आयपीएल झाली नाही तर बीसीसीआय सोसणार 4000 कोटींचे नुकसान

करोना विषाणूच्या महामारीमुळे प्रतिष्ठित विम्बल्डनसह जगभरातल्या क्रीडा स्पर्धा रद्द होत असताना आयपीएलबाबत मात्र बीसीसीआयने सावध पवित्रा घेतला. आधी १५ एप्रिलपर्यंत स्थगित केलेली आयपीएलच्या १३ व्या मोसमातील स्पर्धा लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI | 16 एप्रिल 2020 रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. म्हणजेच रद्द नाही. ही स्पर्धा पुढेही होऊ शकते. अद्याप करोनाचे सावट निवळलेले नाही. पुढे ते केव्हा निवळेल याची शाश्वती नाही.
अशातच जर ही स्पर्धा रद्द झाली, तर बीसीसीआय मंडळाला BCCI | तब्बल 4,000 कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. या व्यतिरिक्त खेळाडू, कंपन्या, फ्रँचाइजींना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीचा आकडा तर वेगळाच आहे. स्थगितीमुळेही नुकसान सोसणाऱ्या बीसीसीआयला आयपीएल रद्द झाल्यानंतर काय काय सोसावे लागू शकते यावर टाकलेला प्रकाशझोत…जगातील श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आयपीएलमधून प्रचंड पैसा मिळत होता. क्रिकेटचे अनेक संदर्भ आयपीएलमुळे बदलले. एखाद्या नवोदित क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नसले तरी आयपीएल हाच एकमेव असा मार्ग होता, जेथे त्याच्या गुणवत्तेला किमान संधी मिळत होती. पैसाही मिळू लागला. आता आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने या स्पर्धेच्या भविष्यातील वाटचालीवरही परिणाम होणार आहे. ही स्पर्धा 29 मार्चपासून होणार होती. मात्र, करोना विषाणूच्या संसर्गामुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. बीसीसीआयची एक अपेक्षा होती, की किमान एप्रिलच्या मध्यात ही महामारी किमान आटोक्यात येईल आणि आयपीएल पुन्हा होऊ शकेल. मात्र, जेथे संपूर्ण विश्वच कोविड 19 महामारीमुळे लॉकडाऊन झाले, तेथे ही स्पर्धा तरी कशी होणार? कारण आंतरराष्ट्रीय सीमाच लॉक झाल्याने विदेशी खेळाडूंचा भारतात येण्याचा मार्गही बंद झाला. अखेर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याशिवाय पर्याय नव्हताच.
‘‘करोना विषाणूच्या महामारीमुळे जगभरात आरोग्य संकट उभे ठाकले आहे. अशातच लॉकडाऊन वाढविल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता’’
– जय शहा, सचिव, बीसीसीआय
मात्र, ही स्पर्धा पुढे घेण्याबाबत शहा यांनी आशा व्यक्त केली आहे. महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर या स्पर्धेची तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलमध्ये अनेकांचे आर्थिक हितसंबंध पाहता ही स्पर्धा रद्द करण्याचे धाडस बीसीसीआयला करता आलेले नाही. ही स्पर्धा स्थगित झाल्याने आशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपही त्याचा परिणाम होईल. अद्याप या दोन्ही स्पर्धांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आयपीएलच्या नुकसानीबाबत बोलायचे झाले, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुमारे चार हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली तर त्याचा पहिला फटका खेळाडूंना बसेल. संघाचे मालक खेळाडूंना वेतन देणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक खेळाडू अडचणीत सापडतील. ही संपूर्ण व्यावसायिक स्पर्धा आहे. स्पर्धा असेल तरच पैसा. कारण व्यापारात फायदा आणि नुकसान या दोनच बाजूंचा विचार होतो. आयपीएलमध्ये ज्या उद्योजकांनी पैसा गुंतवला आहे, त्यांना त्यातून घसघशीत परताव्याची अपेक्षा असते.
![]() |
आयपीएल रद्द झाल्यास असे सोसावे लागेल नुकसान Source : Bank of America securities BofA |
असे असते गणित
आयपीएलमध्ये खेळाडूंना वेतन देण्याची पद्धत कॉर्पोरेट आहे. म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी खेळाडूंना १५ टक्के रक्कम दिली जाते. नंतर स्पर्धा सुरू झाल्यानंतर ६५ टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर दिली जाते. सध्या तरी खेळाडूंना छदामही मिळालेला नाही. स्पर्धा स्थगित झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असून, खेळाडूंच्या रकमेतून कपातही होऊ शकते, असे बीसीसीआय खेळाडू संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी म्हंटले आहे. आयपीएलमध्ये गुंतवणूक इतकी प्रचंड आहे, की सामान्य त्याची कल्पनाही करू शकत नाहीत. आता स्टार इंडिया चॅनलचेच उदाहरण घ्या, त्यांनी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी ३२६९.५० कोटींचे हक्क विकत घेतले होते. त्यासाठी या चॅनलने ६३४७.५० कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजे एकपट हक्क विकत घेऊन जे चॅनल त्याच्या दुप्पट खर्च करू शकते, त्या चॅनलची कमाई किती प्रचंड असू शकते याची कल्पना येऊ शकते. ही गुंतवणूक २०१८ पासून २०२२ पर्यंतच्या हक्कांसाठी होती. आता ही स्पर्धा स्थगित झाल्याने स्टार इंडियाला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. कारण या चॅनलला किती काळ हे नुकसान सोसून धरता येऊ शकेल यावर त्याच्या नुकसानीचा अंदाज करता येऊ शकेल.
