Cricket

झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून ‘देव’ खेळला…!

पिल एक उत्तम कर्णधार होताच, शिवाय तो उत्तम अष्टपैलू खेळाडूही होता. कोणालाही वाटलं नव्हतं, की आपण विश्वकरंडक जिंकू. ना खेळाडूंना ठाऊक होतं, ना प्रेक्षकांना. पण एक आशा होती, काही तरी चमत्कार घडेल आणि आपण विश्वकरंडकावर नाव कोरू. झालंही तसंच. आज कुणालाही एखादी दंतकथा वाटावी असा हा प्रसंग आहे… ही गोष्ट आहे 37 वर्षांपूर्वीची… 18 जून 1983 चा तो दिवस. भारताची झिम्बाब्वेविरुद्धची ती लढत होती. त्या वेळीही झिम्बाब्वे कच्चा लिंबूच समजला जायचा. त्यामुळे विश्वकरंडकाचा हा पेपर भारतासाठी तसा सोपाच होता. ठिकाण होते साहेबांचं टनब्रिज वेल्स. खरं तर या सामन्यात सगळंच विरोधात होतं. अनुकूल काहीही नव्हतं. संघातील सर्वच खेळाडू जिगरबाज होते, पण कधी गाडी रुळावरून घसरेल सांगता येत नव्हतं. आपण या विश्वकरंडक स्पर्धेतील तसे डार्क हॉर्सच होतो… फाजील आत्मविश्वास म्हणावा की झिम्बाब्वेचा खेळ उंचावला म्हणावा, पण भारताचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

झिम्बाब्वेसारख्या संघाविरुद्ध भारताने जवळजवळ सामना गमावल्यातच जमा होता. कारण आव्हान देण्याइतपत धावसंख्या उभारता येईल अशी आशाही जवळजवळ मावळत चालली होती. कारण धावफलकावर भारताची अवस्था होती चार बाद 9 धावा. ही संख्या वाचत नाही तोच पाच बाद 17 अशी केविलवाणी अवस्था झाली. आता देवच वाचवू शकेल, अशी भावना प्रेक्षकांमध्ये स्वाभाविक उमटली. हा देव कपिलदेव (Kapil Dev) तर नक्कीच नव्हता. अगदी कपिल मैदानात उतरल्यानंतरही आशेची किरणे धूसरही दिसत नव्हती. नायिका गुंडांच्या कचाट्यात सापडल्यानंतर जसा एखादा नायक अचानक एंट्री करतो आणि सगळ्या गुंडांची धुलाई करतो, तशी एखाद्या चित्रपटाला साजेशी कपिलची एंट्री अजिबातच वाटली नव्हती. चित्रपटात तरी कळत होतं, अमुक नायक आहे आणि तो आता या सगळ्या संकटातून वाचवू शकेल. पण कपिल नायक (संघाचा कर्णधार) असूनही तो काही करेल असं त्या वेळी तरी कुणाला वाटलं नव्हतं.

मात्र, कपिलने कमालच केली. नायकाला शोभेल अशा थाटात त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जी धुलाई केली, त्याला शब्द नाहीत. त्याने आपल्या 138 चेंडूंत 175 धावा रचताना 16 चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या खालोखाल धावा होत्या सय्यद किरमानीच्या (नाबाद 24). पाच बाद 17 वरून भारताने आठ बाद 266 धावांचा डोंगर उभा केला. हे सगळंच अविश्वसनीय होतं. एक आश्वासक धावसंख्या संघाला उभी करून दिली, ती कपिलदेवने. त्या वेळी वाटलं, ज्या देवाच्या भरवशावर होतो तो हाच कपिलदेव. प्रतिस्पर्धी झिम्बाब्वेसाठी ही धावसंख्या आवाक्याबाहेर होती. तरीही झिम्बाब्वेने 235 पर्यंत मजल मारली. मात्र, तोपर्यंत षटके संपली होती आणि भारताने हा सामना 31 धावांनी जिंकला. आता या घटनेला 37 वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही ही खेळी अनेकांना उभारी देते. क्रिकेटविश्वात अजरामर खेळींपैकी ही एक आहे.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या खेळीचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओने हा सगळा आठवणींचा पट ताजा झाला.

