देशभक्ती म्हणजे काय?
शिवराम महादेव परांजपे (१८६४-१९२९) – शुद्ध स्वातंत्र्याचे प्रतिपादक. ‘काळ’ या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक. ‘काळ’ या वृत्तपत्रातील त्यांचे लेख ब्रिटिश सरकारने जप्त केले होते. परांजपे साहित्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव. बेळगाव येथे १९२९ मध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांचे निवडक लेख ‘काळातील निवडक निबंध’ या नावाने खंडनिहाय प्रसिद्ध आहेत. यातलाच हा एक निवडक लेख, आजही तंतोतंत लागू पडतो. देशभक्ती म्हणजे काय, राजनिष्ठेपेक्षा देशभक्ती कशी श्रेष्ठ आहे, याची माहिती या लेखात नमूद केली आहे. ८०-९० च्या दशकात ‘कुमारभारती’मध्ये याच लेखावर एक धडाही होता. दुर्दैवाने, हा धडा शिकून पुढे आलेली मंडळी देशभक्ती राजनिष्ठेशी जोडत आहे. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून परांजपे यांचा हा लेख आवर्जून वाचायला हवा. देशभक्ती म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी शि. म. परांजपे यांचा लेख वाचा खेळियाड ब्लॉगवर…
शि. म. परांजपे
देशभक्ती आणि राजनिष्ठा ह्यांची परस्पर तुलना करून त्या तुलनेप्रमाणे जर आपण त्यांची किंमत ठरवू लागलो तर आपल्याला देशभक्तीच जास्त किमतीची आहे असे म्हणावे लागते. आणि किमतीवरून जर जागा ठरवावयाची असेल, तर राजनिष्ठेपेक्षा देशभक्तीलाच श्रेष्ठ स्थान दिले पाहिजे.
हा आपला देश आहे आणि तो आपल्याकडेच राहिला पाहिजे अशी स्वदेशभक्ती उत्पन्न झाल्यानंतर आपला देश आपल्याकडे कसा राहील, हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये उद्भवतो. या प्रश्नाचा त्या लोकांना निकाल लावावयाचा असतो. हा प्रश्न बिकट आहे व निरनिराळ्या लोकांनी हा प्रश्न निरनिराळ्या रीतींनी सोडविलेला आहे. आपले व आपल्या देशाचे संरक्षण व्हावे हाच सगळ्यांचा मुख्य मुद्दा असतो; परंतु हा मुद्दा निरनिराळे लोक, निरनिराळ्या मार्गांनी साधून घेतात. आपला देश आपल्या सगळ्यांचा आहे, त्याचे संरक्षण कसे करावे, ह्या प्रश्नाचे पहिले आणि स्वाभाविक उत्तर मनुष्याच्या मनाला जे सूचते ते हे होय की, जर हा आपल्या सगळ्यांचा देश आहे तर त्याचे संरक्षण आणि त्याची व्यवस्था आपण सगळ्यांनी मिळूनच केली पाहिजे. हे उत्तर सगळ्यांच्या मनाला पटून जेथे याप्रमाणे व्यवस्था होते तेथेच लोकसत्तात्मक राज्यपद्धतीचा प्रारंभ होतो असे समजावे. ह्याप्रमाणे आपल्या देशाच्या संरक्षणाची वगैरे सर्व व्यवस्था करण्याचा अधिकार त्या देशातील ज्या लोकांच्या हातामध्ये असतो तेच त्या देशाचे खरे राजे, तेच त्या देशाचे खरे सरकार, आणि तेच त्या देशाचे खरे बादशहा.