विवो कंपनीला ४०० कोटींचा फटका
आयपीएलमध्ये संघमालकांचे नुकसान किती, यापेक्षा यात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूकच डोळे फिरवणारी आहे. विवो कंपनीने तर पाच वर्षांसाठी एक हजार कोटींना आयपीएलची स्पॉन्सरशिप खरेदी केली आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली तर या कंपनीला ४०० कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. एवढेच नाही तर आयपीएलचे ऑनलाइन लाइव प्रसारण हॉटस्टारवर होणार होते. आता ते होणारच नसल्याने हॉटस्टारने बीसीसीआयला प्रसारण हक्कासाठी जेवढे पैसे मोजले होते, ते मागे घेतले जातील. त्यामुळे बीसीसीआयला तब्बल चार हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता अमेरिकेतील बँक डिव्हिजन बोफा सिक्युरिटीजच्या अहवालात व्यक्त केली आहे.
खेळाडूंसोबत फ्रँचाइजींचे किती नुकसान?
आयपीएलमधील बड्या माश्यांना जेथे प्रचंड नुकसान सोसावे लागत असेल तर तेथे छोट्या माश्यांचे काय होणार? मुळात हे छोटे मासेच मोठ्या माश्यांवर अवलंबून होते. त्यामुळे खेळाडूंनाही बरेच नुकसान सोसावे लागणार आहे. यात फ्रँचाइजींचं सोपं गणित आहे, ‘नो क्रिकेट, नो मनी.’ विदेशी खेळाडूंपेक्षा स्थानिक खेळाडूंचे नुकसान सर्वाधिक आहे. त्यांना २० ते ५० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीवर खरेदी केले होते. त्यांना कदाचित या पैशांवर पाणी सोडावे लागणार आहे. अर्थात, फ्रँचाइजीच ते अदा करू शकणार नाही. फ्रँचाइजींचा विचार केला, तर या लीगमधील एकूण 8 फ्रँचाइजींनी जाहिरात आणि गेट मनीवर (तिकीट खरेदी) प्रचंड पैसा ओतला आहे. संघांच्या प्रायोजक रकमेच्या रूपातून एका संघाला किमान साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याचा अंदाज आहे. याशिवाय संघांना तिकिटांच्या रूपाने 250 कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे. कदाचित आयपीएलचे स्वरूप लहान केले तरी संघांचे नुकसान कमी होणार नाही.
तुम्हाला कल्पना नसेल, पण आयपीएलमध्ये प्रत्येक स्पेस विकत मिळते. अगदी खेळाडू वापरत असलेल्या कपड्यांवर एखादा लोगो टाकायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा लोगो कुठे टाकायचा यावर पैसे कमी–जास्त होतात. संघातील खेळाडूंची जी जर्सी असते त्याच्या समोरच्या भागावर जी जाहिरात केली जाते त्यासाठी एका कंपनीला किमान १८ ते २० कोटी रुपये मोजावे लागतात. या जर्सीच्या मागच्या बाजूला जर जाहिरात करायची असेल तर त्यासाठी दीड कोटी आणि जर्सीच्या शोल्डरवर म्हणजे खांद्यावर जी जाहिरात केली जाते त्यावर तीन कोटी रुपये मोजावे लागतात. हा सगळा व्यवहार स्पर्धेआधीच झालेला असतो. हे सगळे पैसे अर्थातच संघमालकांना मिळतात. जर स्पर्धा रद्द झाली तर संघमालकांना हे पैसे मिळू शकणार नाहीत. स्थगितीमुळे कदाचित काही कंपन्या या जाहिराती मागेही घेऊ शकते. त्यामुळे जो पैसा आधी मिळणार होता, तो आता मिळणार नाही. फ्रँचाइजी आपला फायदा पाहत असते. जर फ्रँचाइजींना नुकसान सोसावे लागत असेल तर ते खेळाडूंना पैसा देणार नाहीत, हे स्पष्टच आहे. कदाचित फ्रँचाइजी 7500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीतून कपात करू शकते. अर्थातच, या संपूर्ण नुकसानीचा फटका थेट बीसीसीआयलाच बसणार आहे.
