विल्मा रुडॉल्फ हिची प्रेरणादायी कहाणी
विल्मा रुडॉल्फची प्रेरणादायी कहाणी
दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते. जर्मनीने २२ जून १९४० रोजी संपूर्ण फ्रान्स आपल्या टाचेखाली आणला होता. जग अशा वळणावर येऊन ठेपलं, जिथे प्राणपखेरू कोणत्याही क्षणी उडून जाईल. कारण सामान्यांच्या जिवाची कोणतीही पर्वा या युद्धाने केली नाही. अशा काळात एका जिवाने २३ जून १९४० रोजी अमेरिकेतील टेनेसी प्रांतात जन्म घेतला. त्या जिवाचं नाव होतं विल्मा ग्लोडियन रुडॉल्फ (Wilma Glodean Rudolph). विल्माचा आणि महायुद्धाचा तसा थेट संबंध नाही. संबंध एवढाच, की ती महायुद्धाच्या काळात जन्मली आणि क्रीडायुद्धात जिंकली.
कोण ही विल्मा रुडॉल्फ कोण?
कोण ही विल्मा हा प्रश्न अनेकांना पडला असेल. विल्मा अमेरिकेची प्रख्यात धावपटू, एवढीच एक ओळख नाही. त्यामागचा तिचा संघर्ष अंगावर शहारे आणणारा आहे. टेनेसी प्रांतातील सेंट बेथलेहेममध्ये जन्मलेल्या विल्माच्या यशाचा आलेख १९५६ व १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये उंचावल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पन्नास-साठच्या दशकात एका कृष्णवर्णीय महिलेची ही कामगिरी ‘भयंकर’ होती. कारण ती अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करीत होती, जो वर्ग गुलामीने पछाडलेला होता. ती कृष्णवर्णीय होतीच, शिवाय ती एक महिलाही होती. त्यामुळे तिची ही कामगिरी कृष्णवर्णीयांसाठीच नव्हे, तर महिलांसाठीही उमेद जागविणारी होती. विल्मा अकालीच जन्मली. म्हणजे आई ब्लांचे (Blanche) यांचे गर्भारपणाचे दिवस भरण्याच्या आतच विल्माचा सेंट बेथलेहेम येथे जन्म झाला. त्या वेळी तिचं वजन होतं २ किलो. विशेष म्हणजे रॉडॉल्फ परिवारातल्या २२ भावंडांत विल्मा 20 वी! तिचे वडील एड रुडॉल्फ (Ed Rudolph) यांनी दोन लग्ने केली होती. विल्माच्या जन्मानंतर काही दिवसांतच रुडॉल्फ परिवार क्लार्कविलेत (Clarksville)) स्थायिक झाला. तेथेच विल्माचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं. घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची. वडील रेल्वेचे हमाल, तर आई मोलकरणीची कामं करायची.
अशा परिस्थितीत २२ जणांच्या कुटुंबाची ओढाताण काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. विल्माची स्थिती तर त्याहून भयंकर! जिथे खायचे हाल, तिथे गरिबानं आजारी पडू नये असं म्हणतात. विल्माचं तर बालपण आजारपणातच गेलं. तिला न्यूमोनिया झाला. त्यातच तिला पोलिओ विषाणूमुळे पॅरालिसिस झाला. त्या वेळी तिचं वय होतं अवघ्या पाच वर्षांचं. पोलिओतून ती बरी झाली, पण तिने डाव्या पायातले त्राण गमावले. म्हणजे ती एका पायाने अपंगच झाली. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत तिला लेग ब्रेस (leg brace) घालूनच वावरावं लागलं. डॉक्टर म्हणाले, आता ती कधीच चालू शकणार नाही. पण विल्माचा आईवर अधिक विश्वास होता. तिची आई म्हणायची, विल्मा नकी चालू शकेल.
40 च्या दशकात क्लार्कविलेमध्ये आफ्रिकन अमेरिकन निवासी लोकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होती. त्यामुळेच विल्मावर थोड्याफार प्रमाणात उपचाराची सोय होती हाच काय तो दिलासा. रुडॉल्फ परिवाराने नंतर विल्माचे उपचार मेहरी वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केले. हे महाविद्यालय क्लार्कविलेपासून 80 किलोमीटरवरील नॅशविले येथे होतं. विल्माच्या पायावर उपचारासाठी आठवड्यातून एकदा नॅशविलेला बसने जावं लागायचा. हा प्रवास दोन वर्षे सुरू होता. नंतर विल्माच्या पायाचा मसाज दिवसातून चार वेळा करावा लागला. कुटुंबातील कोणी ना कोणी तिला मसाज करण्यासाठी मदत करायचा. पुढची दोन वर्षे हा मसाज सुरू होता. यामुळे तिच्या पायात चेतना आली. लेग ब्रेसशिवाय ती चालू लागली.
