नाशिकमध्ये पहिल्यांदा शिकारबंदी आणणारा पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ

70-80 च्या दशकात कुणाला पक्ष्यांविषयी फारसं सोयरसुतक नव्हतं. नांदूरमध्यमेश्वरमध्ये तर पक्ष्यांची बेछूट शिकार सुरू होती. विश्रामगृहावर उलटे टांगलेले पक्षी पाहायला मिळायचे. जणू काही शिकारखाना! हे पाहून ते गहिवरले. त्यांनी वृत्तपत्रांत पत्र लिहिले आणि पक्ष्यांची शिकार चर्चेत आली. अखेर वन खात्याने अधिकृतरीत्या शिकारबंदीची घोषणा केली. ही नाशिक जिल्ह्यातील पहिलीच घटना. त्यांच्या एका पत्रामुळे पक्ष्यांचा अधिवास वाचला. हे पक्षीमित्र आहेत दिगंबर गाडगीळ. वयाच्या पंच्याऐंशीतही पक्षीमित्र त्रैमासिकाच्या संपादकपदाची धुरा उत्साहाने वाहत आहेत. त्यांना पाहिलं, की प्रश्न पडतो, कुठून येते ही ऊर्जा…?

पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचा जीवनप्रवासच थक्क करणारा आहे. त्याची सुरुवात पत्रकारितेपासून होते. 1956 मध्ये ‘गांवकरी’त ‘अमृत” मासिकाचे ते उपसंपादक होते. गाडगीळ पत्रकारितेत फार काळ रेंगाळले नाहीत. कदाचित त्यांनी काळाची पावले ओळखली होती की कुणास ठाऊक, पण 1957 मध्ये त्यांना एलआयसीची सरकारी नोकरी मिळाली. आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1993 मध्ये ते डिव्हिजनल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले. या नोकरीच्या कालावधीत त्यांची अनेकदा बदली झाली. मात्र, बदली बढतीवरच व्हायची. 1967 मध्ये त्यांची नंदुरबारला बदली झाली होती. त्या वेळी नंदुरबार धुळे जिल्ह्यातच होता. 1972 मध्ये ते पुन्हा मायभूमी नाशिकला परतले. हा काळ भयंकर दुष्काळाचा. अर्थात, शहरी लोकांना दुष्काळाची तितकीशी झळ नव्हती. त्या वेळी ते रविवार कारंजाच्या मागे राहायचे. त्या वेळी आजच्यासारखी एवढी गजबज नव्हती. त्यांनी नोकरीच्या काळातच कॉलेज रोडला येवलेकर मळ्याजवळ घर बांधलं होतं. ते त्यांनी भाडेतत्त्वावर दिलं होतं. वर्षभरात भाडेकरूने ते सोडलं आणि 1973 मध्ये गाडगीळ परिवार कॉलेजरोड परिसरात वास्तव्यास आला. त्या वेळी आताच्या सारखी पॉश वस्ती नव्हती.
चोहोबाजूंनी शेती होती. गावाबाहेरचा परिसर असल्याने पक्ष्यांच्या किलबिलाटातच सकाळ उजाडायची. गाडगीळ या पक्ष्यांची नोंद घ्यायचे आणि पुस्तकांत त्या पक्ष्यांची ओळख शोधण्याचा प्रयत्न करायचे. याच काळात त्यांचा डॉ. विवेक ठकार यांच्याशी परिचय आला. त्यांच्यातील परिचयाचा पूल पक्षीप्रेमातूनच सांधला गेला. त्या वेळी डॉ. ठकार फोटोग्राफी करायचे. मग त्यांच्यासोबत गाडगीळही पक्षी निरीक्षण करू लागले. ठकार कॅमेऱ्यात पक्षी टिपायचे, तर गाडगीळ पक्षी डोळ्यांत साठवायचे. जसजसं बघत गेले तसतसे ते लिहीत गेले. एखादा पक्षी पाहिला, की त्याची माहिती घेण्यासाठी पुस्तकं शोधली. डॉ. ठकार यांच्या कॅमेऱ्यात टिपलेले जे पक्षी होते, त्यांचीही ओळख करून घेतली. हळूहळू गाडगीळ पक्षीप्रेमात आकंठ बुडाले. यातूनच त्यांचा डॉ. पुराणिकांशी परिचय आला.
