सलाम विश्वविक्रमी सलामीला
Deepti-Sharma-Poonam-Raut-smash-world-record |
Deepti Sharma, Poonam Raut Smash World Record |क्रिकेट भारतीयांचा सर्वाधिक आवडीचा खेळ असला तरी आवडते ते पुरुषांचे क्रिकेटच! एरवी कुणालाही पुरुष क्रिकेटपटूंची नावे विचारली तर धडाधड पाच-सात नावे तरी न अडखळता सांगितली जातील. महिला क्रिकेटपटूंची विचारली तर? अशा या परिस्थितीत पूनम राऊत व दीप्ती शर्मा यांनी विश्वविक्रम केला आहे. पुरुषांनाही अद्याप करता आलेला नाही असाच!
Deepti Sharma, Poonam Raut Smash World Record | भारतीय महिला क्रिकेटला पुरुषी क्रिकेटची श्रीमंती कधी लाभली नाही. याच महिला संघाने पोचेस्ट्रूमवर असा ‘साक्षी’ पराक्रम केला, की जो आजपर्यंत पुरुषांच्या संघाला अद्याप करता आलेला नाही. पूनम राऊत | Poonam Raut | व दीप्ती शर्मा | Deepti Sharm | या सलामीच्या जोडीने त्रिशतकी भागीदारीचा हा विक्रम करून दाखवला. या विश्वविक्रमासह भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी स्पर्धेचा विजेताही ठरला.
एक काळ होता, की पुरुषांचा भारतीय संघ फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचा, तर महिला संघ सी ग्रीनमध्ये वास्तव्य करायचा. पुरुषांचा संघ सरावासाठी निघाला, तरी तो पॉश कारमध्ये राजेशाही थाटात मैदानापर्यंत पोहोचायचा. दुसरीकडे महिला संघ मैदानापर्यंत पायी जाताना अनेकांनी पाहिला आहे. ही अनास्था आजची नाही. महिला संघ हे सगळे सोसत आला आहे. या अनास्थेवर भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांनी अनेकदा टीका केली आहे. पण चित्र बदलले का? ही अनास्था बदलेल किंवा नाही माहीत नाही. पण, भारतीय महिलांनी पोचेस्ट्रूमवर विश्वविक्रम नोंदवून महिला क्रिकेट संघाकडे लक्ष वेधले आहे. साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे.
एरवी कुणालाही पुरुष क्रिकेटपटूंची नावे विचारली तर धडाधड पाचसात नावे तरी न अडखळता सांगितली जातील. महिला क्रिकेटपटूंची विचारली तर? कदाचित मीताली राज, झूलन गोस्वामीपर्यंत येऊन थांबतील. त्यापुढे ‘माहीत नाही’ असेच उत्तर मिळेल. ‘आठवत नाही’ असे म्हटले असते तर तो भारतीय महिला क्रिकेटला तेवढाच दिलासा मिळाला असता; पण तसे अजिबात नाही. कदाचित आता या ‘सामान्य’ज्ञानात दोन नावांची भर नक्कीच पडली असेल, ती म्हणजे पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा यांच्या कर्तृत्ववान कामगिरीची.
पोचेस्ट्रूमच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध त्यांनी केलेल्या या विश्वविक्रमी भागीदारीला तोड नाही. पोचेस्ट्रूमची मुई नदीही नक्कीच आनंदाने खळाळली असेल. कारण त्या भूमीत तीच एकमेव आहे जिला कुठल्याही भेदाचे वावडे नाही. ना काळे-गोरे, ना स्त्री-पुरुष!
आयर्लंडविरुद्ध जिंकणे भारतीय महिलांच्या दृष्टीने अजिबात विशेष नाही; पण ज्या पद्धतीने त्या जिंकल्या ते खूप महत्त्वाचे आहे. भारताने आयर्लंडविरुद्ध ५० षटकांत ३७८ धावांचा डोंगर रचला. यातील ३२० धावा दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांच्या विश्वविक्रमी भागीदारीतल्या आहेत. ही त्रिशतकी सलामीची | Tripple Centuri | भागीदारी २७३ चेंडूंतली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाने आयर्लंडचा २४९ धावांनी धुव्वा उडवला. या विक्रमी भागीदारीने त्यांनी इंग्लंडच्या सारा टेलर आणि कॅरोलिन एटकिन्सन (२६८) यांचा विक्रम मोडीत काढला. शिवाय त्यांनी उपुल थरंगा आणि सनथ जयसूर्या या श्रीलंकन जोडगोळीचा २००६मधील २८६ धावांच्या भागीदारीचाही विक्रम मोडीत काढला. मुळात पुरुषांच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलामीला त्रिशतकी भागीदारीच झालेली नाही! त्यामुळेच पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा यांच्या खेळीचे महत्त्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित होते.
