क्रीडा क्षेत्रातली ‘तिची’ घुसमट थांबणार कधी?
क्रीडा क्षेत्रातली ‘तिची’ घुसमट थांबेल कधी?
उत्तर महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. नाशिकला धावपटूंचं शहर अशी ओळख निर्माण करून देणाऱ्या महिलाच आहेत, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके मिळवून देणाऱ्यांमध्ये महिला खेळाडूंचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र, त्यांचा आदर्श घेऊन महिला खेळाडूंची संख्या वाढल्याचे चित्र नाही. यामागची काय कारणे आहेत, याचा घेतलेला वेध…
(Published in Maharashtra Times : 8 March 2015)
बुद्धिबळातल्या पोल्गार भगिनींनी पुरुषी वर्चस्वाला शह देत जागतिक पातळीवर लौकिक मिळवला. मात्र, त्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. या पोल्गार भगिनींमध्ये सुसान महिलांमध्ये क्रांतिकारक खेळाडू ठरली. ऐन तारुण्यात तिला परदेशात स्पर्धेसाठी जाण्याची संधी मिळाली.
त्या वेळी ती युक्रेनची नागरिक होती. (आता ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे) तिच्या वडिलांनी संघटनेला सुचवले, की माझ्या मुलीसोबत मला किंवा तिच्या आईला सोबत जाण्याची परवानगी मिळावी. त्या वेळी परदेशातही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना होतीच आणि आताही आहे!
संघटनेने ही परवानगी नाकारली आणि सुसानला या स्पर्धेपासून वंचित राहावे लागले. पुरुषांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत पात्र ठरलेली असतानाही केवळ महिला असल्याने सुसानला खेळण्याची संधी नाकारली.
नंतर फिडेने पुरुष-महिला खेळाडूंना समान संधी दिल्यानंतर सुसानने पुरुष गटातूनच ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला. जगाच्या पाठीवर ही एकमेव सुसान नाही, जिला पुरुषी वर्चस्वाचे चटके सोसावे लागलेले नाहीत. मात्र, त्यावर मात करीत अनेक सुसान आता पुरुषी वर्चस्वाला टक्कर देत आहेत. प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी ब्रिटनचा टेनिस खेळाडू अँडी मरे याने फ्रान्सची एमिली मॉरिस्मो हिला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले त्या वेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या. भारतात अशा संधी महिलांच्या वाट्यालाही येऊ शकतात. मात्र, मानसिकता बदलण्याची गरज आहे. खूप लांब कशाला जायचे, नाशिक, जळगावमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतक्या महिला प्रशिक्षक आहेत.
विशेष म्हणजे नाशिकला धावपटूंचं शहर म्हणून नवी ओळख निर्माण करून देणाऱ्याही महिलाच आहेत. असे असले तरी कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत किती महिला खेळाडू पुढे आल्या? केवळ अॅथलेटिक्समध्येच नाही, तर अन्य खेळांकडेही किती महिला वळाल्या?
बुद्धिबळात जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारी भाग्यश्री पाटील, वेटलिफ्टिंगमध्ये दीपाली नारखेडे, अपंग गटात पॅरालिम्पिक स्पर्धेत झळकलेली कांचन चौधरी यांच्यानंतर महिलांची नावे पुढे आली नाहीत. ही स्थिती सगळीकडे सारखीच आहे. याबाबत महिला प्रशिक्षकांशी संवाद साधला असता, असुरक्षिततेची भावना हे प्रमुख कारण समोर आले आहे.
स्पर्धेसाठी आठ दिवस बाहेर जायचं असलं तरी मुलींना घरातून परवानगी मिळत नाही. तिला खेळायचंय, इतर मुलांसारखं जिंकायचंय, पण घरातून सपोर्ट मिळत नाही. हे असुरक्षिततेचं वातावरण दूर करण्याची जबाबदारी आता महिलांवरच आहे.
केवळ खेळाडू म्हणून लौकिक मिळवला तरी आता प्रशिक्षक म्हणूनही या खेळाची जबाबदारी घ्यायला हवी, असं अनेक महिला प्रशिक्षकांना वाटतं. जळगावच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व्हॉलिबॉल प्रशिक्षक अंजली पाटील रेल्वेत नोकरी करतात. मात्र, त्यानंतरही त्या मैदानावर प्रशिक्षण देत असतात.
त्यांनी सांगितले, की मी आठ-दहा वर्षांपासून अनेक खेळाडू घडविले. मात्र, महिला प्रशिक्षक म्हणून एकही खेळाडू मैदानावर आज तरी दिसत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. घरातूनच सपोर्ट नसेल तर महिला पुढे येऊच शकत नाही. नाशिकमधील आर्चरीच्या प्रशिक्षक मंगला शिंदे यांनीही हेच सांगितले. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी महिला क्रीडा प्रशिक्षकांची संख्या वाढण्याची गरज आहे, असे त्यांना वाटते.
प्रशिक्षक महिला असो वा पुरुष, क्रीडा क्षेत्रात महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावीच लागेल. हे काम केवळ महिलेचे नाही. सध्या पुरुष प्रशिक्षक मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यांनीच पालकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा.
जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत क्रीडा क्षेत्रातली महिलांची घुसमट थांबणार नाही, असं अंजली पाटील यांना वाटतं. स्केटिंगमध्ये महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक असलेल्या नाशिकच्या सविता बुलंगे यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास असण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
माझे पती महाराष्ट्र स्केटिंग संघटनेवर सेक्रेटरी आहेत. कदाचित त्यामुळे मी स्वतःला सुरक्षित समजत असेनही. पण ज्या वेळी संघ घेऊन जायचा असेल, अनेकांशी संवाद साधायचा असेल त्या वेळी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागेल. म्हणूनच महिलांनी निश्चयी व्हायला हवं, असं बुलंगे यांना वाटतं.
महिला खेळाडूंची संख्या वाढण्यासाठी प्रशिक्षक म्हणून महिलांनी पुढे यायला हवे हे एकमेव उत्तर नाही तर पुरुषी मानसिकताच बदलण्याची गरज आहे, असंच महिला प्रशिक्षकांना सांगायचं आहे.
भारताची पी.टी. उषा हिने खेळाडू म्हणून लौकिक मिळवल्यानंतरही प्रशिक्षक म्हणूनही मैदानावर पाय रोवून उभी आहे. कविता राऊतनेही स्पोर्ट अॅकॅडमी उघण्याचा मानस व्यक्त केला आहे.
फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्मयोग्यासारखं झिजण्याची अपेक्षा मुळीच नाही. मात्र, करिअर म्हणूनही प्रशिक्षकाच्या भूमिकेत महिलांनी उतरायला हवं. कदाचित तुमच्यापैकी कोणी तरी एमिली मॉरिस्मो असेल, जिच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम खेळाडूची जडणघडण होऊ शकेल. तुमच्यात कदाचित सुसानही लपलेली असेल, जी महिलांना सुरक्षितता प्रदान करू शकेल…!!!
खेळाडू, प्रशिक्षकांना संधी हवी
उत्तर महाराष्ट्रात अनेक कॉलेजांमध्ये स्पोर्ट डायरेक्टर म्हणून महिलांची संख्या नगण्य आहे. नाशिकमध्ये सीनिअर कॉलेजांमध्ये पुरुषांमागे बोटावर मोजण्याइतक्या महिला स्पोर्ट डायरेक्टर आहेत, अनेक हायस्कूलमध्ये महिला क्रीडाशिक्षकांची संख्या कमी आहे.
मराठा हायस्कूलमध्ये तर एकही महिला क्रीडाशिक्षक नाही. जळगावातील अनेक हायस्कूलमध्ये महिला क्रीडाशिक्षकांना तर वर्षानुवर्षे संधीच मिळालेली नाही. ज्या क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या क्रीडा विकासाच्या प्रस्तावांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. विद्यापीठ किंवा शासनाने फिजिकल डायरेक्टरची नियुक्ती करायला हवी. जिथे क्लब आहेत तिथे महिला प्रशिक्षक असायलाच हवा.
[jnews_block_8 first_title=”Read more at :” include_category=”80″]
मुलींना अभ्यासासाठी बाहेर सोडतील, पण पण स्पोर्टसाठी नाही. त्यामागे असुरक्षिततेची भावना हेच महत्त्वाचं कारण आहे. पुरुष असो वा महिला प्रशिक्षक, ही भावना दूर झालेली नाही. अॅडव्हान्स जनरेशनमध्येही ही परिस्थिती बदललेली नाही. करिअर म्हणून स्पोर्टकडे कोणी पाहत नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवरच स्पर्धात्मक वातावरण वाढवले तर महिला खेळाडूंना संधी मिळू शकेल.– अंजली पाटील, व्हॉलिबॉल प्रशिक्षक, जळगाव
स्पर्धेसाठी महिला खेळाडूला बाहेर पाठविण्याबाबत पालक नाखूश असतात. दुसरे म्हणजे ज्यांना जॉब करायचा नाही त्या मुली स्पोर्टकडे लक्ष देत नाहीत. महिला खेळाडू लग्नानंतर जॉब सांभाळून कोचिंगसाठी वेळ देऊ शकत नाहीत आणि केवळ घरच सांभाळायचे असेल तरीही महिला वेळ देऊ शकत नाहीत.महिला क्रीडाशिक्षक वाढल्यास पालकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. जिथे जिथे क्लब आहेत, तेथे महिला कोच ठेवलेच पाहिजे.
– मंगला शिंदे, आर्चरी प्रशिक्षक, नाशिक
मुळात महिलांनी दृढनिश्चयी असावे. सामान्यपणे महिलांना भीती अशी असते, की आपण प्रशिक्षक म्हणून आलो तर लोकं आपल्याशी बोलतील. मग मी त्यांच्याशी कसं डील करायचं? महिला पुढे न येण्यामागे घरच्यांचा सपोर्ट नसणे हे एक कारण आहे. असुरक्षिततेची भावना हेही त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. मात्र, दृढनिश्चयातून महिला यावर मात करू शकते.
– सविता बुलंगे, स्केटिंग प्रशिक्षक, नाशिक