ते म्हणाले, “चला, तुम्हाला खूप पक्षी बघायला नेतो.” गाडगीळांना ते नांदूरमध्यमेश्वरला घेऊन गेले. ही गोष्ट 1980 ची. तिथलं दृश्य पाहून गाडगीळ यांना धक्काच बसला. कारण त्या वेळी वन खातं नांदूरमध्यमेश्वरला भरतपूर करण्याच्या बाता करीत होतं. प्रत्यक्षात तिथं कोणाचंही नियंत्रण नव्हतं. पक्ष्यांची बिनदिक्कत शिकार सुरू होती. इतकी, की मारलेले पक्षी तिथल्या विश्रामगृहावर ओळीने टांगून ठेवलेले होते! हे विश्रामगृह की शिकारखाना? टांगलेल्या एका पक्ष्यावर गाडगीळांची नजर खिळली. हा पक्षी त्यांना माहीत नव्हता. त्यांनी स्थानिकांना विचारलं, तर त्यांनी त्याचं नाव तणमोर सांगितलं. नांदूरमध्यमेश्वरमध्ये सुरू असलेली ही शिकार पाहून ते अस्वस्थ झाले. तेथून परतल्यासरशी त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘गांवकरी’ला पत्र लिहिलं. नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्ष्यांची जी काही बेछूट हत्या होतेय त्या संदर्भात काही तरी करायला पाहिजे, अशा आशयाचं पत्र त्यांनी लिहिलं होतं. त्यावरून खळबळ उडाली. बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीनेही | Bombay history natural society | हे पत्र वाचून त्याची दखल घेतली, पण त्यांनी मृत पक्ष्याबाबत शंका उपस्थित केली. त्यात त्यांनी नमूद केलं, की गाडगीळ म्हणतात तो पक्षी तणमोर नाही. कारण त्यांनी जी निरीक्षणं नोंदवली, तो तणमोर | Lesser Florican | नाही. त्याचा अधिवासही तेथे नाही. तो ‘मूरहेन‘ | Moorhen | किंवा | Marsh hens | असू शकेल. ‘मूरहेन’ला मराठीत ‘जांभळी पाणकोंबडी’ म्हणतात. त्या वेळी गाडगीळ यांना ‘मूरहेन’ | Moorhen | या पक्ष्याचा परिचय झाला.
त्या पत्राने थांबलं शिकारसत्र
हे सगळं शिकारसत्र | Hunting | चर्चेत आल्यानंतर त्यावेळचे वनाधिकारी मित्रा यांनी त्याची दखल घेऊन नांदूरमध्यमेश्वर येथे सकाळी हजेरी लावली. पक्ष्यांची शिकार | Birds Hunting | प्रामुख्याने आर्मीचे अधिकारी करायचे. मित्रा यांनी त्यांना सांगितलं, की इथं शिकारीला अजिबात परवानगी नाही. आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवलं, की इथं तुमची आर्मीची लोकं शिकार करतात. त्यांना समज देण्यात यावी. नांदूरमध्यमेश्वरमधील शिकार प्रकरणावर गांभीर्याने चर्चा झाली. शिकारबंदी करण्यासाठी एकदा इथं पक्षीतज्ज्ञ सलीम अलींना | Ornithologist Salim Ali | बोलावायचं, असं वन खात्यात चाललं होतं. त्याप्रमाणे सलीम अली यांना नाशिकमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. सलीम अली यांचा तो पहिला नाशिक दौरा असावा. त्यांच्याबरोबर वन खात्याचे अधिकारी, पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, डॉ. ठकार हे सगळे नांदूरमध्यमेश्वरला गेले. त्यांच्याबरोबर सैरसपाटा केला. त्या वेळी गाडगीळ यांनी सलीम अली यांची छोटीशी मुलाखत घेतली. ती ‘गांवकरी’त छापून आली. नांदूरमध्यमेश्वर | Nandurmadhyameshwar | हे महाराष्ट्राचं भरतपूर व्हावं, अशी अपेक्षा त्या वेळी सलीम अली यांनी बोलून दाखवली होती. यामुळे झालं काय, की काही दिवसांतच अधिकृतरीत्या शिकारबंदीच जाहीर झाली. 80 च्या दशकात ही मोठी बाब होती. त्याचे श्रेय पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनाच जातं. त्यांनी जर पत्र लिहिलं नसतं तर कदाचित आज नांदूरमध्यमेश्वरचं ‘शिंगाडा तलाव’ झालं असतं. तेव्हापासून गाडगीळ यांचा वन खात्याशी संबंध आला.
