‘मॅरेथॉन’ शहर
नाशिकमध्ये रविवारी तिसरी राष्ट्रीय आणि सहावी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा झाली. थंडीतही घामाच्या धारांनी ओथंबलेले खेळाडू आणि या खेळाडूंना चीअरअप करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खिळलेली गर्दी पाहिल्यानंतर हे ‘धावपटूंचं नाशिक’ आहे, याचा प्रत्यय येत होता. देशभरातील खेळाडूंना उभारी देणाऱ्या आणि स्थानिक खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावणाऱ्या या स्पर्धेविषयी..
मॅरेथॉन चौक तसाही वेगवान आहे. एरव्ही त्याच्या वेगाला आवर घालावा लागण्याइतपत तो बेफाम होतो. काळ्या धुरांत काळवंडलेला हा चौक रविवारी मात्र उत्साहाच्या घर्मधारांनी चिंब भिजला होता. हा सळसळता उत्साह होता मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा.
‘धावण्याची शर्यत जिंकण्यासाठीत असते असं नाही, तर ती आनंदासाठीही असते‘ ही भावना नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेने खऱ्या अर्थाने रुजवली. म्हणूनच ‘मविप्र मॅरेथॉन’ हा इव्हेंट न होता ते निष्ठेने घेतलेलं व्रत वाटतं. गेल्या वर्षीच मॅरेथॉन चौकाची झालेली उभारणी ही या व्रताची फलश्रुती नव्हे तर धावपटूंच्या नाशिकची मुहूर्तमेढ ठरू पाहत आहे. स्पर्धागणिक खेळाडूंचं धावण्याचं कौशल्य बहरतंय, तसं मविप्रचं आयोजनकौशल्यही सुधारतंय.
नाशिक रन असो वा मविप्र मॅरेथॉन हे धावण्याचे सोहळे नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे उत्साहाने साजरे केले. ‘नाशिक रन’ ही स्पर्धा नाही तर फिटनेस जागृतीचा संदेश देणारा सोहळा दरवर्षी होतो. नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनकडून खरं तर अशा सोहळ्यांची अपेक्षा आहे. काही संघटना मुळी निवड चाचण्या आणि तांत्रिक सहाय्यापुरत्याच आहेत. त्यांच्याकडून फारशा अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. अर्थात, त्यांची उणीव नाशिककरांनाही फारशी भासत नाही. मविप्रसारख्या अनेक संस्था ही उणीव भरून काढत आली आहे. ‘मविप्र मॅरेथॉन’ हा त्यातलाच एक सोहळा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ खुल्या गटासाठीच नाही, तर १४, १८, ४०, ४५, ६० वर्षांवरील स्थानिक व राज्यस्तरीय खेळाडूंना सामावून घेणारा हा दिमाखदार सोहळा नाशिककरांसाठी एक दिवसाची धावपटूंची पर्वणीच म्हणावी लागेल. यंदा साडेतीन हजार खेळाडूंनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ४० व ६० वर्षे वयोगटातील डॉक्टर, वकील, व्यावसायिक, नोकरदार वर्गाने स्पर्धेत घेतलेला सहभाग कौतुकास्पद होता. यंदा सर्वांना पदके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. स्पर्धेचं यश यापेक्षा वेगळं असूच शकत नाही.
