रहस्यमयी गाव, जेथे पक्षी करतात आत्महत्या
जगात असं एक रहस्यमयी गाव आहे, जेथे पक्षी आत्महत्या करतात. हे धक्कादायक वाटलं असेल, पण भारतातील आसाममधील एक गाव काही वर्षांपासून पक्ष्यांच्या आत्महत्यांनी चर्चेत आलं आहे. राजहंस आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर प्राण त्यागतो, असं ऐकलं होतं, पण अनेक पक्षी सामूहिकपणे आत्महत्या करतात, हे अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली होती. काय आहे यामागचं रहस्य?
होय, भारतात असं एक रहस्यमयी गाव आहे, जेथे पक्षी सामूहिकपणे आत्महत्या करतात. आसामच्या घाटीत असलेलं जातिंगा हे गाव गुवाहाटीच्या दक्षिणेपासून ३३० किलोमीटरवर आहे. पक्ष्यांच्या सामूहिक आत्महत्येने संपूर्ण जग विचलित झालं आहे. पक्ष्यांच्या सामूहिक आत्महत्येचा रहस्यभेद अद्याप कोणीही करू शकलेलं नाही.कृष्णपक्षातली ती जीवघेणी रात्र पक्ष्यांमध्ये कोलाहल माजवते. पक्ष्यांसाठी एक प्रकारे ती काळरात्रच. सायंकाळ जसजशी गडद होत जाते, तसतसे ढगामध्ये धुकं दाटत जातं… वारे वेगाने घोंगावू लागतात. अचानक प्रकाश दिसतो, पण तो उजेड पक्ष्यांसाठी आशेचा नव्हे, तर अंताचा ठरतो… अवघ्या २५०० लोकसंख्येच्या जतिंगा गावाला आता हे नवीन राहिलेलं नाही, पण जगभरातल्या पक्षिप्रेमींसाठी ती एक खळबळजनक घटना आहे. जतिंगा हे गाव दक्षिण आसामच्या दिमा हासो जिल्ह्यातील डोंगरघाटावर वसलेलं आहे. हे गाव इतकं सुंदर आहे, की या गावात मन रमणार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. डोंगररांगांत वेढलेलं हे गाव खरं तर मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे; पण आता हे पक्ष्यांच्या आत्महत्यांनी अधिक चर्चेत आलं आहे.
या गावात असं काही घडत नाही, ज्याची जगाने चर्चा करावी. वर्षातले नऊ महिने हे गाव जणू जगासाठी अजिबात विशेष नसतं. मात्र, सप्टेंबर महिना उजाडताच हे रहस्यमय गाव चर्चेत येऊ लागतं, जेथे पक्षी सामूहिकपणे आत्महत्या करतात. गावात ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कृष्ण पक्षाच्या रात्री पक्ष्यांच्या आत्महत्यांनी अनेकांना अस्वस्थ केलं आहे. सायंकाळी सातपासून रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान धुके दाटते. अचानक कुठून तरी प्रकाश येतो आणि पक्षी या प्रकाशाच्या दिशेने धावतात. सकाळी नागरिकांना जागोजागी मृतावस्थेतील पक्ष्यांचा खचच पाहायला मिळतो. अतिशय देखणे पक्षी मृतावस्थेत पाहिल्यानंतर मन हेलावून जातं. ते थोडेथोडके नसतात, तर शेकडोने इतस्ततः पडलेले पाहायला मिळतात. या सामूहिक आत्महत्या करणाऱ्या पक्ष्यांमध्ये स्थानिक आणि प्रवासी पक्ष्यांच्या सुमारे ४० पेक्षा अधिक प्रजाती समाविष्ट असतात. किंगफिशर, टाइगर बाइटन, लिट्ल एग्रीटसारखे पक्षी येथे मृतावस्थेत आढळले आहेत. स्थानिक नागरिकांना तर हा भुताटकीचा प्रकार वाटतो. एकूणच या घटनांमुळे रात्री या घाटात मानवाला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कारण जातिंगा हे असं रहस्यमय गाव बनलं आहे, जेथे शेकडो पक्षी आत्महत्या करतात.
चुंबकीय शक्ती की अदृश्य शक्ती?
पक्षी आत्महत्या प्रकरणामुळे जातिंगा हे रहस्यमयी गाव चर्चेत आलं असलं तरी तेथे पक्षी आत्महत्या का करतात, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अद्याप कोणत्याही निष्कर्षावर अभ्यासक आलेले नाहीत. काही अभ्यासकांच्या मते, यामागे चुंबकीय शक्ती आहे, तर स्थानिक नागरिकांच्या मते, यामागे अदृश्य शक्ती, भूतप्रेताची बाधा असल्याचे म्हंटले आहे. स्पष्ट कारण पुढे आले नसले तरी पक्ष्यांच्या मृत्यूमागे आत्महत्या हे कारण नाही, यावर अभ्यासक ठाम आहेत. कारण कोणतंही गाव रहस्यमयी नाही आणि पक्षी कधीही आत्महत्या करीत नाहीत, असं संशोधकांचं स्पष्ट मत आहे.
