अध्यात्म आणि खेळ!
क्रीडादिन आणि शाहीस्नानाची पहिली पर्वणी दोन्ही एकाच दिवशी आल्याने अध्यात्म आणि खेळ या दोन्हींची अनोखी पर्वणी शनिवारी, २९ ऑगस्ट २०१५ रोजी नाशिककरांनी साधली. अध्यात्म आणि खेळ या दोन्ही संकल्पना विविध आखाड्यांतील साधूं- महंतांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या आहेत. काहींच्या मते खेळ साधना आहे, तर काहींनी खेळ तणावास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे…!
खेळात करिअर साधण्यासाठी अनेक खेळाडू शिक्षणातून एक्झिट घेतात. दिवसभर खेळात तल्लीन होतात.
खेळात यश मिळविण्याचा एकच ध्यास असतो. त्याला कोणी एक प्रकारची साधना म्हटली आहे, तर कोणी अध्यात्म. जे आत्म्याशी एकरूप होतं ते अध्यात्म.
लक्ष्याचा वेध घेण्यासाठी खेळाशी एकरूप होणेही अध्यात्मच असं काही साधू-महंतांना वाटतं, तर काही महंतांना खेळाला साधना म्हणणे अजिबात मान्य नाही.
खेळाचा साधनेशी नाही, तर साधनेतून खेळ असतो, असा एक प्रवाह आहे.
अध्यात्म आणि खेळ हे दोन्ही स्वतंत्र आहे. त्याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही असाही एक प्रवाह आहे.
एकूणच खेळ एक साधना आहे का, याचं उत्तर अनेक आखाड्यांच्या साधू-महंतांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे आहे.
काही महंतांच्या मते, खेळामुळे तणाव वाढतो. शांती मिळत नाही!
नेमकी काय आहे खेळ, साधना आणि अध्यात्म?
दिगंबर आखाड्याचे महंत गंगादास महाराजांना अध्यात्म आणि खेळाची तुलनाच मान्य नाही.
खेळात एकाग्रता असावी, पण म्हणून त्याला साधना म्हणता येणार नाही.
प्रणव कन्यासंघाच्या प्रमुख ब्रह्मचारिणीदेवी यांनी कल्की फाऊंडेशनच्या निवेदनादेवी दासाजी यांनी खेळाला साधना म्हटले आहे.
निवेदना दासाजी यांच्या मते, खेळातून शरीराला सजगता, चैतन्य मिळते. ती एक क्रीडासाधनाच आहे.
जेव्हा मी खेळत होते त्या वेळी हे मला माहीत नव्हते. आता मात्र जाणवते, की खेळ एक साधनाच आहे.
आपल्या मनात नेहमी एक द्वंद्व सुरू असतं. हे द्वंद्व आपली ऊर्जा कमी करीत असतं.
हे योग्य की अयोग्य या द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मन एकाग्र करणे आवश्यक आहे.
एकाग्रतेतूनच काही काळ आपलं मन शांत होतं आणि आपला मेंदू अल्फा स्टेटमध्ये जातो.
सर्वोत्तम खेळाडूंचा मेंदू खेळताना अनेकदा अल्फा स्टेटमध्ये जातो.
खेळातून जर हे साध्य होत असेल तर त्याला साधनाच म्हणायला हवं.
खेळही एक ध्यानधारणा आहे, असं निवेदना दासाजी यांचं ठाम मत आहे. मात्र, महंत फलाहारी महाराज, राजेश्वरानंद महाराज, रामबालकदास महात्यागी, महंत गंगादास यांना मात्र हे मान्य नाही.
मात्र, सर्वांच्या बोलण्यात एक साम्य होतं, ते म्हणजे खेळात निरपेक्षता हवी.
जेथे एकी, प्रेम, आनंद साधला जातो आणि जेथे फळाची अपेक्षा नसते तोच खरा खेळ.
त्यासाठीच खेळायला हवं. तसं नसेल तर खेळ एक तणाव आहे… अस्थिरता आहे!
मनापासून खेळणे साधनाच
‘‘कोणतेही कार्य ध्यान आहे. साधना आहे. खेळ मनापासून खेळला तर ती एक साधनाच होते.’’
हे उदगार आहेत प्रणव कन्या संघाच्या प्रमुख ब्रह्मचारिणीदेवी यांचे.
खेळ आणि अध्यात्म यांचे पैलू उलगडून सांगताना ब्रह्मचारिणीदेवी यांनी खेळ हीदेखील एक साधनाच मानली आहे.