‘मविप्र मॅरेथॉन’चा प्रवास
मविप्र मॅरेथॉन स्पर्धेला खऱ्या अर्थाने २००५-०६ पासून सुरुवात झाली. त्याचं श्रेय माजी सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांना जातं. मात्र, ती दोन-तीन किलोमीटरपर्यंत मर्यादित होती. स्पर्धा झाली की विषय संपला, असं डॉ. पवार यांना कधीच मान्य नव्हतं. स्पर्धेनंतरही फॉलोअप मीटिंग व्हायची. आताही होते. त्या वेळी या स्पर्धेविषयी मतं मागविण्यात आली. क्रीडा संचालक हेमंत पाटील यांनी लक्षात आणून दिलं, की या स्पर्धेला आपण मॅरेथॉन स्पर्धा म्हणू शकत नाही. डॉ. पवार यांनी आश्चर्यमिश्रित चेहऱ्याने म्हटले, ‘‘का नाही म्हणू शकत?’’ ‘‘आपण फक्त दोन ते तीन किलोमीटर घेत आहोत. जर मॅरेथॉन स्पर्धा घ्यायचीच असेल तर ती ४२.१९५ किलोमीटरचीच घ्यावी लागेल. तरच तिला मॅरेथॉनचा दर्जा प्राप्त होतो,’’ असं पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर २००७ मध्ये २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली आणि त्यानंतर डॉ. नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये ४२.१९५ किलोमीटरची पहिली राष्ट्रीय स्तरावरील मविप्र मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. यंदा या स्पर्धेने हॅटट्रिक केली. मुळात या स्पर्धेची आचारसंहिता डॉ. पवार यांनी अलिखितपणे निश्चित केलेली आहेत. ती आजही तंतोतंत पाळली जाते. त्यातली पहिली महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडूच प्रमुख पाहुणा म्हणून या स्पर्धेला लाभत आला आहे. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले, २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय मल्ल काका पवार, २०११ मध्ये माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक लालंचंद राजपूत, २०१२ धावपटू पी. टी. उषा, २०१३ मध्ये ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार, २०१४ मध्ये माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, २०१५ मध्ये नेमबाज गगन नारंग, तर यंदा २०१६ मध्ये जागतिक स्पर्धेत पदक विजेता मल्ल नरसिंग यादव अशी ही खेळाडूंची नामावली पाहिली तर स्पर्धेची प्रतिष्ठा राखण्याचा संस्थेचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
चौक नव्हे, मॅरेथॉन रोड!
मविप्र मॅरेथॉन स्पर्धा जिथून सुरू होते तो चौक मॅरेथॉन चौक म्हणून ओळखला जातो. २३ जून २०१५ रोजी या चौकाचं नामकरण झालं. खरं तर तो त्याही पूर्वी मॅरेथॉन चौक म्हणूनच ओळखला जायचा. या चौकाचं नाव नाशिककरांच्या ओठांवर सहज येतं हे या या स्पर्धेचं यश म्हणावं लागेल. एरव्ही अमूक चौक कुठे आहे हे सांगूनही लक्षात येत नाही. मॅरेथॉन चौक मात्र क्षणात लक्षात येतो. या चौकापासून गेल्या सहा वर्षांपासून मॅरेथॉनचा मार्ग कायम आहे. तो कधी बदलला नाही. भविष्यात हा चौकच नाही, तर धोंडेगावपर्यंतचा रस्ताच मॅरेथॉन रोड म्हणून ओळखला जाईल. अर्थात, ही ओळख अभिमानाने मिरवावी अशीच आहे. स्पर्धा देखणी होतेय. प्रमुख पाहुणा म्हणून राजकीय व्यक्तींना हेतुपुरस्सर टाळल्याचे कौतुक असले तरी खेळाडूव्यतिरिक्त व्यासपीठावरील गर्दी मात्र टाळता आलेली नाही हेही तितकेच खरे आहे!
मॅरेथॉनचा इतिहास
फिडिप्पाइड्स नामक ग्रीक संदेशवाहकावरून मॅरेथॉन स्पर्धेचा जन्म झाल्याचं म्हंटलं जातं. इसवीसन ४९० मध्ये ग्रीकांनी मॅरेथॉन युद्धभूमी जिंकल्याचा संदेश पोहोचवण्यासाठी फिडिप्पाइड्स मॅरेथॉन ते अथेन्स हे २४० किलोमीटर अंतर न थांबता धावला. तो इतका थकला होता, की ‘आम्ही जिंकलो’ हा शब्द उच्चारल्यानंतर तो कोसळला आणि गतप्राण झाला. ग्रीक इतिहासकारांमध्ये याबाबत अनेक मते-मतांतरे आहेत. मात्र, फिडिप्पाइड्सच्या धावण्यामुळे मॅरेथॉन स्पर्धेचा जन्म झाला. १० मार्च १८९६ मध्ये ४० किलोमीटरची प्रायोगिक तत्त्वावरील पहिली मॅरेथॉन स्पर्धा झाली. ही स्पर्धा चारिलाओस वासिलाकोस याने ही स्पर्धा ३ तास १८ मिनिटांची वेळ नोंदवत जिंकली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात पहिली ऑलिम्पिक मॅरेथॉन स्पर्धा झाली. ही स्पर्धा स्पायरडोन लुईस याने २ तास ५८ मिनिटे ५० सेकंदांची वेळ नोंदवत जिंकली. १९२४ नंतर या स्पर्धेचे अंतर निश्चित करण्यात आले. ४२.१९५ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेलाच मॅरेथॉन स्पर्धेचा दर्जा देण्यात आला. अद्याप या अंतरात बदल झालेला नाही.
(Maharashtra Times : 03/01/2016)
[jnews_hero_8 include_category=”108″]