10 मिनिटांत स्पोर्ट न्यूज

10 मिनिटांत स्पोर्ट न्यूज
मिताली राज पुन्हा परतणार?
दुबई : भारताच्या मिताली राजने जून महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, मितालीला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळू शकते. मितालीने संधी मिळाल्यास पुढील वर्षीच्या महिला आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आयपीएलसाठी का असेना, मितालीच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. मितालीने २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. मात्र, आयसीसीच्या हंड्रेड परसेन्ट ‘क्रिकेट पॉडकास्ट’ या कार्यक्रमात मितालीने पुनरागमनाची इच्छा बोलून दाखवली. या कार्यक्रमात तिने इंग्लंडच्या इसा गुहा आणि न्यूझीलंडच्या फ्रँकी मॅकाय यांच्याशी संवाद साधला. ती म्हणाली, ‘महिला आयपीएलमध्ये खेळण्याचा पर्याय मी खुला ठेवला आहे. अर्थात, खेळायचे की नाही हे अद्याप ठरविलेले नाही. महिलांच्या आयपीएलला आणखी बरेच महिने आहेत. महिलांची पूर्ण वेळ आयपीएलचा भाग होणे मला आवडेल.’ ३९ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजारांहून अधिक धावा केल्या होत्या. सध्या पुरुषांच्या आयपीएलदरम्यान तीन संघांदरम्यान महिलांची आयपीएल होते. आता पुढील वर्षी बीसीसीआय स्वतंत्र महिला आयपीएल लीग सुरू करण्याचा विचार करीत आहे.
करुणा जैन निवृत्त
10 मिनिटांत स्पोर्ट न्यूज | बेंगळुरू : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी यष्टीरक्षक करुणा जैन हिने रविवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३६ वर्षीय करुणाने पाच कसोटींत १९५ धावा केल्या असून, ४४ वन-डे सामन्यांत ९८७ धावा केल्या होत्या. तिने कसोटीत २३, वन-डेमध्ये ५८ फलंदाज बाद करण्यात मोलाची कामगिरी बजावली. तिने भारतासह कर्नाटक, पुदुच्चेरी आणि दक्षिण विभागाचेही प्रतिनिधित्व केले आहे. ती २०१४मध्ये अखेरचा वन-डे सामना खेळली होती. ती नऊ टी-२० सामनेही खेळली आहे.
वर्णद्वेषाची तक्रार
एडिनबर्घ : स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाचे संचालकांना रविवारी वर्णद्वेषाच्या तक्रारीवरून पायउतार व्हावे लागले आहे. यासाठी स्वतंत्र चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत स्कॉटलंडचा गोलंदाज माजिद हकने गेल्या नोव्हेंबरमध्ये याबाबत तक्रार केली होती. त्याआधी हकचा सहकारी कासिम शेखनेही तक्रार केली होती.
दीपाच्या प्रशिक्षकांकडे ‘जिम्नॅस्टिक्स’ची सूत्रे
10 मिनिटांत स्पोर्ट न्यूज | नवी दिल्ली : दीपा कर्माकरला घडवलेल्या बिश्वेश्वर नंदी यांची राष्ट्रकुल क्रीडा जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. वादग्रस्त प्रशिक्षक रोहित जयस्वाल यांच्याऐवजी नंदी यांची नियुक्ती झाली आहे. जयस्वाल यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांनी आपली परवानगी न घेता आपले व्हिडिओ चित्रिकरण केल्याचा आरोप अरुणा रेड्डीने केला. भारताला या स्पर्धेत प्रणती नायक हिच्याकडून पदकाची आशा आहे. तिला जयस्वाल यांनी घडवले आहे. मात्र, संघातील सर्व खेळाडूंना मी जाणतो, असे नंदी यांनी सांगितले. त्यांनी प्रोतिस्था समंता हीच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे, असेही सांगितले.
धावपटू डोपिंगमध्ये दोषी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय अॅथलेटिक्स महिला रिले संघातील धावपटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरली असल्याचे समजते. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना या खेळाडूचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. निवडलेल्या संघात द्युती चंद, हिमा दास, श्रावणी नंदा, एन. एस. सिमी, एस. धनलक्ष्मी आणि एम. व्ही. जिलना यांची निवड झाली होती. सुरुवातीला जिलना हिला वगळण्यात आले होते; पण धनलक्ष्मी चाचणीत दोषी ठरल्यामुळे जिलनाची निवड झाली. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेले आता पाच खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले आहेत. यापूर्वी धनलक्ष्मी, ऐश्वर्या बाबू यांच्यासह अनीशकुमार आणि गीता हे पॅरा अॅथलीट दोषी आढळले आहेत.