सततच्या आजारपणामुळे विल्माला घरीच शिक्षण घ्यावं लागलं. फर्स्ट ग्रेडपर्यंत तिने शाळेचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. क्लार्कविलेच्या कॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये तिला दुसऱ्या श्रेणीत प्रवेश मिळाला. हे वर्ष होते 1947 चे. त्या वेळी ती सात वर्षांची होती. वयाच्या 11 व्या वर्षी ती लेग ब्रेसशिवाय चालू लागली. विल्माला बास्केटबॉल खेळताना आईने पाहिले. तिला कोण आनंद झाला! हायस्कूलमध्येच तिची बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. तिला धावण्याची आवड होती.
बास्केटबॉलची स्कीटर
बास्केटबॉल हा विल्माचा पहिला खेळ. क्लार्कविलेतील बर्ट हायस्कूलमध्ये तिला या खेळाची ओळख झाली. हे हायस्कूल फक्त अमेरिकन-आफ्रिकन समुदायाचे होते. त्या वेळी तिची बहीण यवोने (Yvonne) बास्केटबॉल खेळायची. विल्माही तिच्यासारखं खेळण्याचा प्रयत्न करायची. त्या वेळी विल्माच्या पायावर उपचार सुरू होते. नंतर विल्माचा पाय बरा झाल्यानंतर हायस्कूलमध्ये तिने बास्केटबॉल खेळणे सुरू केले. हळूहळू त्यात तिने इतकी प्रगती केली, की स्पर्धेसाठीही तिची निवड झाली. विल्माने बास्केटबॉलमध्ये 803 गुण मिळवले. हा बर्ट हायस्कूलमध्ये नवा विक्रम होता. या तिच्या कामगिरीने हायस्कूलचे प्रशिक्षक सी. सी. ग्रे यांनी तिला कौतुकाने स्कीटर (Skeeter) या झुरळाची उपमा दिली होती. कारण ती कमालीच्या वेगवान हालचाली करायची.
अशी वळली ट्रॅक अँड फिल्डकडे
विल्मा कदाचित ट्रॅक अँड फिल्डकडे वळलीही नसती. मात्र, राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा खेळताना एडवर्ड टेम्पल (Ed Temple) यांच्या पारखी नजरेने तिला हेरले. हे एड टेम्पल होते टेनेसी राज्य विद्यापीठाचे (Tennessee State University) प्रशिक्षक. नॅशविले (Nashville) येथील हे ऐतिहासिक विद्यापीठ मानले जाते, जे फक्त कृष्णवर्णीयांसाठीच होते. टेम्पल यांनी विल्माला ट्रॅक अँड फिल्डमध्ये करिअर करण्यास सुचवले. विल्माची तर आधीपासून इच्छा होतीच. आता तर ती संधी स्वतःहून तिच्यापर्यंत चालून आली होती. विल्माला टेम्पल यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात प्रवेश दिला. टायगरबेल (Tigerbell) हा टीएसयूमधील कृष्णवर्णीय धावपटूंचा ग्रुप आहे, जो वेग आणि शिस्त यामुळे प्रसिद्ध होता. विल्माकडे वेग होता. ती प्रतिभावान खेळाडूही होतीच. ती टायगरबेलसारखीच एक उत्तम खेळाडू होती. या ग्रुपची ती अनौपचारिक सदस्य बनली. Inspirational story of Wilma Rudolph | आता तिला टेनेसी प्रांताबाहेरही आपल्या वेगाची ओळख करून द्यायची होती. हायस्कूलच्या ज्युनिअर गटात तिला आपलं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. 1956 मध्ये सिएटलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत तिने ऑलिम्पिकची पात्रता सिद्ध केली. 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये तिने 4×100 मीटर रिले शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले आणि देशाला सांघिक कांस्यपदक मिळवून दिले.
