद्याने आणि नियमानेसुद्धा. जे प्लास्टिक वापरायचं, ते फक्त 10 टक्के वापरायला परवानगी आहे. हे प्लास्टिक वापरताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. ती कधीच घेतली जात नाही. म्हणजे कामगारांनी मास्क कसे वापरायचे? कारण तिथं प्लास्टिक वितळणार आहे. त्यामुळे तिथं तापमान | Temperature | किती असणार वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याकडे पाळलं जाईल, अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. आणि एवढं सगळं करून आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये रस्तेबांधणीत प्लास्टिक वापरणं आणखी चुकीचं आहे. उन्हाळ्यात डांबरी रस्तेही वितळतात. मग त्यात प्लास्टिक आहे, तर तेही वितळणार. आणि हे प्लास्टिक पुन्हा हवेत येणार आहे. ते हवेत आले म्हणजे त्यातील घातक रासायनिक घटक मानवास अधिक त्रासदायक ठरतील. हा विचारच त्यात केलेला नाही. त्यामुळे त्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणंच योग्य आहे.
नाशिकच्या कचराडेपोत लँडफिलिंग | Landfilling | केलं आहे. हे लँडफिलिंग म्हणजे खाली प्लास्टिक टाकून त्याच्यावर माती टाकली जाते. त्याचे थरावर थर रचले जातात. ते दिसायला खूप आकर्षक दिसतं; पण आतून तुम्ही जे काही प्लास्टिक टाकलंय त्यातून जे लीचेट | Leachate | बाहेर पडतं ते अत्यंत घातक आहे. ते जमिनीत जातं, त्यातून ते पाण्यात जातं आणि तेच आपल्या पोटात जातं. म्हणून लँडफिलिंगला | Landfilling | इतर देशांमध्ये विरोध आहे; पण आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आविष्काराखाली त्याचं कौतुक होतं. टीका म्हणून नाही, तर ही टेक्नॉलॉजी किती जागरूकपणे आपण घेतली पाहिजे, याचा विचार महत्त्वाचा आहे आणि हे किती करणार, एक टेकडी झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी… किती जागा त्या खाली व्यापणार, त्यालाही काही मर्यादा आहे की नाही?
श्रीकांतभाऊंचे विचार मनाला थेट भिडतात. त्यांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबाचीही साथ लाभली आहे. श्रीकांतभाऊंसारख्याच त्यांची पत्नी संध्या नावरेकरही एकदम साध्या. त्या पाचवी ते सातवीतील शालेय मुलांचे प्रबोधन करीत असतात. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्या स्वच्छतेचे धडे देतात. दिवाळी असो वा गणेशोत्सव, हे सण आपण पर्यावरणपूरक कसे साजरे करू शकतो, याचं मार्गदर्शन त्या करतात. शालेय मुलांच्या अभ्यास सहली केंद्रावर होतात. त्या वेळी त्यांना कचरा व्यवस्थापनावर Waste Management | मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते. सोलर, बायोगॅस अशा विविध उपक्रमांची माहिती त्या देतात. गाणी, गोष्टी, खेळ या माध्यमातून त्या इतक्या छान समजावून सांगतात, की ते मार्गदर्शन मुलंही तल्लीनतेने ऐकतात, आत्मसात करतात.