आत्महत्येमागचे सत्य काय आहे?
वैज्ञानिकांच्या मते, धुक्याने विचलित होऊन पक्षी उजेडाच्या दिशेने जातात. पक्ष्यांना गावाच्या दिशेने जाण्यास हा उजेड भाग पाडतो. त्याच वेळी त्यांच्या मार्गात झाडं येतात. त्यात फसल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो. यात अनेक पक्षी जखमीही होतात. एक मात्र सत्य आहे, की पक्षी केवळ गावाच्या उत्तरेकडील भागातूनच येतात. साधारण दीड किलोमीटर लांब आणि २०० मीटर रुंद पट्ट्यातच पक्षी या आत्महत्यांचे शिकार होत आहेत. जातिंगा आसामच्या बोरेल हिल्समध्ये आहे. या गावात प्रचंड पाऊस होतो. हे गाव उंचीवर असून चोहोबाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे. त्यामुळे येथे प्रचंड धुके दाटलेले पाहायला मिळते. वैज्ञानिकांच्या मते, दाट घाटातील जतिंगा गावात प्रचंड पावसात जेव्हा पक्षी उडतात, तेव्हा ते भिजलेले असतात. त्यामुळे त्यांची उडण्याची नैसर्गिक क्षमता संपते. येथे बांबूचे घनदाट जंगल आहे. अनेक ठिकाणी ते कापलेले आहे. अशा वेळी या दाटलेल्या धुक्यात आणि रात्री गर्द अंधारात पक्षी जेव्हा सांजसमयी घराकडे परततात, त्याच वेळी ते या बांबूच्या झाडांवर धडकतात आणि मृत्यूचे शिकार होतात.
पशुपक्षी आत्महत्या करीत नाहीत
इटलीमधील कॅग्लियारी विद्यापीठाचे (Cagliari university) अंतोनियो प्रेटी यांना पक्ष्यांची आत्महत्या मान्य नाही. पक्षी किंवा जनावरे आत्महत्या करूच शकत नाहीत. याला पुष्टी देताना त्यांनी चाळीस वर्षांपासून प्रसिद्ध झालेले सुमारे एक हजार संशोधन पेपर खंगाळून काढले आहेत. त्यावरून प्रेंटी या निष्कर्षावर पोहोचल्या आहेत, की जनावरे जाणूनबुजून जीव देत नाहीत. उंदीर, लेमिंग्ससारखे प्राणी समूहाने दरीत कोसळतात. ते त्यात उडी घेत नाहीत, तर पडतात. लेमिंग्सची संख्याच इतकी असते, की ते हजारोंच्या संख्येने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करतात. यादरम्यानच्या प्रवासात त्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होतो. अमेरिकेची अभ्यासक बार्बरा किंग यांच्या मते, आपण जनावरांची बुद्धी समजूच शकलेलो नसल्याने या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे.
60 च्या दशकात उघडकीस आली घटना
१९६० च्या दशकात एडवर्ड पिचर्डने ही घटना सर्वप्रथम जगासमोर आणली. त्या वेळी ते पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्यासोबत जातिंगा गावात आले होते. सलीम अली व एडवर्ड या दोघांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर दिशाभ्रम व वेगवान वारे आणि धुक्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. पक्ष्यांच्या आत्महत्येचा रहस्यभेद करण्यासाठी भारत सरकारने प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉ. सेन गुप्ता यांची नियुक्ती केली होती. डॉ. गुप्ता यांनी दीर्घ अभ्यासांती हा निष्कर्ष काढला, की यामागे मोसम आणि चुंबकीय शक्ती कारणीभूत आहे. त्यामुळे पक्ष्यांमध्ये असामान्य व्यवहार आढळतात. त्यांनी सांगितले, की मान्सूनच्या काळात धुके दाटते आणि वेगाने वारे वाहू लागतात, तेव्हा जातिंगा घाटात चुंबकीय स्थितीत वेगाने बदल होताना आढळतात. या परिवर्तनामुळे पक्ष्यांमध्ये असामान्य हालचाली घडताना दिसतात. ते प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. डॉ. गुप्ता यांनी सांगितले, की या घटना टाळण्यासाठी रात्री बल्ब किंवा कोणत्याही प्रकारे उजेड करू नये. त्यांच्या या सल्ल्यानुसार रात्री विजेची उपकरणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे पक्ष्यांचे मृत्यू ४० टक्क्यांनी कमी झाले. संरक्षण विभाग आणि वन्यजीव अभयारण्यद्वारेही पक्ष्यांच्या संरक्षणासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. याशिवाय काही स्वयंसेवकही जातिंगा आणि परिसरातील गावांमध्ये जाऊन अशिक्षित लोकांना या घटनेमागची कारणे आणि बचावासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देत आहेत.
नाशिकमध्ये पहिल्यांदा शिकारबंदी आणणारा पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ
Follow us Kheliyad facebook page
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1636″]