EnvironmentalGreen SoldierJungleRaanwata

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट काय आहे, हे ऐकायची उत्सुकता प्रचंड होती. याच उत्सुकतेने मी एका गावाकडे निघालो….

मी ऐकलं होतं, की कुणी नाईक म्हणून एक कुटुंब आहे, ज्यांनी तळवाडे गावात जंगल उभं केलंय… नाशिक जिल्ह्यातलं पहिलं खासगी जंगल! डोळे विस्फारले… जंगल? गावाकडं कुणी शेती करतं, कुणी घराच्या अंगणात बगिचा करतो… पण जंगल?

एकदा हे जंगल पाहायलाच हवं.. पण जायचं कसं? एक तर तळवाडे गाव कधी पाहिलं नाही. माहितीसाठी नाईकांच्या आकांक्षाचा मोबाइल नंबर होताच… तिला फोन केला.

पलीकडून गोड आवाजात आकांक्षाने एखादी स्क्रिप्ट वाचावी तसा पत्ता नावाचा उताराच वाचला… तो ऐकून जाम गोंधळून गेलो.

बापरे! फारच आडवळणाचं आहे!

मी म्हंटलं, “गुगल मॅपच टाका ना?”

ती म्हणाली, “रेंज मिळणार नाही तुम्हाला…गुगल मॅपऐवजी मी व्हॉट्सअ‍ॅपवर सविस्तर पत्ता टाकते…”

आणि फोन कट करीत काही वेळातच तिने शे-दीडशे शब्दांचा संपूर्ण पत्ताच माझ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या ओंजळीत ओतला…

इतका सविस्तर पत्ता आयुष्यात पहिल्यांदाच वाचत होतो…

या पत्त्याबरहुकूम मी उतारा उताराने खाली खाली जात एकदाचा गावात पोहोचलो…

तेव्हा जाणवलं, की तळ गाठल्याशिवाय तळवाडे गाठता येत नाही!

गावात कोणालाही विचारलं, आनंद नाईकांचा बंगला कुठे, तर ते थेट त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडतील. त्याचाही प्रत्यय आला.

मी एका भव्य गेटमधून आत आलो, तर दोन्ही बाजूंनी उंचच उंच ताडामाडाची झाडं…  सूर्यकिरणंही या दाट झाडीतून लपूनछपून आमच्याकडे कुतूहलाने पाहत असल्याचा भास होत होता…

शतार्ची म्हणजे काय

आम्ही नाईकांच्या आलिशान बंगल्यात आलो. सगळं कसं निसर्गाशी अनुरूप..! नाईकांनी या जंगलाचं नाव शतार्ची Shatarchi | ठेवलं आहे… माझं मन या नावाभोवतीच घुटमळत राहिलं. नाईकांनी शतार्ची नाव कुठं तरी वाचलं होतं. ते त्यांना आवडलं. त्यांना शतार्चीचा अर्थ माहीत नव्हता… पण ठेवलं नाव. नंतर मी या नावाचा शोध घेतला.. ऋग्वेदातल्या प्रथम मंडल देवतेचं नाव शतार्ची Shatarchi | आहे, असं कळलं. असो..

नाईकांशी गप्पा रंगल्या होत्या आणि या गप्पांतून शतार्ची जंगलाचा इतिहासही उलगडत गेला..

Anand Naik and Monal Naik | आनंद व मोनल या नाईक दाम्पत्याने आधीच ठरवलं होतं, की आपण पंचेचाळिशीनंतर जंगलातच राहायचं. अखेरचा श्वासही जंगलातच घ्यायचा.

नाईक यांची वूडन पॅकेजिंगची फॅक्टरी होती. आनंद यांच्या वडिलांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर ही फॅक्टरी सुरू केली होती; पण त्यांना ती फॅक्टरी काही पेलवली नाही. उगाच पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा ती विकून का टाकू नये, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या वेळी आनंद नाईक यांनी नुकतंच बारावीचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

ते म्हणाले, “तुम्ही फॅक्टरी विकणारच आहात, तर मग मी एक प्रयत्न करून पाहतो. मला नाही जमलं तर मग खुशाल विका फॅक्टरी.”