श्रीकांतभाऊंची शेती शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने होते. नावरेकर कुटुंब ज्या गोवर्धन भागात राहतात त्या जागेचाही वेगळा इतिहास आहे. त्यांनी जे काम उभं केलं आहे, त्यामागे त्यांच्या वडिलांचे संस्कार आहेच, तसाच त्यांचा त्याग आहे. कारण ती पिढीच अशी होती, जी त्यागावर आधारित होती. ज्या वेळी ते घरातून बाहेर पडले त्या वेळी त्यांच्याकडे अजिबात पैसा नव्हता. बँक बॅलन्सही नाही. स्वतःची इंचभर जागा नाही. वडिलांचं काम देशासाठी खूप उपयोगाचं होतं. त्यांचं एक स्वप्न होतं, की आपण यासाठी एक केंद्र उभं केलं पाहिजे. त्यामुळे देशासाठीचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ही जागा मिळाली. ही जागा याच कामासाठी वापरावी या शपथेवर ही जागा मिळाली. ही जागा मिळाल्यानंतर दुर्दैवाने एका वर्षातच भाऊंचं निधन झालं. वडील गेले तेव्हा श्रीकांतभाऊ आणि त्यांच्या बहीण नीलूताईंचं नुकतंच शिक्षण झालं होतं. म्हणजे वय फारसं नव्हतं. सगळे म्हणायचे, की तुम्ही इथं राहून काय करणार? कारण अडचणी तर मोठ्या होत्या. लांबून पाणी आणावं लागायचं. तीनेक वर्ष तर वीजही नव्हती; पण श्रीकांतभाऊंनी इथंच राहून वडिलांचं काम पुढे नेण्याचा विचार केला. श्रीकांतभाऊंचं शिक्षण एम. एस्सी. अॅग्री झालं आहे, तर नीलूताई जीडी आर्ट झालेल्या आहेत. तसं पाहिलं तर त्यांना त्यांचेही व्यवसाय करता आले असते; पण मिशन म्हणूनच त्यांनी स्वच्छतेचं काम हाती घेतलं. आता जी काही फुलं, झाडं दिसतात ते पाहून कुणालाही छान वाटणारच; पण ज्या वेळी नावरेकर कुटुंबाकडे ही जमीन आली त्या वेळी तिथं काहीही नव्हतं. त्या काळात ही पडीक जमीन होती. साधं बोरीबाभळीचंही झाड नव्हतं. 80 च्या दशकातला हा काळ तर नावरेकर कुटुंबाच्या अंगावर शहारे आणणाराच होता. अत्यंत एकांतात ही जागा होती. आता शहर जवळ आलं आहे. ही जागा श्रीकांतभाऊंच्या कुटुंबाने हळूहळू विकसित केली. या पडीक जमिनीचं त्यांनी नंदनवन केलं आहे.
स्वच्छतेची मोहीम राबविताना श्रीकांतभाऊंना काही कटू आणि गमतीदार अनुभवही आले. दहा वर्षांपूर्वी श्रीकांतभाऊंनी निर्माल्य संकलनाचा प्रकल्प राबविला. हा प्रकल्प राबविण्यासाठी नावरेकर कुटुंबाला कुठेही बाहेर जावं लागलं नाही. कारण त्यांच्या घरासमोरूनच गंगापूर धरणाकडे रस्ता जातो. धरणाच्या अलीकडेच जो गोदावरी | Godavari | नदीवर पूल आहे, तेथे गणेशमूर्तींचं विसर्जन होतं. सावरकरनगरपासून ध्रुवनगर वगैरे जो भाग आहे, तेथील लोकं या पुलाजवळ गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यायचे. त्या वेळी नावरेकर कुटुंब निर्माल्य संकलनाची मोहीम त्यांच्या गेटपाशी उभं राहून राबवायचे. गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना थांबवून त्यांना निर्माल्य देण्याची विनंती करायचे. ते नावरेकर कुटुंबाने राबविलेलं पहिलंच निर्माल्य संकलन होतं. त्यांना वाटलं, की निर्माल्य म्हणजे काय, की पानंफुलं वगैरे असेल. दुसरं काय असणार? हेतू हाच, की या जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खतही होईल आणि नदीही स्वच्छ राहील, हा स्वच्छ विचार त्यांच्या मनात होता. पण झालं भलतंच. ज्या वेळी निर्माल्य संकलित केलं तेव्हा या निर्माल्यासोबत 25-30 प्रकारच्या वस्तूही आल्या. म्हणजे फुलं, फळं, नाऱळ, हळद-कुंकू, घरातले जुने फोटो, डेकोरेशन, पोथ्या अशा अनेक वस्तूंचा त्यात