चेस ऑलिम्पियाड : लक्ष भारताच्या कामगिरीवर
चेस ऑलिम्पियाड (Chess Olympiad)
रशिया, चीनसारख्या दिग्गज देशांच्या अनुपस्थितीत चेन्नईत गुरुवारपासून होणाऱ्या 44 व्या चेस ऑलिम्पियाड
(Chess Olympiad) स्पर्धेत भारत विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. बुद्धिबळात अव्वल असलेले रशिया आणि चीन यंदा या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे भारत खुल्या आणि महिला गटात तीन संघ खेळवणार आहे. बुद्धिबळप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत सर्वांचं लक्ष भारतावर असेल.
पाच वेळा विश्वविजेता असलेला अव्वल भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो या वेळी भारतीय संघासोबत मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून आपली भूमिका निभावेल. निश्चितच भारतीय संघ त्याच्या अनुभवाचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करेल.
भारत अ संघाला अमेरिकेनंतर दुसरे मानांकन मिळाले आहे. या संघासमोर मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखालील नॉर्वे, तसेच अमेरिका आणि अझरबैजान या संघांचे कडवे आव्हान असेल. भारत ब संघात नव्या दमाच्या तरुण खेळाडूंचा सहभाग आहे. या संघाचा प्रशिक्षक आहे आर बी रमेश. भारत ब संघाला 11 वे मानांकन आहे. हा संघ धक्के देईल अशी अटकळे आहेत.
चेस ऑलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेत यंदा खुल्या गटात विक्रमी 188 संघ, तर महिला गटात 162 संघ सहभागी होत आहेत. यापैकी सहा संघ यजमान भारत संघाचे आहेत. भारत यजमान देश असल्यामुळे त्याला अतिरिक्त संघ उतरवण्याची संधी मिळाली आहे.
रशिया आणि चीनची गैरहजेरी यामुळे भारताच्या विजेते पदाचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. मात्र, यामुळे भारतालाच नाही, तर इतर संघांनाही आपलं कौशल्य सिद्ध करण्याची संधी आहे.
स्पर्धेत अमेरिकेचा संघ कडवा प्रतिस्पर्धी मानला जातो. या संघात फॅबियो कारुआना, वेस्ले सो, लेवोन अरोनियन, सॅम शँकलँड आणि लीनिअर डोमिनिग्जसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांची सरासरी इलो रेटिंग 2771 आहे. मात्र, चेस ऑलिम्पियाड सारख्या सांघिक स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच टीमवर्कही तेवढेच महत्त्वाचे असते.
भारताने नॉर्वेमधील ट्रॉमसो येथे 2014 मध्ये झालेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या गटात कांस्य पदक जिंकले होते. 2020 मध्ये ऑनलाइन चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रशियासह संयुक्त विजेतेपद जिंकले होते. भारताने 2021 मध्ये कांस्य पदक मिळवले होते. भारतासमोर आता पुन्हा गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
एकीकडे भारत अ संघ जेतेपदाचा दावेदार मानला जात असला तरी भारत ब संघातही अनेक प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. यात डी गुकेश आणि आर प्रज्ञाननंदा यांच्याशिवाय निहाल सरीन, रौनक साधवानी आणि अनुभवी बी अधिबान या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांचे प्रशिक्षक रमेश यांच्या मतानुसार या संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. या दीर्घ स्पर्धेत खेळाडूंना संपूर्ण 11 फेऱ्यांपर्यंत स्वत:ला प्रसन्न ठेवावे लागेल. हाच पवित्रा त्यांना विजेतेपदापर्यंत घेऊन जाण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.
मॅग्नस कार्लसन यानेही केले भारताचे कौतुक
विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याने भारतीय खेळाडूंचे बरेच कौतुक केले आहे. त्याच्या मते, भारतीय टीम पदक मिळविण्याचे दावेदार आहेत. भारत ‘अ’ संघात अनुभवी पी. हरिकृष्णा आणि वेगाने प्रगती करणारा अर्जुन एरिगॅसी, विदित गुजराती, अनुभवी के शशिकिरण आणि एस एल नारायणन यांचा समावेश आहे. विदित गुजराती 2020 च्या ऑनलाइन चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत कर्णधार होता. त्या वेळी भारताने रशियासोबत संयुक्त विजेतेपद मिळविले होते. भारत ब संघाला 17 वे मानांकन मिळाले आहे. या संघात अनुभव आणि तरुणांचे मिश्रण आहे. संघात अनुभवी सूर्यशेखर गांगुली यांचा समावेश आहे.
महिला गटात भारत अ संघाला अव्वल मानांकन आहे. कोनेरू हम्पी आणि डी हरिका यांच्या उपस्थितीमुळे संघ सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. या दोन्ही अनुभवी खेळाडूंशिवाय आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांचाही संघात समावेश आहे. भारताचे इतर दोन संघही स्पर्धेची समीकरणे बदलण्यात सक्षम मानले जात आहेत. भारताला महिला गटात युक्रेन, जॉर्जिया आणि कझाकिस्तानसारख्या संघांचे कडवे आव्हान असेल.
भारतीय संघ
खुला गट
भारत ए
विदित एस गुजराती, पी हरिकृष्णा, अर्जुन एरिगॅसी, एस एल नारायणन, के शशिकिरण.
भारत बी
निहाल सरीन, डी गुकेश, आर प्रज्ञाननंदा, बी अधिबान, रौनक साधवानी.
भारत सी
सूर्यशेखर गांगुली, एसपी सेथुरमन, अभिजित गुप्ता, कार्तिकेयन मुरली, अभिमन्यू पुराणिक.
महिला गट
भारत ए
कोनेरू हम्पी, डी हरिका, आर वैशाली, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी.
भारत बी
वंतिका अग्रवाल, सौम्या स्वामीनाथन, मेरी एन गोम्स, पद्मिनी राउत, दिव्या देशमुख.
भारत सी
ईशा करवडे, साहिती वार्शिनी, प्रत्युषा बोड्डा, पी वी नंदिधा, विश्व वासनावा.