फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष
2022 या सरत्या वर्षाला निरोप देताना भारतीय फुटबॉल नक्कीच काही घटनांची पुनरावृत्ती करणार नाही, अशी आशा करूया.
सर्वांत मोठे संकट म्हणजे कोरोना महामारीचे आणि त्यानंतर बंदीचे.
कारण याच वर्षात भारतीय फुटबॉल महासंघावर फिफाकडून बंदी लादण्याची नामुष्की ओढवली होती. नंतर ही बंदी उठवण्यातही आली.
याच वर्षात भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत रंगलेलं राजकारणही चर्चेचा विषय ठरला.
बायचुंग भुटिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटूला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकच मत मिळाले.
या निवडणुकीत गोलरक्षक कल्याण चौबे यांनी भुटिया यांचा पराभव केला.
मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेले समर ‘बद्रू’ बॅनर्जी यांचे 20 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
काही कटू घटना वगळता चांगल्या गोष्टीही भारतीय फुटबॉलसाठी दिलासा देणाऱ्या आहेत.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची फिफाने घेतलेली दखल, भारताचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मिळालेला मान अशा काही घटना खेळाडूंना उभारी देणाऱ्या ठरल्या. वर्षभरातील अशाच काही ठळक घटनांचा घेतलेला मागोवा…
9 ऑगस्ट
सुनील छेत्री, मनीषा सर्वोत्तम फुटबॉलपटू
नवी दिल्ली : सुनील छेत्री याची सातव्यांदा भारताचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. मनीषा कल्याणने प्रथमच देशातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा मान मिळवला.
राष्ट्रीय प्रशिक्षक इगॉर स्तिमॅक आणि थॉमस देनेर्बी यांनी छेत्री, तसेच मनीषाच्या नावाची शिफारस केली होती.
सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल क्रमवारीत छेत्री तिसरा आहे. त्याने 2007 मध्ये प्रथम देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचे बक्षीस जिंकले.
त्यानंतर त्याने 2011, 2013, 2014, 2017 आणि 2018-19 मध्ये हा मान मिळवला होता.
‘सुनीलने या मोसमात भारताकडून सर्वाधिक पाच गोल केले. तो सॅफ कप स्पर्धेत सर्वोत्तम होता. त्याने आशिया कप पात्रता स्पर्धेत तीन सामन्यांत चार गोल केले होते.
त्याचा शिस्तबद्ध सराव, नेतृत्वकौशल्य संघातील खेळाडूंसाठी प्रेरक आहे,’ असे स्तिमॅक यांनी सांगितले. #भारतीय फुटबॉल 2022
10 ऑगस्ट
वर्ल्ड कप संयोजन संघटनांची जबाबदारी
नवी दिल्ली : ‘आम्ही दिलेल्या निकालातून पळवाटा शोधू नका. आम्ही हे सहन करणार नाही. सतरा वर्षांखालील मुलींंच्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे संयोजन करण्याची जबाबदारी ही तुमची आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुनावले.
‘आम्ही तीन ऑगस्टला निकाल दिला आहे.भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासक आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने फिफासह चर्चा करून वर्ल्ड कप संयोजनाबाबत चर्चा सुरू करणे योग्य होईल. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत, ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी होईल. त्यात राज्य संघटना, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, तसेच प्रफुल पटेल यांच्याविरुद्ध प्रशासकीय समितीने दाखल केलेल्या याचिकेबद्दल निर्णय होईल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. #भारतीय फुटबॉल 2022
11 ऑगस्ट
प्रफुल पटेलांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
नवी दिल्ली : राज्य फुटबॉल संघटनेच्या बैठकीला प्रफुल पटेल उपस्थित राहिले किंवा त्यांनी महासंघांवरील प्रशासकांच्या कामात ढवळाढवळ केली, तर त्याला हस्तक्षेप करू, असा आदेश 11 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
त्याचबरोबर भारतातील 17 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनात अडथळा आल्यास आम्ही हस्तक्षेप करू, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. वर्ल्ड कप फुटबॉलचे भारताचे यजमानपद कायम राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन ऑगस्टला दिलेल्या निकालाबाबत केंद्र सरकारने फेरविचार याचिका सादर केली होती.
राज्य संघटनांनीही घटना बदलाबद्दल आक्षेप घेणारी याचिका सादर केली होती. मात्र, त्याचबरोबर पटेल संघटनेच्या कारभारात ढवळाढवळ करीत असल्याबद्दलची याचिकाही प्रशासकांनी सादर केली होती. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार होती.