करिअरच्या सुरुवातीलाच गर्भवती
विल्माने तारुण्यात पदार्पण केले. धावपटू म्हणून तिची ओळख निर्माण झाली होती. हायस्कूलच्या सीनिअर गटात तिने पाऊल ठेवले आणि टायगरबेलची शिस्त मोडली. त्या वेळी तिचे वय होते 18 वर्षे. याच काळात तिची रॉबर्ट एल्ड्रिजशी (Robert Eldridge) मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या ती रॉबर्टमध्ये अधिक गुंतली. हायस्कूलमध्ये असतानाच ती गर्भवती राहिली आणि एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव योलांडा. ट्रॅक अँड फिल्डच्या करिअरसाठी हा मोठा धक्का होता. यामुळे टेम्पल यांनी विल्माला संघात घेण्यास थेट नकार दिला. टेम्पल यांचा धावपटूंचा ग्रुप कृष्णवर्णीयच असल्याने खेळाडूंना वर्णभेदाशी, यौनशोषणाशी कसा सामना करावा लागतो, याची त्यांना पूर्णतः जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या खेळाडूंसाठी कठोर नियमांचे बंधनच घातले होते. विल्माने मात्र या शिस्तीला तडा दिला. टेम्पल म्हणायचे, की कृष्णवर्णीय महिलांनी खेळात भाग घ्यावं असं मला खूप वाटायचं. मात्र, त्या वेळी वर्णभेदामुळे अनेक महिला खेळाकडे वळण्यापूर्वी द्विधा मनःस्थितीत असायच्या. टेम्पल यांना विश्वास होता, की तुम्ही महिला असूनही प्रामाणिकपणे काम केल्यास तुम्ही उत्तम खेळाडू म्हणून लौकिक मिळवू शकता.
टेम्पल यांनी विल्माला पुन्हा ट्रॅक अँड फिल्डमध्ये येण्यास परवानगी दिली, पण त्यासाठी काही अटी घातल्या. एक तर तिने आपल्या मुलीपासून आणि रॉबर्ट एल्ड्रिज (Robert Eldridge) या बॉयफ्रेंडपासून दूर राहावे. विल्मा बॉयफ्रेंडपासून दूर राहू शकेल, पण योलांडापासून दूर राहणं कठीण होतं. अखेर तिने मनाचा हिय्या करीत योलांडाला सेंट लुइसमधील तिच्या बहिणीकडे पाठवले. मनावर दगड ठेवून विल्मा योलांडापासून दूर राहिली आणि मैदानावर अथक परिश्रम घेऊ लागली. पुढची ऑलिम्पिक स्पर्धा खेळणे हे एकमेव ध्येय तिने समोर ठेवले. पन्नास-साठच्या दशकात वर्णभेदाने कमालीचे टोक गाठले होते. त्यामुळेच टायगरबेलच्या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान रेस्ट रूम वापरण्यास मुभा दिली जात नव्हती. एवढेच नाही तर कृष्णवर्णीय प्रवाशांना वाहनात प्रवास करण्यास चालक थेट नकार देत होते. अशा परिस्थितीतही कृष्णवर्णीयांचा टायगरबेल संघ मजबूत राहिला.
विल्माने 1960 ची रोम ऑलिम्पिकची पात्रता गाठली. विल्मा टायगरबेलच्या आठ खेळाडूंपैकी एक होती, जिने ऑलिम्पिकची पात्रता गाठली. विशेष म्हणजे टेम्पल यांचंही नाव ट्रॅक अँड फिल्डचे प्रशिक्षक म्हणून जाहीर झालं. रोममध्ये विल्माने कमालच केली. तिने 100 मीटर, 200 मीटर आणि रिलेमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. अशी कामगिरी करणारी ती अमेरिकेतली पहिलीच महिला धावपटू होती जिने सुवर्णपदकांचा ट्रिपल धमाका केला होता. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकारांत तिने विश्वविक्रमही नोंदवला. विल्मा आता अमेरिकेतली स्टार खेळाडू झाली होती. टीव्हीमध्ये तिचा शांत, मृदू स्वर अमेरिकींच्या कानावर पडत होता.
विश्वविक्रमाशी बरोबरी, पण हाती कांस्य!