पक्षीमित्र मंडळाची मुहूर्तमेढ
गाडगीळ यांचं पक्षीनिरीक्षण | Bird watching | सुरू होतं, पण ते एकट्यादुकट्याने करण्यापेक्षा आपण एखादं पक्षी मित्रमंडळ स्थापन करायला हवं, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावर त्यांनी ‘गांवकरी’त पत्र लिहिलं. त्यातूनच पुढे पक्षीमित्र मंडळ स्थापन झालं. त्याचं उद्घाटनही पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या हस्ते झालं. त्याच दिवशी सायंकाळी बॉश कंपनीनेही त्यांचा सत्कार केला. एकूणच पक्ष्यांकडं लक्ष वेधणारं नाशिकमधलं पहिलंवहिलं पक्षीमित्र मंडळ | Birds Friend association| दिगंबर गाडगीळ यांच्या पुढाकाराने 1981 मध्ये सुरू झालं.
पहिलं पक्षीमित्र संमेलन
गाडगीळ वृत्तपत्रांत लिहीत होते. यातूनच त्यांचा पुण्याचे पक्षीनिरीक्षक प्रकाश गोळे यांच्याशी परिचय झाला. ते सैबेरियात वगैरे पक्षी बघायला जाऊन आले होते. गोळे आपल्या काही मित्रांसोबत पक्षी निरीक्षणासाठी आले होते. जवळपास बारा-तेरा लोकं होती. सकाळी-सायंकाळी पक्षीनिरीक्षण, पक्ष्यांच्या स्लाइड्स असा कार्यक्रम झाला. त्या वेळी असा मुद्दा पुढे आला, की आपण दरवर्षी एकत्र का जमू नये? त्यामुळे पक्ष्यांच्या माहितीची देवाणघेवाणही होईल. यातूनच लोणावळा येथे 1981-82 मध्ये महाराष्ट्रातलं पहिलं पक्षीमित्र संमेलन झालं. नंतर कोल्हापूरला झालं. चौथं संमेलन औरंगाबादला झालं. त्या वेळी नाशिकचं पक्षीमित्र मंडळ सुरू होऊन तीन-चार वर्षेच झाली होती. या संमेलनातच ठरलं, की नाशिकमध्ये संमेलन घ्यावं. जानेवारी 1986 मध्ये पाचवं संमेलन नाशिकमध्ये झालं. नाशिकमधल्या या पहिल्यावहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते मारुती चितमपल्ली. पक्षीमित्रांना एकसंध ठेवणारी महाराष्ट्र स्तरावरची संघटना त्या वेळी अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे गाडगीळ यांचा नाशिकमधील संमेलनातच आग्रह होता, की पुणेकरांनी महाराष्ट्र स्तरावरचं पक्षीमित्र मंडळ स्थापन करावं; पण पुणेकरांनी फारसं मनावर घेतलं नाही. हळूहळू पक्षीमित्रांची चळवळ मूळ धरू लागली. महाराष्ट्रभर ठीकठिकाणी संमेलनं होत गेली. अर्थात, ही संमेलनं अनौपचारिकच होती. त्याला औपचारिक स्वरूप देण्यासाठी अखेर नागपूरच्या लोकांनी पुढाकार घेतला. त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्था रजिस्टर केली. याच संस्थेच्या अधिपत्याखाली पुढे दरवर्षी संमेलनं होऊ लागली. नांदेडमध्ये झालेल्या पक्षीमित्र संमेलनाला दिगंबर गाडगीळ अध्यक्ष होते.
