wrestler sonam malik | एका ‘दंगल गर्ल’चा प्रवास…. मदिना ते टोकियो
एका ‘दंगल गर्ल’चा प्रवास…. मदिना ते टोकियो
“बापरे! हिला वरिष्ठ गटात खेळवायचं? राकट आणि दणकट मल्लांच्या कवळीत ही पोर पार चोळामोळा होईल… हिला काही झालं तर…?”
ज्युनिअर गटातल्या सोनम मलिकविषयी (wrestler sonam malik) अनेकांना काळजीनं घेरलं. वय अवघ १९ वर्षांचं. वजनगट होता ६२ किलोचा. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातल्या मदिना या छोट्याशा गावातली ही मुलगी कुस्तीच्या आखाड्यात मोठ्या गटातल्या मल्लांशी भिडणार होती. साक्षी मलिक, रितू मलिक, सरितो मोर अशा ताकदीच्या मल्लांचं तिच्यासमोर आव्हान होतं. तरीही ती डगमगली नाही. कारण तिचं लक्ष्य होतं टोकियो ऑलिम्पिक. आता जर जिंकलं तरच टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळेल, हे सोनमला ठाऊक होतं. समोर साधीसुधी नाही, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक होती. काय आश्चर्य! सोनमने साक्षीला चारीमुंड्या चीत करीत ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला… सोनमने सिद्ध केलं, की जोखीम घेण्याचा निर्णय योग्य होता.
सोनमला वरिष्ठ गटात खेळवताना तिच्या प्रशिक्षकांना बरीच मेहनत घ्यावी लागली. सोनमला वरिष्ठ गटात खेळवण्यासाठी प्रशिक्षक अजमेर मलिक आणि तिच्या पालकांना कुस्ती महासंघाकडे खेटे घालावे लागले. विनंती करावी लागली. सोनम साधारण मल्ल नव्हती. कॅडेट गटात दोन वेळा तिने जागतिक स्पर्धा जिंकली होती. असं असलं तरी वरिष्ठ गटात खेळणं सोपं नव्हतं. 2019 मध्ये बरीच मेहनत घेतल्यानंतर अखेर भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) तिला एक संधी दिली. तिला रोम रँकिंग सीरिजसाठी जानेवारी 2020 मध्ये निवड चाचणी खेळण्यास मुभा दिली.
ही निवड चाचणी सोनमने (wrestler Sonam Malik) लीलया जिंकली आणि भारतीय संघात स्थान मिळवलं. तिची कामगिरी पाहून सगळेच स्तीमित झाले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बीबी शरण यांनाही तिच्या कामगिरीने अचंबित केलं. अखेर त्यांनी मान्य केलं, की जर आम्ही तिला निवड चाचणीसाठी संधी दिली नसती तर ती आमची मोठी चूक ठरली असती. कारण तिला वरिष्ठ गटात खेळवताना महासंघातच एकमत नव्हतं. त्यांना वाटायचं, की अनुभव नसल्याने तिला गंभीर इजा होईल. तिचं करिअर धोक्यात येईल. तरीही विनवण्या करून महासंघाला राजी केलंच.
wrestler Sonam Malik…
सोनम (wrestler Sonam Malik) वरच्या गटात खेळू शकेल हा तिच्या प्रशिक्षकांना आत्मविश्वास होता. त्याचं कारण म्हणजे तिने गाजवलेल्या गावातल्या कुस्तीच्या दंगली. त्यात तिने वरच्या गटातल्या मल्लांना चीतपट केलं होतं. हे मल्ल साधेसुधे नव्हते, तर त्यांचं नाव घेतलं तरी अनेक मल्लांचे हातपाय गळायचे. सोनम मात्र या मल्लांच्या प्रतिष्ठेची, लौकिकाची अजिबात पर्वा करीत नव्हती. म्हणूनच सोनमला वरच्या गटात खेळवण्याचा निर्णय घेतला. तिची कामगिरी पाहून कुस्ती महासंघही थक्क झाला. कारण सोनमने रितू मलिक, सरिता मोर, निशा, तसेच सुदेशसारख्या नामांकित मल्लांना अस्मान दाखवलं.
सोनमच्या प्रशिक्षकांना पाहायचं होतं, की ती वरच्या गटात कशी कामगिरी करते… मात्र, ती एकामागोमाग विजय मिळवत गेली आणि मदीनाची ही ‘छोरी’ कुस्तीमध्ये नवा इतिहास रचणार हा विश्वास निर्माण केला. दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. दिल्लीत 2018 मध्ये एका कुस्तीच्या दंगलीत तिने एक स्कूटर आणि एक लाख 10 हजारांचे पारितोषिक जिंकले. एकदोन नव्हे, तर तिने आतापर्यंत पाच वेळा भारत केसरीचा किताब जिंकला आहे.