वयाच्या १६ व्या वर्षी विल्मा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा धावली. वॉशिंग्टनमधील सिअॅटलमध्ये तिने ऑलिम्पिकची पात्रता गाठली आणि १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये जाऊन पोहोचली. टायगरबेलच्या पाच खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये पाऊल ठेवले होते. विल्मा अमेरिकी संघातील सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. 200 मीटरच्या पहिल्याच हीटमध्ये विल्मा अपयशी ठरली. मात्र, 4 × 100 मीटर रिले शर्यतीत तिला कांस्यपदक मिळाले. या रिले शर्यतीत विल्मासह इसाबेल डॅनियल्स (Isabelle Daniels), माए फॅग्स (Mae Faggs) आणि मार्गारेट मॅथ्यूज (Margaret Matthews) यांचा समावेश होता. या सर्व टायगरबेल्सच्या खेळाडू. त्यांनी 44.9 सेकंदांची वेळ नोंदवली. ही त्या वेळच्या विश्वविक्रमी वेळेइतकी होती. मात्र, त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या संघाने रौप्यपदक मिळवले, तर 44.5 सेकंदांची वेळ नोंदवत ऑस्ट्रेलियन संघाने सुवर्णपदक मिळविले.
Inspirational story of Wilma Rudolph | टेनेसीला परतल्यानंतर विल्माने आपल्या हायस्कूलमधील वर्गमैत्रिणींना कौतुकाने कांस्यपदक दाखवले. त्याच वेळी तिने ठरवले, की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये या कांस्यपदकाचा रंग बदलायचा. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा ध्यास तिने घेतला होता. त्यादृष्टीने तिची पावलेही पडू लागली. 1958 मध्ये विल्माने टेम्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक अँड फिल्ड गाजवण्यास सुरुवात केली. 1959 मध्ये शिकागोतील इलिनॉइस येथे झालेल्या पॅन अमेरिकन गेम्समध्ये (Pan American Games, Chicago, Illinois) 100 मीटर शर्यतीत विल्माने रौप्यपदक मिळविले, तर 4 × 100 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या रिलेत तिच्या सहकारी होत्या इसाबेल डॅन (Isabelle Dan), बार्बरा जो (Barbara Joe), आणि लुसिंडा विल्यम्स (Lucinda Williams). एएयू 200 मीटर शर्यतीत तिने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. पुढे सलग चार वर्षे ती या सुवर्णपदकाची मानकरी ठरली. एएयूच्याच इंडोअर स्पर्धेचे विजेतेपदही तिने जिंकले.
1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रमी सुवर्णधाव
विल्माला आता 1960 चे रोम ऑलिम्पिक खुणावत होते. टेक्सासमधील अॅबिलेल ख्रिस्तियन विद्यापीठात झालेल्या ट्रॅक अँड फिल्ड ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिने 200 मीटर शर्यतीत विश्वविक्रमी वेळेची नोंद केली. एवढेच नाही तर १०० मीटर शर्यतीतही तिने ऑलिम्पिकची पात्रता गाठली. 4 × 100 मीटर रिलेतही तिने आपला लौकिक राखला. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये विल्मा आता तीन इव्हेंटमध्ये भाग घेणार होती. रोमच्या भव्यदिव्य स्टॅडिओ ऑलिम्पिको (Stadio Olimpico) मैदानावर विल्माने ऐतिहासिक कामगिरी रचली. तिने 100 आणि 200 मीटर शर्यतीबरोबरच 4 × 100 मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिली अमेरिकी महिला होती, जिने एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली. विल्माने 100 मीटर शर्यतीत 11 सेकंदांची वेळ नोंदवली. ही विश्वविक्रमी वेळ होती. मात्र, या वेळेची नोंद विश्वविक्रम म्हणून करण्यात आली नाही. कारण वाऱ्याचा वेग 2.75 मीटर प्रतिसेकंद असल्याने त्याचा फायदा विल्माला झाल्याचे कारण देण्यात आले. 1936 च्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकमध्ये हेलेन स्टीफन्सनंतर विल्मा पहिलीच अमेरिकी खेळाडू होती, जिने 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
200 मीटर शर्यतीत सुरुवातीच्या हीटमध्ये तिने 23.2 सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम रचला. अंतिम फेरीत तिने 24 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या विक्रमी कामगिरीनंतर तिची ‘सर्वांत वेगवान महिला’ म्हणून जगभरात लोकप्रिय झाली. या कामगिरीनंतर हजारो प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले होते. रोम ऑलिम्पिकमधील तिचा अखेरचा इव्हेंट होता 4 x 100 मीटर रिलेचा. या संघात टेनेसी प्रांतातल्या टायगरबेलच्याच सहकारी होत्या. मार्था हडसन (Martha Hudson), लुसिंडा विल्यम्स (Lucinda Williams), आणि बार्बरा जोन्स (Barbara Jones). ही शर्यतही विल्माच्या संघाने जिंकली आणि 44.5 सेकंदांची वेळ नोंदवत आणखी एक विश्वविक्रम नोंदवला. हा विजय विल्माने जेसी ओवेन्सला (Jesse Owen) अर्पण केला. जेसीने 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये चार वेळा सुवर्णपदक जिंकले होते. ही जेसी विल्मासाठी प्रेरणास्थान होती. त्यामुळेच हा विजय तिने जेसीला अर्पण केला.