दिवसा कॉलेज आणि रात्री फॅक्टरी

आनंद यांचा प्रयत्न यशस्वी झाला आणि ‘एफवाय’ला असतानाच त्यांनी फॅक्टरीची पूर्ण कमान आपल्या हाती घेतली. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा हा मुलगा पुढे शिक्षण सोडून या फॅक्टरीचाच डॉक्टर झाला. शिक्षण खुंटू नये म्हणून त्यांनी दिवसा कॉलेज आणि रात्री फॅक्टरी असा दिनक्रम सुरू केला. वकिली शिक्षण पूर्ण केलं. ते क्रिमिनल लॉयर झाले. नाईक कुटुंब काहीसं हळवं आहे. त्यांनी यातही विचार केला, की गुन्हेगारांच्या केसेस घेऊन ते पैसे घरात कशाला आणावेत?

मग पुढे वकिली न करता त्यांनी फॅक्टरीच सांभाळली आणि कुटुंबाची निर्भरताही संपूर्णपणे फॅक्टरीवरच राहिली. या व्यवसायामुळे त्यांना अनेक झाडं तोडावी लागली. झाड तुटतं तेव्हा ते भयंकर रडतं. एक घाव झाडावर होत होता, तर दुसरा मनावर. संवेदनशील दाम्पत्याच्या मनाला प्रचंड वेदना होत होत्या. त्याचा त्यांना भयंकर मानसिक त्रासही व्हायचा. हे पापच आहे. त्या पापाचं परिमार्जन कधी ना कधी तरी करावं लागणार…

‘सरकार’मध्ये एक डायलॉग आहे… नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए…

नाईकांनी या दूरच्या नुकसानीचाच आधी विचार केला आणि भरपूर झाडं लावण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच उभं राहिलं साडेसहा एकरातील शतार्ची जंगल. आज या जंगलाला 20 वर्षे झाली आहेत. झाडांच्या मुळावरच घाव घालणारी वूडन पॅकेजिंगची फॅक्टरीही त्यांनी बंद केली. त्याऐवजी आनंद टायर रिट्रेडिंग सर्व्हिसेस ही नवी फॅक्टरी सुरू केली. त्यालाही आता 29 वर्षे उलटली आहेत.

प्रवास एखाद्या मुशाफिऱ्यासारखा

नाईकांचा नाशिक ते तळवाडे हा प्रवास एखाद्या मुशाफिऱ्यासारखा आहे. मुसाफिर एकदा रस्ता तुडवत निघाला, की कुठं जायचं हे त्याला माहीत नसतं. फक्त चालत राहायचं. तसंच काहीसं नाईकांचं आहे. त्यांना कळलं, की तळवाडेत जमीन विक्रीस आहे. ती पडीक आहे, जायलायायला रस्ता आहे का, बसची सोय आहे का, यापैकी कसलाही विचार केला नाही. पाणी आहे जवळ म्हणून त्यांनी १९९२ मध्ये ही जमीन खरेदी केली. नंतर नाईक दाम्पत्य जेव्हा राहायला आले, तेव्हा गावातल्या लोकांमध्ये आश्चर्याचे भाव उमटले…

लोकं आश्चर्याने विचारू लागली, “का बरं इतक्या लांब राहायला आले? काय झालं तुमच्या आयुष्यात असं?”

आता या प्रश्नांची उत्तरं तरी काय देणार…? कारण नाईक जंगल बनविण्याच्या विचाराने झपाटलेले होते.

मुळात नाईक कुटुंबाने ज्या वेळी जमीन घेतली तेव्हा त्यांना हेच माहिती नव्हतं, की कोणती झाडं लावावी? त्यांनी सुरुवातीला निलगिरी आणि सागाची झाडंच लावली. २००१-०२ नंतर ठरवलं, की झाडं लावून खूप उशीर होईल. नाईक कुटुंबाला थोरली ईशा आणि धाकटी आकांक्षा या दोन मुली.

ईशा सध्या  टोरांटोला अ‍ॅनिमेशन कंपनीत आहे. पण दोन्ही मुली लहान होत्या तेव्हा त्यांना या निसर्गाचा आनंद कधी मिळेल..? म्हणून नाईक दाम्पत्याने मिळेल तशी देशी झाडं लावण्याचा प्रयत्न केला.