जखमी गरुडावरील उपचार
नाशिकमध्ये प्रामुख्याने पक्षीनिरीक्षण गोदावरी नदीवर, गंगापूर येथेच व्हायचं. भोंसला मिलिटरी स्कूलच्या कंपाऊंडमध्येही खूप पक्षी पाहायला मिळायचे. 80 च्या दशकातला काळ आणि आताचा काळ यात मोठा बदल आहे. गाडगीळांच्या मते, आताच्या काळात लोकांमध्ये जागरूकता आहे. त्या वेळी तर फारशा सुविधा नव्हत्या. एखादा पक्षी जखमी झाला तर त्याच्यावर उपचार कसे करायचे, हाच मोठा प्रश्न होता. 80 च्या दशकातलाच एक प्रसंग गाडगीळांना चांगला आठवतो. एकदा गरूड | Eagle | पक्षी जखमी अवस्थेत सापडला होता. गाडगीळांनी त्याला पशुवैद्यकीय विभागात आणले. गाडगीळ म्हणाले, की पक्षी जखमी झाला आहे. त्याच्यावर तुम्ही काही उपचार करू शकाल काय? त्या वेळी पशुवैद्यकीय विभाग गायी-म्हैस व्याली किंवा बैलांवरच उपचार करायचा. पक्ष्यांशी त्यांचा कधी संबंधच आला नाही. ते म्हणाले, “आम्हाला त्यातलं काही कळत नाही.” त्याच वेळी पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांना डॉ. सावकार भेटले. ते होते माणसांचे डॉक्टर! ते म्हणाले, “आपण एक प्रयोग करून पाहू.” मग त्यांनी काय केलं, तर आधी त्यांनी कोंबडीचा पाय तोडला आणि म्हणाले, आता यावर उपचार करून तो दुरुस्त करू. जर दुरुस्त झाला तर गरुडावर उपचार करणे सोपे होईल.” मात्र, त्यातून उपाय काही सापडला नाही. ती कोंबडी मेली. शेवटी गाडगीळांनी गरुडाला घरी आणले. दोनचार दिवस या खगेंद्राने गाडगीळ यांच्या घरचा पाहुणचार घेतला. नंतर ठणठणीत झाल्यानंतर त्याने आकाशी झेप घेतली. पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांचा तसा होमिओपथीवर अभ्यास होता. पक्षी जेव्हा जखमी होतात किंवा पडतात तेव्हा त्यांना मानसिक धक्का बसलेला असतो. त्याच्यावर गाडगीळांनी औषध शोधून काढलं. ते औषध त्याला बोळ्याने पाजायचे. हा प्रयोग यशस्वी होऊ लागला. मग कोणताही पक्षी जखमी झाला, की त्याच औषधाची मात्रा दिली जाऊ लागली.
वृक्षलागवडीतही पुढाकार
नांदूरमध्यमेश्वरला 80-85 दरम्यान पक्ष्यांच्या 123 प्रजातींची नोंद झाली होती. आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आढळणाऱ्या पक्ष्यांची एक सूची प्रसिद्ध करण्यात आली. त्यात 136 पक्ष्यांचा समावेश आहे. गाडगीळांनी नाशिकमध्ये बहुतांश ठिकाणी पक्षीनिरीक्षण केले. शिवाय जेथे जेथे पक्षीमित्र संमेलन झाले, तेथे तेथे पक्षीनिरीक्षणाची संधी गाडगीळ यांनी कधी सोडली नाही. पक्षी निरीक्षणासाठी नाशिकमध्ये पाणथळ जागा होत्याच कुठे? शिंगाडा तलाव ही एकमेव पाणथळ जागा नाशिकमध्ये होती. तीही आता राहिली नाही. कारण तेथे आता महापालिकेचं फायर स्टेशन झालं आहे. पक्ष्यांचा अधिवास असावा किंवा किमान पक्ष्यांना मुक्तपणे वावरता यावे म्हणून वृक्षलागवडीतही गाडगीळांचा पुढाकार असायचा. डॉन बॉस्को रोडवर जे काही मोठमोठे वृक्ष आपण पाहतोय, ते पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ आणि त्यांच्या मित्राने लावलेले आहेत. शाळांमध्ये जाऊन गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. स्लाइड शोही दाखवायचे. ते मुलांना सांगायचे, की प्रत्येक मुलाने बाटलीभर पाणी झाडांना घालावे. गाडगीळांनी शाळेलाही विनंती केली, की एकदा तुम्ही मीटिंग घ्या. मलाही बोलवा; पण शाळेने काही मनावर घेतलं नाही. महापालिकेलाही त्यांनी विनंती केली, की आम्ही झाडे लावतो, पण त्याकडे लक्ष देणे शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. त्यावर महापालिकेचं पत्र आलं, की आम्ही पाणी घालतो, पण त्यासाठी महिन्याला दीड हजार रुपये द्यावे लागतील. ही रक्कम त्या वेळी मोठी होती. पक्षीमित्र मंडळाचंही तेवढं उत्पन्न नव्हतं. ही रक्कम महापालिकेला देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे महापालिकेनेही दुर्लक्ष केलं.सध्या पक्षीनिरीक्षण करण्यासाठी अनेक लोकं जातात. हे वातावरण उत्सावर्धक आहे, असं म्हणण्याचं धाडस गाडगीळ करीत नाहीत. आजकाल कॅमेरे, व्हिडीओ शूटिंग होत असलं तरी गांभीर्याने पक्षी निरीक्षण करणारे फारच कमी आहेत. मात्र, मुलांना वाचून, ऐकून जी माहिती मिळते, त्यातून दोनचार मुलांनी जरी प्रेरणा घेतली तरी खूप आहे. नाशिकमध्ये पहिलं पक्षीमित्र मंडळ स्थापन केल्यानंतर नेचर क्लब ऑफ नाशिकची स्थापना झाली. नाशिकमध्ये बिश्वरूप राहा यांनीही पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोठं काम केलं आहे. दिवसभर ते फिरायचे. गाडगीळ यांना नोकरीतून एवढा मिळायचा नाही; पण शक्य असेल तेव्हा राहा यांच्यासोबत गाडगीळ यांनीही अनेकदा पक्षी निरीक्षण केलं आहे. मुळात 80 च्या दशकात पक्षी निरीक्षणासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या. गाडगीळ कधी डॉ. ठकार यांच्यासोबत जायचे. वन खात्याशी संबंध आल्यानंतर ते त्यांच्या वाहनातूनही प्रवास करायचे.