पुनरागमनी पूनम
२०१६ हे वर्ष पूनमसाठी भयंकर कठीण ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिला अपयश आले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेतून तिला वगळण्यात आले. हे अपयश पचवत नाही तोच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही तिला संघातून वगळण्यात आले. देशासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न असे एकापाठोपाठ एक धक्क्याने धूसर होत चालले होते. तरीही पूनम खचली नाही. घरच्या मैदानावर खेळताना आंतरराज्य स्पर्धेमध्ये तिने चार सामन्यांत एकूण १२३ धावा केल्या. त्यातील दिल्लीविरुद्ध तिची नाबाद १०२ धावांची खेळी संस्मरणीय ठरली. अर्थात, त्यावरून तिची क्षमता मोजली गेली नाही आणि पूनमला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन-डे आणि टी-२० मालिकेतून पुन्हा वगळण्यात आलं. आता मात्र तिच्या डोक्यावर आकाशाचे काळे ढग दाटून आल्यासारखे वाटले. वयाच्या २६व्या वर्षी, ऐन उमेदीच्या काळात तिला धीर देणारा एक हात तिच्या पाठीशी होता, तो म्हणजे वडील गणेश राऊत | Ganesh Raut | यांचा. ‘तू संघात पुनरागमन करशील. तुझ्यात मोठी खेळी करण्याची क्षमता आहे’, वडिलांच्या या शब्दांनी तिला धीर दिला आणि ती पुन्हा फिनिक्स भरारीसाठी सज्ज झाली. तिने कसून सराव केला. फलंदाजीतले वेगवेगळे पैलू आत्मसात केले आणि पूनमचे फलंदाजीतले धावांचे आकडे सेकंद काट्यासारखे पुढे पुढे सरकू लागले. घरेलू क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळताना सात सामन्यांत तिने ६८.५०च्या सरासरीने १२१.२चा स्ट्राइक रनरेट देत २७३ धावा रचल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. रेल्वेने पूनमच्या याच खेळीच्या जोरावर पुन्हा विजेतेपद उंचावले. असे असले तरी फेब्रुवारीत झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत तिची भारतीय संघाकडून खेळण्याची संधी हुकली. मात्र, मार्चमध्ये आंतरविभागीय स्पर्धेत तिचा यशाचा आलेख आणखी उंचावला. टी-२०च्या चार सामन्यांत तर तिने दोन शतके ठोकली. नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला तर ती रौद्र रूप धारण करते. पूनमचेही तसेच होते. आता मेमधील दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी मालिकेतून तिने पुनरागमन केले. जणू डोळे दपिून जावीत अशा पूनम चंद्रप्रकाशासारखं शुभ्र शीतल.
दीप्ती शर्मा | Deepti Sharma | : महिला क्रिकेटची आधारस्तंभ
त्या वेळी मुलगी क्रिकेट | Cricket | खेळते, तिला शोभते का, अशी खोचक वाक्ये शर्मा कुटुंबाच्या कानी पडत होते. अर्थात, आईवडील सुशिक्षित होते. त्यामुळे त्यांनी लोक काय म्हणतात, याकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यांचे म्हणणे होते, की मुलगी देवीचे वरदान असते. दीप्तीची आई प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका, तर वडील रेल्वेतील निवृत्त क्लार्क. दीप्तीचा भाऊ बाला राज्यस्तरीय क्रिकेटपटू. तो सरावासाठी जायचा तेव्हा दीप्ती त्याच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागली. त्या वेळी ती अवघी नऊ वर्षांची होती. बालाने दीप्तीला अखेर सोबत घेतले. त्याच वेळी वरिष्ठ महिला क्रिकेटपटू हेमलता कालरा मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी तेथे आली होती. दीप्तीही त्यात सहभागी झाली. त्या वेळी तिने चेंडू फेकला तो थेट स्टम्पवर. हेमलता चकित झाली. ती म्हणाली, पुन्हा फेक. तिने पुन्हा फेकला. पुन्हा स्टम्पवर आदळला. त्या वेळी हेमलता म्हणाली, ही नक्कीच अव्वल क्रिकेटपटू होईल. ही भविष्यवाणी आज खरी ठरली. दीप्ती आता भारतीय महिला क्रिकेटची आधारस्तंभच झाली आहे.
पूनम आणि दीप्तीच्या यशामागे प्रोत्साहन आहे ते आईवडिलांचे. आजही मुलींना तेच हवे आहे. त्यांना त्यांचे स्वतःचे आकाश हवेय. त्यांच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. मग बघा, त्यांच्या यशाचा चंद्र असाच अंधार भेदत राहील…