आपल्या लहानपणच्या आठवणी उलगडून सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या कन्या संघातील मुलांना आम्ही खेळात सहभाग घेण्यास आवर्जून सांगतो. आरोग्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. मी जमशेदपूरमध्ये शिकले. त्या वेळी शालेय जीवनात मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडायचे. अगदी दहावीपर्यंत मी बॅडमिंटन खेळत होते; पण ती केवळ आवड होती; ध्येय नव्हतं!’’
टेबल टेनिस, बॉलबॅडमिंटन हे खेळ माहीत आहे. सध्या क्रिकेटची खूप क्रेझ आहे.
मला हा खेळ जागोजागी पाहायला मिळतो.
सुनील गावस्कर, कपिलदेव, सौरभ गांगुली आणि हो, सचिन तेंडुलकर या खेळाडूंची नावे डोळ्यांसमोर येतात, असे सांगताना ब्रह्मचारिणी म्हणाल्या, ‘‘जीवनात अप-डाऊन सुरूच असतात. हाही एक खेळच आहे. तुम्ही जे मनापासून करतात ती अखेर साधना होते. प्रत्येक कार्यात साधना आवश्यक आहे. तशी ती खेळासाठीही आहेच. मात्र, मनापासून एकाग्रपणे खेळाल तर तीही एक साधना होते. म्हणूनच अध्यात्म आणि खेळ वेगळे नाहीच.’’
खेळ अध्यात्म नाही!
‘‘खेळ आणि अध्यात्म वेगळे आहे. खेळाचा अध्यात्माशी मेळ नाही. कारण खेळ संस्कृतीमध्ये येतो; अध्यात्मात नाही. खेळात शरीर आहे, तर अध्यात्मात आत्मा.’’
पालघरच्या परमहंस आश्रमाचे श्री राजेश्वरानंद महाराज यांनी अध्यात्म आणि खेळातला फरक सांगत होते.
अध्यात्म आणि खेळ यांची फोड करताना राजेश्वरानंद म्हणाले, ‘‘अध्यात्म आणि खेळ दोन्ही वेगळे आहेत. आत्मा सर्वज्ञ, अविनाशी आहे. आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणे ही अध्यात्माची सुरुवात आहे. आत्म्याशी संबंधित अध्यात्म असते, तर शरीराशी संबंधित, समाजाशी संबंधित क्रीडासंस्कृती असते. खेळ जीवनाचा एक हिस्सा आहे. साधनेतून खेळ होऊ शकतो; पण खेळ साधना मुळीच नाही. साधनेचा संबंध आत्म्याशी आहे.’’
आखाड्यांविषयीही माहिती देताना ते म्हणाले, ‘‘साधू-संतांचे आखाडे नसतातच मुळी. आखाडे कुस्तीसाठी असतात. साधू-संतांसाठी नसतात. जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यथार्थ गीतेतून मिळतील.
खेळ योगाचाच एक भाग
‘‘योगा एक साधना आहे आणि खेळ योगाचाच एक भाग आहे. प्राचीन अध्यात्माच्या शिक्षणात खेळांचा आवर्जून समावेश केलेला आहे. जे लक्ष्य साधायचे आहे त्याच्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे साधना.’’
हे उदगार आहेत दिगंबर आखाड्याचे बालयोगेश्वर श्री रामबालकदास महात्यागी यांचे.
अध्यात्म आणि खेळ हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक असल्याचे सांगताना रामबालकदास महात्यागी म्हणाले, ‘‘अध्यात्मात मानसिक व्यायाम आहे. साधूच्या विद्याध्ययनात शास्त्रार्थ आहे. म्हणजे विविध ग्रंथांचे अध्ययन केले जाते आणि खेळातून शारीरिक तंदुरुस्ती साधली जाते. प्राचीन अध्यात्म शिक्षणात खेळाचा समावेश आहे. मात्र, आजचा खेळ बिघडलेला आहे. टीव्ही, नेट, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मुले व्यस्त आहेत. त्यांच्या बुद्धीला गंज चढत आहे. योगाशी खेळाचा संबंध आहे. त्यामुळे खेळ योगाशीच जोडलेला असावा. गावागावांत खेळ खेळले जावे हा आमचा आग्रह आहे. आम्हीही अनेक स्पर्धांचे आयोजन करतो. मात्र, ते खेळ खूपच वेगळे आहेत. बैलांशी झुंज, बैलांच्या शर्यती आम्ही आयोजित करतो.’’