मात्र केंद्र सरकार, फुटबॉल प्रशासक आणि फिफाच्या पदाधिकाऱ्यांत गुरुवारी संध्याकाळी चर्चा होणार आहे, हे सर्वोच्च न्यायालयास सांगण्यात आले. त्यामुळे एकाही याचिकेवर सुनावणी झाली नाही.
16 ऑगस्ट
‘भारतीय फुटबॉल’वर बंदी
नवी दिल्ली : ‘भारतीय फुटबॉल महासंघा’ला बंदीला सामोरे जावे लागले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या कारभारात त्रयस्थ यंत्रणेचा हस्तक्षेप होत असल्याचा ठपका ठेवून जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतावर बंदी घातली. त्याचबरोबर भारतातील 17 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कप संयोजनही संकटात असल्याचा इशारा दिला आहे.
भारतीय फुटबॉल महासंघावर 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बंदी आली आहे. त्रयस्थ यंत्रणेचा हस्तक्षेप होत असल्याने ‘फिफा’च्या नियमावलीचा भंग होत आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघावर तातडीने बंदी घालण्यात आली असल्याचे ‘फिफा’ने भारताला कळवले आहे.
महासंघावर कार्यकारिणी असावी, प्रशासक नको, असेही स्पष्ट केले आहे. भारतीय महासंघाची सूत्रे कार्यकारिणीकडे आल्यावर ही बंदी रद्द होईल, असेही ‘फिफा’ने सांगितले.
17 ऑगस्ट
#भारतीय फुटबॉल 2022 : बंदी उठवण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत
नवी दिल्ली : भारतात 17 वर्षांखालील मुलींची वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा होण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक फुटबॉल महासंघाकडून (फिफा) घातलेली बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाने केली.
न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी बुधवारी स्थगित केली आणि पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याचे सांगितले. वर्ल्ड कप भारतातच होण्यासाठी केंद्र सरकार ‘फिफा’सह चर्चा करीत आहे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले.
‘फिफा’सह मंगळवारी चर्चा झाली आणि अजूनही सुरूच आहे. केंद्र सरकारने बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आम्ही करीत आहोत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. भारतीय फुटबॉलमधील पेच सोडवण्यासाठी सर्वच प्रयत्न करीत आहेत, असे न्यायालयाने म्हटल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मेहता यांनी सांगितले.
20 ऑगस्ट
माजी फुटबॉल कर्णधार समर बॅनर्जी यांचे निधन
कोलकाता : मेलबर्न ऑलिम्पिक क्रीडा फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेले समर ‘बद्रू’ बॅनर्जी यांचे शनिवारी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघ चौथा आला होता.
‘बद्रू दा’ या नावाने प्रसिद्ध असलेले बॅनर्जी यांना अल्झायमर, अॅझोतेमिया; तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांना जुलैच्या अखेरीस करोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे शनिवारी पहाटे 2.10 वाजता निधन झाले.
मोहन बागान क्लबमध्ये अनेक फुटबॉलप्रेमींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. समर बॅनर्जी यांनी मोहन बगानला अनेक स्पर्धांत विजेते केले. त्यांनी बंगालला दोनदा संतोष करंडक जिंकून दिला होता. त्यांनी डॉक्टर व्हावे हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते; पण त्यांनी फुटबॉलला प्राधान्य दिले.
युवा स्पर्धेत खेळत असतानाच त्यांनी तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी बगानला ड्युरँड कप (1953), रोव्हर्स कप (1955) यांसारख्या प्रमुख स्पर्धांत विजेते केले होते. ते भारतीय फुटबॉल संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचेही सदस्य होते.
22 ऑगस्ट
फुटबॉल महासंघावरील प्रशासकीय समिती रद्द
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकीय समितीच्या नियुक्तीचा आपलाच निर्णय रद्द केला आहे. फिफा अर्थात जागतिक फुटबॉल महासंघाने घातलेली बंदीची कारवाई रद्द होण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल महासंघावर 18 मे रोजी तीन सदस्यीय प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. प्रफुल्ल पटेल अध्यक्ष असलेली कार्यकारिणी समिती बरखास्त करून निवृत्त न्यायाधीश अनिल आर. दवे, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि भारताचे माजी फुटबॉल कर्णधार भास्कर गांगुली या तीन प्रशासकांची नियुक्ती केली होती.