कोकिळेची सुटका
पक्ष्यांचा अधिवास | bird habitats |, त्यांचं स्थलांतर, त्यांच्या सवयी हे जाणून घेता घेता गाडगीळांचं पक्षीप्रेम अधिकच घट्ट होत गेलं. पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्नही केले. पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणे त्यांना अजिबात रुचत नाही. त्यांचं खुलं आकाश हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही, असं गाडगीळ नेहमीच सांगतात. कोकिळेची सुटका करतानाचाही एक प्रसंग त्यांनी सांगितला. दर अठरा वर्षांनी कोकिळा व्रताचा योग येतो. या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे कोकिळेला पाहिल्याशिवाय जेवण करायचं नाही, अशी एक परंपरा आहे. कोकिळा व्रताविषयी असं म्हंटलं जातं, की या व्रतामुळे कुमारिकांना सुयोग्य पती मिळतो. विवाहित महिलांनी या व्रताचं पालन केलं तर त्यांचा पती दीर्घायुषी होतो. घरात वैभव आणि सुखसमृद्धी होते. या व्रतामुळे सौंदर्यही प्राप्त होतं अशीही एक श्रद्धा आहे. कारण या व्रतात जडीबुट्यांनी स्नान करण्याचा नियम आहे. तर अशा या कोकिळा व्रताच्या काळात लोकं कोकिळेला पिंजऱ्यात पकडून ठेवायचे. नाशिकरोडला असेच एकाने कोकिळेला पकडले होते. ते कळल्यानंतर गाडगीळांनी कोकिळेच्या सुटकेसाठी पोलिसांचीच मदत घेतली. अखेर कोकिळेची सुटका झाली.
उरला अखेरचा माळढोक…
गाडगीळांना एक खंत कायम आहे, ती म्हणजे पाणथळ जागा | wetlands | नाहीशा होणे. या पाणथळ जागांवर पक्ष्यांचा अधिवास असायचा. अनेक स्थलांतरित पक्षी तेथे पाहायला मिळायचे. माळरानावरही पक्षी पाहायला मिळायचे. सोलापूर जिल्ह्यात माळढोकच्या संरक्षणासाठी स्वतंत्र अभयारण्य केलं आहे. गाडगीळांनी या अभयारण्याला तीन-चार वेळा भेट दिली आहे. त्या वेळेला पाच-सात माळढोक पाहायला मिळायचे. आता तिथे एकच माळढोक शिल्लक राहिला आहे. म्हणजे जवळजवळ तो संपलाच आहे. कारण तो एकच आहे. त्यामुळे माळढोकच्या उत्पत्तीची शक्यता नाहीच. नाशिकमध्येही माळढोक फारसा नव्हताच. दोन-तीनच असायचे. ओझरच्या परिसरात माळढोक दिसायचा. त्याच्या संरक्षणासाठी राहा यांनी काम केलं होतं. परिसरातल्या शाळांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. चित्रकला स्पर्धा घेतल्या. राहा यांच्यासोबत गाडगीळांनीही या माळढोकवर काम केलं; पण आता तिथूनही तो नामशेष झाला आहे. माळढोक नामशेष होण्यास जेवढे नागरिक कारणीभूूत आहे, तेवढाच तो माळढोकही जबाबदार आहे, असं गाडगीळ म्हणतात. जसे इतर पक्षी अंडी घातल्यानंतर काळजी घेतात, तसा माळढोक पक्षी अंडी घातल्यानंतर अजिबात काळजी घेत नाही. अंडी दिली की जबाबदारी संपली, असं या माळढोकचं आहे. त्यामुळे कुत्री, कोल्हे त्याची अंडी फस्त करायचे. त्याचा अधिवास नष्ट झाला. कारण माळढोकला मोकळं मैदान लागतं. मोठी झाडं आली की तो अडतो. त्यामुळे महाराष्ट्रात माळढोक फक्त सोलापूर जिल्ह्यात एकमेव शिल्लक आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये आहेत काहीसे.
