गोल्फ हा खेळ कसा खेळतात? (भाग २)
गोल्फचा इतिहास आणि त्याची पार्श्वभूमी तुम्ही पहिल्या भागात वाचली असेलच. आता हा गोल्फ खेळ नेमकी कसा खेळतात हे पाहू. साधारण क्रिकेट तुम्हाला माहिती आहेच. तो खेळतात कसा, त्याची गुणपद्धत सगळं काही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तो पाहताना कशी मजा येते! तसंच गोल्फचीही गुणपद्धत आणि त्याचे बारकावे कळले तर कदाचित हा खेळही तुम्हाला आवडेल.
समजा, 100 यार्डांपासून लांब अंतरावर एखादे खळगे किंवा होल असेल, तर त्या होलमध्ये चेंडू टाकण्याचे काही नियम आहेत. ते म्हणजे तीन शॉटमध्ये तुम्हाला खळग्यात चेंडू टाकणे क्रमप्राप्त आहे. तसा नियमच आहे. जर तुम्ही चार शॉटमध्ये चेंडू खळग्यात टाकला तर तुमचा स्कोअर होईल 1 ओव्हर-पार. म्हणजे तुम्हाला जेवढे शॉट मिळाले होते, त्यापेक्षा एक जास्त. जर पाच शॉटमध्ये चेंडू खळग्यात टाकला तर तुमचा स्कोअर 2 ओव्हर-पार. नियमाप्रमाणे जर तीन शॉटमध्ये तुम्ही चेंडू खळग्यात टाकला तर तुमचा स्कोअर होईल 1 अंडर-पार. जर एखाद्या खळग्यासाठी पाच शॉट मिळाले आणि तुम्ही पाच शॉटमध्ये खळग्यात चेंडू टाकला तर त्याला ईवन-पार. अशा प्रकारे एकूण 18 खळगे असतात. प्रत्येक खळग्यासाठी शॉट खेळण्याची संख्या वेगवेगळी असते. काही खळग्यासाठी तीन, तर काही खळग्यांसाठी चार किंवा पाच. गुणपद्धत समजून घेणे थोडेसे किचकट आहे, पण एकदा तुम्ही गोल्फ (Golf) खेळायला लागला किंवा तो तल्लीनतेने (प्रयत्नपूर्वक) पाहायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला हा खेळ आवडेल. खेळ पाहताना त्याची गुणपद्धत समजून घेतली तर तो नक्कीच आवडू लागतो.
जेवढे कमी गुण तेवढी उत्तम गुणवत्ता
संपूर्ण खळग्यांची एकत्रित गुणसंख्या काढली जाते. समजा तुम्हा 18 खळग्यांसाठी 72 शॉट मिळाले, तर तुम्ही म्हणू शकता हा 72-पार खेळ होता. हा 72-पार खेळ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 80 शॉट घेतले तर तुमचा स्कोअर झाला 8 ओव्हर-पार. हाच स्कोअर लिहिताना +8 असाही नोंदवला जातो. जर हा 72-पार खेळ तुम्ही 66 शॉटमध्ये पूर्ण केला तर तुमचा स्कोअर होईल 6 अंडर-पार किंवा -6. म्हणजेच 72 शॉटला 6 कमी. जो कमीत कमी शॉटमध्ये 18 खळगे जिंकतो तो विजेता ठरतो. म्हणजे जेवढी उणे गुणसंख्या तेवढा उत्तम खेळ.
खळग्यांची विभागणी
या खेळात खळग्यांचीही विभागणी केलेली असते. म्हणजे 18 खळग्यांमध्ये पहिल्या 9 खळग्यांना फ्रंटनाइन, तर शेवटच्या नऊ खळग्यांना बॅकनाइन म्हंटले जाते. साधारणपणे 18 खळग्यांसाठी 71 किंवा 72 शॉट निश्चित केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जिंकायचे असेल तर ही निश्चित केलेली जी शॉटची संख्या आहे त्यापेक्षा कमीत कमी शॉटमध्ये तुम्हाला 18 खळगे जिंकणे आवश्यक आहे. या 18 खळग्यांच्या मैदानालाच गोल्फ कोर्स म्हंटले जाते. हा गोल्फ कोर्स कित्येक एकरमध्ये सामावलेला असतो हे इथे लक्षात घ्यावे. हा संपूर्ण 18 खळग्यांचा प्रवास चार-पाच तासांचा असतो.
या खेळातही आहे रंगत
या नीरस खेळालाही थोडेसे मजेदार बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यासाठी अधेमधे खड्डे खोदून त्यावर माती टाकली जाते. या खड्ड्यांना बंकर असे म्हणतात. त्यामुळे होते काय, की जर बंकरमध्ये तुमचा चेंडू फसला तर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. म्हणजे खळग्यात चेंडू आणण्यासाठी तुम्हाला जास्त शॉट खेळण्यास भाग पडू शकते. त्यामुळे शॉट असा खेळायचा, की तो या बंकरमध्ये फसायला नको. यात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे अधेमधे छोटेछोटे तलावही असतात. जर चेंडू पाण्यात गेला तर एका शॉटची पेनल्टी लावली जाते. त्यामुळे बंकर आणि पाणी टाळून 18 खळगे तुम्हाला जिंकायचे आहे. त्यामुळे गोल्फ वाटतो तेवढा सोपा नाही, याची कल्पना आलीच असेल.