त्या देशातील लोकांनी आपल्या देशावर अधिकार चालवावा आणि आपल्या देशातील व्यवस्था ठेवावी, हा सरळ मार्ग; परंतु मनुष्यजातीच्या दुर्दैवामुळे तो मार्ग सुटला. त्यामुळे देशाच्या मूळच्या खऱ्या धन्यांची गळसूत्रे हळूहळू आवळून टाकण्यात आली आणि जे चाकर होते ते अखेरीस रुद्राजीबुवा झाले. नंतर ह्यांचे प्रस्थ लोकांमध्ये कायम राहावे, ह्यांच्या दुर्गुणाबद्दलही लोकांमध्ये पूज्यभाव असावा, ह्यांनी केलेल्या अन्यायाबद्दलही लोकांनी ‘न्याय न्याय’ म्हणून तारीफ करावी, आणि ह्यांनी केलेल्या अत्यंत निष्ठुरपणाच्या जुलुमाबद्दलही लोकांना गुदगुल्या व्हाव्या, ह्यासाठी त्या मूळच्या चाकरांनी, परंतु पुढे बनलेल्या रुद्राजीबुवांनी राजनिष्ठा म्हणून एक थोतांड निर्माण केले.
तसे पाहिले तर देशभक्ती ही आधीची आहे व राजनिष्ठा ही नंतरची होय. देशभक्ती ही थोरली बहीण आणि राजनिष्ठा ही धाकटी बहीण होय. देशभक्ती ही सर्वांच्या मनांमध्ये एकदम उत्पन्न होते. राजनिष्ठा लोकांच्या मनांत उत्पन्न व्हावी, अशी इच्छा राजाच्या मनात प्रथमतः उत्पन्न होते आणि नंतर तो भीतीच्या, कायद्याच्या वगैरे साधनांनी ती लोकांच्या मनांमध्ये उत्पन्न झाली आहे अशी आपल्या मनाची समजूत करून घेतो. देशभक्ती ही मनुष्याच्या मनात स्वाभाविकपणे उत्पन्न होते. राजनिष्ठा लोकांच्या मनांमध्ये उत्पन्न करण्यास कृत्रिम प्रयत्न करावे लागतात. एक नैसर्गिक आहे, दुसरी मारूनमुटकून आणावी लागते. एक सर्वांच्या फायद्याची आहे, दुसरी एकाच व्यक्तीच्या फायट्याची आहे. देश पहिला आणि राजा दुसरा, देशासाठी राजा; राजासाठी देश नव्हे. देशाचा सुरक्षितपणा व देशाची व्यवस्था नीट रीतीने चालावी म्हणून राजा अस्तित्वात आला. राजाला आपला अंमल गाजविता यावा म्हणून देश अस्तिवात आला असे नव्हे. हा मूळ मुद्दा लक्षात आणून देशातील लोकांनी देशावर किती भक्ती करावयाची आणि राजावर किती निष्ठा ठेवावयाची याचा विचार ठरविला पाहिजे. देशाचा फायदा होत आहे तेथपर्यंत राजनिष्ठेला चिकटून राहणे अत्यंत आवश्यक आहे व जेव्हा राजे चांगले असतात आणि त्यांच्या प्रत्येक कृतीने त्यांच्या अमलाखालील देशाचे कल्याणच होत असते, तेव्हा राजनिष्ठा हा अत्यंत उत्तम सद्गुण होय. परंतु सर्वच राजे चांगले झालेले आहेत असे नाही. राजांमध्येही वाईट व जुलुमी राजे आहेतच. अशा प्रसंगी जेव्हा त्या वाईट व जुलुमी राजांच्या कृतीने देश बुडू लागतो, त्या वेळेला राजनिष्ठेला चिकटून राहणे हा उत्तम सद्गुण नव्हे, हे तत्त्व आजपर्यंच्या इतिहासाच्या पर्यालोचनावरून सिद्ध होते. देशासाठी राजा आणि राजनिष्ठा. पण ज्याच्यासाठी राजा आणि राजनिष्ठा, तो देशच जर त्या राजाच्या कृतीने रसातळाला जाऊ लागेल तर मग त्या राजाबद्दल राजनिष्ठा बाळगून काय करायचे आहे? जिच्यापासून इष्ट हेतू जो स्वदेशकल्याण तो साधत नाही, तर उलट बिघडतो, असली राजनिष्ठा काय कामाची? लोक हे राजांवर, त्यांची कृती कशीही असली तरी, निष्ठा ठेवण्यासाठी देवाने बनविलेले नाहीत. लोक हे राजांचे पुजारी म्हणून निर्माण केलेले नाहीत. लोकांना मुख्य स्वदेशकल्याण पाहिजे असते, आणि त्यासाठी त्यांनी राजनिष्ठा हे एक राजालाही पसंत असलेले असे साधन आपल्या हातांमध्ये घेतलेले असते. त्या साधनापासून जर साध्य देशभक्ती आणि राजनिष्ठा साधत नसले तर त्या साधनाचे ओझे हातात बाळगून काय करावयाचे आहे?