या खेळीबाबत कपिलदेव म्हणाला, ‘‘झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना असा होता, की आघाडीचे जे चार संघ आहेत ते आम्ही हरवू शकतो आणि जर तो दिवस आमचा असेल तर आम्ही कोणत्याही संघाचं आव्हान परतावून लावू शकतो हा आत्मविश्वास खेळाडूंना मिळाला.’’

कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने त्यानंतर गटातील पुढील सामन्यात दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाला तब्बल 118 धावांनी पराभूत केले. उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचे आव्हान होते. या साहेबांना त्यांच्याच मैदानावर सहा गडी राखून पराभूत केले आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी सोपी नव्हती. समोर होता रांगडा वेस्ट इंडीजचा संघ. एकापेक्षा एक भेदक गोलंदाज, ज्यांचा सामना करणं म्हणजे जायबंदी होणं. त्यांनी भारतीय संघाचा डाव अवघ्या 183 धावांत संपुष्टात आणला. इथे जाणवलं, की आता आपला तोंडचा घास हिरावणार. कॅरेबियन संघाला जिंकण्यासाठी 183 धावा पुरेशा होत्या. मात्र, त्यांना माहीत नव्हतं, की भारतीय संघ आता हाराकिरी मानणारा नव्हता. त्याने कपिलच्या 175 धावांचे टॉनिक घेतले होते. प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळविण्याची उमेद प्रत्येक खेळाडूच्या नसानसांत भिनली होती. आपल्या गोलंदाजांनी जो अचूक मारा केला त्यापुढे कॅरेबियन संघ अवघ्या 140 धावांत गारद झाला. अविश्वसनीय! भारत विश्वविजेता झाला होता. तब्बल 43 धावांनी भारत जिंकला होता. काय जल्लोष होता भारतभर! त्या वेळी घरोघरी टीव्ही नव्हतेच. घोळक्याघोळक्याने एखाद्याच्या घरात कुणी टीव्हीवर हा सामना पाहत होतं, तर कुणी रेडिओला कान देऊन ऐकत होतं..

कपिल म्हणाला, ‘‘झिम्बाब्वेविरुद्धच्या एका खेळीने संघाला विश्वास दिला, की प्रत्येकाच्या आत विजय मिळविण्याची क्षमता आहे आणि आम्ही कोणत्याही स्थितीत पुनरागमन करू शकतो.’’

भारताचा झिम्बाब्वेविरुद्धचा तो विजयच विश्वविजेतेपदापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे हा विजय किती महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. तसं पाहिलं तर कपिलदेववर किती तरी दबाव होता. कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी त्याच्यावरच होती. दुसरे म्हणजे झिम्बाब्वेविरुद्धची नाणेफेकही कपिलनेच जिंकली होती. त्या वेळी कपिलने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाच बाद 17 अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर अनेकांना वाटलं असेल, अरेरे! आपण उगाच बॅटिंग घेतली… कारण वेगवान गोलंदाज पीटर रॉसन आणि केविन कुर्रेन यांनी आघाडीच्या फलंदाजांना झटपट तंबूत धाडत भारताची भरवशाची फलंदाजीची भिंत पाडली होती. सुनील गावस्कर, कृष्णमाचारी श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटिल आणि यशपाल शर्मा हे झटपट बाद झाले होते. मात्र, कपिलदेव आल्यानंतर ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ अशा थाटात धडाकेबाज खेळी रचली. ही वनडेच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. त्या वेळी वनडेमधील पहिलेच शतक होते. आता हे शतक चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. असे असले तरी चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीतली आजही ही सर्वोच्च धावसंख्या आहे. अतुलनीय… अविश्वसनीय.. कारण संघाचा कर्णधार कपिल ‘देव’ होता!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!