समावेश होता. निर्माल्यात केवळ पानाफुलांचा विचार केला, पण त्यासोबत आलेल्या इतर वस्तूंची त्यांना कल्पनाच नव्हती. समाधान एवढंच होतं, की या वस्तू नदीत जाऊ दिल्या नाहीत. पण मग आता या वस्तूंचं करायचं काय? इतरत्र कुठंही टाकताही येणार नव्हत्याच. त्यामुळे त्यांनी या सगळ्या वस्तूंचं वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला. नारळं वेगळी, वस्त्र वेगळी, असं सगळं वेगवेगळं केलं. या अनावश्यक वस्तूंच्या धाकाने त्यांनी निर्माल्य संकलन कधीही थांबवलेलं नाही. हे काम नावरेकर कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून करीत आहे. या निर्माल्य संकलनात त्यांच्या विचारांचे अनेक लोक सोबत येतात. जवळपास 70-80 लोकं या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. या निर्माल्य संकलनात त्यांनी गणेशमूर्ती स्वीकारल्या नाहीत. त्याची अनेक कारणं होती. त्यापैकी एक म्हणजे लोकांची मानसिकता. प्रत्येकाला वाटतं, की मूर्ती पाण्यातच विसर्जित करायला हवी आणि विसर्जनाची कोणतीही सोय नावरेकर कुटुंबाकडे नव्हती. गणेशमूर्ती संकलित केल्या तरी त्या ठेवायच्या कुठे, हाही एक प्रश्न होता. मातीचा गणपती असेल तर अडचण नाही; पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या | Plaster of Paris | गणेशमूर्तींचं काय करायचं? त्यामुळे नावरेकर कुटुंबाने मूर्ती घेतल्या नाहीत.
हे निर्माल्य गोळा करताना त्यांना खूप गमतीदार अनुभवही आले. काही लोकं तर गाडीची काचही खाली करत नव्हते. काही म्हणायचे, “तुम्ही कोण आम्हाला विचारणारे? आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते.” काही अनुभव तर असेही होते, की नावरेकर कुटुंब नसले तरी ते नेहमीच्या जागेवर निर्माल्य ठेवून जाणार. नावरेकर कुटुंबाचं लोकांना हेच सांगणं असायचं, की “निर्माल्य तुम्ही इथं आणूच नका. घरच्या घरी त्याचं विघटन करा. इथं न आणणं सर्वांत चांगलं आहे. जर तुम्ही नदीत ते विसर्जित करणार असाल तर मग तुम्ही आम्हाला द्या.” तरी काही लोकं अभिमानाने त्यांना सांगायचे, “सर, आम्ही दरवर्षी तुमच्याकडेच निर्माल्य देतो बरं का?” नेहमीच्या भाजीवाल्याला कसं, “आम्ही तुमच्याकडेच नेहमी भाजी घेतो,” अशा थाटातलं हे वाक्य. अर्थात, हेही कमी नाही. आता गणेशोत्सवाबाबत जागृती खूप वाढली आहे. त्यामुळे काळी माती आणि शाडू मातीच्या मूर्ती घेण्याकडे लोकांचा कलही वाढला आहे. नदीवर गणेश विसर्जन करणंही बऱ्यापैकी कमी झालं आहे, असं निरीक्षणही श्रीकांतभाऊ नोंदवतात. मंडळांच्या गणेशमूर्ती पाहतात तेव्हा श्रीकांतभाऊंना कमालीची चिंता वाटते. मुळात एवढ्या मोठ्या मूर्तींची खरंच गरज आहे का, हा त्यांना पडलेला पहिला प्रश्न. पुढे तेच त्यावर कोटी करतात, “पण काय करणार, आपली स्पर्धा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीशी आहे ना!” शाडू मातीच्या मूर्तीबाबत नावरेकरांचं वेगळं निरीक्षण आहे. शाडू माती स्थानिक नाही. ती प्रक्रियायुक्त माती आहे. ती पाण्यात गेल्यानंतर प्रदूषणच करणार. त्यामुळे काळ्या किंवा लाल मातीतल्या गणेशमूर्तीच वापरायला हव्यात. पूर्वी तर “कुंभारी गणपती” असायचे. ते लाल मातीपासूनच बनवले जायचे. त्याच मूर्ती पर्यावरणपूरक आहेत. शाडू माती घातक आहे, हे त्याचं मत शास्त्रीय आधारावर बरोबर असलं तरी अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे हे नक्की.