‘वेलकम विल्मा डे’
ऑलिम्पिकचा सुवर्णताज घेऊन विल्मा रुडॉल्फ आता आपल्या घरी क्लार्कविलेत पोहोचली. तिचं शहर तिच्या आगमनासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून तिची वाट पाहत होतं. त्यांनी 4 ऑक्टोबर 1960 हा दिवस ‘वेलकम विल्मा डे’ सोहळा साजरा केला. तिच्या सन्मानार्थ 1100 लोकांना भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. रोम ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर विल्मा प्रचंड लोकप्रिय झाली होती. अमेरिकेसह जगभरात सर्वाधिक वेळा पाहिली गेलेली ती पहिलीच कृष्णवर्णीय महिला होती. ऑलिम्पिक स्टार म्हणून तिची गणना झाली होती. 1961 मध्ये विल्माने लॉस एंजिल्स येथे निमंत्रितांच्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तिची शर्यत पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते. तिच्या ऑलिम्पिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी दहा मिनिटांची एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती. विल्मा रुडॉल्फ : ऑलिम्पिक चॅम्पियन (Wilma Rudolph: Olympic Champion) या डॉक्युमेंट्रीने विल्मा घराघरांत पोहोचली. टीव्हीवरील अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्येही तिला आमंत्रित करण्यात आले.
वयाच्या २२ व्या वर्षी निवृत्ती!
यशाच्या शिखरावर असलेल्या विल्मा रुडॉल्फ हिने आणखीही बऱ्याच स्पर्धा जिंकल्या असत्या. मात्र 1961 मध्ये तिने ट्रॅकवरील आपलाच संघसहकारी विल्यम वार्ड ( William Ward) याच्याशी विवाह केला. हा विवाह फार काळ टिकला नाही. 1963 मध्ये ते विभक्त झाले. 1962 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात अमेरिका-रशिया मीटमध्ये 100 मीटर व 4 x 100 मीटर रिले शर्यतीत तिने विजय मिळवला. ही तिची अखेरची शर्यत ठरली. त्यानंतर वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने ट्रॅक अँड फिल्डमधून कायमची निवृत्ती घेतली. हा तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. कारण अनेकांची क्रीडा कारकीर्द ज्या वयात सुरू होते, त्या वयात विल्मा निवृत्त झाली होती. ज्या वेळी ती निवृत्त झाली होती, त्या वेळी तिच्या नावावर तीन विश्वविक्रम होते. 100 मीटर (11.2 सेकंद, 19 जुलै 1961), 200 मीटर (22.9 सेकंद, 9 जुलै 1960), आणि 4 x 100 मीटर रिले या तीन प्रकारांत ती विश्वविक्रमावर विराजमान होती. विल्मा आणखी काही वर्षे खेळू शकली असती. यशाच्या शिखरावर विराजमान होती. मात्र, तिला पुन्हा धावायचं नव्हतं. त्यावर ती ठाम होती. अन्यथा 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही विल्माच्या नावावर आणखी नव्या विक्रमाची नोंद झाली असती.
विल्मा रुडॉल्फ म्हणते, “मी जर आणखी दोन सुवर्णपदके जिंकली, तर काही तरी उणीव सतत जाणवत राहिली असती. मी त्याच गौरवान्वित कामगिरीसोबत राहीन, जी 1936 मध्ये जेसी ओवेन्सने केली होती.”
