‘हिजार्बी’ निरागस हवी
निर्जीव बाहुलीशी लहानग्या मुलीचं कधी काळी घट्ट नातं होतं. आता मोठ्यांचं आहे! म्हणजे चिमुरडीसाठी बार्बी डॉल घेऊन यायची आणि शोकेसमध्ये ठेवायची! असो… पण या बाहुल्यांना धर्म नव्हता. तो तिच्याशी खेळणाऱ्या मुलीकडेही कधीही नसेल आणि नसणार. कशीही असो, ती त्या चिमुरडीची छकुलीच असते. अगदी त्या बाहुलीच्या हाताची बोटे खरवडलेली असली तरीही! तुम्ही चिमुरडीला कधी तरी विचारा, की दिसायला कोणासारखी आहे? तर ती एकच उत्तर देईल…. परीसारखी! ती चिमुरडी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही, की माझी बाहुली ख्रिश्चन दिसावी, मुस्लिम दिसावी, हिंदू दिसावी…. वगैरे वगैरे… निरागस मनांना धर्म नसतो. असतो तो निखळ आनंद, ज्याची तुलना तुम्ही कशाशीही करू शकणार नाही.
असो… सांगायचा मुद्दा हा, की बार्बीने तब्बल ५७ वर्षांनंतर आपलं रूपडं बदललं असलं तरी ती नायजेरियाच्या हनीफा आदम नावाच्या बाईंना ‘आपलीशी’ वाटत नव्हती. म्हणूनच त्यांनी बार्बीला हिजाबी बार्बी तयार करण्याचं ठरवलंय. हिजाबी म्हणजे बुरखा घातलेली… हिजाबी लूकमधल्या बार्बीला नावही दिलंय ‘हिजार्बी!’ ही बाहुली सुरुवातीला अमेरिकेत उपलब्ध होईल आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये मार्चच्या सुमारास येईल… असो.. हनीफाबाईंना शुभेच्छा. पण त्यांनी या ‘हिजार्बी’मागची वेगळीच भावना बोलून दाखवली. म्हणे, या बाहुलीमुळे मुस्लिम समाजातील मुलींमध्ये आत्मविश्वासाची जाणीव रुजेल…! पण ही भावना नेमकी कशी रुजेल ते काही कळलं नाही.
आता तुम्हाला आठवतंच असेल, की पाच वर्षांपूर्वी बॉलीवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कतरिना कैफला असंच काहीसं बार्बीचं रूप दिलं होतं. मेटल टॉइज कंपनीने ही कतरिना बार्बी तयार केली होती. ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर कतरिनाला बार्बीच्या रूपाचं ‘ऐश्वर्य’ लाभलं हा मुद्दा इथे गौण आहे. आता कतरिनाबाईंना बार्बीचं रूप मिळाल्यानंतर तिचा आत्मविश्वास किती तरी पटीने वाढायला हवा! हिंदी सिनेमात काम करते म्हणून हिंदी बोलण्याचा आत्मविश्वास किंवा नाही काही तरी किमान थोडा फार अभिनयाचा आत्मविश्वास तरी…
बार्बी डॉल आपलीशी नक्कीच वाटायला हवी. मात्र, ठराविक धर्मातील मुलींनाच ती आवडावी म्हणून तुचं रूपडं बदलणं आणि त्यातून आत्मविश्वास वाढणं वगैरे वगैरे काही पटलेलं नाही. हनीफाबाई, तुमची ‘हिजार्बी’ सर्वांनाच आवडेल. कारण माहितीय, ती निरागस असेल! तिचा ‘लूक’ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे विशिष्ट धर्मातील चिमुरड्यांनाच नाही, तर इतर धर्मातील चिमुरड्यांनाही ‘आपलासा’ वाटेल. कारण पेहरावापेक्षाही त्या निरागस मनाचं नातं अधिक घट्ट असतं… तिथे धर्म कधीही आडवा येत नाही.
[jnews_hero_9 post_offset=”2″ include_category=”106″]