वयोमर्यादा पुरुषोत्तम लिअँडर पेस!
तो मस्त जगतोय. मनासारखं जगतोय आणि मनापासून जगतोय. म्हणजे बघा ना, तो नुकताच १०० व्या जोडीदारासोबत वयाच्या ४२व्या वर्षी त्याच उमेदीने खेळला, ज्या उमेदीने तो पहिला सामना खेळला होता ! भारतीय टेनिसचा नायक लिअँडर पेस याचा हा पराक्रम सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे.
आपण ठराविक टप्पे ठरवून टाकले आहेत, मग ते खेळातले असो, शिक्षणातले असो वा नोकरीतले. एरव्ही वयाची चाळिशी ओलांडली, की निवृत्तीचे वेध लागतात. कॉर्पोरेट क्षेत्रात तर ४५व्या वर्षी आदर्श निवृत्ती मानली जाते. व्हॉलंटरी रिटायरमेंट (व्हीआरएस) आणि कम्पल्सरी रिटायरमेंट (सीआरएस) या दोनपैकी कोणती निवृत्ती स्वीकारायची एवढाच विचार आपण करतो. अगदी खेळातही व्हीआरएस आणि सीआरएस हे दोन निवृत्तीचे प्रकार पाहायला मिळतात. कारण वय वाढत जातं तसतसा कामगिरीवरही परिणाम होतोच. मात्र, येथे व्हीआरएस गौरविला जातो, तर सीआरएस लाजीरवाणी ठरते. काही क्रिकेटपटूंच्या बाबतीत ‘सीआरएस’चा नियम लवकर लागू करावासा वाटतो. लिअँडर पेससारख्या खेळाडूंना हे दोन्ही प्रकार अजिबात लागू होत नाहीत. टेनिस म्हणजे शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा खेळ. त्यातही दुहेरीतला खेळ एकेरीपेक्षाही वेगवान. असं असतानाही चाळिशीनंतर त्याचे चापल्य तसूभरही कमी झालेले नाही.
भारतीय क्रीडाविश्वात शारीरिक तंदुरुस्तीची क्षमता पाहणाऱ्या खेळात लिअँडर पेसशी बरोबरी करणारा एकही खेळाडू नाही. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने वयाच्या चाळिशीपर्यंत क्रिकेटचे मैदान गाजवले. मात्र, वय झालं तरी त्याने खेळतच राहावं, असं कोणालाही वाटलं नाही. त्याच्या रिटायर्डमेंटविषयी अनेकदा चर्चा व्हायच्या. दोन वर्षांपूर्वी त्याच्या रिटायर्डमेंटचा सोहळा दिमाखात पार पडल्यानंतर सर्वांनी त्याचा तो ‘योग्य निर्णय’ ठरवला. याउलट लिअँडरच्या खेळाचा विचार केला, तर त्याचं दुहेरीतलं कौशल्य, चापल्य यावरच चर्चा होते. निवृत्तीचा विषय कधी चर्चिला जात नाही. हीच त्याच्या गुणवत्तेची पावती आहे.
‘‘मी माझ्या जोडीदारांमध्ये चांगला मित्र पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साथीने खेळताना त्यांचा मान राखणे, आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे लिअँडर पेस याने म्हटले आहे. खेळाकडे पाहताना, सहकाऱ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना लिअँडर पेस याने समंजसपणाचा संदेश दिला आहे. लिअँडरच्या दुहेरीतील १०० पुरुष जोडीदारांमध्ये १३ भारतीय आहेत. मात्र, मिश्र दुहेरीत २४ महिला जोडीदारांमध्ये सानिया मिर्झा या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची पहिली फेरी जिंकून पेसने कारकिर्दीतील सातशेवा विजयही साजरा केला. असा पराक्रम करणारा तो जगातला आठवा टेनिसपटू ठरला. विशेष म्हणजे या ७०० विजयांत ५० जेतेपदे मिळविणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे.
कदाचित लिअँडरशी बरोबरी करण्यासाठी भारतीय ग्रँडमास्टर व बुद्धिबळविश्वात पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदचे नाव घेतले जाईल. वयाच्या ४५व्या वर्षीही त्याने नुकतेच नॉर्वे क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे. जगातील अव्वल नऊ खेळाडूंच्या या स्पर्धेत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन जेथे सातव्या स्थानी राहावे लागले, त्या स्पर्धेचे उपविजेतेपद आनंदने मिळविले. मात्र, बुद्धिबळ आणि टेनिस हे दोन्ही खेळ भिन्न आहेत. दोन्ही खेळांत तंदुरुस्ती हवीच. मात्र टेनिस हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची, तर बुद्धिबळ हा बुद्धीची कसोटी पाहणारा खेळ आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात अनेक बुद्धिबळपटू वयाच्या पन्नाशीनंतरही खेळत आहेत. अर्थात, गुणवत्तेच्या बाबतीत दोघेही क्रीडाविश्वात महान आहेत. मात्र, तंदुरुस्तीच्या पातळीवर लिअँडर अधिक उजवा ठरतो. कारण टेनिसमध्ये समयसूचकतेला जास्त महत्त्व आहे आणि त्यासाठी बुद्धी असावीच लागते.
One Comment