रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणारी कोनेरू हम्पी
रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणारी कोनेरू हम्पी हिच्याविषयी...

हम्पीचं शिक्षण गुंटूरमधील चलपथी रेसिडेन्शियल स्कूलमध्ये झालं आहे. तिच्या आईचं नाव कोनेरू लता, तर बहिणीचं नाव कोनेरू चंद्रहासा आहे. वडील कोनेरू अशोक यांनी हम्पीचं नाव यासाठी ठेवलं, की त्या नावाचा अर्थ रशियन भाषेत चॅम्पियन असा होतो. त्यांची इच्छा होती, की मोठी झाल्यावर हम्पी हे नाव ती सार्थकी लावेल. त्यांनी त्यासाठी हम्पी | Humpi | या नावातल्या स्पेलिंगमध्ये थोडासा बदल केला. आय ऐवजी त्यांनी शेवटी वाय लावला. त्याचे कारण म्हणजे ते रशियन नावासारखे वाटेल. कोनेरू कुटुंब मध्यमवर्गीय. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर दहा वेळा विचार करणारं असं हे कुटुंब. कोनेरू हम्पी हिच्या बुद्धिबळ खेळाला चालना मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी टीव्हीऐवजी कम्प्युटर खरेदी केला. त्या वेळी लोकांनी तर टोमणे मारले होते. हम्पीच्या आईला हे अजूनही स्मरणात आहे. मात्र, जेव्हा कोनेरू हम्पी हिने जगज्जेतेपद जिंकले तेव्हा याच टोमणे मारणाऱ्यांची तोंडे बंद झाली असतील.
कोनेरू हम्पी बुद्धिबळ खेळाकडे वळली ते वडिलांमुळे. वयाच्या पाचव्या वर्षीच हम्पी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पटावरच्या चाली शिकली. वडील तिला शिकवत असताना एकदा हम्पीने अतिशय किचकट प्रसंगात एक चाल सुचवली. त्या वेळी ती अवघ्या सहा वर्षांची होती. वडील चकित झाले. कारण ती चाल इतकी चपखल होती की भल्या भल्यांना ही चाल सुचणे कठीण होते. त्यांनी ही चाल पडताळून पाहिल्यानंतर लक्षात आले, की ती सर्वोत्तम चालींपैकी एक होती. हम्पीला बुद्धिबळाची गोडी लागल्याचे पाहून वडिलांनाही तिला शिकविण्याचा हुरूप आला. नऊ वर्षांखालील गटात तिने राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद जिंकून आपल्या कौशल्याची चुणूकही दिली.
कोनेरू हम्पी सर्वांत कमी वयातील महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर
भारतातील सर्वांत कमी वयाची महिला ग्रँडमास्टर म्हणून लौकिक मिळविलेल्या हम्पीने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविल्यानंतरही तिला प्रायोजक मिळू शकला नाही. त्यामुळे तिने ऑगस्ट 2006 मध्ये ओएनजीसी कंपनीत पर्सनल अॅडमिनिस्ट्रेटरची नोकरी केली. कारण स्पर्धात्मक बुद्धिबळ अतिशय महागडा खेळ आहे. नोकरी करण्यामागे तिचा हेतू हाच होता, की विदेशातील स्पर्धांचा खर्च किमान कंपनी तरी उचलेल. बहुतांश कंपन्या क्रिकेटपटूंनाच प्रायोजकत्व देतात. त्यामुळे बुद्धिबळात महिला खेळाडूंकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं. त्यामुळेच तिला परदेशी प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेता आलं नाही. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली ती जगात नंबर दोनची खेळाडू ठरली.
हम्पीमुळे वडिलांचाही प्रशिक्षक म्हणून सन्मान
हम्पीला उत्तम मार्गदर्शन केल्याने आंध्र प्रदेश सरकारने त्यांना राज्य प्रशिक्षकाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय उत्तम प्रशिक्षण कौशल्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. उत्तम प्रशिक्षक असलेले कोनेरू अशोक राज्यस्तरीय स्पर्धेत दोन वेळा विजेतेही ठरले आहेत. 1985 मध्ये गुंटूरमध्ये दक्षिण भारत ओपन चॅम्पियनशिप ते जिंकले होते. बाप-लेकीचं हे नातं अशोक यांच्या दृष्टिकोनातून द्रोणाचार्य-अर्जुनासारखं आहे. हम्पीला बुद्भिबळातच रुची आहे, असं अजिबात नाही. टीव्हीवर तेलुगू आणि हिंदी चित्रपट पाहायलाही तिला खूप आवडते. पुस्तके वाचणेही तिला आवडते. तिचा आदर्श खेळाडू विश्वनाथन आनंद आहे.
