एक होती फिंदर्डी…!
मुलगा वाया गेला, व्यसनाधीन झाला, थोडक्यात म्हणजे तो चुकला तर त्याला सुधारण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात. अगदी एखाद्या मुलीलाही त्याच्या दावणीला बांधतात; पण बाई चुकली तर तिच्या घरचे आईवडीलही तिला पाहत नाहीत! हे भयावह वास्तव तिला भयंकर अस्वस्थ करतं. अनेक खस्ता खाल्ल्यानंतरही न खचता लढणाऱ्या एक सामान्य मुलीची कहाणी- एक होती फिंदर्डी.
‘‘अहो जोशीकाकू, ऐकलंत का? त्या शेजारच्या भेंडेकाकूंच्या सुनेला पुन्हा तिसरी फिंदर्डीच झाली…’’
एक सहावीची चुणचुणीत मुलगी शालेय वक्तृत्व स्पर्धेत भाषण देत होती आणि तिचे ते शब्द सुईसारखे मनाला टोचत होते… जान्हवीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तीच नाही, ते ऐकणारे पाहुणे, परीक्षक, विद्यार्थी सर्वच सद््गदित झाले होते, हेलावले होते… १९८५-८६ चा तो काळ असेल. तब्बल ३० वर्षांपूर्वींचा शालेय वक्तृत्व स्पर्धेचा तो आठवणींचा पट जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या वेळी पिंपळगाव हायस्कूलमध्ये स्पर्धेची ती पहिलीच फेरी होती. दुसरी फेरी भाऊसाहेबनगरला, तर तिसरी फेरी नाशिकला होती. स्पर्धेची फेरी कुठे होती हा चर्चेचा विषय नाही; पण हे सगळं जान्हवीला आजही जसंच्या तसं आठवतं. तिच्या भाषणाची ती सुरुवात, तिचा तो स्पर्धेचा विषयही आठवतोय तिला- ‘मी मुलगी जन्मा आले…’ या विषयावर काय सुंदर बोलली होती! अर्थातच त्या मुलीने पहिलं बक्षीस मिळवलं. ती कोण होती, आता कुठे असेल असे नाना प्रश्न आजही जान्हवीला पडले आहेत. तिला सांगायचंय, की बाई, तू फारच सुरेख बोलली होतीस… आता आयुष्य अशा वळणावर आहे, की तीस वर्षांनंतर आजही परिस्थिती बदललेली नाही. मुलीची व्यथा तीच आहे… वखवखलेल्या नजराही त्याच आहेत. फक्त पोशाख बदलले; पण इतरांच्या मनातली ‘फिंदर्डी’ या शब्दातला स्ट्रोकही तसाच आहे.
महिलादिनी यशोशिखरावर गेलेल्या महिलांचं कौतुकच आहे. जान्हवी मात्र असं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे, जे तुमच्या-आमच्या पॅरामीटरमध्ये बसणाऱ्या यशोशिखरावर नसेलही; पण तिच्या पॅरामीटरमध्ये ती नक्कीच यशोशिखरावर आहे. ती मोठी आहे कर्तृत्वाने, पण ते कर्तृत्व मोजण्यासाठी तिला एकदा तरी वाचायला हवं. कारण तिच्याकडे जिद्द आहे… चाळिशीतही ती समाधानी आहे. संघर्ष तर तिलाच काय कोणालाही चुकलेला नाही. पण अनपेक्ष भावनेने ती जगतेय. भाड्याचं घर आहे, पण म्हणून ती हक्काच्या घराचं स्वप्न कधीच पाहत नाही. खरं तर तिने स्वप्न फार पूर्वी पाहिली होती. आता तिला स्वप्न पडत नाहीत. तिला तिच्यासाठी फक्त आज आहे.
