गावकुसातही स्केटिंग
कोणताही खेळ असो, त्याचे प्रशिक्षण शहरात, स्पर्धाही शहरात. खेळ शहरात आणि संघटनाही शहरात. हे कमी की काय, ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी शासनाने जे पंचायत क्रीडा व खेल अभियान (पायका) सुरू केले. त्यालाही ‘शहरी टच’ मिळावा यापेक्षा ग्रामीण खेळाडूंची शोकांतिका दुसरी नाही. मैदानी खेळातली हुकूमत खेड्यात असली तरी इतर खेळांमध्येही कौशल्य सिद्ध करण्यात ग्रामीण भागातील खेळाडू मागे नाहीत हे समजून घेण्याची मानसिकता रुजायला अजूनही तयार नाही. मात्र, हे चित्र जळगाव जिल्ह्यात हळूहळू बदलत आहे. हे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेने स्पष्ट केले आहे. गावकुसातही स्केटिंग रुळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
स्केटिंग तसा महागडा खेळ, जो शहरातच अधिक रूळला आहे. जेथे हा खेळ खेळला जातो त्याची स्केटिंग रिंक बनवण्यासाठीच 15 लाखांपर्यंत खर्च येतो. स्केटही 300 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. या महागड्या खेळावर हव्या तेवढय़ा सुविधा पुरवण्यासाठी तालुक्याची गावे सक्षम आहेत. मात्र, तेथे जाऊन प्रशिक्षण देण्याची रिस्क घ्यायला शहरी मन तयार होत नाही. मात्र, स्पीड स्केटिंग संघटनेचे सचिव संजय पाटील यांनी ही रिस्क घेतली आणि ग्रामीण भागातली पावले सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यांवरही धावू लागली. हा बदल एकदम झाला नाही, तर त्यासाठी तब्बल पाच वर्षे दीर्घ वाट पाहावी लागली. चोपड्यातील स्पर्धेने तालुक्याच्या जवळपासची 8-10 गावे स्केटिंगशी जोडली गेली आहेत. गावकुसातही स्केटिंग हीच सुरुवात म्हणावी लागेल.
संजय पाटील स्वत: आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी बास्केटबॉल, बुद्धिबळ खेळायचो. दोन्ही खेळांमध्ये मला विशेष रुची आहे; पण स्केटिंग हा खेळही मला अधिक भावला. मी या खेळातही कौशल्य सिद्ध केले. जळगावात हा खेळ जितक्या झपाट्याने रुजला तितका तो ग्रामीण भागात रुजायला खूपच मेहनत घ्यावी लागली. स्केटिंगला जे ग्राउंड लागते, ज्याला स्केटिंग रिंक म्हणतात, ते महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्केटिंग रिंकला पर्याय म्हणून शाळेचा व्हरांडा, काँक्रीटचा रस्ता पर्याय म्हणून वापरला. एकदा मैदान झाले की मग बाकी सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात. ग्रामीण भागात स्केटिंगचे आकर्षण प्रचंड आहे. खेळाडूत गुणवत्ताही आहे. खरं तर आम्ही या खेळाकडे उत्कृष्ट व्यायाम म्हणून पाहतो, जो मैदानी खेळांसाठी पूरक ठरू शकतो. मांडीचे स्नायू मजबूत होतात, वेगाबरोबरच बॅलन्सही साधता येतो.
मैदाने ही खेळाची फुफ्फुसे मानली जातात. मैदान असेल तर काहीही साध्य करता येते. संजय पाटील यांनी हेच सांगितले. मी स्केटिंगसाठी मैदान निवडले आणि खेळ आपोआप रुजला. मुळात स्केट 300 रुपयांपासून उपलब्ध आहेत, जे सामान्यांना घेणे सहज शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मैदानी खेळांबरोबरच विदेशी खेळांनाही स्थान मिळणे आवश्यक आहे. कारण आधुनिक जीवनशैली गावातही अवलंबली जात आहे. शहर हे खेळाडूंच्या सोयीसाठी अनुकूल असते, ही मानसिकता बदलायला हवी. ग्रामीण भागातही सोयी उपलब्ध होऊ शकतात, पण त्या अनुकूल करून घेण्याची मानसिकताही खेळाडूंमध्ये रुजायला हवी. चोपड्यातील स्पर्धेने खेळाडूंना केवळ स्पर्धेतला आनंद दिला नाही, तर ग्रामीण भागाशी नातेही जोडणारा ठरला आहे. आता ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहणार नाहीत.