ऑलिम्पिकमध्ये द्युतीचं लक्ष्य ११.१० सेकंदांचं!
द्युती चंद (Dutee Chand). वेगवान शर्यतीत भारतीयांचं आशास्थान. वेगवान धावपटू द्युती चंदने जागतिक क्रमवारीच्या कोट्यातून टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिचं लक्ष्य आहे 11.10 सेकंदांची वेळ नोंदवणे. कारण ही वेळ तिला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन जाणार आहे.
ओडिशाची ही धावपटू म्हणाली, ‘‘मी आशियाई स्तरावर पदक जिंकले आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अव्वल खेळाडू येतात. अमेरिका किंवा जर्मनीच्या धावपटूंचा टायमिंग 10 सेकंदांच्या आसपास जातो. मी 11.10 सेकंदांचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. यामुळे मी उपांत्य फेरीपर्यंत जाऊ शकते.’’
द्युती चंद ऑलिम्पिकची पात्रता फेरी सिद्ध करू शकलेली नाही. मात्र जागतिक क्रमवारीतील उंचावलेल्या कामगिरीमुळे तिला ऑलिम्पिकचा कोटा मिळाला. आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी द्युती चंद राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिली होती. ही तिची ऑलिम्पिकपूर्वीची अखेरची शर्यत.
यापूर्वी तिने इंडियन ग्रांप्री 4 मध्ये महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.17 सेकंदांची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम केला. मात्र, ऑलिम्पिक पात्रतेसाठी जी वेळ हवी होती, त्यात ती अवघ्या 0.02 सेकंदांनी चुकली. शंभर मीटर चार्टमध्ये 44 वी आणि 200 मीटरमध्ये 51 व्या क्रमांकावर असल्याने ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.
रँकिंगमुळे द्युती चंद ऑलिम्पिक महायुद्धात
द्युती चंद म्हणाली, ‘‘रियो ऑलिम्पिक 2016 पर्यंत पात्रता स्पर्धेतून ऑलिम्पिक खेळता येत होतं. मात्र, अनेक दिग्गज खेळाडूंची संधी क्षुल्लक अंतराने हुकत होती. म्हणूनच आयओसीने या वेळी रँकिंगची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे खेळाडूची संधी हुकणार नाही.’’ द्युती चंद म्हणाली, ‘‘ऑलिम्पिकसाठी शंभर मीटर शर्यतीची पात्रता वेळ 11.15 सेकंदांची होती. कोरोना महामारीमुळे मला अपेक्षाच नव्हती, की मी ही वेळ नोंदवू शकेन. कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या. सराव कार्यक्रमही विस्कळीत झाले होते. सरावासाठी मी कझाकिस्तान आणि किर्गिझस्तानलाही जाऊ शकले नाही. मी शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र, क्षुल्लक अंतराने मी पात्रता गाठू शकले नाही.’’ भुवनेश्वर, पटियाला आणि हैदराबादमध्ये सराव करणाऱ्या द्युतीला एक विश्वास होता, की रँकिंगच्या माध्यमातून दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळेल. त्यामुळे तिने तयारीत कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.
द्युती चंद म्हणाली, ‘‘मला पूर्ण विश्वास होता, की रँकिंगच्या माध्यमातून मी ऑलिम्पिक खेळेेन. मात्र, माझं लक्ष्य फक्त खेळणं नाही. मी सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. मी कधी हा विचारच केला नाही, की मी टोकियोला जाऊ शकेन.’’ ती म्हणाली, ‘‘माझं लक्ष 100 मीटर शर्यतीवरच आहे. शंभर आणि दोनशे मीटर या दोन्ही शर्यतींवर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा परिणाम टायमिंगवर होऊ शकेल. तसाही दोन्ही शर्यतींचा सराव सारखाच असतो, पण माझं लक्ष शंभर मीटरवरच असेल.’’
द्युती चंद ऑलिम्पिक पदक जिंकणार?
पदकाच्या अपेक्षा द्युतीकडूनही आहे. मात्र, या अपेक्षांचं ओझं काय असतं हे द्युतीला पूर्ण ठाऊक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम खेळावर ती होऊ देणार नाही. त्याचबरोबर आपल्या खासगी आयुष्यातील तणावही ती ट्रॅकवर येऊ देत नाही. ती म्हणाली, ‘‘अपेक्षांचा तणाव सुरुवातीला होता. आता बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले असल्याने दबाव जाणवत नाही. सलग चार वर्षांपासून पदक जिंकत आहे. त्यामुळेच लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खेळात कामगिरीच बोलते. चांगलं खेळलं नाही तर लोक विराट कोहलीलाही सोडत नाही.’’
द्युतीवर समलैंगिक संबंधांमुळे अनेकदा टीका झाली आहे. त्यावर द्युती म्हणाली, ‘‘मी खासगी आयुष्यातील समस्यांचा परिणाम खेळावर होऊ देत नाही. ट्रॅकवर मेंदू फक्त खेळावर काम करतो. इतर काय बोलतात याची फिकीर मी करीत नाही. मात्र, जेव्हा नातेवाईक किंवा मित्र बोलतात तेव्हा दुःख होतं. अर्थात, खेळताना मी हे सगळं विसरून जाते.’’
ओडिशा सरकारने यंदा द्युती चंदचं नाव राजीव गांधी खेलरत्न या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी पाठवलं आहे. यावर द्युती चंद म्हणाली, ‘‘मला खेलरत्न यापूर्वीच मिळायला हवा होता. दोन वेळा आशियाई स्पर्धेत, चार वेळा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मी पदके जिंकली आहेत. विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. मात्र, मी ओडिशा सरकारची आभारी आहे, की अर्जुन पुरस्कारानंतर त्यांनी माझं नाव खेलरत्नसाठीही पाठवलं आहे.’’
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]