कोनेरू हम्पी हिने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (एआयसीएफ) सचिव डी. व्ही. सुंदर यांच्यावर छळ केल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच तिला 2009 मधील आशियाई इनडोअर स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता. हम्पीला या स्पर्धेत सहभाग घेणार होती. सचिव सुंदर यांनीही तिच्या सहभागास मंजुरी दिली होती. नंतर त्यांनी घूमजाव करीत स्पर्धेत सहभागासाठी तिच्यावर काही अटी लादल्या. त्यांनी तिचे वडील व प्रशिक्षक असलेले कोनेरू अशोक यांना हम्पीबरोबर जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे हम्पीने या स्पर्धेत सहभाग घेतला नाही. डी. व्ही. सुंदर खेळाडूंना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप हम्पीने केला होता. सुंदर यांच्यावर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. ग्रँडमास्टर जी. एन. गोपालने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला नाही म्हणून त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. एआयसीएफच्या नियमांनुसार सर्व ग्रँडमास्टर खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणे अनिवार्य आहे. त्यावरून सुंदर आणि गोपालच्या वडिलांमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण विकोपास गेले होते.
भारतीय ऑलिम्पिक संघाने (आयओए) खासगी प्रशिक्षक म्हणून कोनेरू अशोक यांना सोबत नेण्याची परवानगी मागितली होती. त्यावर आयओने सांगितले, की एआयसीएफने जर पत्र दिले तर आमची काहीही हरकत नाही. हम्पीने सुंदर यांना ई-मेल केला. मात्र, त्यावर तिला कोणतेही उत्तर मिळाले नाही. अखेर कोनेरू अशोक यांनी फोन केला, तेव्हा सुंदर यांनी काही अटी ठेवल्या. या अटींनुसार हम्पीने पुढील सर्वच महिला स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, नंतर घूमजाव करीत सुंदर यांनी हम्पीला वडिलांचा संपूर्ण खर्च उचलावा लागेल, असे सांगितले. एकूणच हे प्रकरण दहा वर्षांपूर्वी बरेच गाजले होते. कोनेरू अशोक यांनी तर सुंदर यांना आव्हान दिले होते, की पत्रकारांसमोर त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
अशी जिंकली जलदगती बुद्धिबळ स्पर्धा
भारताच्या कोनेरू हम्पी हिने | Koneru Humpy | महिला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत | Women’s World Rapid Chess Championship | चीनच्या लेई टिंग्जी | Lei Tingjie | विरुद्ध आर्मगेडन | Armageddon | डावात बरोबरी साधत जगज्जेतेपदाच्या किताबावर शिक्कामोर्तब केले. हम्पीने चीनच्याच टँग झोंग्यी | Tang Zhongyi | विरुद्ध यशस्वी पुनरागमन करताना 12 व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यामुळे 32 वर्षीय हम्पीला टिंग्जीलविरुद्ध टायब्रेकर खेळावे लागले.
दोन वर्षांनी यशस्वी पुनरागमन
मातृत्वानंतर 2016 ते 2018 दरम्यान तब्बल दोन वर्षे हम्पी बुद्धिबळापासून लांब होती. त्यानंतर जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळविणे थक्क करणारे आहे. विजयानंतर हम्पी | Koneru Humpy | म्हणाली, की जेव्हा मी पहिला डाव खेळत होते तेव्हा मला वाटले नव्हते, की मी अव्वल स्थानी असेन. पण मी पहिल्या तीन क्रमांकात राहण्याची अपेक्षा मात्र ठेवली होती. पण टायब्रेकमध्ये खेळण्याची अपेक्षा अजिबातच नव्हती. मी पहिला डाव गमावल्यानंतर दुसरा डाव जिंकला. हा दुसरा डावही जिंकणेही तसे सोपे नव्हतेच. पण मी तो जिंंकला. हम्पीने | Koneru Humpy | एकूण नऊ गुण मिळवल्याने ती टिंग्जी आणि तुर्कस्तानच्या एकेटरिना अटालिकच्या गुणांशी बरोबरी करू शकली.
हम्पीने | Koneru Humpy | पहिल्या पाच फेऱ्यांत 4.5 गुण मिळवून सुरुवात तर उत्तम केली, पण रशियाच्या इरिना बुलमागाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने ती पिछाडीवर पडली. आता तिला आव्हान टिकविण्याची गरज होती. अखेरच्या दोन फेऱ्या जिंकून तिने यशस्वी पुनरागमनही केले. पण तेवढेच पुरेसे नव्हते. त्यासाठी नशिबाचीही जोड हवी होती. कारण टिंग्जी आणि अटालिक या दोघींचे आव्हान मोठे होते. या दोघी पुढची फेरी हरल्या तरच हम्पीचा मार्ग सुकर होणार होता. गंमत म्हणजे तसंच झालं. दोघीही पुढची फेरी हरल्या.या नाट्यमय घडामोडी अजून संपलेल्या नव्हत्या. कारण हम्पी पहिला टायब्रेक डाव गमावून बसली होती. दुसऱ्या डावात ती आर्मगेडनमध्ये (निर्णायक डाव) जाऊन पोहोचली. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हम्पीने | Koneru Humpy | तिसऱ्या डावात बरोबरी साधली. या बरोबरीमुळे ती जगज्जेतेपदासाठी आता केवळ अर्धा गुण लांब होती. जिंकली तर जगज्जेती होणारच, पण बरोबरी साधली तरी जगज्जेतेपद मिळणारच. फक्त पराभवाचा धोका टाळणे आवश्यक होते. सुदैवाने तिने बरोबरी साधली आणि जलदगती बुद्धिबळ स्पर्धेची ती सम्राज्ञी बनली. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने | Viswanathan Anand | 2017 मध्ये हा किताब जिंकला होता. त्यानंतर हम्पीच्या | Koneru Humpy | रूपाने जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेतेपद मिळविणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली. .