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट

या झाडांची माहिती घेत असताना त्यांनी डॉ. श्रीश क्षीरसागरांचं ‘फुलवा’ आणि ‘बहर’ वाचलं. देशी झाडांची नावं कळली, की लगेच त्या झाडांचा शोध सुरू व्हायचा.

कधी या रोपवाटिकेतून त्या रोपवाटिकेत त्यांची भटकंती सुरू झाली. त्या वेळी त्यांना सामाजिक वनीकरणाची खूप मदत झाली. निवृत्त वन अधिकारी कुसुम दहिवेलकर यांचंही त्यांना मार्गदर्शन मिळालं. यातूनच त्यांना दुर्मिळ प्रजातीतली झाडं मिळाली.

अशा वृक्षवेलींनी शतार्ची छान बहरत होती; पण आधी जी निलगिरी व सागाची झाडं लावली होती, त्याकडे त्यांचं सुरुवातीला दुर्लक्षच झालं. निलगिरीची झाडं तर वाढली, पण सागाची झाडं फारशी वाढली नाहीत. अनेक झाडं तर जळून गेली. त्यामुळे पुन्हा झाडं लावली.

खापराच्या पाटीवर लिहिलेलं पुसलं, की पुन्हा नव्याने लिहावं तसं हे सगळं होतं. (खापराची पाटी नव्या पिढीच्या लक्षात येणार नसेल तर मग ‘डिजिटल नोटपॅड’ म्हणा… खापराच्या पाटीचं हे नवं व्हर्जन)

नाईक दाम्पत्य खांद्यावर पाइप ओढून झाडांना पाणी घालायचे. तसं पाहिलं तर ते ड्रीपही करू शकले असते, पण ते त्यांना करायचं नव्हतं. कारण त्यामुळे झाडांची मुळं खोलवर जात नाहीत. जोराचा वारा आला तर ती उन्मळून पडण्याचा धोका म्हणून त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं.

नाईक दाम्पत्य शेतकरी मुळीच नाही. पण सात जूनला पाऊस येतो, एवढं पक्क डोक्यात होतं. या पावसाच्या अंदाजानेच त्यांनी झाडं लावली, पण सात जूनला पाऊसच आला नाही. त्यानंतर तीन दिवस वाट पाहिली. पाऊस नाहीच.

त्यांना जाणवलं, की आता झाडांचं काही खरं नाही. मग त्यांनी पावसाच्या भरवशावर न राहता विहिरीतल्या पाण्याने संपूर्ण जमीनच भिजवायची ठरवलं. एखाद्या एकरचा प्रश्न असता तरी ते सोपं नव्हतं. त्यांना पहिला प्रश्न पडला, कोण करेल हे सगळं?

…पण एक चूक झाली

मग मोनल नाईकांनीच पदर खोचून जमीन भिजवण्याचं आव्हान स्वीकारलं. मालकीणबाई स्वतः जमीन भिजवताहेत म्हंटल्यावर त्यांचा वॉचमन, त्याची बायको सगळेच लागले कामाला.

निसर्गही त्यांची परीक्षाच पाहत होता. नाईक दाम्पत्याने तीन दिवस घाम गाळल्यानंतर मग पावसानेही अंबराचा खजिनाच रिता करण्यास सुरुवात केली. मनसोक्त बरसला.

निसर्ग मानवाच्या इच्छाशक्तीची कसोटी पाहत असतो, असं म्हणतात ते खोटं नाही. नाईक दाम्पत्याला याचा पुरेपूर प्रत्यय आला.

पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर कालांतराने साग आणि निलगिरीचीच झाडं भरभर वाढू लागली. झाडं वाढू लागली, तसतसे नवे पाहुणे येऊ लागले… हळूहळू खारूताई आली, पक्ष्यांचा किलबिलाट वाढला.

नाईकांना वाटलं होतं, आपण योग्य मार्गावर आहोत… पण एक चूक झालीच, ती म्हणजे अविवेकी झाडांची लागवड!

परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते. त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याने तक्रार केली, की तुमच्या निलगिरीमुळे माझी भातशेती होत नाही… त्याचंही खरंच होतं.

कारण निलगिरी प्रचंड पाणी शोषून घेते. शेवटी त्या शेतकऱ्याचंही भातशेतीवरच पोट आहे. त्यामुळे सगळी निलगिरी काढण्याचा निर्णय घेतला.

मन धजावत नव्हतं, पण हृदयावर दगड ठेवून त्यांनी निलगिरी कायमची काढली. अविचाराने जरी ती झाडं लावली तरी ती तळहाताच्या फोडासारखी जपली होती.

जवळपास शंभरावर निलगिरीची झाडं त्यांना काढावी लागली.

शतार्चीचं वैशिष्ट्य म्हणजे फुलपाखरांचे थवेच्या थवे वेडावून टाकतात. जंगलातच त्यांनी टायगर फुलपाखरांच्या Tiger butterfly | आवडीची झाडं लावली आहेत.

आमच्या अस्तित्त्वाने हजारो फुलपाखरांचा थवा उडाल्यानंतर जो नजारा अनुभवला त्याची सर कशातच नव्हती.

वूड रोजची झाडं…

याच परिसरात नैसर्गिक झऱ्याचं पाणी साचवलं आहे. त्याचीही रचना त्यांनी सुरेख केली आहे. वूड रोजची WOOD ROSE | झाडं पाहून थबकलोच. मुळात ती फुलं नव्हती, तर बी वाळल्यानंतर लाकडी गुलाबासारखी फुलंच भासतात. फुलदाण्यांची शोभा वाढविणारं हे फूल दोन-तीन वर्षांपर्यंत टिकतं.

नाईकांनी विहीर खोदली तेव्हा मोठ्या प्रमाणावर दगड निघाला होता. या दगडांचं काय करायचं? त्यांनी एकेक दगड उतारावरील एका प्लॉटवरच पूर्णपणे समांतर रचला आणि त्यावर शंभरदोनशे ट्रक मातीचा भराव टाकला. त्यावर आंब्याची बाग तयार केली आहे.

हे ऐकून मी कुतूहलाने विचारलं, “असंही करता येतं?”

त्यावर मोनल नाईकांचा निरागस प्रश्न- “मग काय करणार एवढ्या दगडांचं?”

माझ्या प्रश्नाचा रोख झाडांच्या भवितव्याशी निगडित होता, तर मोनल नाईक दगडाप्रती पाझर फोडत होत्या…

शतार्ची जंगलात नाईकांचे ‘सत्याचे प्रयोग’

शास्त्रीयदृष्ट्या हे कितपत योग्य आहे, माहीत नाही; पण नाईक दाम्पत्य त्यांच्या हक्काच्या जागेवर जमेल तसे ‘सत्याचे प्रयोग’ करीत होते. ही आंब्याची बाग शॉर्टसर्किटने दोनदा जळाली होती. जेवढ्या वेळा जळली तेवढ्याच वेळा त्यांनी लावलीही. तेच आपलं डिजिटल नोटपॅडसारखं! पुसलेलं पुुुन:पुुन्हा लिहिणं..

पण आंब्याची झाडं लावणं काही सोडलं नाही. त्यांच्या या चिकाटीचं फळ त्यांना पुढच्या हंगामात नक्कीच मिळेल इतकी ही आमराई छान बहरली आहे.

मात्र, आगीचा धोका टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सगळा पालापाचोळा ते एका ठिकाणी गोळा करून रचतात. हेतू हाच, की पाचोळ्याने पेट घेतला तर तो पसरू नये.

नाईक दाम्पत्याला या जमिनीतून उत्पन्न घेण्याचा कोणताही हेतू नाही. ही जागा त्यांनी आत्मिक समाधानासाठीच विकसित केली आहे.

फार झालं, तर ते आध्यात्मिक शिबिरांसाठी ही जागा वापरू देतात. सामाजिक उपक्रम असेल तर ते ही जागा विनामूल्यही उपलब्ध करून देतात. मात्र, शूटिंग, प्री-वेडिंग, किटी पार्ट्यांना तर ते स्पष्टपणे नकार देतात.