लवलिनाचा मानसिक छळवणुकीचा आरोप
बर्मिंगहॅम : ‘भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आपली मानसिक छळवणूक करीत असल्याचा गंभीर आरोप ऑलिम्पिक ब्राँझ पदक विजेती बॉक्सर लवलिना बर्गोहाइन हिने केला आहे. भारतीय बॉक्सिंगमधील राजकारणाचा माझ्या सरावावर परिणाम झाल्याचा आरोपही तिने केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांआधीच तिने केलेल्या या आरोपाने भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा 28 जुलै 2022 पासून आहे. लवलिनाचे वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना क्रीडानगरीत प्रवेश नाकारण्यात आला. गुरुंग यांच्याकडे स्पर्धेचे ‘अॅक्रिडिएशन’च नाही. लवलिनाचे वैयक्तिक प्रशिक्षक अमेय कोळेकर यांचीही स्पर्धेसाठी निवड झालेली नाही. त्यामुळेही लवलिना संतापल्याची चर्चा आहे. भारतीय क्रीडा प्राधीकरणाने भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेला लवलिनाने उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्याची सूचना केली आहे.
टेबल टेनिस संघनिवडीवरूनही वाद
मानसोपचार तज्ज्ञ गायत्री वर्तक यांचा संघात समावेश न केल्यामुळे भारतीय टेबल टेनिस संघातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. आता माजी बॅडमिंटनपटू गायत्री यांचा संघात समावेश करण्यात आला आहे; पण त्यांनाही अॅक्रिडिएशन मिळण्याबाबत प्रश्न येण्याची शक्यता आहे. गायत्री यांना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. राष्ट्रीय शिबिराच्या वेळी गायत्री संघासोबत होत्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी गायत्री संघासोबत असल्यास कामगिरी उंचावेल, असे शरथ कमल आणि राष्ट्रीय विजेती श्रीजी अकुला यांनी सांगितले आहे.
अॅथलेटिक्समध्येही रिपेचेज फेरी होणार
भारतीय कुस्तीच्या यशात रिपेचेज (repechage) फेरीचा मोलाचा सहभाग आहे. आता हीच रिपेचेज फेरी अॅथलेटिक्समध्येही लवकरच सुरू होणार आहे. जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत याची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केली आहे.
रिपेचेज (repechage) फेरी कशी असेल?
- 200 मीटर ते 1500 मीटर शर्यतीत रिपेचेज फेरी
- या शर्यतीत प्रत्येक स्पर्धकास किमान दोन संधी
- प्राथमिक फेरीनंतर (हिट्स) ही रिपेचेज फेरी
- रिपेचेज ही उपांत्य फेरीची पात्रता
नेमके काय बदल होतील?
- सध्याच्या नियमानुसार प्राथमिक फेरीतील विजेते उपांत्य फेरीत
- उर्वरित जागांसाठी सर्वोत्तम वेळेनुसार प्रवेश
- नव्या रिपेचेज फेरीमुळे सर्वोत्तम वेळेनुसार क्रमवारी ठरणार नाही
- उपांत्य फेरीतील उर्वरित जागांसाठी थेट स्पर्धा होणार
यामुळे काय साध्य होईल?
- खेळातील तांत्रिकता दूर होऊन थेट अव्वल स्पर्धक
- ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धात अतिरिक्त शर्यतीचे प्रक्षेपण
- प्रत्येक स्पर्धकास किमान दोन शर्यतीत कौशल्य दाखवण्याची संधी
कोणत्या स्पर्धेत असेल रिपेचेज फेरी?
- 200 मीटर ते 1500 मीटरसाठीच रिपेचेज फेरी
- 100 मीटरमध्ये प्राथमिक फेरी असल्याने रिपेचेज फेरी नाही
- दीर्घ अंतराच्या शर्यतीसाठी रिपेचेज (repechage) फेरी नसणार
- दीर्घ अंतराच्या शर्यती जास्त
- थकवणाऱ्या असल्यामुळे निर्णय
- 2023 च्या जागतिक स्पर्धेत मात्र रिपेचेज फेरी नसणार