आर्मगेडन (Armageddon) म्हणजे काय?
ख्रिश्चन बायबलच्या नवीन करारातील बुक ऑफ रिव्हीलेशन पुस्तकात आर्मगेडन हा शब्द वापरला आहे. आर्मगेडन म्हणजे लढाईच्या काळात सैन्याची जमवाजमव जेथे केली जाते ते स्थान. आर्मगेडन हा शब्द सर्वसाधारणपणे जगातील कोणत्याही परिस्थितीचा शेवट करण्यासाठी वापरला जातो. अर्थात, निर्णायक या अर्थाने आर्मगेडन हा शब्द वापरण्यात आला आहे. हिब्रू भाषेतील ‘हर मेगिडो’ | Har Megiddo | या शब्दावरून ‘आर्मेगेडन’ हा शब्द रूढ झाला आहे. उत्तर इस्राएलमध्ये मेगिडोचा डोंगर आहे. अर्थात, त्याला डोंगर म्हणण्याऐवजी टेकडीच म्हणता येईल. मारिस मार्गावर असलेल्या या टेकडीवर प्राचीन काळात किल्ले बांधण्यात आले होते. मारिस प्राचीन व्यापारी मार्ग आहे, जो सिरिया, अँटोलिया आणि मेसोपोटॅमिया साम्राज्याला जोडला गेलेला होता. हा मेगिडो अनेक प्राचीन लढायांसाठी वापरला जायचा. १५ व्या शतकातील लढायांचाही यात समावेश आहे. आधुनिक युगात हा मेगिडो किशोन नदीवरील किबुत्झजवळ वसलेला आहे. जुन्या करारात मेगिडो डोंगराचा उल्लेख १२ वेळा, प्राचीन मेगिडो शहराचा दहा वेळा , तर मेगिडो मैदानाचा दोनदा उल्लेख आहे.
हम्पीची लक्षणीय कामगिरी
1998 : 12 वर्षांखालील गटात गुंटूरमध्ये राष्ट्रीय रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद |
1998 : 15 वर्षांखालील गटात औरंगाबादमधील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक |
2000 : वयाच्या 14 व्या वर्षी अहमदाबादमधील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक |
2002 : वयाच्या 16 व्या वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग |
2006 : दोहा आशियाईत रॅपिड चेस स्पर्धेत सुवर्णपदक |
सर्वांत कमी वयात पुरुषांमध्ये ग्रँडमास्टरचा बहुमान मिळविणारी पहिली भारतीय महिला. यापूर्वी ही कामगिरी हंगेरीच्या जुडिट पोल्गारच्या नावावर होती. त्या वेळी तिचे वय होते 15 वर्ष 4 महिने 27 दिवस, तर कोनेरू हम्पीने ही कामगिरी वयाच्या 15 वर्ष 1 महिना 27 दिवसाची असतानाच साधली. हा विक्रम आजही हम्पीच्या नावावर आहे. |
पुरुष ग्रँडमास्टरचा बहुमान जिंकणारी हम्पी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू आहे. |
दोन वेळा ग्रँडमास्टरचा (महिला व पुरुष गटात) बहुमान मिळविणारीही ती पहिली भारतीय महिला आहे. |
जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळविणारीही हम्पी पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. |
जगातील सर्वोत्तम 50 महिलांमध्ये 16 वे स्थान मिळविणारीही ती पहिलीच भारतीय महिला आहे. |
जागतिक ज्युनिअर महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी हम्पी एकमेव भारतीय महिला आहे. |
बुद्धिबळात विश्वविजेतेपद मिळविणारीही ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. |
10, 12 व 14 वर्षांखालील गटातील जागतिक बुद्धिबळ स्पर्धा सलगपणे जिंकणारी कोनेरू हम्पी एकमेव भारतीय महिला |
ब्रिटिश महिला बुद्धिबळ स्पर्धा सर्वांत कमी वयात जिंकणारी एकमेव महिला. ब्रिटनच्या के 61 वर्षाच्या इतिहासातली ही पहिली घटना. |
कोनेरू हम्पीला 21 सप्टेंबर 2004 रोजी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. |
2007 मध्ये हम्पीला ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. |
Follow us : Facebook page Kheliyad
2 Comments