तळवाडे येथील नाईक दाम्पत्याचं शतार्ची नावाचं घनदाट जंगल,shatarchi forest in nashik Talwade,akanksha naik,monal naik,anand naik,पहिलं खासगी जंगल,शतार्ची,शतार्चि,त्र्यंबकेश्वर-तळवाडे,त्र्यंबक तळवाडे,आनंद नाईक,मोनल नाईक,आकांक्षा नाईक,बेडकीचा पाला,मधुनाशिनी,fiddlewood,फिडलवूड,Fishtail Palm,anand nike,monal nike,akanksha nike,shatarchi forest in talwade,shrish kshirsagar

नाईक कुटुंबाला एव्हाना पर्यावरणशास्त्र कळू लागलंय. मार्च ते ऑगस्ट हा पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. या काळात ते कोणत्याच शिबिराला परवानगी देत नाहीत.

सुरुवातीला ते शिबिराला परवानगी द्यायचे. मात्र, अनेक पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आल्यानंतर ते शिबिरांना ऑगस्टनंतरच परवानगी देतात. म्हणजेच काय, तर पहिली शिबिरं पक्ष्यांची, मग इतरांची. या शतार्चीमुळे अनेक पक्ष्यांचे संसार फळले, फुलले.

पिकं संपूर्णपणे सेंद्रिय खतांवरच

नाईक कुटुंबाचा शेती हा मूळ उद्देश अजिबात नाही, पण काही प्लॉटवर त्यांनी पिकं घेतली आहे. ही पिकं संपूर्णपणे सेंद्रिय खतांवरच घेतली जातात. त्याचे पेस्टिसाइडही सेंद्रियच.

त्यात कोणत्याही रासायनिक खतांचा उपयोग केला जात नाही. त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे जंगलात येऊन शांततेत राहायचं.

कारण नाईक कुटुंब आधी नाशिकमध्ये शरणपूर रोड परिसरात राहायचं. पण त्या सिमेंटच्या जंगलात हे कुटुंब रमलंच नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःचं जंगल उभं केलं आणि शहराला कायमचा रामराम ठोकला.

‘शतार्ची’मध्ये कारवी लावली आहे. ही कारवी तोडता येत नाही. त्याला कायद्यानेच बंदी आहे. नाईक कुटुंबासाठी सगळ्याच झाडांना कारवीचाच न्याय आहे. एकदा झाड उभं केलं, की त्यावर पुन्हा घाव घालायचा नाही; पण कारवी त्यांनी मनापासून जपली आहे. कारण त्याला बारा वर्षांतून एकदाच फूल येतं. म्हणूनच त्याचं बीजही बारा वर्षांतून एकदाच मिळतं. जांभळ्या फुलांनी लगडलेलं जायंट पोटॅटो व्हाइन Giant Potato Vine | खूपच छान दिसत होतं.

मोनल नाईक एकेका झाडाची माहिती देत होत्या. झुडपं, शेवाळापासून अडीचशे-तीनशे प्रजातीतल्या झाडांनी ‘शतार्ची’ समृद्ध झालं आहे. वाळलेला पालापाचोळा पायाखाली येत होता.

पापडाची चटणी होते तसा वाळलेल्या पाचोळ्याचा पायाखाली भुगा व्हायचा. त्यातून होणारा कर्र.. कर्र आवाज जंगलाची नीरव शांतता भंग करीत होता. पाचोळ्याचा गंज घालणं हे एक नवं काम नाईक कुटुंबाला या जंगलाने दिलं. विशिष्ट अंतरावर ते या पाचोळ्याचा खच करायच्या.

यदाकदाचित आग लागली तर पाचोळ्याचा एखादाच खच पेट घेईल. त्यामुळे आग विझवणंही सोपं होऊ शकेल हा त्यामागचा हेतू. उन्हाळ्यात नाईक कुटुंब हेच काम करतात. शतार्चीने अनेक जिवांना निवारा दिला. धूळकिड्यांची घरं, मुंग्यांची वारुळं तर ठायी ठायी दिसत होती.