स्वच्छतेबाबत सरकारचा अनुभव सांगताना श्रीकांतभाऊ आपला चिकित्सक दृष्टिकोन स्पष्टपणे मांडतात. स्वच्छता मोहिमेत सरकारचा प्रयत्न प्रामाणिकच असतो. सरकारव्यतिरिक्त अशी कोणतीही एजन्सी नाही, जी गावोगाव, घराघरापर्यंत पोहोचू शकेल. खरं म्हणजे त्यांच्या माध्यमातून खूप लवकर आणि परिणामकारक काम होणं अपेक्षित असतं; पण त्यात दोन गोंधळ आहेत, जे श्रीकांतभाऊंनी अनुभवले आहेत आणि सरकारलाही अनेक वेळा सांगून झालेलं आहे. एक तर सरकारचं काम उद्दिष्टांवर आधारित आहे. म्हणजे आम्हाला इतकी शौचालये बांधायची आहेत, इतका कचरा गोळा करायचा आहे, अमूक इतकं झालं पाहिजे वगैरे. श्रीकांतभाऊंच्या मते, ही एक चूक होतेय आणि दुसरी चूक म्हणजे सबसिडी देत राहणे. शौचालय कशासाठी बांधायचं, तर बारा हजार रुपये मिळतात म्हणून बांधायचं. बायोगॅस का करायचं, तर अनुदान मिळतं म्हणून करायचं. ही पद्धतच चुकीची आहे. काही ठिकाणी सबसिडी आवश्यक असते, हे मान्य आहे; पण शंभर टक्के सबसिडी देणं अत्यंत चुकीचं आहे. आणि जे काम होतं तेही निकृष्ट दर्जाचं. आपला भारत हागणदारीमुक्त झाला हे एकवेळ मान्य केलं; पण जी शौचालये बांधली ती तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का? फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि हे जबाबदारीने बोलतोय, हेही सांगायला श्रीकांतभाऊ विसरत नाहीत. कारण श्रीकांतभाऊ भारतातील प्रत्येक राज्यात, गावागावांमध्ये जाऊन आलेले आहेत. आज जे काही चित्र उभं केलं आहे, त्याचे चटके चार-पाच वर्षांनी तीव्रतेने जाणवायला लागतील. म्हणून तांत्रिकदृष्ट्या उत्तम काम होणं खूप आवश्यक आहे.
गावागावांतला एक काळ असा होता, की काही ऐकून घेण्याची मानसिकताच नव्हती. श्रीकांतभाऊंनी ज्या वेळी शौचालयाची नवी संकल्पना पुढे आणली तेव्हा कुणीही तयार नव्हतं. त्यांच्या गावातच कुणीही पुढं आलं नाही. एक व्यक्ती तयार झाली. त्याच्याकडे शौचालय बांधलं. लोकं उत्सुकतेने पाहू लागले. अनेकांनी तक्रार सुरू केली, की आम्हाला त्रास होईल वगैरे. पण जागा त्या व्यक्तीची होती. त्याला अडवणारं कुणीच नव्हतं. शौचालय बांधून झाल्यानंतर दुर्गंधी वगैरे काहीच आली नाही. उलट त्या माणसाची तर चांगली सोय झाली. त्यानंतर हळूहळू एकेक जण पुढे आलं. ही शौचालयांची जी पद्धत आहे, त्यातून सोनखत तयार होतं. लोकं म्हणायचे, सर आता टाकी भरलीय. आता काय करायचं? मग श्रीकांतभाऊ तिथं जायचे. ते स्वतः खत काढायचे. भयंकर दुर्गंधी सुटेल या भावनेने सुरुवातीला सगळे लांब लांब उभे राहिले. श्रीकांतभाऊंनी पाटी-फावड्याने स्वतः खत काढलं. दुर्गंधी नाही की काही नाही. ते सोनखत काळ्या मातीसारखं निघालं. आता लोकं स्वतःच सोनखत काढून घेतात. ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी ते शेतीत वापरावं. जर शेती नसेल तर आम्हाला सांगावं, आम्ही ते विकत घेऊ, असंही श्रीकांतभाऊंनी लोकांना आवाहन करतात. विकत घेण्याचा हेतू हाच, की ही वस्तू टाकाऊ नाही. हा विचारच लोकांमध्ये बदल घडवत आहे.