आताच्या खेळांवर टीका करताना रामबालकदास महात्यागी म्हणाले, ‘‘आजचा खेळ बुद्धी थकविणारा, तणाव निर्माण करणारा आहे. माणसाला माणसापासून दूर नेणारा आहे. यापूर्वी खेळ आध्यात्मिक अंगाने तयार केले जात होते. प्रेम आणि आनंदाशी जोडलेले होते. आता तसे राहिले नाही. विदेशी खेळांऐवजी कबड्डी, कुस्तीसारख्या भारतीय खेळांना प्रोत्साहन द्यायला हवं.’’
खेळ आणि अध्यात्म दोन्ही वेगळे
‘‘खेळ शरीराशी संबंधित आहे; मानसिकतेशी नाही. त्यामुळे खेळ आणि अध्यात्माची तुलना होऊच शकत नाही.’’
दिगंबर आखाड्याचे महंत गंगादास सांगत होते.
ते म्हणाले, ‘‘खेळ सांघिक असतो, तर अध्यात्म एकाकी. अध्यात्म खेळाचा सहाय्यक अजिबात नाही. खेळात एकाग्रता आवश्यक असले तरी ती साधना नाही. खेळात समूह असतो. त्यामुळे त्यातून मिळणारं फळही सामूहिक असतं. अध्यात्म मात्र एकाकी असतं. त्यामुळे फळही एकालाच मिळणार. त्यामुळे खेळाची तुलना अध्यात्माशी अजिबात होऊ शकत नाही.’’
‘‘जोपर्यंत स्पर्धा आहे तोपर्यंत खेळ आहे. स्पर्धा संपली, की वर्चस्वाची लढाईही तेथेच संपते. अध्यात्मचे तसे नाही. ती निरंतर चालणारी क्रिया आहे. त्यामुळे खेळाचा संबंध अध्यात्माशी जोडता येणार नाही, तशी त्याची तुलनाही करता येणार नाही. साधना खेळातून होत नसतेच. साधना आत्म्याशी जोडलेली आहे. त्यामुळे खेळ शारीरिकतेशी जोडलेला आहे. अध्यात्माशी त्याचा संबंध येत नाही,’’ असेही महंत गंगादास महाराजांनी ठामपणे सांगितले.
खेळामुळे तणाव वाढतो!
‘‘खेळातून तणाव दूर होत नाही, उलट वाढतो. शांती मिळत नाही. कारण खेळातून पैसा कमावला जातो. जे खेळ लहानपणी खेळले तेच खरे खेळ.’’
अयोध्यातील फैजाबादच्या अखिल भारतीय दीनबंधूनगरचे महंत राजारामदास फलाहारी महाराज यांनीही अध्यात्माचा खेळाशी संबंध नाकारला.
महंत फलाहारी महाराज म्हणाले, ‘‘जीवनात द्विधा मनःस्थिती तीन कारणांनी होते. एक म्हणजे करणी, जी केली जाते, दुसरे म्हणजे कर्मगती, जी पूर्वी केलेली असते आणि तिसरे म्हणजे पूर्वजांची देण. द्विधा मनःस्थिती टाळण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी खेळ अजिबात सहाय्यभूत नाही. त्यामुळे तणाव वाढतो. शांती मिळत नाही. लहानपणी जे खेळ खेळले जातात तेच खरे खेळ. कारण त्यात कोणतीही आसक्ती नसते. कुणावर विजयाची लालसा नसते. पैसा, बक्षिसाची अपेक्षा नसते. असे निरपेक्ष खेळच खरे खेळ. आताचे खेळ टेन्शन दूर करणार नाही. कारण यात पैसा, नाव कमावण्याची लालसा असते.’’
मातापित्याची सेवा हाच खरा खेळ असल्याचे स्पष्ट करताना फलाहारी महाराज म्हणाले, ‘‘पहाटे चार वाजता उठून माता-पित्याचे ध्यान करणे, त्यांचा आदर करणे, आज्ञेचे पालन करणे हा सर्वांत मोठा खेळ आणि भक्ती आहे. यातून सर्व काही प्राप्त होतं.’’ गुरूचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, की गुरू खेळातला असो, चोरी करणाऱ्यांचा असो वा अध्यात्मातला, सर्व समान आहेत. त्यात कोणताही भेद नाही!
क्रीडाविश्व हादरले… चार महिन्यांत तीन नेमबाजांच्या आत्महत्या