जान्हवी, प्रचंड हुशार आणि खोडकरही तितकीच. वडील टपाल खात्यात अधिकारी होते. दोन बहिणी, आईवडील असं ते टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब. मुली होत्या म्हणून वडिलांनी कधीही त्यांना कमी लेखलं नाही. जान्हवी घरात सर्वांत लहान. सोप्या भाषेत सांगायचे तर शेंडेफळ. वडिलांची बदली दर तीन वर्षांनी व्हायची आणि जान्हवीची शाळाही दर तीन वर्षांनी बदलत गेली. मात्र, जेथे जाईल तेथे तिने पहिला नंबर कधी सोडला नाही. पिंपळगाव कन्या विद्यालयात ती सहावीपर्यंतच होती. तिथल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. तिला मित्र-मैत्रिणी आठवतात… तिला अजूनही आठवतात, ते खेलुकर गुरूजी, गितेबाई, वैरागकर सर… तिचं कॉलेजजीवन तर फारच भन्नाट होतं. वडिलांच्या बदलीमुळे पिंपळगाव केव्हाच मागे पडलं होतं. आता ती मालेगावात आली. अकरावी-बारावी तेथेच काढली. हुशार होतीच आणि लोभसवाणीही होती; पण ती चारचौघींसारखी मुळमुळीत अजिबात नव्हती. बिंधास्त आणि अतिशय फटकळ स्वभावाची. तो कशामुळे आला कुणास ठावूक; पण त्यामुळे तिचं नाव घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. एकदा ती कॉलेजला जात असताना एकाने सायकलीवरून तिला कट मारला. म्हणजे अगदी जवळून सायकल नेली. त्या वेळी आजच्यासारख्या गाड्याघोड्या नव्हत्या. शायनिंग मारायला त्या वेळी सायकल हे एकमेव इकोफ्रेंडली साधन होतं. अचानक जवळून सायकल गेल्यावर जान्हवी तिथेच थबकली; पण घाबरली अजिबात नाही. तिने ‘शूक.. शूक..’ करत त्याला थांबवलं. तो चपापलाच. जान्हवी म्हणाली, ‘‘अरे बाबा, एवढ्या जवळून गेला, थोडा धक्काच मारून जायचं ना. तेवढंच तुला बरं वाटलं असतं!’’
जान्हवीच्या या अनपेक्षित शाब्दिक फटक्याने तो पुरता खजिल झाला. नंतर तो तिच्या जवळपासही कधी दिसलेला तिला तरी आठवत नाही. कुठून ही फिंदर्डी पाहिली, असं त्याला झालं असेल. तिचे रिप्लायच इतके भन्नाट असायचे, की त्यावर एक स्वतंत्र पुस्तक होईल.
जान्हवी कॉलेजला कधीही वेळेवर जात नव्हती. म्हणजे ‘मे आय कमिंग सर’ हे वाक्य उच्चारणारी बहुधा तीच शेवटची स्टुडंट. मालेगावच्या एमएसजी कॉलेजचं सायकल स्टँड त्या वेळी कॉलेजसमोरील बस स्टॉपशेजारी होतं. आता काय परिस्थिती आहे माहीत नाही; पण त्या वेळी म्हणजे सुमारे २२-२३ वर्षांपूर्वी होतं. त्या वेळी ती एसवाय बीएस्सीला असेल. तिने सायकल लावली नि कॉलेजात शिरतानाच तिचा मित्र तिच्या पुढ्यात येऊन उभा ठाकला.
तो म्हणाला, ‘‘जान्हवी, मला तुझ्याशी बोलायचंय.’’
जान्हवी म्हणाली, ‘‘मग बोल ना!’’ नाही म्हंटलं, तरी अशा अचानक भेटणाऱ्यांचे मनसुबे जान्हवी बरोबर हेरायची. म्हणूनच तिच्या मनात धडधड नाही की चलबिचल, असलं काही होत नव्हतं… अशी स्थिती विचारणाऱ्याची व्हायची.
तो म्हणाला, ‘‘मी तुझ्यात इंटरेस्टेड आहे.’’
जान्हवीने त्याला पायापासून न्याहाळलं नि म्हणाली, ‘‘मला ना कॉलेजला ऑलरेडी उशीर झालाय आणि तू जे सांगतोय ते मी माझ्या मैत्रिणींना शेअर करते. मग नंतर तुला सांगते. मला आता उशीर होतोय. चल बाय.’’
जान्हवी लेक्चरला बसली आणि लेक्चर सुरू असताना कसं सांगायचं? म्हणून तिने वहीमागे सगळं काही लिहिलं आणि ती मैत्रिणींकडे पास केली. ते वाचून त्या मैत्रिणींना हसू आवरेना. जान्हवीने थेट सरांना सांगितलं, की आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. आम्हाला बाहेर जाऊ द्या. हे सांगायला ती तशी बाणेदार फिंदर्डी होतीच. सरांनाही तिचा स्वभाव माहिती होता. त्यांनी त्यांना बाहेर जाण्यास परवानगी दिली. या मैत्रिणींनी थेट कँटीन गाठलं नि खूप वेळ दाबून ठेवलेल्या हास्याचा स्फोट झाला. त्या चौघीही नॉनस्टॉप हसत होत्या. अखेर कँटीन मालक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘‘बाहेर मुलंपण बसली आहेत. जरा हळू हसा..!’’
