जिम्नॅस्टिक खेळाडू किरन बेहान याची थक्क करणारी कहाणी
संकटे कोणाला चुकली नाहीत…? काही जणांनी संकटांनाच संधी मानले; पण त्याच्या आयुष्यात अशा जीवघेण्या संकटांची मालिका सुरू झाली, की ही संकटेच त्याच्या प्रत्येक संधीत बाधा ठरत गेली. एकूणच काय, तर सगळ्या संधींवरच घाव घालणारी ही संकटे होती. मात्र, त्यावर मात करीत त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. ही कहाणी आहे जिम्नॅस्टिक खेळाडू किरन बेहान (Kieran Behan) या इंग्लंडमधील जन्मलेल्या एका आयरिश जिम्नॅस्टची, ज्याने ऑलिम्पिकमध्ये मजल मारली.
दक्षिण लंडनमधील क्रॉयडन शहरात जन्मलेल्या किरनचे आईवडील मूळचे आयर्लंडचे. इंग्लंडमधून नंतर हे आयरिश कुटुंब आपल्या मायदेशी स्थायिक झालं. मात्र, यात किरनचे आयुष्य भयंकर यातनांतून गेले. अवघ्या दहा वर्षांचा असताना त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करून कर्करोगाचा ट्युमर बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया इतकी गुंतागुंतीची होती, की मज्जातंतूंच्या वेदनांनी तो सारखा विव्हळत होता. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर त्याला चालताच येत नव्हते. तब्बल दीड वर्ष तो व्हीलचेअरला खिळून होता. या दुखण्यातून तो सावरला आणि जिम्नॅस्टिककडे वळला. मात्र, सराव सुरू असताना काही दिवसांनंतर किरनच्या आयुष्यात पुन्हा जीवघेणे संकट उभे ठाकले.
उंच बारवर सराव करीत असतानाच तो घसरला आणि डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारानंतर कळले, की ही इजा मेंदूला झाली असून, कानाच्या आतील भागालाही धक्का पोहोचला आहे. ही जखम इतकी गंभीर होती, की किरनने स्वतःवरचं संतुलनच गमावलं. यामुळे किरन पुन्हा व्हीलचेअरला खिळला. वर्षभर तो शाळेत जाऊ शकला नाही. वर्षभरानंतर त्याची शाळा पुन्हा सुरू झाली; पण संकट टळलेले नव्हते. त्याला आता वॉकिंग स्टिकचा आधार घ्यावा लागत होता.
जिम्नॅस्टिक खेळाडू किरन बेहान याची जिद्द
काठीच्या आधाराने चालताना त्याला खूप त्रास व्हायचा. हा त्रास कमी की काय, त्याला वर्गमित्रांनी चिडवायला सुरुवात केली. हेही त्याने सहन केले. मात्र, डॉक्टरांनी धक्कादायक रिझल्ट दिला. तो म्हणजे किरनला यापुढे चालता येणार नाही. त्याचे आईवडील हादरलेच. पण किरन हार मानायला तयार नव्हता. तब्बल तीन वर्षांनी किरन या गंभीर दुखण्यातूनही सुखरूप बाहेर पडला. जिम्नॅस्टिकचा पुन्हा कसून सराव सुरू झाला. मग किरनने मागे वळून पाहिलेच नाही. ज्युनिअर गटात अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. उत्तम कामगिरीच्या जोरावर किरनची २०१२ मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपसाठी निवड झाली. अर्थात, किरनच्या जीवघेण्या परीक्षा अजून संपलेल्या नव्हत्या. स्पर्धेला सहा आठवडे बाकी असतानाच किरनवर नवे संकट कोसळले. सराव करताना उंच बारवरून तो कोसळला आणि गुडघ्याच्या लिगामेंट तुटल्या. ही संकटे एकामागोमाग झेलत असताना किरन खचला मुळीच नाही. तो जिद्दीने पुन्हा उभा राहिला. २०११ मध्ये मात्र त्याने कमालच केली. बर्लिनमध्ये झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य, तर वर्ल्ड चॅलेंज कप सीरिजमध्ये कांस्य पदक जिंकले. ही दोन्ही पदके त्याने फ्लोअर प्रकारात जिंकली. त्यानंतर २०१२ मध्ये त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले. जिम्नॅस्टिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारा तो आयर्लंडचा दुसराच खेळाडू ठरला. २०१४ व २०१५ अशी सलग दोन वर्षे त्याने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये फ्लोअर व उंच बार प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली. लक्ष्याचा वेध घेताना दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द काय असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे किरन.
जिम्नॅस्टिक खेळाडू किरन बेहान याच्याविषयी हेही जाणून घ्या…
किरन बेहानचा जन्म १९ एप्रिल १९८९ मध्ये इंग्लंडमधील क्रॉयडन या शहरात झाला.किरनचे आईवडील मूळचे आयरिश आहेत. |
वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या पायातून कर्करोगाचा ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे दीड वर्षे तो व्हीलचेअरला खिळून होता. |
या शस्त्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर त्याने जिम्नॅस्टिकचा सराव सुरू केला. मात्र, काही महिन्यांतच हाय बारवरून पडल्याने त्याच्या डोक्यावर गंभीर इजा झाली. मेंदूला धक्का बसलाच, शिवाय कानाच्या पडद्यालाही इजा झाली. |
या दुर्घटनेमुळे तो पुन्हा व्हीलचेअरला खिळला. यातून बाहेर यायला त्याला तीन वर्षे लागली. |
किरन आता पुन्हा कधीही चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. |
मात्र, किरनने जोरदार कमबॅक करीत जिम्नॅस्टिक सुरू केले. |
सराव करताना २०१० मध्ये पुन्हा तो पडला. यात त्याच्या पायाच्या लिगामेंट तुटल्या. यामुळे त्याला निवड होऊनही युरोपियन चॅम्पियनशिप खेळता आली नाही. |
यावरही मात करीत किरनने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवली. आयर्लंडमधील तो दुसराच जिम्नॅस्टिकचा खेळाडू आहे, ज्याने ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे. |
किरन बेहान याची माहिती
नाव | किरन बेहान |
कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करतो | आयर्लंड |
यापूर्वी कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करीत होता | इंग्लंड |
जन्म | 19 एप्रिल 1989 |
जन्मस्थळ | क्रॉयडन, इंग्लंड |
खेळ | आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक |
राष्ट्रीय संघात सहभाग | 2009 |
क्लब टॉलवर्थ | जिम्नॅस्टिक्स क्लब |
मुख्य प्रशिक्षक | सायमन गेल आणि डेमेट्रिओस ब्रॅडशॉ |
या चार खेळाडूंची कहाणी बदलून टाकेल तुमचे आयुष्य
Follow us Facebook Page : Kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”102,80″]
One Comment