विक्रमवीर नोव्हाक जोकोविच
गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने ज्या नोव्हाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियाने देशाच्या सीमारेषेवरूनच माघारी धाडले होते.
त्याच जोकोविचने एक वर्षाने रविवारी याच ऑस्ट्रेलियाभूमीत कारकिर्दीतील विक्रमी 22 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदास गवसणी घातली.
२९ जानेवारी 2023 रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचने ग्रीसच्या स्टेफानोस सितसिपास याचे आव्हान 6-3, 7-6 (7-4), 7-6 (7-5) असे मोडीत काढले.
कारकिर्दीत विक्रमी दहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची किमयादेखील त्याने करून दाखवली.
नोव्हाक जोकोविच याला विक्रमवीर का म्हणतात, याचं हे उत्तर.
गेल्या वर्षीचा संघर्ष, ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या शर्यतीत कडवा प्रतिस्पर्धी नदालने साधलेली सरशी आणि गमावलेला अव्वल क्रमांक…
हे सारे नकारात्मक क्षण जोकोविच याला आठवले अन् तो भावूक झाला.
एकूणच यंदाची ऑस्ट्रेलियावारी विक्रमवीर नोव्हाक जोकोविच याच्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी संघर्ष करायला लावणारी ठरली.
या जेतेपदासह जोकोविच याने पुन्हा जागतिक रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
तसेही जागतिक रँकिंगमध्ये सर्वाधिक आठवडे अव्वल राहण्याचा विक्रम याआधीच त्याच्या नावावर आहे.
सामना आटोपल्यावर जोकोविच याने स्टँडमध्ये बसलेले आपले प्रशिक्षक गोरान इव्हानिसेव्हिच यांच्याकडे धाव घेतली.
तिथेच त्याचे कुटुंबीयदेखील होते. या साऱ्यांची गळाभेट घेतल्यावर त्याला अश्रू अनावर झाले.
तिथून परतल्यानंतर कोर्टवरील आपल्या बाकावर बसूनही जोकोविचने बराच काळ टॉवेलच्या आडून अश्रूंना वाट करून दिली.
‘कारकिर्दीत आतापर्यंत जेवढ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, त्यामध्ये यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन ही सर्वांत आव्हानात्मक ठरली.
याला काही कारणे आहेत. पहिले म्हणजे गेल्या वर्षी ज्या घटना आणि प्रसंगांना मला सामोरे जावे लागले, त्यानंतर मी पुन्हा इथे खेळलो.
दुसरे म्हणजे गेल्या वर्षी इथे खेळता आले नव्हते.
यामुळे माझ्याकडे इथल्या वातावरण, परिस्थितीबाबतचा अलीकडचा असा अनुभवच नव्हता,’ असे भावूक झालेला विक्रमवीर नोव्हाक जोकोविच म्हणाला.
या अंतिम फेरीत जोकोविचने सितसिपासपेक्षा अधिक उजवा खेळ केला.
खासकरून दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये जोकोविचने सितसिपासला महत्त्वाच्या क्षणी डोके वर काढण्याची संधी दिली नाही.
हे माहीत आहे काय?
कोरलेला २२ क्रमांक : जेतेपदाची खात्री असल्याने जोकोविचने सामन्यानंतरच्या बक्षीस समारंभात घालण्यासाठी खास जॅकेट तयार करून घेतले होते.
त्यावर 22 क्रमांक कोरलेला होता. ही संख्या त्याच्या सध्याच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांचा आकडा नमूद करते.
जोकोविचचे 22 ग्रँडस्लॅम
- ऑस्ट्रेलियन ओपन 10 (2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021, 2023)
- विम्बल्डन 7 (2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022)
- फ्रेंच ओपन 2 (2016, 2021)
- अमेरिकन ओपन 3 (2011, 2015, 2018)
असाही विक्रम
नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या रॉड लेव्हर संकुलात सर्वाधिक सलग 28 लढती (2019 ते 2022. त्याने 2011 ते 2014 दरम्यानही हा पराक्रम केला आहे) जिंकल्या आहेत. त्याच्यानंतर क्रमांक लागतो : मोनिका सेलेस : सलग 26 विजय (1991-99), आंद्रे आगासी : सलग 25 विजय (2000-2004), मार्टिना हिंगिस : सलग 25 विजय (1997-2000), नोव्हाक जोकोविच : 22 (2011-14).
- सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आता संयुक्तरित्या नदाल आणि जोकोविच यांच्या नावावर असून पाठोपाठ रॉजर फेडरर (20), सॅम्प्रस (14), आणि बियाँ बोर्ग (11) यांचा क्रमांक लागतो.
- या जेतेपदासह जोकोविच पुन्हा जागतिक टेनिस रँकिंगमध्ये (एटीपी रँकिंग) अव्वल झाला आहे.
- जोकोविचचे हे विक्रमी दहावे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद ठरले.
- जोकोविच आणि नदाल यांच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम एकेरीची जेतेपद आता दोन महिला टेनिसपटूंच्या नावावर आहेत. मार्गरेट कोर्ट यांनी 24, तर सेरेना विल्यम्सने एकेरीची 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत.
- एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांची 38 जेतेपदे जोकोविचच्या नावावर आहेत.
- एखाद्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षांपासून सातत्याने जेतेपदे पटकावणारा जोकोविच हा नदालनंतरचा दुसरा पुरुष टेनिसपटू.
- नदालने 2005 मध्ये प्रथम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. यानंतर गेल्या वर्षी 2022 मध्येही त्याने क्ले कोर्टवरील ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. जोकोविचने 2008 मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती, त्यानंतर ही स्पर्धा नऊ वेळा जिंकत रविवारी पंधरा वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही जोकोविच या स्पर्धेत दहाव्यांदा विजेता ठरला.
- ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावणारा जोकोविच हा वयाच्या हिशेबाने तिसरा बुजूर्ग टेनिसपटू ठरला. या यादीत केन रोजवॉल (1971 आणि 1972) अव्वल असून, रॉजर फेडरर (2018) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत 89 वा विजयदेखील नोंदवला.
- जोकोविचने कारकिर्दीत 93 एटीपी जेतेपदे पटकावली आहेत. त्याने नदालला (92) मागे टाकले. (जिमी कॉनर्स 109, फेडरर 103, इव्हान लेंडल 94, जोकोविच 93, नदाल 92).
- बेन शेल्टन (85) आणि कारेन खचानोव्ह (83) यांच्यापाठोपाठ सितसिपासने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक 69 एसेस (बिनतोड सर्व्हिस) तडकावले आहेत. 2019 मध्ये त्याने याच स्पर्धेत एकूण 94 एसेसचा मारा केला होता.
- ऑस्ट्रेलियन ओपनच्या निमित्ताने जोकोविचने 33 वी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी निश्चिl केली होती. ओपन स्पर्धांचे युग सुरू झाल्यापासून फक्त ख्रिस एव्हर्ट या महिला टेनिसपटूनेच सर्वाधिक 34 ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने सेरेना विल्यम्सशी (33 ग्रँडस्लॅम फायनल) बरोबरी केली.