आणखी थोडं पुढं गेल्यानंतर अनेक फुलपाखरांचा थवा झपकन् उडाला… अरे काय सुंदर..!!! हे आनंदोद्गार आपसूकच बाहेर पडले. एवढी हजारो फुलपाखरं मी यापूर्वी कुठंही पाहिली नव्हती.

मुंग्यांना कोणी शिकवलं हे आर्किटेक्चर…

मोनल नाईक म्हणतात, “आम्ही शतार्चीमध्ये कधीच पाऊल ठेवत नाहीत.” शतार्ची जंगलाला मानवी अस्तित्व त्यांनी कधी जाणवूच दिलं नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या जिवांनी या जंगलात घर केलं.

लक्ष्मीतरू, चांदिवा, रक्तचंदन, कांचन, भुत्या पळस, पळस  अशी किती तरी झाडं मन मोहवून टाकत होती. जंगल समृद्ध झालं, पण मधमाश्यांच्या पोळ्याची उणीव या जंगलाला भासते.

आधी होती मधमाश्यांची पोळी; पण आजूबाजूला द्राक्षाची शेती असल्याने रासायनिक फवारणीचा परिणाम मधमाश्यांवर होतो. अनेक मधमाश्या तर तडफडत मरून पडलेल्या त्यांनी पाहिल्या.

मधेच एक वारूळ दिसलं. सुरेख रचना असलेलं ते वारूळ पाहताना कमालीचं आश्चर्य वाटलं. जणू तटबंदी घातलेला एखादा किल्लाच!

मोनल नाईकांनी प्रश्न केला, “मुंग्यांनी या भिंती का मोठ्या केल्या असतील?”

“मी प्रश्नांकित मुद्रेने त्यांच्याकडे पाहिलं…”

तेव्हा मोनल नाईकांनीच ही प्रश्नकोंडी फोडली… त्या म्हणाल्या, “या ज्या मोठ्या भिंती आहेत ना, त्या त्यांनी उतार पाहून बांधल्या आहेत. कारण पावसाचं पाणी उताराने घरात शिरू नये म्हणून त्यांनी केलेली ही रचना. या मुंग्यांना कोणी शिकवलं हे आर्किटेक्चर?”

मोनल नाईकांनी जेव्हा जंगल वाचलं, तेव्हा त्यांना शाळा, कॉलेजात जे शिकायला मिळालं नाही, ते इथं शिकायला मिळालं.

या मुंग्यांना कोणी शिकवलं हे आर्किटेक्चर?

विविध घरांचं शतार्ची जंगल..

मुंग्यांच्या वारूळापासूनच काही अंतरावर मुंगळ्यांचं घर पाहायला मिळालं. हे घर खूप खोल असतं. त्यात अनेक कम्पार्टमेंटही असतात.

आणखी बरंचसं अंतर चालल्यानंतर वाळवीचीही घरं पाहायला मिळाली. नाईक कुटुंबाने ही घरं या मुंग्या, मुंगळ्याइतकीच जपली आहेत.

ही झाडं आजची नाहीत, तर बरीच वर्षे जुनी आहेत. पाणी देताना या घरांना धक्का लागणार नाही याची खूप काळजी घेतली त्यांनी.

आंब्याचं एक वठलेलं झाडही शतार्ची जंगलाची शोभा वाढवतंय. रुंद घेर असलेलं ते आता बुंध्याइतकंच उरलं आहे. एकदा या जंगलात बिबट्याही येऊन गेलाय.

नाईक कुटुंबाचा कुत्रा त्याने फस्त केला होता. गावातली लोकं जेव्हा बिबट्याच्या शोधात आली, तेव्हा ती लोकं म्हणाली, की या वठलेल्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीतच बिबट्या लपलेला असेल. तुम्ही हे झाड काढून टाका…

पण बिबट्या अशा मोकळ्या ढोलीत कशाला येऊन बसेल… नाईकांनी हे झाड काढलं नाही. त्यालाही त्यांनी निसर्गाचा एक घटक मानलं आहे. फिशटेल पामही Fishtail Palm | सुरेख भासत होता. या झाडाची पानं बुकेमध्ये वापरली जातात. शतावरीच्या वेली आपोआप उगवल्या आहेत. पूर्वी तर केवळ दोन झाडं होती.