सोनमचा जन्म 15 एप्रिल 2002 चा. घरात कुस्तीचा माहोल. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून सोनमला नावलौकिक मिळविण्याची इच्छा होती. मदिनातील नेताजी सुभाष चंद्र बोस अकादमीत तिने कुस्तीचे डावपेच शिकले. 2012 मध्ये या अकादमीत सरावानंतर तिने टीव्हीवर सुशील कुमार, योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळताना पाहिलं. त्याच वेळी तिच्या मनात वीज चमकली. तिने ठरवलं, एक दिवस मीही अशीच टीव्हीवर झळकणार आणि लोक माझी कुस्ती पाहतील.
सोनम म्हणते, मला मुलांना हरवायला मजा वाटते!
सोनमचा भाऊ मोहितलाही कुस्तीत लौकिक मिळवायचा होता. दुर्दैवाने खांद्याला दुखापत झाल्याने त्याचं स्वप्न भंगलं. मात्र, सोनम कुस्तीच्या आखाड्यात टिकून राहिली. प्रशिक्षकाने तिला जर सांगितलं, जा पाच किलोमीटर धाव. त्या वेळी क्षणाचाही विचार न करता ती धावायची. बऱ्याचदा नवोदित पहिलवान प्रशिक्षकाशी खोटं बोलून धावल्याचं सांगतात. असं होतं कधी कधी. पण सोनमने असं कधीच केलं नाही. असे ‘आज्ञाधारक मल्ल’ फार कमी असतात. सोनम त्यापैकी एक होती. सोनमला आपल्यापेक्षा मोठ्या मुलांशी कुस्ती खेळायला आवडायचं. भीती हा तिच्या शब्दकोशातच नाही. हरली तरी तिच्या चेहऱ्यावर निराशेची रेषा कधीच उमटत नाही. सोनमला याबाबत विचारले, तर ती म्हणते, “मला त्या दणकट मुलांना हरवायला मजा वाटते. मुलींविरुद्ध कुस्ती खेळणं चांगलंच आहे, पण मुलांविरुद्ध खेळणं माझ्यासाठी उत्तम सराव होता.’’
wrestler sonam malik | कुस्तीशिवाय दुसरा विषय नाही…
सोनमसाठी जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुस्तीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तसाही तिच्याकडे चर्चेसाठी कुस्तीशिवाय दुसरा कोणताही विषय नसतो. तिचं कुटुंबही कुस्तीशिवाय दुसरं काही बोलत नाही. म्हणूनच सोनम कुस्तीत इतकी रमली, की तासन् तास आखाड्यात घाम गाळायची. तिच्या प्रशिक्षकाला सांगावं लागायचं, सोनम, सराव संपला आहे…! एक दिवस प्रशिक्षकाने सर्व मल्लांना सांगितलं, की सर्वांनी 350 वेळा सिट-अप्स (उठाबशा) करायच्या आहेत. सर्वांनी सांगितल्याबरहुकूम उठाबशा काढल्या. प्रशिक्षकाने पुन्हा सांगितलं, आता आणखी 150 उठाबशा मारा. हे ऐकून सगळ्यांचे हातपाय गळाले. पण सोनम एकमेव पहिलवान होती, तिने लगेच उठाबशा मारण्यास सुरुवात केली आणि त्या पूर्णही केल्या. ती कधीच तक्रार करीत नाही.
पिछाडीवर असतानाही सोनम साक्षीवर भारी
साक्षी विरुद्ध सोनम
सोनमचं वैशिष्ट्य म्हणजे, कुस्ती खेळताना ती मागे पडली तरी कधी विचलित झाली नाही. असं वाटतं, की आता ती जिंकणार नाही. मात्र अखेरच्या क्षणी तिने अनेक लढती जिंकल्या आहेत. तिची अशीच एक लढत जानेवारी 2020 मध्ये साक्षीसोबत झाली होती. सोनम आधी 4-6 आणि नंतर पुन्हा 6-10 अशी पिछाडीवर होती. मात्र, अखेरच्या क्षणी तिने कमाल केली आणि चार गुण वसूल करीत साक्षीला चकित केलं. तिने साक्षीला चार वेळा उचलून पटकावले. सोनमने साक्षीला पहिल्यांदा 2017 मध्ये पाहिलं होतं. तिच्याविरुद्ध कुस्ती खेळण्याचं तिचं एक स्वप्न होतं. ज्या वेळी साक्षीविरुद्ध सोनम रिंगणात उतरली, त्या वेळी प्रशिक्षक म्हणाले, “सोनम, तुझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही; मात्र मिळवण्यासाठी भरपूर काही आहे.”
“मला माहीत नाही, की मी साक्षीला अखेरच्या क्षणी कसं पराभूत केलं, पण मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं,” असं सोनम म्हणते. सोनमचा हा प्रवास पाहिला, की एक विश्वास वाटतो, ती नक्कीच टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकेल. कारण तेव्हाही तिच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसेल….
सोनमची कामगिरी | |
सुवर्णपदक : | कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2019 |
रौप्यपदक : | कॅडेट एशियन चॅम्पियनशिप 2019 |
कांस्यपदक : | कॅडेट एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2018 |
कांस्यपदक : | कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2018 |
सुवर्णपदक : | कॅडेट वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2017 |
सुवर्णपदक : | वर्ल्ड स्कूल गेम्स 2017 |
कांस्यपदक : | कॅडेट एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2017 |