फिदा कुरेशी- संगीतकला जोपासणाऱ्या घराण्यातील एकमेव कबड्डीपटू
kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549
“तुझे एवढे मित्र आहेत. तुला तरी त्यांची नावं आठवतात का रे?”
ऐन तारुण्यातल्या फिदाभाईंना त्यांच्या वडिलांनी प्रश्न विचारला होता. त्या वेळी फिदाभाईंनी काहीही उत्तर न देता केवळ स्मितहास्य केलं. पण ज्या वेळी फिदाभाईंनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या दफनविधीला पुण्यातल्या मोमीनपुरा कब्रस्तानावर प्रचंड गर्दी लोटली होती. कब्रस्तानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी प्रचंड गर्दी झाली होती.. कदाचित त्यांच्या वडिलांच्या प्रश्नाचं उत्तर हेच असावं.
एक खेळाडू, प्रशिक्षक म्हणून फिदा कुरेशी यांचा सहवास जेवढा खेळाडूंना लाभला, तेवढा बाप म्हणून त्यांच्या मुलांना म्हणावा तसा लाभलाच नाही. फिदाभाईंचं कबड्डीप्रेम इतकं परमोच्च शिखरावर होतं, की आमिर, शदाफत, आफताब या त्यांच्या मुलांच्या वाट्याला फिदाभाई फारसे आलेच नाहीत.
“डॅडी आमच्या वाट्याला तसे कमीच आले; पण जेव्हा आले तेव्हा तेव्हा ते क्षण म्हणजे आमच्यासाठी सेलिब्रेशन असायचं..”
वडील फिदा कुरेशी यांच्या आठवणींनी आमिर, शदाफत, आफताब गलबलून गेले होते. पण जेवढी कबड्डी त्यांनी मॅनेज केली तेवढंच त्यांनी घराकडेही लक्ष दिलं… आमिरने फिदाभाईंचा व्यवस्थापनातला एक गुणही नकळत स्पष्ट केला. अर्थात, तरीही या तिन्ही मुलांची त्यांच्याविषयी एक प्रेमळ तक्रार कायम असायची, ती म्हणजे “डॅडी, आमच्याजवळ थांबा..!” पण फिदाभाई एका जागेवर कधी थांबलेच नाहीत. कबड्डीसाठी संपूर्ण देशभर ते फिरले.
फिदाभाई होतेच तसे. कबड्डी त्यांची नशा होती. ही नशाही अंगात भिणायला एक कारण होतं. फिदाभाई शालेय जीवनात पुण्यातल्या पेरूगेटच्या भावे स्कूलमध्ये खेळायचे. त्यांची ती खेळकर वृत्ती इतकी होती, की त्यांना एकदा शिक्षा म्हणून कबड्डी खेळायला सांगितलं आणि पुढे हीच शिक्षा त्यांनी अगदी आनंदाने जन्मठेपेसारखी भोगली. अखेरच्या श्वासापर्यंत!
मुळात फिदाभाईंचं कबड्डी खेळणंच कुरेशी घराण्यात असंबद्धच म्हणायला हवं. कारण फिदाभाईंच्या घराण्याचा मूळ पिंड संगीतकलेचा. कुरेशी घराण्यावर ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा पगडा. या कुरेशी घराण्याच्या गेल्या सात पिढ्या संगीत आराधनेतच लीन झालेल्या होत्या. वडील खानसाहेब महंमद हुसेन सारंगीवादक, भाऊ फय्याज व्हायोलीनवादक, तर दुसरा भाऊ अन्वर गझल गायक. फिदाभाईच एकमेव असा होता, जो मातीतल्या कबड्डीशी एकरूप झाला. कुरेशी घराण्याला तसा हा धक्काच होता; पण नंतर त्यांच्या यशाचे सूर जसजसे घुमू लागले तसतसा घरातला विरोध मावळत गेला. अखेर वडील म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात जा; पण नावलौकिक मिळव.” वडिलांचा शब्द फिदाभाईंनी कधी खाली पडू दिला नाही. फिदाभाईंचा लोकसंग्रह अफाट होता. संगीत, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांत त्यांचा दांडगा परिचय होता. घरातली अवघड कामे फिदा चुटकीसरशी करायचा. एखाद्या कार्यक्रमासाठी थिएटरची बुकिंग करायची असेल तर घरातील कोणालाही चार दिवस हेलपाटे मारावे लागतील. तरीही काम होणार नाही; पण फिदाच्या एका शब्दावर काम चुटकीसरशी व्हायचं.
फिदा कुरेशी यांचं घर सदाशिवपेठेतील अलका टॉकीजच्या जवळच आहे. घराजवळच अवघ्या काही पावलांवर नदी पार केली, की डेक्कन मशीद लागते. शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जाताना पहिल्यांदा विठ्ठलाचं मंदिर लागतं, त्यानंतर मशीद. फिदाभाई पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे, नंतर नमाजपठण. न चुकता त्यांनी हा शिरस्ता कायम ठेवला. ते म्हणायचे, “ऐलतीरी माझा विठ्ठल, तर पैलतीरी माझा खुदा आहे!”
फिदाभाई संगीत आणि कबड्डी मोठ्या आनंदाने जगले. त्यांना स्वत:बद्दल विचार करायला फारसा वेळ मिळत नव्हता. फिदाभाईंचा भाऊ फय्याज सहा-सात वर्षांनी मोठा. फय्याझ यांची व्हायोलिनवर पकड, तर फिदाभाईंची कबड्डीवर. दांडगा परिचय मात्र फय्याझपेक्षा फिदाभाईंचाच अधिक. लोकांनी फिदाभाईंवर भरभरून प्रेम दिलं. फिदाभाईंना मेहदी हसनची गझलगायकी प्रचंड आवडायची.
ते एक गझल गायचे, कधी कधी गुणगुणायचेही…
“अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें”
त्यांच्या सुरेल गळ्यातून ही गझल ज्यांनी ज्यांनी ऐकली असेल त्यांना आता ती प्रचंड अस्वस्थ करीत असेल.
पुण्यातलं कबड्डी प्रशिक्षण शिबिरातलं त्यांचं मार्गदर्शन अखेरचं ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. 17 जून 2012 रोजी या शिबिराला सुरुवात झाली तेव्हा त्यांचा पहाटेपासूनचा शिस्तबद्ध कार्यक्रम थक्क करणारा होता. त्यांच्या अखेरच्या दिवसांत मोहन भावसार सोबत होते. 22 जून 2012 रोजी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं, तेव्हा ते मैदानावर वॉक करीत होते. तेथेच ते कोसळले आणि मैदानावरच अखेरचा श्वास घेतला. जाण्याचा मुहूर्तही निवडला, तो म्हणजे शुक्रवार (जुम्मा). कुरेशी घराण्यातल्या वीराला आणखी काय हवं होतं?
(Divya Marathi : 28 Jun 2012)
स्त्रीशक्तीची सुवर्णपकड घट्ट करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन
शायद कभी ख़्वाबों में मिलें…
Plz watch also video on youtube