गाडगीळ एकदा नगर जिल्ह्यात नान्नज अभयारण्यात काळवीट पाहायला गेले होते. तेथे वन खात्याच्या कार्यालयात गेले असता अचानक कोणी तरी सांगितलं, की माळढोक आले, माळढोक आले. सगळे उठून तेथे गेले. माळढोकांची जोडी तेथे निवांतपणे वावरताना आढळली. हेच नान्नज अभयारण्य आता माळढोकांसाठी संरक्षित करण्यात आलं आहे. दुर्दैवाने माळढोक सुरक्षित राहू शकलाच नाही. आता एकमेव माळढोक वावरतोय. महाराष्ट्रातील माळढोकांचा अखेरचा शिलेदार.गाडगीळांचं पक्षीप्रेम चाळिशीनंतर बहरलं. रविवार कारंजाच्या मागे राहत असताना त्यांना भरपूर चिमण्या | Sparrows | पाहायला मिळायच्या. आता तर शहरात त्या अभावानेच पाहायला मिळतात. म्हणजे शहरी चिमण्या गेल्या, पण ग्रामीण भागात अजूनही आहेत. लहानपणापासून चिमण्यांनी मनात घर केलं, पण शहरात घरं करायला चिमण्यांना जागा नाही, ही खंत गाडगीळ व्यक्त करतात. हे शहरीकरण इतकं वाढलं, की चिमण्यांना इथं राहणंच असुरक्षित वाटू लागलं. पूर्वी काय व्हायचं, की लोकं धान्य बाहेर वाळत टाकायचे. त्यातले किडे, धान्य चिमण्यांना खायला मिळायचं. आता तर सगळं रेडिमेड मिळतं. त्यामुळे शहरातून चिमण्या नाहीशा होऊ लागल्या आहेत. गाडगीळांचं घर गोदेच्या काठीच होतं. त्यामुळे तेथे खंड्या पक्षी वगैरे पाहायला मिळायचे. त्या वेळी त्यांना या पक्ष्यांचं एवढं कुुतूहल दाटलं नाही; पण कॉलेज रोडवर राहायला आल्यानंतर आजूबाजूच्या शेती परिसरात येणाऱ्या पक्ष्यांनी त्यांचं लक्ष वेधलं आणि इथूनच सुरू झाला पक्षी निरीक्षणाचा सिलसिला.

गेट टुगेदरने जागवल्या आठवणी
गाडगीळांनी शिंगाडा तलावात | Shingada Pond | शिंगाड्याची लागवड पाहिलेली आहे. जे एचपीटी, आरवायके कॉलेज आज आपण पाहत आहोत, त्या कॉलेजमध्ये 1956 मध्ये गाडगीळांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्या वेळी कॉलेजच्या पुढे तर रस्ताच नव्हता. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गंगापूर रोडनेच जावं लागायचं. महाविद्यालयीन शिक्षण घेताना गाडगीळांनी या महाविद्यालयात तीन प्राचार्य पाहिलेत- बी. एल. पाटणकर, गजेंद्र गडकर आणि पुराणिक. गाडगीळ कधी कधी महाविद्यालयीन आठवणींतही रमतात. पन्नासच्या दशकात एक बस कॉलेजपर्यंत असायची. ती मालेगाव स्टँडवरून सुटायची. तीन वेळा ती यायची. सकाळ, दुपार, सायंकाळ या तीन प्रहरांत तिचा प्रवास असायचा. एखाद्यावेळी प्रॅक्टिकल लांबलं, की बस हुकायची. त्या वेळी तर रस्त्यावर दिवेही नव्हते. गाडगीळ रविवार कारंजाजवळच राहत असल्याने त्यांना ती सोयीची होती. 2006 मध्ये 50 वर्षांनंतर त्यांचं गेट टुगेदरही झालं होतं. त्या वेळी शंभर-सव्वाशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्याची एक स्मरणिका काढली. शालेय शिक्षण पेठे हायस्कूलमध्ये झालं. त्याच्या शाळेचंही पन्नास वर्षांनी गेट टुगेदर झालं. आता काळ इतका लोटला, की पन्नासच्या दशकातील सर्वच विद्यार्थी असणं शक्यच नव्हतं. 51 च्या बॅचचे गाडगीळ एकमेव विद्यार्थी या गेट टुगेदरमध्ये होते. 49 च्या बॅचचाही एक विद्यार्थी होता. पन्नासच्या दशकातलं नाशिक आणि आताचं नाशिक यात तुलनाच होऊ शकत नाही. त्या वेळी बसस्थानक ते गोळे कॉलनी एवढंच गाव होतं. कॅनडा कॉर्नर जे आपण पाहत आहोत, तेथे कॅनडा मिशनचं एक हॉस्पिटल होतं. आता तिथं बीएसएनएलचं कार्यालय आपण पाहत आहोत. कॅनडा मिशनच्या हॉस्पिटलला कधी काळी भेट दिल्याचं गाडगीळांना आठवतंय. आमच्या एका नातेवाइकाला मुलगा झाला त्या वेळी त्याला बघायला तिथे गेल्याचं त्यांना आठवत होतं.