शहरातले अनुभवही गमतीशीर आहेत. काही लोकं मनापासून करतात, तर काही आरंभशूर. काही जण म्हणायचे, त्यात अळ्या झाल्या म्हणून ते आम्ही बंदच केलं. काही जण म्हणायचे, आम्ही बाहेरगावी गेल्याने दुर्लक्ष झालं. त्यामुळे आम्ही ते बंदच केलं, असे सांगणारेही त्यांना बरेच भेटले. त्यामुळे शहरांमध्ये सातत्याने काम करणारे फार कमी. कारण शहरामध्ये सोयी भरपूर. शहरामध्ये एक सर्वांत लोकप्रिय बहाणा असतो, तो म्हणजे वेळच नाही. म्हणून श्रीकांतभाऊ पुुन्हा आपल्या एका मतावर जोर देतात- ते म्हणजे लोकांची मानसिकता बदलणे आणि कायदा कडक करणे. आपण ज्या परदेशाचे गोडवे गातो, तिथे या दोन्ही गोष्टी आहेत. मानसिकता तिथं केजीपासून तयार केली जाते. तिथं कुठंही जा, प्लास्टिकच्या कचऱ्यात प्लास्टिकच दिसेल. आपल्याकडे मात्र सगळ्यामध्ये सगळं दिसतं!
इको टुरिजम, कृषिपर्यटन, तसं नावरेकरांनी स्वच्छता पर्यटन म्हणजे सॅनिटुरिजम Sanitourism | सुरू केलं आहे. त्याला ते इन्फोटेन्मेंट प्रोग्रामही Infotainment Program | म्हणतात. माहिती व करमणूक यांचा संगम येथे अनुभवता येतो. इथं या, डबे खा आणि माहिती घ्या, अशी त्यांची कल्पना आहे. यातून लोकांच्या मनातील, डोक्यातील कचरा निघून जाईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
नावरेकरांच्या सॅनिटुरिजमचा Sanitourism | परिसर ऐसपैस विस्तारलेला आहे. याच परिसरात त्यांनी एक सेमिनार हॉल बांधलेला आहे. तेथे पेपर रिसायकलिंग केलेल्या काही वस्तू मांडलेल्या आहेत. अस्वच्छतेमुळे आपल्या पोटात कोणकोणते जंतू होतात, याची माहिती देण्यासाठी तेथे काही बाटल्यांमध्ये जंतूं पाहायला मिळतात. याच हॉलमध्ये सोनखत, हिराखत, गांडूळ खत आदी खतांचे अनेक प्रकारही पाहायला मिळतात. हिरा खत मूत्रविसर्जनापासून Urine excretion । बनवता येतं. हिरा खताचे दोन-तीन प्रकार असतात. एक तर मूत्र गोळा करून त्यात चार पट पाणी घालून वापरणे, हा एक प्रकार आहे; पण ती थोडीशी अवघड प्रक्रिया आहे. कारण मूत्र गोळा करणे, शिवाय ते पिकांना हवंच असतं असं नाही. त्यामुळे हे खत कोरडे करूनही वापरता येते. मुताऱ्या जिथे असतात तिथे चर खोदून त्यात पालापाचोळा टाकायचा. त्यामुळे मूत्र त्यात जिरतं. ते पाचोळा खत म्हणूनही वापरता येतं. मूत्र हा आपल्या देशात वाया जाणारा सर्वांत मोठा स्रोत आहे. कारण त्याचं काहीच होत नाही. केवळ वायाच जात नाही, तर त्यातून प्रदूषणही होतं. युरोपातील काही देशांमध्ये हे मूत्र टँकर भरून घेऊन जातात. आफ्रिकेतही यावर खूप चांगलं काम होतंय. भारतातही होतं; पण खूप कमी प्रमाणात. शहरातील अशा मुताऱ्या एखाद्या संस्थेला दिल्या तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल, असं श्रीकांतभाऊंना वाटतं. सेमिनार हॉलमधील अनेक वस्तू श्रीकांतभाऊ दाखवत होते. सेमिनार हॉलमधून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या