जान्हवीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच स्पष्ट होता. एक मुलगी म्हणून वावरणं चॅलेंजच असतं. ते टाळता येत नाही. जान्हवीने ते हसत हसत स्वीकारलं. एकदा पुढच्या बॅचच्या मुलाने तिला प्रपोज केले. कॉलेजच्याच आवारात कुठे तरी त्याने तिला विचारले, ‘‘जान्हवी, आय लव्ह यू!’’ एखादी मुलगी गांगरली असती, नाही तर काहीही न बोलता झपझप पावलं टाकून निघून तरी आली असती. जान्हवी तशी नव्हतीच मुळी. तो जाडसर मुलगा तिने आपादमस्तक न्याहाळला आणि म्हणाली, ‘‘हे बघ, तू जे म्हणतोय ते मलाही आवडेल; पण एक प्रॉब्लेम आहे. काय आहे, की एक तर मला तुझ्यासारखं जाड व्हावं लागेल किंवा तुला तरी माझ्यासारखं बारीक व्हावं लागेल. यापैकी काही तरी एक झालं की मग आपण विचार करू…’’
जान्हवी एक्सलंट रिप्लाय तर देतच होती, पण तशी ती सोशल विचारांचीही होती. तिला कोणी गुटखा खाल्लेलं अजिबात आवडायचं नाही. एकदा एक मुलगा गुटखा खाऊन पिचकारी मारत होता. जान्हवी त्याच्याजवळ गेली नि म्हणाली, ‘‘बाबा रे, तू झाला तेव्हा तुझ्या घरच्यांनी पेढे वाटले असतील रे. कशाला असलं खाऊन आयुष्य बरबाद करतोस?’’ असल्या भयंकर सल्ल्याने गुटखा सुटला की माहीत नाही; पण जान्हवीसमोर तरी गुटखा खाण्याची हिंमत केली नसेल!
जान्हवी एकदा बसमधून जात होती. त्याच बसमध्ये काही टवाळखोरही होते. ते मुलींची छेड काढत होते. बस स्टॉपवर थांबल्यानंतरही ते मुलं त्या मुलींना चिडवत होते. जान्हवी पाहत होती. ते टवाळखोर खाली उतरले त्याचक्षणी जान्हवीने एका मुलाच्या खाडकन ठेवून दिली. एरव्ही शाब्दिक फटके लगावणारी जान्हवी कानाखालीही आवाज काढायला मागेपुढे पाहत नव्हती.
जान्हवी हुशार होती, बिंधास्त होती, फटकळ होती. तिच्या या स्वभावाकडे पाहिले की वाटते, खरंच ही मुलगी आयुष्यात जोही निर्णय घेईल तो कोहिनूरपेक्षा मौल्यवान असेल… कारण घरचं वातावरण एकदम आध्यात्मिक, साधनशूचिता पाळणारं आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारंही. मात्र, तिच्या बिंधास्त स्वभावामुळे तिचे वडील कधी कधी म्हणायचे, ‘‘बाळा, कोणी आजारी पडलं किंवा काही आणायचं असेल तर तुलाच बाहेर जावं लागणार आहे. अशा वेळी तुला कोणी त्रास दिला तर..?’’ पण जान्हवीला त्याची तमा नव्हती.