विविध संस्थांवर कार्यरत
कॉलेज रोडवरील ऐसपैस बंगल्यात गाडगीळ आपल्या अर्धांगिणीसोबत राहतात. त्यांना दोन मुली आहेत. एक पुण्यात, तर दुसरी दौंडला. एक मुलगा होता. ऐन पंचविशीत 1989 मध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. मुली सासरी गेल्याने गाडगीळ दाम्पत्य तसं एकाकीच पडलं. मात्र, पक्ष्यांच्या सान्निध्यात त्यांनी मन रमवलं आहे. गाडगीळांनी अनेक संस्थांवर काम केलं. पक्षीमित्र मंडळाचे ते तर संस्थापकच आहेत. या मंडळाचे ते अध्यक्षही होते. दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीवरही ते होते. सार्वजनिक वाचनालयाचे ते काही काळ सचिवही होते. वाढत्या वयामुळे ते आता केवळ सभासद आहेत. रचना विद्यालयाचा महाराष्ट्र सेवा संघ, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र आदी संस्थांवर ते पदाधिकारी होते. महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे ते कार्यकारी सभासद होते. नंदुरबारला 1967 ते 72 दरम्यान एलआयसीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर असताना ते धुळे जिल्हा ग्रंथालयाचे सचिवही होते. त्यावेळी नंदुरबार धुळ्यापासून वेगळं नव्हतंच. सावानाचा त्यांना अनुभव होताच. त्यामुळे तिथे वाचनालय सुरू करण्यासाठी गाडगीळांनीही पुढाकार घ्यावा असा आग्रह होता. गाडगीळांच्या पुढाकारानेच तिथे वाचनालय सुरू झालं. आता नंदुरबार जिल्ह्याचेही स्वतंत्र वाचनालय सुरू झाले आहे.
सध्या किती तरी सुविधा आल्याने पक्षी निरीक्षण करणे सोपे झाले आहे. त्या वेळी तर कॅमेरा एखाद्याकडेच असायचा. डॉ. ठकार यांच्याकडे कॅमेरा असायचा. ते कॅमेऱ्यात पक्षी टिपायचे. गाडगीळांनी मात्र सगळे पक्षी डोळ्यांत साठवले. दरवर्षी हिवाळी पक्षीगणना असायची. त्या वेळी गाडगीळ नांदूरमध्यमेश्वर येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्ष्यांच्या नोंदी घ्यायचे. या पक्ष्यांची माहिती एशियन वेटलँड ब्यूरोकडे | Asian Wetland Bureau | ते पाठवायचे. ती सगळी माहिती छापून यायची. आता ही सगळी पुस्तकं त्यांनी पुण्यातील डॉ. सतीश पांडे यांना दिली आहेत. ते पक्षी निरीक्षणात चांगले काम करीत आहेत. शिंगाडा तलाव ही एकमेव पाणथळ जागा नाशिकमध्ये असली तरी त्या वेळी पक्षी निरीक्षणाची ती दृष्टी नव्हती. पक्षी निरीक्षणाला उशिराच सुरुवात झाली, याचंही त्यांना कधी कधी शल्य बोचत राहतं. एलआयसीमध्ये ते 1957 मध्ये लागले आणि पक्षी निरीक्षण 1973 मध्ये सुरू केलं. 1980 नंतर ते पक्षी निरीक्षणासाठी बाहेर जाऊ लागले. महाराष्ट्राच्या पक्षीमित्र संस्थेचं जे त्रैमासिक आहे, त्याचे संपादक स्वतः गाडगीळ आहेत. नाशिकमध्ये बसून ते सगळं काम पाहतात. त्याची पानं नंतर नागपूरला पाठवतात. याच त्रैमासिकात त्यांनी एक खंत व्यक्त केली, की लोकं आपले अनुभव लिहीत नाहीत. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर ते सक्रिय असतात. पण त्याचे अनुभव लिहून किंवा ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळत नाही. व्हॉट्सअॅपवर पाठवलेलं टेम्पररी असतं. ईमेलवर ते केव्हाही पाहता येतं, असं गाडगीळ म्हणतात. गाडगीळांकडे ग्रंथसंपदाही विपुल आहे. निसर्गावरील शंभर-दीडशे पुस्तकं, चारशेवर मासिके त्यांनी सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली आहेत. ही ग्रंथसंपदा निसर्गकट्टा म्हणून सार्वजनिक वाचनालयात पाहायला मिळते.

