वसिम जाफर : वयाला न जुमानणारा क्रिकेटपटू
भारताचा एकेकाळचा सलामीचा फलंदाज वसिम जाफर याने ७ मार्च २०२० रोजी वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सुमारे दोन दशके त्याने क्रिकेटमध्ये योगदान दिले होते.
वसिम जाफरला स्थानिक क्रिकेटमधील रन मशिन म्हंटलं जायचं. त्यामुळेच त्याने भारतीय संघात स्थान मिळवत सलामीच्या फलंदाजीची धुराही सांभाळली होती. चाळिशी ओलांडल्यानंतर त्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन शक्यच नव्हतं. कधी तरी निवृत्ती जाहीर करावीच लागणार होती. अखेर वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली. वसिम जाफर (Wasim Jaffer) याचं क्रिकेटमधील पदार्पण 1996-97 मधलं. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या. रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर आहेत. भारतातर्फे त्याने ३१ कसोटी सामन्यांमध्ये 34.11 च्या सरासरीने 1,944 धावा केल्या. यात पाच शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कारकिर्दीतली 212 धावांची खेळी सर्वोच्च धावसंख्या आहे.
जाफरने जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याला अनेकांनी प्रोत्साहन दिलं, मदत केली. निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला या सगळ्यांची आठवण दाटून आली. तो म्हणतो, ‘‘माझ्या शालेय जीवनापासून व्यावसायिक क्रिकेटपर्यंत ज्यांनी मला सावरलं, अशा माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मी विशेष आभार मानतो. कारण त्यांनीच मला विश्वास दिला.’’ वसिम जाफर याने रणजी ट्रॉफीत तब्बल १२ हजार धावा केल्या आहेत. त्याने आपल्या एकूण कारकिर्दीत सर्वाधिक काळ मुंबईचंच प्रतिनिधित्व केलं आहे. नंतर तो विदर्भाकडूनही खेळला. रणजी ट्रॉफीत सर्वाधिक 150 धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे.
‘‘सर्वांत आधी मी त्या अल्लाहची करुणा भाकतो, त्याने मला या खेळाची प्रतिभा दिली. मी माझ्या आप्तस्वकियांचं, माझे आईवडील, भावांचेही आभार मानतो, ज्यांनी मला हा खेळ व्यावसायिक रूपाने खेळण्यास प्रोत्साहन दिलं. मी माझ्या अर्धांगिनीचेही आभार मानतो, जिने माझ्या सुंदर घराचं घरपण टिकवलं आणि मुलांना इंग्लंडमधील आरामदायी आयुष्य दिलं.’’
जाफरची सलामीच्या अशा फलंदाजांमध्ये गणती होते, ज्यांनी वेस्ट इंडीजमध्ये द्विशतक झळकावलं आहे. त्याने या कॅरेबियन संघाविरुद्ध सेंट लुसिया येथे 212 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 2006 मध्ये पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील पदार्पणही याच देशाविरुद्ध केले. जाफरने केवळ दोन वन-डे सामने खेळले होते, ज्यात त्याला केवळ दहा धावा करता आल्या. मात्र, स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्याचा हात कोणी धरू शकला नाही. विशेषतः रणजी ट्रॉफीतील त्याच्या स्मरणीय खेळी कायम लक्षात राहतात. केवळ याच कामगिरीसाठी तो ओळखला जातो. किंबहुना तो रणजीचा हुकमी एक्का मानला जातो. जाफरने मुंबईला 38 आणि 39 वी रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका साकारली आहे. मागील तीन सत्रांमध्ये त्याने विदर्भाकडून खेळतानाही दोन रणजी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1996-97 मध्ये पदार्पण केले. यात त्याने 260 सामन्यांमध्ये 50.67 च्या सरासरीने 19,410 धावा केल्या. यात त्याने शतकांचे अर्धशतक केले, तर अर्धशतकांचे शतक थोडक्यात हुकले. म्हणजेच त्याने 57 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. या कारकिर्दीतल्या कामगिरीसाठी बीसीसीआय, एमसीए आणि व्हीसीएचे आभार व्यक्त करणाऱ्या जाफरसाठी भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे, पाकिस्तानविरुद्धची द्विशतकी खेळी (202 धावा), वेस्ट इंडीजविरुद्धची द्विशतकी खेळी (212 धावा), तसेच वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये 2006-07 मध्ये मालिका जिंकणे हे चार क्षण सर्वांत संस्मरणीय क्षण असल्याचे मानले आहे.
‘‘ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, की मला राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली.’’
सचिन तेंडुलकरसोबतच्या आठवणीही जाफर कसा विसरेल? तो म्हणाला, ‘‘सचिनविषयी काय सांगू? तो तर माझा आदर्श आहे. मी खूप भाग्यवान आहे, ज्याची फलंदाजी जवळून पाहिली आहे. माझ्या मते, तो ब्रायन लारासह या युगातला सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे.’’