वडिलांची कला दाखवली. तीसच्या दशकात त्यांनी साकारलेली अप्रतिम कला पाहून थक्क व्हायला होतं. एका चार-पाच फुटांच्या अखंड कागदावर त्यांनी कातरकाम करून सुरेख नक्षीकला साकारलेली होती. तब्बल 70 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही श्रीकांतभाऊंनी वडिलांची ही कला जिवापाड जोपासली आहे. त्यांचे वडील एचपीटी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना फावल्या वेळात त्यांनी ही कला साकारली होती. सुमारे चार-पाच फुटांच्या सलग कागदावर बारीक कलाकुसर केलेली आहे. एका कागदावरची नक्षी साकारण्यासाठी त्यांना सहा-सहा महिने लागले आहेत. ही ऐतिहासिक नक्षीकला अशी आहे, की भारतात ती इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. तिचं वैशिष्ट्य म्हणजे, की एक नक्षी कुठेही रिपीट झालेली नाही. ही बारीक कलाकुसर साकारताना कागदही फाटलेला नाही. मात्र, ही कलाकुसर साकारताना भाऊंना डोळ्यांचा त्रास जाणवला. डॉक्टरांनी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की तुम्ही हे काम थांबवलं नाही तर तुमचे डोळे जातील. कागदावरील ही कलाकुसर नावरेकर कुटुंबाचा सर्वांत दुर्मिळ ठेवा आहे. ही कला अशी धूळ खात पडू नये म्हणून त्यांना एक छोटीशी आर्ट गॅलरी करायची आहे. या कलेचं प्रदर्शन मांडण्याची श्रीकांतभाऊंची इच्छा आहे. ते स्वच्छतेच्या कामात इतके व्यस्त आहेत, की त्यांना या कलेच्या प्रदर्शनासाठी वेळ मिळत नाही. मात्र, कोणी त्यासाठी पुढाकार घेतला तर ते हा खजिना लोकांपर्यंत खुला करण्यास प्रचंड उत्सुक आहे.
या कलेचं वैशिुष्ट्य म्हणजे, त्या काळात श्रीकांतभाऊंच्या वडिलांना अखिल भारतीय स्तरावर सुवर्णपदकांसह अनेक बक्षिसं मिळाली आहेत. एकदा काय झालं, की त्यांचे वडील ग्वाल्हेरला पुष्कराज पंडित यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला गेले होते. त्या वेळी ग्वाल्हेर संस्थान होतं. तिथं दसऱ्याला प्रदर्शन असायचं. राष्ट्रीय पातळीवरचं सर्वांत मोठं प्रदर्शन म्हणून त्या वेळी लौकिक होता. देशभरातील अनेक कलाकार, कारागिरांचे स्टॉल या प्रदर्शनात आपली कला मांडायचे. श्रीकांतभाऊंच्या वडिलांनीही अर्ज केला. त्यांना एक स्टॉल मिळाला आणि आपल्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या. या वस्तू मांडताना त्यांचं सादरीकरणही उत्तम असायचं. प्रत्येक कलावस्तूच्या मध्ये ते कागदाचेच खांब तयार करून लावायचे. दसऱ्याच्या दोन दिवस आधी ग्वाल्हेर संस्थानचे प्रमुख मंत्री पाहणी करायला आले. कारण दसऱ्याला ग्वाल्हेरचे राजे स्वतः पाहायला येणार होते. भाऊंना सर्वांत कोपऱ्यातला स्टॉल देण्यात आलेला होता. कारण भाऊ बाहेरून आलेले होते. स्थानिकांना महत्त्वाच्या जागा मिळाल्या होत्या. मंत्री भाऊंच्या स्टॉलवर आल्यावर थबकले. ते म्हणाले, “इतकी सुंदर रचना असताना तुम्हाला ही जागा कुणी दिली?”