घरातलं फुलासारखं जान्हवीचं बालपण लग्नानंतर मात्र कोमेजून गेलं.. गणितात प्रचंड हुशार असणाऱ्या जान्हवीचं आयुष्याचं गणित चुकत गेलं. दहावीतच ती प्रेमात पडली होती. अर्थात, ते उथळ नव्हतं. ज्याच्यावर प्रेम केलं तोच तिचा जीवनसाथी झाला आणि जान्हवीची खरी स्टोरी इथून सुरू झाली. भयंकर यातनामय जीवन सोसलं. ज्याच्यावर प्रेम केलं तो लग्नानंतर मद्याच्या आहारी गेलेला तिने पाहिला. पैशांची चणचण तर नित्याची. बरं हे सगळं सोसून उभं राहणंही शक्य होतं; पण नवऱ्याची संशयी वृत्ती असह्य झाली. प्रचंड मारझोड. त्याची उसनवारीही प्रचंड. फुलासारखी वाढलेली ही फिंदर्डी वैवाहिक आयुष्यात मात्र कोमेजली. तिने क्लासेसही सुरू केले होते. मात्र, जाच काही थांबत नव्हता. सगळं सोडून मुलीला घेऊन निघून जावं असंही तिला वाटलं. पण मुलांची आगावू फी घेतलेली होती. घेतलेली फी परत करणे शक्य नव्हतेच तिला. त्यांचं भविष्य तिच्याशीच निगडित होतं. म्हणूनही ती टोकाचा निर्णयही घेऊ शकत नव्हती. अखेर एक दिवस प्रचंड मारहाणीने विव्हळणाऱ्या जान्हवीला हे सगळं असह्य झालं. त्याच वेळी मुलगी गाडीवरून पडली. डोक्याला मोठी खोच पडली. हातात पैसे नाहीत. मारहाणीचे वळ असह्य होत होते आणि मुलगी जखमी. या भयंकर यातना सोसतनाही आत्महत्येचा विचार कधी तिच्या मनाला शिवला नाही. हा संपूर्ण प्रकार इथेच संपवायचा म्हणून ती निघून आली. पुण्यात नोकरी केली. मात्र, एकटी बाई म्हणजे माळावरची माती समजणाऱ्या या जगात जान्हवी खंबीरपणे लढत होती. अखेर पुणंही सोडलं आणि नाशिकला आली. कालांतराने नवऱ्याचाही अपघाती मृत्यू झाला. जान्हवी मात्र स्थितप्रज्ञ होती. तिने एकटेपणा त्याच्या मृत्यूच्याही आधी स्वीकारला होता. आता ती छान जगतेय. पण तिच्या मनात एक खंत कायम सलते, तिचं फुलासारखं बालपण तिच्या मुलीच्या वाट्याला कधी आलंच नाही!
मुलगा वाया गेला, व्यसनाधीन झाला, थोडक्यात म्हणजे तो चुकला तर त्याला सुधारण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतात. अगदी एखाद्या मुलीलाही त्याच्या दावणीला बांधतात; पण बाई चुकली तर तिच्या घरचे आईवडीलही तिला पाहत नाहीत! हे भयावह वास्तव तिला भयंकर अस्वस्थ करतं. जान्हवीच्या वाट्यालाही हेच आलं. मात्र, वडील शेवटपर्यंत तिच्यासोबत राहिले. ज्या वयात तिला त्यांची सेवा करायची गरज होती, तेथे ते तिला सांभाळत होते. आयुष्यातली एक चूक तिची सगळी स्वप्नं उद््ध्वस्त करून गेली.
तिला जेव्हा तिचं बालपण आठवतं, तेव्हा तिला शालेय वक्तृत्व स्पर्धेतील फिंदर्डी हा शब्द अजूनही अस्वस्थ करतो. फिंदर्डी या शब्दातला स्ट्रोक तेव्हाही टोकदार होता आणि आजही आहे. ही फिंदर्डी नेहमीच नकोशीच्या गटात जाऊन बसते. समाजात खोलवर रुजलेली ही मानसिकता इतकी वर्षे लोटल्यानंतरही तशीच आहे. नेमकं हेच तिला भयंकर अस्वस्थ करीत आलं आहे.
ती म्हणतेही, ‘‘माझ्या घरचं सगळं चांगलं होतं; पण एका ठिकाणी व्यवस्थितरीत्या माती खाल्ली… आता मला मागे वळून पाहायचं नाही. माझ्या मुलीला मी चांगले शिकवू शकते हेच माझ्यासाठी खूप आहे. ती डॉक्टर झाली, की मी सोशल वर्कमध्ये स्वतःला गढून घेणार आहे. ज्यांना आईबाबा नकोसे झाले त्यांची मला सेवा करायचीय. मी माझ्या आईवडिलांची सेवा करू शकले नाही. उलट ते माझ्या काळजीनेच या जगातून निघून गेले.’’
त्यांना श्रद्धांजली म्हणून अशा सोडून दिलेल्या आईबाबांसाठी आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या महिलांसाठी तिला काम करायचंय. त्यासाठी तिने संस्थाही रजिस्टर केली आहे. जान्हवीच्या प्रवासातले चटके खूपच तीव्र आहेत. विस्तारभयास्तव संपूर्ण पट मांडता येणार नाही; पण ती खचलेली अजिबात नाही. छान जगतेय. तिला फक्त प्रोत्साहन हवंय. प्रत्येक वेळी कशाला हवंय यशोशिखर? कधी तरी जमिनीवरच धावून पाहा. भलेही वेळेत पोहोचणार नाही; पण धावल्याचं समाधान तर मिळेल!
ही फिंदर्डी तुम्हाला कशी वाटली, आम्हाला जरूर कळवा…
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_hero_9 post_offset=”2″ include_category=”103″]