2021 चे लिलाव होतील रद्द
2020 ची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली आहे. अर्थात, ती रद्द करण्याचे धाडस सध्या तरी कोणालाही परवडणारे नाही. मात्र, ही स्पर्धा यंदा झाली नाही तर 2021 मध्ये खेळाडूंचा लिलावच होऊ शकणार नाही. म्हणजेच 13 वा सिझन वाया जाईल. ही शक्यता यंदाच्या आयपीएलवर अवलंबून आहे. कारण 2021 मध्ये फ्रँचायजींना काही खेळाडूच स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी होती. उर्वरित खेळाडूंवर मात्र बोली लावावी लागणार होती.
बीसीसीआय नुकसान कसे भरून काढणार?
आयपीएल रद्द झाली तर सुमारे चार हजार कोटींचे नुकसान बीसीसीआय स्वतः सोसणार नाही. मग ही बीसीसीआय काय करणार, तर कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार, करारबद्ध खेळाडूंच्या वार्षिक रकमेतूनही कमी करणार. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की जर बीसीसीआयला आर्थिक नुकसान सोसावे लागले तर निश्चितच कर्मचाऱ्यांचे वेतन कापावे लागेल. बीसीसीआयशी करारबद्ध झालेले विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना वर्षाला प्रत्येकी सात कोटी रुपये मिळतात. हे सगळे ए प्लस श्रेणीतील खेळाडू आहेत. ए श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना तीन कोटी, तर सी श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येक एक कोटी रुपये दिले जातात. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तर वर्षाला नऊ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळते. कदाचित पुढे या मानधनातही मोठी कपात होण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी तसा निर्णय झालेला नाही. मात्र, विचार तर नक्कीच झाला असेल. जर मानधनात कपात होणार नसेल तर सामना शुल्कातही कपातीची शक्यता आहेच.
कारण या मानधनाव्यतिरिक्थ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी १५ लाख, आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यासाठी ७ लाख आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यासाठी पाच लाख रुपये शुल्करूपात दिले जातात. स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी सामन्यासाठी प्रतिदिन ३५ हजार, वन-डे सामन्यासाठी ५० हजार आणि तेवढीच रक्कम टी-२० साठी दिली जाते. त्यामुळे आता खेळाडूंच्या करारातून रक्कम कपात होते की सामना शुल्कातून हे आयपीएल रद्द झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, हे स्पष्ट आहे, की कपात अपरिहार्य आहे.
विमा पॉलिसी असती तर…
लब्धप्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डनसारख्या टेनिस स्पर्धा जर रद्द झाल्या तर स्पर्धेच्या आयोजकांना १०७६ कोटी विम्याच्या रूपाने मिळणार आहेत. बीसीसीआयने मात्र अशा कोणत्याही विमा पॉलिसीची व्यवस्था केलेली नाही. बीसीसीआयला वाटते, की प्रत्येक ठिकाणी विमा वेगवेगळा असतो. विम्बल्डनचे आयोजक गेल्या १७ वर्षांपासून महामारी इन्शुरन्सच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १५ कोटी रुपये भरत होते. आता क्लब नुकसानभरपाईचा दावा करू शकेल, ज्यामुळे त्यांना घसघशीत रक्कम विम्याच्या रूपातून मिळू शकेल. आता विम्बल्डनचं अनुकरण बीसीसीआयने का केलं नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. करोना विषाणू महामारी आली नसती तर कदाचित हा प्रश्न कधी उपस्थितच झाला नसता. मात्र, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हंटले आहे, की विम्बल्डन आणि आयपीएलची तुलना करण्यापूर्वी उलाढाल आणि संस्कृती या दोन्हींचा विचार करणे आवश्यक आहे. महामारीमुळे भारतात जर एखादी स्पर्धा रद्द होत असेल तर अशा काही विम्याची तरतूद आहे का, हेसुद्धा पाहणे आवश्यक आहे. इन्शुरन्स घटक प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळा आहे. एकूणच भारतातील स्थिती इतर देशांपेक्षा वेगळी आहे. जर विम्बल्डनसाठी असा काही पर्याय असेल तर मग भारतातही तसा काही पर्याय आहे का, याची माहितीच एकाही क्रीडा संस्थेला नाही. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमच्या पायाचा विमा काढण्यात आला होता.
भारतातही करारबद्ध क्रिकेटपटूंचा असा काही विमा काढायचा असेल तर किती खस्ता खाव्या लागतील याचा विचारच न केलेला बरा. डेव्हिड बेकहॅमच्या पायाचा विमाच १० कोटी पाऊंड होता. अशी स्थिती भारतात पाहायला मिळणार नाही. कदाचित या महामारीमुळे अनेक बदल पाहायला मिळू शकतील. बीसीसीआयही अशा काही विम्यासाठी आग्रही असेल. मात्र, त्यासाठी काही काळ जाणे आवश्यक होते. कोविड-१९ महामारीमुळे ही संधी मिळाली आहे. भविष्यात विम्बल्डनच्या धर्तीवर खेळाडूंना स्पर्धा आयोजकांना विमाही मिळेल. अर्थात, त्यासाठी भारतीय मानसिकताही बदलणे आवश्यक आहे.
[jnews_block_37 first_title=”more cricket related news:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]