भाऊ म्हणाले, “मला काही माहिती नाही. मला जो स्टॉल दिला तो मी स्वीकारला.”
मंत्र्यांनी लगेच सूत्रे हलवत त्यांना प्रमुख चार स्टॉलपैकी एक स्टॉल दुसरीकडे हलवत भाऊंना तेथे स्थान दिले.
दसऱ्याला राजे आले. त्यांनी भाऊंची कला न्याहाळली. त्यांच्याशी खूप गप्पाही रंगल्या. त्या वेळी राजे आणि भाऊ तसे समवयस्कच होते. त्यांनी भाऊंच्या कलेचे तोंडभरून कौतुकही केले. ते पुढे गेल्यानंतर इतर स्टॉलवाले भाऊंकडे आले आणि म्हणाले, “अहो, तुम्हाला काही माहिती आहे का?”
भाऊ आश्चर्याने म्हणाले, “का? काय झालं?”
कलाकार मंडळी म्हणाली, “अहो, राजे तुमच्याकडे आले, तर तुम्ही त्यांना मुजरा करायला हवा. तुम्ही केला नाही. बरं राजे काय म्हणाले?”
भाऊ म्हणाले, “काही नाही, त्यांनी माझ्या कलेचे कौतुक केले. त्यांना एक कलावस्तू खूपच आवडली. त्याचं त्यांनी खूप वेळा कौतुक केलं.”
कलाकार मंडळी म्हणाली, “अहो, त्यामागे काही संकेत आहेत. आता असं करा, राजे त्यांच्या डेऱ्यावर जाऊन बसतील. तेथे प्रत्येक कलाकार आपला नजराणा सादर करीत असतो. तुमची जी वस्तू राजेंना आवडली, ती त्यांना द्या. तुमच्या जन्माचं कल्याण होईल.”
त्यावर भाऊ म्हणाले, “हे माझ्याकडून तर काही शक्य नाही. यासाठी माझी कला अजिबात नाही.”
असे हे श्रीकांतभाऊंचे वडील आपल्या कलेविषयी फारच सजग होते. 1930-32 च्या काळातली ही कला 85 वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. कला जोपासण्याचाही हा एक विक्रमच म्हणावा लागेल. श्रीकांतभाऊंनी वडिलांची ही दुर्मिळ कला अगदी मनापासून जपली आहे.

जी स्वच्छतेची चळवळ श्रीकांतभाऊ देशभर राबवत आहेत, त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे शौचालये. शौचालय पर्यावरणपूरक कसे असावे, याची कार्यशाळा ते नेहमी घेत असतात. त्यासाठी त्यांनी शौचालयांची काही प्रतिकृतीही बनविल्या आहेत. श्रीकांतभाऊंनी अनेक प्रयोग आणि अभ्यासाअंती पर्यावरणपूरक शौचालयांची पद्धत विकसित केली आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे द्विकूप शौचालय | Two Pit Toilet | त्याला दोन टाक्या असतात. त्याला शोषखड्डे म्हणतात. हे दोन्ही शोषखड्डे विटा आणि मातीचे बनवलेले असतात. कुठेही सिमेंट वापरलं जात नाही. तळ पूर्णपणे मोकळा ठेवलेला असतो. मानवाच्या मैल्यात 80 टक्के पाणीच असतं. त्यामुळे ते खड्ड्यात जिरतं. त्या दोन्ही आलटूनपालटून वापरायच्या असतात. एक टाकी भरण्यासाठी साधारण पाच-सहा वर्षे लागतात. कारण मैल्यातलं पाणी टाकीत जिरून जातं. ही टाकी भरली की दुसरी टाकी सुरू करायची. तोपर्यंत पहिल्या टाकीतील मैल्याचं सोनखत तयार होतं. दुसरी टाकी भरली की पुन्हा पहिली टाकी सुरू करायची. विशेष म्हणजे या दोन्ही टाक्या दोन-तीन मीटर खोलीच्याच असतात. अनेकांना प्रश्न पडतो, की या टाक्या तर खूपच छोट्या आहेत. मग त्या महिनाभरातच भरतील! पण तसं अजिबात होत नाही. विशेष म्हणजे, या खताला दुर्गंधी येत नाही. रोगजंतूही जिवंत राहत नाहीत आणि हे सोनखत मातीसारखे कोरडे व भुसभुशीत असते. हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालं आहे.