‘आम्ही दिलेल्या निर्णयाने जर वरील प्रक्रिया तिच्या तार्किक निष्कर्षापर्यंत पोचली नाही तर, न्यायालय पुढील टप्प्यावर पुढील कोणत्याही आदेशाचा विचार करेल,’ असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाने 18 मे आणि 3 ऑगस्टला दिलेल्या निर्णयांबाबत फेरविचार याचिका सादर केली होती.
फिफासह चर्चा करूनच ही याचिका सादर करण्यात आली होती. भारताचे 17 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कपचे संयोजन कायम राहण्यासाठी ही याचिका सादर केली होती.
24 ऑगस्ट
भारताच्या लढती व्हिएतनामकडून रद्द
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाच्या सप्टेंबरअखेरीस होणाऱ्या लढती रद्द करण्याचा निर्णय व्हिएतनामने घेतला आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील सहभाग अनिश्चित असल्याने व्हिएतनामने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ सिंगापूरविरुद्ध 24 सप्टेंबरला आणि व्हिएतनामविरुद्ध 27 सप्टेंबरला खेळणार होता. या दोन्ही लढती व्हिएतनाममधील हो चि मिन्ह येथे होणार होत्या.
जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतावर कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच व्हिएतनामने या लढती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघासह कोणतेही करार करू नका; तसेच त्यांच्याविरुद्ध सामने खेळू नका, असे ‘फिफा’ने संलग्न संघटनांना भारतावरील बंदीची कारवाई करताना कळवले होते. त्यानुसार व्हिएतनामने निर्णय घेतला आहे.
26 ऑगस्ट
भारतावरील बंदी ‘फिफा’ने उठवली
नवी दिल्ली : फिफा (जागतिक फुटबॉल महासंघाने) भारतावरील बंदी उठवली आहे. त्याचबरोबर मुलींच्या 17 वर्षांखालील वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे भारताचे यजमानपदही कायम राखले आहे. ‘फिफा’ने 15 ऑगस्टच्या मध्यरात्री घातलेली बंदी 11 दिवसांनी उठवली आहे.
फिफाने भारतीय फुटबॉल महासंघास बंदी उठवल्याचे पत्र लिहिले आहे.
प्रशासकीय समिती दूर झाल्यामुळे, तसेच निवडणूक होईपर्यंत महासंघाचा कारभार हंगामी सचिव पाहणार असल्यामुळे कारवाई रद्द केली आहे, असे ‘फिफा’ने पत्रात म्हंटले आहे. #भारतीय फुटबॉल 2022
2 सप्टेंबर
फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी चौबे; भुटियांना एकच मत
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या इतिहासात प्रथमच माजी खेळाडूची अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदाच्या एकतर्फी निवडणूकीत माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी देशातील अव्वल खेळाडू बायचुंग भुतियांचा धुव्वा उडवला.
या निवडणुकीत भुतियांना अवघे एक मत मिळाले. दरम्यान, नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील मालोजीराजे छत्रपती यांनाही स्थान आहे. त्यांची सदस्यपदी निवड झाली.
मालोजीराजे छत्रपती सदस्यपदी
कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची अखिल भारतीय फुटबॉल संघाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव सदस्य आहेत. ते गेली दहा वर्षे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष; तसेच कोल्हापूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
फुटबॉलच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे सचिव आहेत. #भारतीय फुटबॉल 2022
19 सप्टेंबर
भारतीय फुटबॉलमधील वाद
कोलकाता : भारतीय फुटबॉल महासंघाची नवी कार्यकारिणी आल्यावरही 2022 मध्ये महासंघातील वाद संपण्यास तयार नाहीत. शाजी प्रभाकरन यांच्या सचिवपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्याची बायचुंग भुतिया यांची मागणी महासंघाच्या कार्यकारिणीने फेटाळली. याबाबत आता भुतिया न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
‘प्रभाकर दिल्ली संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांची मानधन देऊन नियुक्ती करणे म्हणजे एक मत खरेदी केल्यासारखेच आहे.
त्यामुळे या नियुक्तीबाबत चर्चा करण्याचा मी आग्रह धरला. मात्र, हा मुद्दा विषयपत्रिकेत नसल्याचे सांगत माझी मागणी फेटाळण्यात आली,’ असे भुतिया यांनी सांगितले.