देशभक्ती म्हणजे काय ?
देशभक्ती आणि राजनिष्ठा ही दोन्हीही मनुष्याची कर्तव्यकर्मे आहेत, परंतु त्या दोघांमध्ये जेथे विरोध उत्पन्न होईल तेथे तात्पुरत्या फायद्यासाठी हाती धरलेली राजनिष्ठा सोडून देऊन सर्वांच्या कल्याणाला साधनीभूत अशी देशभक्ती अंगीकारिली पाहिजे. आता ह्या दोन्ही कर्तव्यकर्मांचे मनुष्याच्या मनावर काय काय निरनिराळे परिणाम होतात? देशभक्तीने मनुष्याचे मन उदात्त होते. परंतु राजनिष्ठेने बऱ्याच प्रसंगी मनुष्याचे मन तितके उदात्त राहत नाही. राजनिष्ठा ही पुष्कळ प्रसंगी काही तरी हेतूने उत्पन्न झालेली असते. राजनिष्ठा ही पहिल्याने राजाने आपल्या फायद्याकरिता उत्पन्न केली हे खरे. परंतु पुढे पुढे प्रजेपैकीही कित्येक लोक त्या राजनिष्ठेपासून आपला फायदा करून घेऊ लागले आणि अखेरीस तर सर्व लोक भीतीसाठी किंवा नफ्यासाठी राजनिष्ठ होऊ लागले. ‘एक्सरेज-’च्या नवीन निघालेल्या साधनाने शरीराच्या आतील भागही ज्याप्रमाणे स्पष्ट पाहावयास सापडतो त्याप्रमाणे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये खरे काय आहे हे ज्याच्या योगाने दिसेल असे जर एखादे यंत्र कोणी शोधून काढले असते आणि ते जर आजपर्यंत होऊन गेलेल्या राजांच्या हातांमध्ये दिले असते आणि त्या यंत्रामधून त्या राजांनी आपल्या सभोवताली पायांत राजनिष्ठेचे चाळ बांधून नाचणाऱ्या लोकांच्या अंत:करणाकडे पाहिले असते, तर खरोखर त्यांना ह्या जगाचा वीट आला असता, त्यांना आपल्या सभोवती किती घाण दिसली असती! आपल्या आसमंतात किती घाणेरडे, तुच्छ आणि क्षुद्र मनोविकार भरलेले त्यांना दिसले असते! वर सांगितलेल्या प्रकारच्या यंत्रातून त्यांनी आपल्या राजनिष्ठ म्हणून म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या अंतःकरणाकडे पाहिले असते तर त्यांना खरी राजनिष्ठा कोठे दिसली असती! राजनिष्ठा हे आपले कर्तव्यकर्म आहे म्हणून राजनिष्ठा, अशी निष्कलंक राजनिष्ठा त्यांना कोठे दिसली असती! कोणी तरी काही तरी निमित्तानेच राजनिष्ठ झालेले त्यांना दिसले असते. कोणी स्वतःला चाकरी मिळावी म्हणून राजनिष्ठ, तर कोणी आपल्या मुलाला चाकरी मिळावी म्हणून राजनिष्ठ, कोणी जहागीर मिळविण्यासाठी राजनिष्ठ, तर कोणी मिळविलेले इनाम कायम राखण्यासाठी राजनिष्ठ, कोणी पैशांसाठी राजनिष्ठ तर कोणी पदवीच्या नुसत्या शब्दासाठी राजनिष्ठ, कोणी लाच खाण्यासाठी राजनिष्ठ, तर कोणी खाल्लेली लाच पचविण्यासाठी राजनिष्ठ. अशा प्रकारची राजनिष्ठेची हिडीस आणि विद्रूप स्वरूपे आपल्या सभोवती जिकडे तिकडे पसरलेली पाहून त्या राजांना खरोखर असल्या राजनिष्ठेचा किळस आल्यावाचून राहिला नसता. सारांश, राजनिष्ठा ही बऱ्याच प्रसंगी काही तरी हेतूने उत्पन्न झालेली असते; परंतु देशभक्तीची गोष्ट तशी नाही. राजनिष्ठा दाखवून राजाची मर्जी संपादन करण्यापासून तसे करणाऱ्याचा तात्कालिक फायदा होतो. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. परंतु देशभक्ती केल्यापासून ती करणाऱ्याला तसा काय फायदा आहे? आपल्या पुढे पुढे नाचणाराला किंवा आपल्या अतिशय उत्तम तोंडपूजाला राजा एखादा गाव इनाम देईल किंवा मोठी पदवी बहाल करील. तसे देशभक्ती करणाऱ्याला काय मिळवायचे आहे? देश त्याला काय देणार? पण काही द्यावयाला नकोच असते. देशाने आपल्याला काही तरी द्यावे आणि त्यासाठी आपण त्याच्यावर प्रीती करावी, ही बुद्धीच अशा मनुष्याच्या मनामध्ये नसते.
राजनिष्ठा जसा देवघेवीचा व्यापार मांडते तसा देशभक्ती मांडीत नाही. हा आपला देश आहे, एवढ्याचकरिता लोक त्याच्यावर प्रीती करतात. त्याच्यापासून काही फलप्राप्ती होईल ह्या इच्छेने करीत नाहीत; देशभक्ती निर्हेतुक असते, राजनिष्ठेसारखी ती सहेतुक नाही.
देशभक्ती ही निष्कामसेवा आहे, परंतु राजनिष्ठा ही सकाम उपासना आहे, हा ह्या दोहोंमध्ये मुख्य फरक असल्यामुळे एकाने मन उच्च होते व दुसऱ्याने नीचतेला जाते. देशभक्तीची वाट स्वतंत्रतेकडे जाते आणि राजनिष्ठेचा शेवट गुलामगिरीमध्ये होतो. चांगल्या राजांच्या ठिकाणी राजनिष्ठा असली तर ती चांगलीच. परंतु वाईट राजांच्या ठिकाणी राजनिष्ठा म्हणजे नीच कर्माला सुरुवात. त्या स्थितीत तोंडपूजेपणाचा दुर्गुण लोकांच्या अंगात विशेष भिनतो. सद्सद्विवेकबुद्धीला झोप लागते, स्वदेश बांधवांच्या खऱ्या हिताच्या कल्पनेवर पाणी पडते, न्यायबुद्धी मलिन होते. परंतु देशभक्ती मनाची स्थिती ह्याच्या अगदी उलट होते. अमुक फायदा होत आहे म्हणून अमुक कृत्य करावे असली क्षुद्र बुद्धी त्या ठिकाणी बिलकुल नसते. आपल्या देशासाठी आजपर्यंत जे हजारो लोक मेले आहेत ते काय फायदा पाहून मेले? त्यांचा कोणता फायदा झाला? जेथे फायदा मोजून त्याप्रमाणे कृत्य करण्यात येते तेथे महत्कृत्य व्हावयाचे नाही, म्हणून समजावे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून ‘देव’ खेळला…!
Follow on Facebook Page kheliyad
(काळातील निवडक निबंध ः भाग 5)
(रुद्राजीबुवा म्हणजे फुकटचा अधिकार गाजविणारा. धन्याचं नाव गण्या, चाकराचं नाव रुद्राजी… अशी म्हण प्रचलित आहे)