इथं होतं कचऱ्याचं सोनं
प्रत्येकाच्या घरात कचरा होतो. भाजीपाल्याचे देठ असतील किंवा पालापाचोळा असेल तर तो घंटागाडीत टाकण्याची मानसिकता झाली आहे. त्याऐवजी त्याचं घरच्या घरी खत तयार केलं तर त्याचा दुहेरी फायदा होईल. एक तर कचरा घंटागाडीत जाणार नाही, दुसरे म्हणजे सेंद्रिय खत घरच्या घरी तयार होईल. त्यासाठी नावरेकर कुटुंबाने खास असे कचऱ्याचे बेड तयार केले आहेत. हा कचरा वेगवेगळ्या टप्प्यांत खतात रूपांतरित केला जातो. हे सगळं काम श्रीकांतभाऊंच्या पत्नी संध्या नावरेकर पाहतात. या कचऱ्यात गांडूळ सोडले तर दीड महिन्यात खत तयार होतं. जर गांडुळाशिवाय खत तयार करायचे असेल तर त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागतो. शेणपाणी टाकून तयार केलेले हे खत झाडांसाठी अत्यंत पोषक असतं. या खताची जबाबदारी संध्या वहिनींकडे असते. त्या जेव्हा खताची एकूण प्रक्रिया सांगत असतात, तेव्हा थक्क व्हायला होतं.
कारण संध्या वहिनींचं बालपण मुंबईतलं. गावाशी तसा त्यांचा संबंध कधी आलाच नव्हता. श्रीकांतभाऊंशी लग्न झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच एका छोट्याशा गावात आल्या. मुंबापुरीतला लोकलचा प्रवास, गजबजलेलं वातावरण हे एकाएकी त्यांच्या आयुष्यातून वजा झालं आणि एका निर्जन ठिकाणी लग्न होऊन आल्या. सुरुवातीला तर पाणीही नव्हतं. लांबून हंड्याहंड्याने पाणी आणावं लागायचं. संध्या वहिनींनी हे आव्हान हसत हसत स्वीकारलं. मुंबईकरांमध्ये स्पिरिट असतं, असं आपण ऐकतो. संध्या वहिनी त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं.
किराणा दुकानाची यादी देतानाही संध्या वहिनींच्या उरी धडधड व्हायची. पैसे नाहीत तर आणतील कुठून, असं संध्या वहिनी जेव्हा सांगतात तेव्हा त्या काळात या कुटुंबाने कसा संघर्ष केला असेल, याची प्रचीती येते.
सुरुवातीचा काळ तर कसोटीचा होता. सगळीच प्रतिकूलता. एक प्रकारे ती जगण्याचीच लढाई होती. आता तो काळ आठवला, की श्रीकांतभाऊंना कमालीची हुरहुर वाटते. We really enjoyed that period.. श्रीकांतभाऊ त्या प्रतिकूल काळाचा अशा शब्दांत आनंद व्यक्त करतात. आज श्रीकांतभाऊंचं हे काम पाहिलं की जाणवतं, ते निष्काम कर्मयोगी पर्यावरणपुरुष का आहेत ते! आपल्याला अशा प.पु. कर्मयोग्यांचे कुंभमेळे हवे आहेत, ज्यांच्यामुळे पर्यावरणच नव्हे, तर मनंही स्वच्छ, शुद्ध होतील…