बक्षीस समारंभात फोटोसाठी राज्यपालाने सुनील छेत्रीला ढकलले[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=7lkff4VQGVc&t=63s” column_width=”4″]कोलकाता : भारताचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली बेंगळुरू एफसीने ड्युरँड कप स्पर्धा जिंकली. या यशाने छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र, या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन यांनी स्वत: फोटोमध्ये दिसावे, म्हणून विजयाचा करंडक स्वीकारत असलेल्या छेत्रीलाच मागे ढकलले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, ला गणेशन यांच्यावर चौफेर टीका होत आहे. ला गणेशन यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी विराजमान होऊन केवळ दोन महिने झाले आहेत. मात्र, ज्या पश्चिम बंगालमध्ये फुटबॉल सर्वांत लोकप्रिय आहे, तेथेच फुटबॉलमधील महान खेळाडू छेत्रीचा अपमान झाल्याची भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त झाली. ही घटना रविवारी घडली. |
28 सप्टेंबर
सुनील छेत्रीला ‘फिफा’चा सलाम
नवी दिल्ली : ‘तुम्ही रोनाल्डो, मेस्सीला ओळखताच, आता समजून घ्या अशा फुटबॉलपटूला ज्याने रोनाल्डो, मेसीपाठोपाठ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत! सुनील छेत्री… ’
अशी खास दखल घेतली आहे ती जागतिक फुटबॉलचा कारभार सांभाळणारी संस्था ‘फिफा’ने. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 117 गोलसह अव्वल असून, अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीच्या नावावर 90 गोल आहेत.
यापाठोपाठ 84 गोल तडकावणारा सुनील छेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या कर्णधाराचा लौकिक, गुणवत्ता यांची याची जागतिक पातळीवर दखल घेण्याच्या दृष्टीने ‘फिफा’ने 38 वर्षीय सुनील छेत्री याच्यावर तीन भागांची मालिका तयार केली असून, ती फिफा + या स्ट्रीमिंग व्यासपीठावर उपलब्ध आहे. वर्ल्ड कपच्या ट्विटर हँडलवरून ‘फिफा’ने तशी घोषणा केली आहे.
4 ऑक्टोबर
भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी इगॉर स्तिमॅक
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी इगॉर स्तिमॅक यांची फेरनिवड झाली. आशिया कप स्पर्धेपर्यंत स्तिमॅक यांचा करार वाढवण्याचा निर्णय भारतीय फुटबॉल महासंघाने घेतला होता. त्यास स्तिमॅक यांनी मंजुरी दिली.
भारताने आशिया कप स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास स्तिमॅक यांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने घेतला आहे.
त्यासही स्तिमॅक यांनी मंजुरी दिल्याचे समजते. स्तिमॅक 2019 पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. भारताने ‘ड’ गट पात्रता स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवला होता.
9 नोव्हेंबर
केरळमध्ये ‘कटआउट वॉर’मुळे वर्ल्ड कप फुटबॉलचा फिव्हर
कोझीकोडे : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचा ज्वर केरळमध्ये पराकोटीला गेला होता. त्याची परिणती म्हणून कोझीकोडे जिल्ह्यात ‘कटआउट वॉर’ सुरू झाले. उत्तर केरळमधील या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीपात्रात उभारलेले अव्वल खेळाडूंचे कटआउटबाबत भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चा झडल्या.
त्यातच जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) हे छायाचित्र ट्वीट केल्याने ते जास्तच व्हायरलही झाले होते.
भारतात वर्ल्ड कप क्रिकेटचा ज्वर असला तरी केरळला सध्या वर्ल्ड कप फुटबॉलने झपाटले आहे. केरळवासीयांचा पाठिंबा ब्राझील, अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशांना प्रामुख्याने असतो.
गेल्या आठवड्यात पुल्लावूर गावाने जवळून वाहणाऱ्या लिओनेल मेस्सी याचा 30 फूट उंचीचा कटआउट उभारला.
अर्जेंटिनाच्या पाठीराख्यांनी सुरुवात केल्यावर ब्राझीलचे चाहते हार मानणे शक्यच नव्हते. त्यांनीही त्याच नदीत नेमारचा 40 फूट उंचीचा कटआउट लावला.
