धक्कादायक! फ्रेंच ओपनमध्ये मॅच फिक्सिंग? | Match-fixing investigation at French Open
धक्कादायक! फ्रेंच ओपनमध्ये मॅच फिक्सिंग?
पॅरिस | टेनिसमध्येही मॅच फिक्सिंग? रोलांगॅरोवर सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील एका सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पॅरिस पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दुहेरीतील एका सामन्यात ही मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय आहे.
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगची तपासणी एका विशेष तज्ज्ञांकडून केली जात आहे. या तज्ज्ञाने यापूर्वी एका व्यावसायिक टेनिस स्पर्धेत मॅच फिक्सिंगची तपासणी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांसोबत केली आहे. मात्र, एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत मॅच फिक्सिंगच्या तपासणीची शक्यता खूपच कमी आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की ज्या सामन्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे त्याच सामन्यावर ही तपासणी केंद्रित असेल. मात्र, हा सामना नेमकी कोणता, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
जर्मनीतील डाइ वेल्ट आणि फ्रान्सच्या एका क्रीडा दैनिकाने सांगितले, की 30 सप्टेंबर रोजी महिलांच्या दुहेरीतील सामन्यापूर्वी एका सामन्यात सट्टेबाजीशी अनुरूप परिणाम पाहायला मिळाले होते.
रोलांगॅरोच्या कोर्ट नंबर 10 वर हा सामना रोमनियाची आंद्रिया मितू आणि पॅट्रिसिया मारिया टिग विरुद्ध अमेरिकेची मॅडिसन ब्रेंगल आणि रशियाची याना सिजिकोवा यांच्या दरम्यान खेळविण्यात आला होता.
सामन्याच्या दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये सिजिकोवाची ‘लव’वर सर्व्हिस तुटली होती. या दरम्यान तिने दोन वेळा डबल फॉल्ट केला होता.
डाइ वेल्ट आणि लॅक्विपीच्या अहवालानुसार, या पाचव्या गेममध्ये रोमानियन संघाच्या विजयावर पॅरिस आणि वेगवेगळ्या देशांमध्ये मोठा सट्टा लागला होता.
[jnews_block_9 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”90″]