निवृत्तीनंतर केले शिक्षण पूर्ण
विल्मा रुडॉल्फ हिने निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तिच्यासमोरही होताच. वय फार नाही. अवघ्या 22 व्या वर्षी निवृत्ती. तसंही एखाद्या अॅथलेटिक्सचं मैदानावरचं आयुष्य फार तर तिशीपर्यंत असतं. विल्मा किमान पंचविशीपर्यंत जरी खेळली असती तरी तिच्या हातात आणखी तीन वर्षे होती. अर्थात, त्या काळात इतका काही विचार केला असेल असं मला तरी नाही वाटत. केलाही असला तरी तिला पुन्हा मैदानावर उतरायचंच नव्हतं. तिला थांबायचं कुठं हे माहीत होतं. ज्याला थांबायचं कुठं हे माहीत असतं तो सर्वोत्तम खेळाडू किंवा व्यक्ती असतो. विल्मा त्यापैकीच एक. निवृत्तीनंतर तिने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सततच्या स्पर्धांमुळे तिचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. कुटुंबालाही फारसा वेळ देता आला नाही. वडिलांचं तर 1961 मध्येच निधन झालं. आई होती सोबत. 1963 मध्ये तिने बॅचलर डीग्री घेतली. नंतर तिने आपल्या सगळ्या हौस पुरवल्या, ज्याचा आनंद तिला कधी घेता आला नव्हता. याच काळात तिला पश्चिम आफ्रिकेची सद्भावना राजदूत म्हणून अमेरिकी सरकारने नियुक्ती केली. महिनाभर ती पश्चिम आफ्रिका फिरली. 1963 मध्येच ती सेनेगलची राजधानी डकार येथे मैत्रीपूर्ण स्पर्धेसाठी अमेरिकेची प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली.
सेनेगलच्या निमित्ताने तिने घाना, जिनिव्हा, माली, अप्पर वोल्टा (पश्चिम आफ्रिकेतला एक देश) या देशांतील क्रीडा स्पर्धांना, शाळांना भेटी दिल्या. त्याचबरोबर अनेक टीव्ही कार्यक्रमांत, रेडिओवरही तिच्या मुलाखती झाल्या. पश्चिम आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर काही आठवडे उलटले नाही तोच आपल्या क्लार्कविले शहरात एका हॉटेलवर बहिष्कार टाकल्याचे प्रकरण समोर आले. या वेळी ती नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावरही उतरली. त्यामुळे क्लार्कविलेच्या महापौराला घोषणा करावी लागली, की नागरिकांना सगळ्या सुविधा दिल्या जातील. त्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही. विल्माला फार कमी वयात सामाजिक जाणीव आली होती. कारण तुम्ही कृष्णवर्णीय म्हणून जन्माला आला तर तुम्हाला भवतालच्या सामाजिक वातावरणाची फार लवकर जाणीव होते. वर्णभेद आणि पावलोपावली होणारी कुचंबणा विल्माने तर अनुभवली होती. त्यामुळे विल्मा खेळाडू म्हणून महान होतीच, तशी ती व्यक्ती म्हणूनही उत्तुंग होती.
विल्माने यश, पैसा सगळं मिळवलं; पण मानसिक समाधान तिला लाभलंच नाही. एक स्त्री म्हणून असेल किंवा अमेरिकेतली जीवनशैली असेल, पण तिच्या वाट्याला कायम एकटेपणा आला. वयाच्या 18 व्या वर्षी योलांडाला जन्म देणारी विल्मा तिचा बॉयफ्रेंड रॉबर्ट एल्डिजपासूनही Robert Eldridge दुरावली होती. एक मुलगी सोडली तर तिचं आयुष्य कोऱ्या कागदासारखं होतं.
मुहंमद अलीशी प्रेमप्रकरणही गाजले
रॉबर्टपासून दुरावल्यानंतर तिने आपलं संपूर्ण लक्ष मैदानावर केंद्रित केलं होतं. ती ऑलिम्पिक गाजवत होती त्याच सुमारास मुहंमद अली नावाचं एक वादळ घोंघावत होतं. होय, हाच तो मुष्टियोद्धा ज्याने भल्या भल्यांना नॉकआउट केलं. या मुहंमद अलीशी विल्मा रुडॉल्फ हिची ओळख झाली. दोघेही आपापल्या खेळात दिग्गज होतं. मुहंमद अलीनेही त्याच सुमारास ऑलिम्पिकही गाजवलं. रॉबर्टपासून दुरावल्यानंतर तसंही तिला एकटेपणा जाणवत होता. यातूनच तिची मुहंमद अलीशी जवळीक निर्माण झाली. मुहंमद अली प्रेम या विषयात गंभीर कधीच नव्हता. त्याची अनेक प्रेमप्रकरणं गाजली. तो विवाहित असतानाही विल्मा त्याच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे प्रेमप्रकरण अपेक्षेप्रमाणे फार काळ टिकलं नाही.