आता काताची झाडं, कवठ, रक्तचंदन, कळंब, कदंब अशी शेकडो प्रकारची झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. इथलं लहानसं मुंग्यांचं घरही तोडायचं नाही, साप, विंचू दिसला तर त्याला मारायचं नाही, अशी स्पष्ट ताकीदच नाईक कुटुंबाने लोकांना दिली आहे. त्यामुळेच हे जंगल एवढी वर्षे छान टिकलं.

वारूळही जपलं जिवापाड

अन्नसाखळीतले महत्त्वाचे घटक असलेला प्रत्येक जीव त्यांनी जिवापाड जपला आहे. लहानपणी आम्हाला गुरुजी ज्या वेताच्या छडीने मारायचे, त्या वेताचंही झाड या जंगलात पाहायला मिळालं. हे झाड पाहताना मी उगाचंच हात मागे घेतले!

आणखी पुढे चालत चालत आम्ही वाळवीच्या वारुळाजवळ आलो. या वारुळात नागोबाही कधी कधी असतो. या वारुळाची माती म्हणे, अंगाला लावायला चांगली असते.

“मग तुम्ही का नाही घेत ही माती?”

त्यावर मोनल नाईक म्हणाल्या, “अहो, ते इतक्या कष्टाने माती गोळा करून घर बनवतात. ती माती आपण आयतीमायती नेणं ही सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे.. एवढंच काय, कुंभारमाश्या जे मातीचं घर बनवतात तेसुद्धा आम्ही काढत नाही. कण कण माती आणून या माश्या मोठ्या कष्टाने आपलं घरटं बनवतात आणि आपण केवळ आपल्या घरावर ते चांगलं दिसत नाही म्हणून त्याचं घरटं मोडून टाकतो…”

मोनल नाईक निसर्गातल्या प्रत्येक जिवाचा किती बारकाईने विचार करतात!

मी सहज म्हंटलं, “मग आता तुम्ही नाशिक सोडलंच का?”

मोनल नाईक म्हणाल्या, “हो, आता हा आमचा पर्मनंट अ‍ॅड्रेस. आम्ही इथंच मरणार!”

नाईक दाम्पत्याने आता मुलींना सांगून ठेवलंय. यदाकदाचित आमच्या सत्तरी किंवा पंचाहत्तरीनंतर आम्हाला काही आजार झाला, तर आमच्यावर कोणतेही उपचार करू नका… कारण सत्तरीनंतर आमचं शरीर कितीसं चांगलं राहणार? उगाच इतरांना भार!मोनल नाईक ‘निसर्गाध्यात्मिक’ झाल्या आहेत. प्रत्येक गोष्ट त्या निसर्गनियमाशी जुळवून पाहतात.

मी बिचारा कृपाभिलाषी भाविक सत्संग घडल्याचे समाधान बाळगत पुढे पुढे चालत राहिलो. शांतपणे चालताना पायाखाली तुडवला जाणारा पाचोळा मात्र कर कर आवाज करीत होता. नाईकांच्या जमिनीच्या हद्दीजवळ आल्यानंतर त्यांनी शेजारची पडीक जमीन दाखवली.

काय नाही या जंगलात…!

“ही बघा आमच्या शेजारची पडीक जमीन… काहीच उगवलेलं नाही. अगदी अशीच जमीन होती आमची.” हा फरक इतका मोठा होता, की कुणाचा विश्वासही बसणार नाही… जणू कुणी तरी देव आला आणि चमत्कार करून गेला असं सगळं हे वातावरण होतं. गुंजेची वेल, आपट्याची झाडं, पांढरी तुती… काय नाही या जंगलात…!

नाईक दाम्पत्य शहरातून गावाकडे आल्याने एक अडचण प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे विजेचा लपंडाव. वीज सारखी खंडित होते, हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर काहीसा त्रागा दिसला. दुसरी अडचण म्हणजे मजुरांची उणीव. हे सांगता सांगता त्या झाडांचीही माहिती देत होत्या. गुलाबी पेरू, चिंच या फळझाडं दाखवताना त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता. का नाही, पोटच्या मुलासारखं त्यांनी वाढवलेला हा परिवार होता.