केरळ म्हणजे दक्षिण अमेरिकेतीलच देश नव्हे, हे दाखवण्याचे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांनी ठरवले. त्यांनीही 45 फूट उंचीचा कटआउट उभारला. रोनाल्डो फ्री किकसाठी सज्ज असल्याचे दाखवले. अर्थातच हे कटआउटचे छायाचित्र चर्चेत आले.
अर्जेंटिनाने 2021 मध्ये कोपा अमेरिका कप जिंकल्यावर केरळमधील जल्लोष अर्जेंटिनातील शहरांच्या तोडीचा होता, असे सांगितले जात आहे.
त्याची छायाचित्रे अर्जेंटिनातही व्हायरल झाली होती. केरळमधील आमदारांमध्ये ब्राझील जिंकणार की अर्जेंटिना यावरून ट्विटरवरून वाद सुरू झाले आहेत.
अर्थात, हे टोकाचे प्रेम कधी जीवावरही येते. गेल्या आठवड्यात ब्राझील खेळाडूचे छायाचित्र झाडावर लावण्याच्या प्रयत्नात 48 वर्षीय पुरुषांचे निधन झाले होते.
13 नोव्हेंबर
लिव्हरपूलची मालकी मुकेश अंबांनींंकडे?
लंडन : आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी इंग्लंडमधील प्रीमियर लीग फुटबॉलमधील अव्वल क्लब लिव्हरपूलची खरेदी करण्यास उत्सुक आहेत. लिव्हरपूलची सध्या मालकी असलेल्या फेनवे स्पोर्टस ग्रुपने लिव्हरपूल क्लबची विक्री करण्याचे ठरवले.
त्या क्लबच्या खरेदीसाठी सुरू असलेल्या स्पर्धेत अंबानी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. लिव्हरपूलच्या विक्रीसाठी ‘फेनवे स्पोर्ट्स’ने 4 अब्ज ब्रिटिश पौंड इतकी किंमत निश्चित केली आहे. याबाबत रिलायन्स उद्योगसमूहाचे चेअरमन, तसेच व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ‘फेनवे स्पोर्ट्स’सह संपर्क साधल्याचे वृत्त इंग्लंडमधील वृत्तपत्राने दिले आहे.
मात्र, त्यास मुंबईतील रिलायन्सच्या मुख्यालयातून दुजोरा मिळालेला नाही.
15 नोव्हेंबर
‘मँचेस्टर युनायटेड’ने दगा दिला : रोनाल्डो
लंडन : ‘मँचेस्टर युनायटेड क्लब व्यवस्थापन, मार्गदर्शक एरिक तेन हॅग, तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंनी आपल्याला दगा दिला,’ असा आरोप ख्रिस्तियानो रोनाल्डोने केला आहे. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत रोनाल्डोने संघास लक्ष्य केले.
प्रीमियर लीगमधील युनायटेडची वर्ल्ड कप ब्रेकपूर्व लढत संपल्यावर रोनाल्डोच्या मुलाखतीची क्षणचित्रे प्रसारित करण्यात आली. रोनाल्डोला सलग दुसऱ्या सामन्यासाठी युनायटेडने संघाबाहेर ठेवले. आता या मुलाखतीमुळे रोनाल्डो ‘युनायटेड’कडून अखेरची लढत खेळला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘युनायटेड’चे मार्गदर्शकच नव्हे, तर संघातील काही खेळाडूही मी क्लब सोडून जावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. मला त्यांनी दगा दिला आहे, असा दावा रोनाल्डोने केला. ही मुलाखत क्लबचे वरिष्ठ पदाधिकारीही बघणार आहेत, याची जाणीव करून दिल्यावर रोनाल्डोने मला याची फिकीर नाही.
लोकांना सत्य कळायलाच हवे. काही लोकांना मी येथे नकोच होतो, असेच मला गेल्या वर्षीपासून वाटत होते, असे तो म्हणाला. ‘युनायटेड’ने रोनाल्डोच्या मुलाखतीबाबत टिपणी करणे टाळले आहे. सध्याचे मार्गदर्शक तेन हॅग यांना माझ्या खेळाबद्दल आदर नाही. मलाही त्यांच्याबद्दल नाही.
ॲलेक्स फर्ग्युसन यांनी युनायटेडचा निरोप घेतल्यापासून क्लबची पीछेहाटच सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी जबाबदारी सोपवलेले राल्फ रागनिक मार्गदर्शकच नव्हते, असा दावाही रोनाल्डोने केला.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]