1961 मध्ये तिने विल्यम वार्ड (William Ward) या ट्रॅक अँड फिल्डवरील आपल्या जुन्या सहकाऱ्यासोबत लग्न केलं. विल्यमचं टोपणनाव विली. तिच्या डरहॅम ट्रॅकवरील संघातलाच तो एक सदस्य होता. मात्र, हा वैवाहिक प्रवास दोन वर्षांतच संपुष्टात आला. 1963 मध्ये ते विभक्त झाले. त्या वेळी विल्मा अवघ्या 21 वर्षांची होती. लग्नानंतर 22 व्या वर्षी तिने निवृत्ती जाहीर केली होती. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1963 मध्ये ती आपला एक्स बॉयफ्रेंड रॉबर्ट एल्ड्रिजशी विवाहबद्ध झाली. हे तिचं दुसरं लग्न, तर पहिलं प्रेम. त्याच्यापासून तिला विवाहापूर्वीच 1958 मध्ये योलांडा नावाची मुलगी होतीच. नंतर या दाम्पत्याला आणखी तीन मुलं झाली. योलांडासह दोन मुली आणि दोन मुलगे असा चार मुलांचा हा परिवार. हा विवाह बरीच वर्षे टिकला, पण तिच्या वाट्याला पुन्हा एकाकीपण आलं. सतरा वर्षांच्या मॅरेथॉन वैवाहिक जीवनानंतर अखेर हे दोघे विभक्त झाले.
अखेरचा प्रवास…
विल्माला आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे आईचं निधन. 1994 मध्ये आई गेली. त्यानंतर काही महिन्यांतच विल्माला मेंदूचा कर्करोग (brain cancer) झाल्याचं निष्पन्न झालं. हे कमी की काय घशाच्या कर्करोगानेही (throat cancer) तिला ग्रासलं. या आजाराने तिला पुरतं घेरलं होतं. अखेर 12 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी तिने या जगाला अलविदा केलं. टेनेसीतील आपल्या ब्रेंटवूडमध्येच तिने चिरशांती घेतली. एकाच वर्षात मायलेकींचा मृत्यू रुडॉल्फ परिवारावर मोठा आघात होता. टेनेसीतील क्लार्कविले येथील एजफिल्ड मिशनरी बाप्टिस्ट चर्चमध्ये विल्मावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विल्मा गेली तेव्हा चार मुलं, आठ नातवंडे, भाचे, पुतणे असा मोठा परिवार मागे ठेवून गेली. टेनेसी विद्यापीठात 17 नोव्हेंबर 1994 मध्ये घेतलेल्या शोकसभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. विद्यापीठाचे सभागृह तुडुंब भरले होते. टेनेसी राज्याचा ध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला होता.
विल्मा गेली, मात्र महिलांसाठी सन्मान मागे ठेवून गेली. विल्माचा हा प्रवास इथपर्यंतच होता असं नाही. तिने तरुणाईच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी विल्मा रुडॉल्फ फाउंडेशनची स्थापनाही केली होती. विल्माची ही कहाणी 1977 मध्ये विल्मा ः दि स्टोरी ऑफ विल्मा रुडॉल्फ (Wilma: The Story of Wilma Rudolph) या आत्मचरित्राद्वारेही घराघरांत पोहोचली. 2015 मध्ये अनलिमिटेड या नावाने एक डॉक्युमेंट्रीही काढण्यात आली होती. विश्वास बसत नाही, की विल्माच्या ऑलिम्पिक यशाला शंभर वर्षे लोटली आहेत. पण एका गोष्टीवर विश्वास बसतो, तो म्हणजे जेव्हा जेव्हा मुली ट्रॅकवर धावतात, तेव्हा ती कोणीही असो, तिच्या श्वासात विल्मा नक्कीच असते…
Follow on Facebook page kheliyad
[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”60″]
One Comment