चालता चालता गोठा लागला. गायी रवंथ करीत होत्या. पाच गायी होत्या त्यांच्याकडे. आता चारच आहेत. पाचव्या गायीला कोब्रा सर्पाने दंश केल्याने ती दगावली. त्यांच्या मनाला वेदना झाली, पण या डोळ्यांत फक्त करुणा होती… कोब्राविषयी क्रोध अजिबात दिसला नाही.

सगळं शतार्ची जंगल पालथं घातल्यानंतर त्यांनी घराजवळ लावलेल्या एका वनस्पतीचा पाला खायला दिला.

मी म्हंटलं, “हे काय?”

“तुम्ही खाऊन तर पाहा…” मोनल नाईकांना काही तरी सरप्राइज सांगायचं होतं..

तो पाला खाल्ला आणि मग घरातून त्यांनी साखर आणली आणि हातावर ठेवत म्हणाल्या, “आता ही साखर खाऊन पाहा…”

आणि काय आश्चर्य! साखरेचा गोडवाच जाणवत नव्हता. साखर नव्हे, मातीच खातोय की काय, असं वाटत होतं.

नंतर त्या म्हणाल्या, याला ‘बेडकीचा पाला’ म्हणतात. त्याला ‘मधुनाशिनी’ असंही नाव आहे. बेडकीचा पाला म्हणण्यापेक्षाही ‘मधुनाशिनी’ हे नाव खूपच समर्पक होतं. गोडवा नाहीसा करणारी ती मधुनाशिनी… या मधुनाशिनीचा उपयोग मधुमेहाच्या औषधांमध्ये केला जातो.

first forest in nashik

मसाल्याचं झाडही

कोल्हापूर विद्यापीठाने तयार केलेलं मसाल्याचं झाडंही असंच काहीसं वेगळं होतं. त्याचं पान खाल्ल्यानंतर दोनतीन मसाल्यांचा स्वाद चाखण्याचा आनंद मिळाला.

अंगणातच त्यांनी जुन्या काळच्या केळीचे कंद लावले आहेत. आंबेमोहोर जातीची ही केळी. अजून केळी आली नाही.

नाईकांनी स्वतःसाठी शेती केली नाही, पण आता ती सुरू केली आहे. मात्र, ती बहुपीक पद्धतीची आहे.

लसूण, सूर्यफूल, मका, वाटाणा, जवस, हरभरा, पालक, मेथी, मुळा अशा पालेभाज्या, फळभाज्यांचे एकाआड वाफे तयार केले आहेत.

सभोवार नजर टाकली तर गलंगल, कापूर, गारंबीची वेल, गावठी आंबा, महोगनी अशी किती तरी झाडं पाहायला मिळाली. काही झाडांची तर आता नावंही लक्षात नाहीत…

पण सोनसावरी, काटेसावर, पांगारा अशी काही झाडं त्यांच्या वेगळेपणामुळे लक्षात राहतात. सेमला कांचन हे दुर्मिळ देशी झाडही शतार्चीची शोभा वाढवत आहे.

फिडलवूड fiddlewood tree |, ज्याच्यापासून पत्रावळ्या बनतात ते चांदिवाचं झाड.. हे सगळं पाहताना मनच भरत नव्हतं.

शतार्ची जंगलाचा निरोप घेतला, पण तो टायगर फुलपाखरांचा थवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या पाचोळ्याचा कर्र कर्र आवाज काही केल्या मनातून जात नव्हता….

मोनल नाईकांनी पर्यावरणाच्या मधुनाशिनीची अशी काही पानं खाऊ घातली होती, की आता सिमेंटच्या जंगलातलं अन्न गोडच लागेनासं झालंय…

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1632″]

Related Articles

13 Comments

  1. आनंद माझा काँलेज चा वर्गमिञ आहे खुप अभिमान व आनंद वाटला ! छान लिहिले आहे

  2. खूप छान लिहलं आहे , मोनल माझी मैत्रीण आहे ह्याचा अभिमान वाटतो .. अजून योग आला नाही शतारची बघण्याचा पण लवकरच येईल ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!