ग्रीन एरिया
तुम्हाला बंकर आणि पाण्याची गंमत कळली. या खेळात आणखीही बरंच काही आहे. आता समजा, तुम्ही चेंडूला खळग्याजवळ आणले, तर या खळग्याजवळ तुम्हाला बारीक कापलेले गवत आढळेल. त्याला ग्रीन एरिया म्हणतात. खळग्यात एक झेंडा प्रत्येक वेळी फडकत असतो. त्याचे कारण म्हणजे लांबून खळगे नेमकी कुठे आहे ते समजते. ग्रीन एरियावर आलेला चेंडू खळग्यात ढकलण्याला पटिंग असे म्हणतात. पटिंगसाठी वेगळा गोल्फ क्लब म्हणजे गोल्फ स्टीक वापरली जाते. कारण लांबून चेंडू खळग्यापर्यंत आणण्यासाठी विशिष्ट प्रकारची वेगळी स्टीक वापरली जाते. मात्र, हलक्या हाताने जर चेंडू खळग्यात ढकलायचा असेल तर त्यासाठी वेगळी स्टीक असते. एका खेळाडूकडे असे किती क्लब किंवा स्टीक असू शकतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एका खेळाडूकडे जास्तीत जास्त 14 गोल्फ क्लब असतात. गोल्फ म्हणजे थोडंथोडकं काम नाही रे भावा.
कॅडींची भूमिका
आता एवढे गोल्फ क्लब घेऊन शॉट खेळायचं म्हणजे ‘हेला पाणी वाहता वाहता मेला…’ असं व्हायचं. नाही तर काय, एवढं सामान कसं वाहायचं? ते वाहतानाच अर्धमेलं होऊ. पण घाबरायचं काम नाही. गोल्फ खेळाडूचे हे सर्व सामान वाहण्यासाठी एक जण सोबतीला असतो. त्याला कॅडी (caddie) असं म्हणतात. तो तुमचे क्लब, बॅग घेऊन तुमच्या सोबत राहतो. तो केवळ सामान वाहायचंच काम करीत नाही, तर तुम्हाला सल्लाही देतो. तो तुम्हाला हवेचा झोत कोणत्या दिशेने आहे, हे सांगतो. त्यामुळे तुम्हाला शॉट कसा खेळायचा हे कळते. गोल्फ कोर्सवर कॅडीचा सल्ला घेण्याची परवानगी असते.
डबल बोगी, एल्बात्रोस
क्रिकेटमध्ये सिक्सर, फोरला जसे चौके-छक्के म्हंटले जाते किंवा खो-खोमध्ये गडी बाद केला तर ‘मारला’ असे काही शब्द खेळामध्ये प्रचलित आहेत, तसेच गोल्फमध्येही आहेत. जर तुम्ही निश्चित केलेल्या शॉटसंख्येपेक्षा दोन शॉट कमी खेळून चेंडू खळग्यात टाकले तर त्याला ‘2 अंडर-पार’ असे म्हंटले जाते, हे तुम्हाला आधी सांगितलेच आहे; पण त्याला वेगळा शब्दही आहे, तो म्हणजे ‘एल्बात्रोस.’ तसंच ‘1 अंडर-पार’ स्कोअर केला तर तो ‘इगल’, एक शॉट जास्त घेतला तर त्याला ‘बोगी’ म्हंटले जाते. दोन शॉट जास्त घेतले तर ‘2 ओवर-पार’ किंवा ‘+2’ किंवा ‘डबल बोगी’ असे म्हंटले जाते. काय स्कोअर झाला, तर ‘डबल बोगी’ झाला! बोगी हा शब्द भारीच हं.
गोल्फ किटची किंमत किती?
आता हा खेळ खेळायचा म्हणजे तुमचा खिसा गरम हवा. या खेळासाठी गोल्फ स्टीक अर्थात क्लब असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 14 क्लबचे (गोल्फ स्टीक) किट घ्यायचे असेल तर त्याची सुरुवातच 25 हजारांपासून होते. ज्युनिअर खेळाडू असाल तर तुम्हाला 10 क्लबचे (गोल्फ स्टीक) किट लागेल. त्याची किंमत 12 हजारांपासून सुरू होते.
भारतातील गोल्फ कोर्स
भारतात काही ठिकाणी गोल्फ कोर्स आहेत. चंडीगडला गोल्फ क्लबचे उत्तम मैदान आहे. सेक्टर-6 वर असलेले है मैदान 18 खळग्यांचे आहे. तेथे व्यावसायिक स्पर्धाही होतात. लहान मुलांच्या सरावासाठीही मैदान तयार केले आहे. या मैैदानावर प्रशिक्षणही दिले जाते. पटिंग ग्रीन, चिपिंगचे मार्गदर्शन केले जाते. पटिंग म्हणजे 40 ते 50 यार्डावरून चेंडू खळग्यात टाकण्याचे प्रशिक्षण. चिपिंग म्हणजे कमी अंतरावरून शॉट मारणे. तर असं आहे हे सगळं. चंडीगड गोल्फ कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसाला 50 रुपये देऊनही तुम्ही सराव करू शकता. सरावासाठी चेंडू हवे असतील तर तेही भाड्याने मिळतात. 30 रुपये दिले, की 50 चेंडू खेळायला मिळतात. पण गोल्फ कोर्सवर खेळायचे असेल तर मग थोडे पैसे जास्त मोजावे लागतील. म्हणजे तब्बल 500 रुपये प्रतिदिन भाडे आकारले जाते.
तर असं आहे मित्रांनो… क्रिकेट वगैरे खेळ बरेच खेळ तुम्हाला माहीत असतील. आता गोल्फही एव्हाना कळला असेल. काही घाई नाही, रिटायर्ड झाल्यावर तुम्हाला वेळच वेळ राहील. तेव्हा मनसोक्त खेळा गोल्फ.
हेही वाचा… गोल्फचा इतिहास
One Comment