लंगडीलाही आंतरराष्ट्रीय स्वप्ने!
पूर्वी मोजकेच खेळ होते; पण खऱ्या अर्थाने बालपण समृद्ध करून गेले. आज खेळांनी एवढी गर्दी केलीय, की रोज कोणता नवा खेळ येईल याचा नेम राहिला नाही. अर्थात, या खेळांमध्ये विदेशी खेळांचाच भरणा अधिक होता. आता हे चित्र बदलतंय. भारतातल्या पारंपरिक खेळांचीही यात भर पडत आहे. आट्यापाट्या, लगोरीनंतर लंगडीनेही स्पर्धात्मक खेळांमध्ये शिरकाव केला आहे. अजून गोट्या, लपाछपी, शिवापाणी, काचकवड्या, सूरपारंब्या, गज रवारवी (मातीत गज खुपसणे) असे बरेच खेळ रांगेत आहेत. तेही येतीलच यथावकाश. मात्र, सध्या लंगडीबाबत काहीसं औत्सुक्य आहे. लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार रक्षा खडसे यांची निवड होणे आणि निवडीनंतर या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा करणे या दोन्ही बाबी किमान खान्देशासाठी तरी कुतूहलाच्या आहेत.
विदेशी खेळांपेक्षा बरे
चाळिशीतल्या पिढीचं बालपण पारंपरिक खेळांनीच समृद्ध केलं. मातीत खेळलास तर बघ, असा पालकांचा काळजीयुक्त इशाराही कानी पडायचा. आता याउलट परिस्थिती आहे. मुलांना मातीत खेळण्यासाठी आग्रह धरावा लागतो. टीव्ही, मोबाइलच्या विश्वातून मुले बाहेर पडेनाशी झाली आहेत. दहावी-बारावीत २५ क्रीडागुणांपुरता खेळाचा आधार घेतला जातो. विदेशी खेळांनी तर ते खूपच सोपे केले आहे. त्यामुळे अशा विदेशी खेळांपेक्षा भारतीय पारंपरिक खेळ बरे.
क्रीडागुण सवलतीची मागणी
गेल्या वर्षी २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात या खेळाचा समावेश झाला आहे. मराठवाडा आणि सोलापूर विद्यापीठांमध्येही या खेळाच्या समावेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात शालेय स्पर्धेतही या खेळाने प्रायोगिक तत्त्वावर समावेश केला आहे. मात्र, क्रीडागुणांची सवलत नाही. ती मिळावी, तसेच या खेळाला नोकरीतही आरक्षण मिळावे यासाठी खासदार खडसे यांचे नेतृत्व कारणी लागण्याची अपेक्षा संघटनेला आहे. लंगडीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एमओएमध्ये पारंपरिक खेळाला समाविष्ट करण्याची तरतूद आहे. मग भलेही इंडियन ऑलिम्पिक संघटनेची मान्यत नसेल…! यंदा गुजरात राज्यातील शालेय स्पर्धांमध्ये हा खेळ समाविष्ट झाला आहे.
नाशिकमध्ये दुसरी शालेय स्पर्धा
पहिली राज्यस्तरीय शालेय स्पर्धा गेल्या वर्षी कल्याणमध्ये झाली, तर यंदा १९ वर्षांखालील वयोगटातील दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, गुजरातमधील शालेय स्पर्धा, आशियाई स्पर्धेचे आयोजन हा लंगडी खेळाचा एकूणच प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे आता लंगडी खेळाचाही वर्ल्डकप घेण्याचे नियोजन सुरू आहे. २०१८ किंवा २०२० मध्ये घेऊ, असा विश्वास लंगडी संघटनेला आहे. तत्पूर्वी या खेळाला अन्य देशांमध्ये प्रचार आणि प्रसाराचे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
लंगडी हा खेळ सर्व खेळांचा पाया आहे. कारण पायाचे स्नायू बळकट असेल तर कोणतेही खेळ सहजपणे खेळता येतात. शालेय खेळात हा खेळ समाविष्ट असला तरी क्रीडागुणांची सवलत, नोकरीत आरक्षण नाही. ते मिळावे, तसेच एमओएची मान्यता मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
– चेतन पागवाड, सचिव, महाराष्ट्र लंगडी संघटना
(Maharashtra Times : 7 Sep. 2015)
Khup Chhan Mahesh…!!!!