कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर
कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर
जागतिक कसोटी स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत विराट कोहली (Virat Kohli) नवा विक्रम (record) रचणार आहे. तो जेव्हा मैदानात उतरेल तेव्हाच त्याच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. हा विक्रम आहे कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे सर्वाधिक वेळा नेतृत्व करण्याचा. या सामन्यात भारत जिंकला तर जगातील सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर विराजमान होईल.
कोहलीने आतापर्यंत 60 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. ही महेंद्रसिंह धोनी याच्या कामगिरीशी बरोबरी करणारी आहे. इंग्लंडमधील साउथम्पटन येथे 18 ऑक्टोबर रोजी डब्लूटीसीची (WTC) अंतिम फेरी होणार आहे. मैदानावर पाऊल ठेवताच तो महेंद्रसिंह धोनीला मागे टाकणार आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांचे नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे.
कोहलीने हा विक्रम यंदा इंग्लंडमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिविरुद्धच्या कसोटी मालिकेतच केला असता. मात्र, मालिकेदरम्यान मुलाच्या जन्मामुळे तो मायदेशी परतल्याने अखेरचे तीन सामने खेळू शकला नाही. या उर्वरित सामन्यांत अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. कोहलीने 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हापासून आतापर्यंत कोहलीने 60 सामन्यांत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची कमान सांभाळली आहे. यापैकी 36 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. हाही एक भारतीय विक्रम आहे. धोनीने 60 सामन्यांत 27 विजय मिळवले आहेत. कोहलीनंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघ तब्बल साडेतीन महिन्यांनंतर 2 जून 2021 रोजी इंग्लंडच्या भूमीत पाऊल ठेवणार आहे. या दरम्यान भारत डब्लूटीसीच्या अंतिम फेरी खेळणार आहे. शिवाय यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. यात एक जरी विजय भारताने नोंदवला तरी विराट सर्वाधिक विजय मिळविणाऱ्या कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवेल. तो वेस्ट इंडीजच्या क्लाइव्ह लॉइडला मागे टाकेल. लॉइडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजने 74 सामने खेळले आहेत. यात विंडीजने 36 सामने जिंकले आहेत. कर्णधाराच्या रूपाने सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या गॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने 109 सामन्यांत 53 विजय मिळवले आहेत. त्यानंतर आस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगचा नंबर लागतो. त्याने 77 सामन्यांत 48 विजय, तर स्टीव वॉ याने 57 सामन्यातं 41 विजय मिळवले आहेत. ग्रॅमी स्मिथच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामन्यांत कर्णधारपद भूषविण्याचा विक्रम आहे. त्याच्यानंतर आस्ट्रेलियाच्या अॅलन बोर्डर (93 सामने), न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (80), पाँटिंग (77), लाइड (74), धोनी आणि कोहलीचा नंबर लागतो.
भारतीय कर्णधारांची कसोटी विजयातील कामगिरी
विराट कोहली
सामने 60, विजय 36
महेंद्रसिंह धोनी
सामने 60 विजय 27
सर्वाधिक कसोटी विजय मिळविणारे कर्णधार
ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith), दक्षिण आफ्रिका
सामने 109 विजय 53
रिकी पाँटिंग (Ricky Ponting), ऑस्ट्रेलिया
सामने 77 विजय 48
स्टीव वॉ, ऑस्ट्रेलिया
सामने 57 विजय 41
सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे कर्णधार
ग्रॅमी स्मिथ 109, अॅलन बोर्डर 93, स्टीफन फ्लेमिंग 80, रिकी पाँटिंग 77, क्लाइव्ह लॉइड 74, महेंद्रसिंह धोनी 60, विराट कोहली 60