खेळ संपला, कर्मचारी उरला
जाफरच्या आयुष्यात अनेक कटू प्रसंग आले. अर्थात, ते त्याने कधी ओठावर आणले नाहीत. खेळत राहणे, संधीचं सोनं करणे एवढंच त्याला माहीत होतं. प्रचंड हार्डवर्क असलेला या खेळाडूच्या आयुष्यात काही प्रसंग तर इतरांसारखेच अपरिहार्य होते. 2017 ची ही घटना आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याची बॅट तळपली. तो एका कंपनीशीही करारबद्ध होता. कंपनीत खेळाडूंना करारबद्ध करणे नवीन नाही. अनेक खेळाडूंना या संधी मिळतातच. जोपर्यंत खेळत असतात तोपर्यंत कंपनीचे लाड होतात. पण काळ ओसरला, की कंपनीचं धोरणही बदलते. जाफरच्या आयुष्यातही असाच काळ आला. त्याला जाणीव होती, की अजूनही आपल्यात क्रिकेटची प्रतिभा शिल्लक आहे. रणजी स्पर्धा गाजविणारा, भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावणारा जाफर मुंबई क्रिकेट संघाचाही हुकमी एक्का होता. मात्र, जर तुम्ही खेळला नाही, तर ही सगळी कामगिरी शून्यावर येते. जाफरच्या आयुष्यातही असा हंगाम आला. एक हंगाम वाया गेल्यानंतर त्याला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कंपनीत काम करावं लागलं. त्याने ते हसत हसत स्वीकारलं. मात्र, त्याला माहीत होतं, की अजूनही आपल्यात क्रिकेटचा स्पार्क आहे. तो खेळण्यासाठी आसुसलेला होता. त्याला काहीही नको होतं, फक्त खेळायचं होतं. जिद्द असली की आशेची किरणं दिसतात. ज्या मुंबई संघासाठी जिवाचं रान केलं, तो संघ त्याच्यापासून दुरावला होता. मात्र, विदर्भाने त्याला हात दिला. स्थानिक क्रिकेट संघांचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे व्यावसायिक क्रिकेटपटूला कोणत्याही संघाकडून खेळण्याची संधी मिळते. विदर्भालाही अशाच खेळाडूची गरज होती. जाफरमुळे त्यांचा दुहेरी हेतू साध्य होणार होता. तो म्हणजे, एक तर अनुभवी खेळाडू संघाला मिळणार होताच, शिवाय तरुण नव्या दमाच्या खेळाडूंसाठी उत्तम मार्गदर्शकही मिळणार होता. विदर्भाला वसिम हवा होता आणि वसिमला एक संघ. वसिमने ही एक संधी मानली.
एका व्यावसायिक खेळाडूला कोणताही संघ वेतन देत असतो. वसिमलाही ते मिळणार होतं, पण वसिमला एखाद्या संघात दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे पैशांपेक्षाही खूप मोठं होतं. त्याने हे वेतन नम्रपणे नाकारलं. मला तर कुसुमाग्रजांची कणा नावाची कविताच आठवली…
‘‘पैसे नकोत सर, थोडा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवर हाथ ठेवून फक्त लढ म्हणा…
वसिम जाफर याने अशाच थाटात हे वेतन नाकारलं असावं. तो विदर्भ क्रिकेट संघटनेला म्हणाला, मला फक्त खेळू द्या, त्यापेक्षा काही नको. इथंच विदर्भाचं आणि जाफरचं नातं जुळलं. जे नंतर पुढेही दृढ होत गेलं. वयाच्या पस्तिशीनंतरही वसिम अनेक स्पर्धा खेळला. क्रिकेटमध्ये अलीकडे तंदुरुस्तीचा दर्जा कमालीचा उंचावर गेला आहे. एखादा खेळाडू तंदुरुस्तीत थोडाही कमी पडला तरी त्याची संपूर्ण कारकिर्दच संपुष्टात येऊ शकते. अशा स्थितीत पस्तिशी ओलांडलेल्या जाफरने स्वतःला सिद्ध केलं आणि इंग्लंडमधील एका स्थानिक लीगमध्येही स्थान मिळवलं.
आयपीएल IPL | ही देशातील अनेक खेळाडूंसाठी आधार देणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेची दारे वसिमसाठीही खुली होतीच. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून त्याने दोन हंगामही आजमावले. मात्र, फारशी संधी मिळाली नाही. या दोन हंगामात इनमिन आठ सामने खेळला. त्यात त्याने 16.25 च्या सरासरीने 130 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचाही समावेश होता. एकूणच वयाच्या प्रत्येक टप्प्यात तो क्रिकेटच्या सर्वच प्रकारांत आपली छाप सोडत होता. जाफर हा एकमेव खेळाडू असावा, ज्याने क्रिकेटच्या सर्वांगाला स्पर्श करताना वयाची बंधनं कधीच पाळली नाहीत. किंबहुना वय होतंय, म्हणून खेळ थांबवायला हवं, हा विचार त्याच्या मनाला कधी शिवला नाही. कसा शिवेल, क्रिकेट कौशल्य त्याच्या रोमरोमात होतं. ते कमी झाल्याचं ना त्याला जाणवलं, ना त्याच्या बॅटीला. मात्र, भविष्याची पावले ओळखून त्याने क्रिकेटला अलविदा केला. वसिम मैदानावर दिसणार नाही, पण एक प्रशिक्षक, समालोचक म्हणून तो क्रिकेटशी नातं कायम राखेल यात शंका नाही.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#008080″ header_line_color=”#008080″ include_category=”65″]
Nice Article Sir
thank you so much 🙂