ऑस्ट्रेलियन महिला संघाची पाँटिंग युगाशी बरोबरी
ऑस्ट्रेलियन महिला संघाची पाँटिंग युगाशी बरोबरी
ब्रिस्बेन | महिला क्रिकेटला पुरुषांच्या क्रिकेटइतकं वलय नसलं तरी त्यांची कामगिरी तितकीच तोलामोलाची आहे हे ऑस्ट्रेलियन महिला संघाने सिद्ध केलं आहे.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने बुधवारी न्यूझीलंडला 232 धावांनी पराभूत करीत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 21 व्या विजयाची नोंद केली आहे. ही कामगिरी पाँटिगच्या युगाच्या विक्रमाशी बरोबरीची आहे.
रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील पुरुष गटातील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने २००३ मध्ये ही कामगिरी केली होती. आता महिला संघानेही या कामगिरीची बरोबरी केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दुहेरी झळाळी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने सलग २१ वा विजय नोंदवताना लढावू बाणाही सिद्ध केला आहे. कारण संगाची कर्णधार मेग लॅनिंग अखेरच्या सामन्यात खेळू शकली नाही, तर स्टार अष्टपैलू खेळाडू एलिस पॅरीला दुखापत झाल्याने ती या मालिकेत खेळता आलेले नाही.
दोन खंद्या फलंदाज मैदानाबाहेर असताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने न्यूझीलंडवर दणदणीत विजयाची नोंद केली हे विशेष.
पाँटिंगच्या संघाने पाच महिन्यांत सलग २१ एकदिवसीय सामने जिंकले होते. या विजयात दक्षिण आफ्रिकेतील २००३ मधील वर्ल्डकपचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघाला 29 अक्टूबर 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर त्यांनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही.
कांगारूंच्या महिलांनी मार्च 2018 मध्ये भारताविरुद्ध आपलं विजयी अभियान सुरू केलं आणि पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका जिंकल्या.
लँनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला पाँटिंगचा विक्रम मोडीत काढण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली. कारण कोविड-19 महामारीमुळे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे शक्य नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियालाही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणे शक्य नाही.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाच बाद 325 धावांचा डोंगर रचला. इथेच ऑस्ट्रेलियन संघाचा विजयही जवळजवळ निश्चित झाला होता.
लैनिंग दुखापतग्रस्त झाल्याने कर्णधारपदाची धुरा सलामीची फलंदाज राचेल हेन्स हिच्यावर आली. मात्र तिने कर्णधाराला साजेशी खेळी रचत 104 चेंडूंत ९६ धावा केल्या. यात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
एलिसा हिली (87 चेंडूंत 87 धावा, 13 चौकार, एक षटकार) हिच्यासोबत पहिल्या विकेटसाठी हेन्सने १४४ धावांची भागीदारी रचली.
प्रत्युत्तरात न्यूजीलंडचा संघाचा डाव अवघ्या ९३ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडतर्फे एमी सॅटरवेट (41) आणि मॅडी ग्रीन (22) या दोनच खेळाडू दोनअंकी धावसंख्या गाठू शकल्या.
कर्णधार सोफी डेवाइन पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूत बाद झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी मालिका जिंकत क्लीन स्विप दिला.
लॅनिंगने ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगितले, ‘‘मोठ्या फरकाने विजयाचा समारोप करणे खरोखर मोठीच गोष्ट आहे. सलग २१ सामने जिंकणे गौरवास्पद आहे.’’
[jnews_block_15 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”65″]