होमिओपथीचा दांडगा अभ्यास
गाडगीळांच्या पत्नी लता गाडगीळ उत्तम गृहिणी. त्या आता 79 वर्षांच्या आहेत, पण घरातलं सगळी कामं उत्साहाने करतात. दिगंबर गाडगीळ यांच्या पक्षी निरीक्षणाला एक प्रकारे त्यांच्या पत्नीचंच बळ आहे. पक्षी निरीक्षणासाठी गाडगीळ बाहेर फिरायचे, तर सौ. गाडगीळ घर सांभाळायच्या. गाडगीळांचा होमिओपथीवरही दांडगा अभ्यास. डीग्री नसली तरी त्यावर त्यांचा अभ्यास आहे. ही गोडीही त्यांना त्यांच्या पत्नी लता गाडगीळ यांच्या मामांकडून लागली. होमिओपथीच्या या अभ्यासाचा प्रयोग त्यांनी त्यांच्या पत्नीवरच केला. प्रसूतीनंतर लता गाडगीळ यांच्या स्तनात गाठ झाली. वैद्यकीय उपचारानंतरही वेदना काही गेल्या नाहीत. त्यावर गाडगीळ यांनी होमिओपथीचं पुस्तक शोधलं. त्यावरून त्यांनी औषध तयार केलं आणि एका दिवसात सौ. गाडगीळ वेदनामुक्त झाल्या. तेव्हापासून गाडगीळ होमिओपथीकडे वळले. गाडगीळांचा होमिओपथीचा दवाखाना घरातल्या घरातच सुरू असतो. औषधांसाठी त्यांनी पाच-सहा मोठमोठ्या लाकडी पेट्या बनवून घेतल्या आहेत. कोणी आलं की देतात ते औषध. या होमिओपथीचं वैशिष्ट्य असं, की माणसाच्या स्वभावानुसार औषध तयार करावं लागतं. मात्र, किरकोळ आजारावर त्यांना ही सगळी केसटेकिंग घेण्याची गरज पडत नाही. आजाराच्या लक्षणावरून जरी औषध दिलं तरी काम भागतं. सौ. गाडगीळही आता त्यांचीच औषधे घेतात. अर्थात त्यांचा स्वभाव गाडगीळांशिवाय कोणाला माहीत असणार…! त्यामुळे त्यांच्या औषधाची मात्रा सौ. गाडगीळांना बरोबर लागू पडते. सौ. गाडगीळही म्हणतात, आता म्हातारपण आलं आहे.
वृद्धत्वाचे जे भोग आहेत ते भोगावेच लागणार; पण त्यांच्या औषधांचा गुण येतो हे मात्र नक्की. एकदा कॉलनीत लहान मूल मोठ्यान रडत असल्याचं गाडगीळांच्या कानी पडलं. त्याचं रडणं काही थांबत नव्हतं. त्याच्या नुसत्या रडण्यावरून गाडगीळांनी औषध दिलं. सौ. गाडगीळ यांनी ते औषध दिलं. पंधरा-वीस मिनिटांनी त्याचं रडणं थांबलं. एकाला मूळव्याधीचा त्रास होता. गाडगीळ अंघोळ करीत होते. त्याला घाई होती. गाडगीळ यांनी स्नानघरातूनच सौं.ना सांगितले, की अमुकअमुक औषध दे. त्याला त्या औषधाचाही गुण मिळतो.आता वय निघून चाललंय हलक्या हलक्या पावलांनी. अशा स्थितीतही दिगंबर गाडगीळ पक्षीमित्रांची ही चळवळ पुढे नेत आहेत. ओशो म्हणतात, पक्ष्यांचं असणं म्हणजेच आकाशाचा जिवंत असणं आणि हे आकाश जिवंत ठेवण्यासाठी गाडगीळांसारखं पक्षीमित्र होणं आवश्यक आहे.
Facebook Page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1635″]