All SportsFootballsports news
कोरोनाचा आगडोंब, तरीही हवीय फुटबॉल स्पर्धा
coronavirus-football-brazil |
31 May 2020
एकवेळ क्रिकेटवेडा भारत क्रिकेटशिवाय राहू शकतो; पण फुटबॉलवेडा ब्राझील फुटबॉलशिवाय राहूच शकत नाही. ब्राझीलमध्ये कोरोना महामारीने coronavirus | कहर केला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत राष्ट्रपती जेयर बोलसोनारो Jair Bolsonaro | यांना फुटबॉलमध्ये लवकरच वापसी हवी आहे. कारण त्यांना वाटतं, की फुटबॉलपटूंवर कोरोनाचा फारसा परिणाम होत नाही!
ब्राझील आणि फुटबॉल हे नातं इतकं घट्ट आहे, की एकवेळ फेविकॉलचा जोड तुटू शकेल, पण ब्राझीलचं फुटबॉलशी नातं अजिबातच तुटू शकत नाही. पेलेपासून नेमारपर्यंत अनेक दिग्गज फुटबॉलपटू या ब्राझीलने दिले आहेत. मात्र, आता ब्राझीलने लॅटिन अमेरिकी देशांमध्ये कोरोनाचा केंद्रबिंदू ठरले आहे. ब्राझीलमध्ये या महामारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २९ मेपर्यंत २७ हजार ८७८ होता. सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या कोरनाग्रस्तांच्या देशात ब्राझील पाचव्या स्थानी आहे. या देशात मार्चच्या मध्यापासूनच फुटबॉल सामने स्थगित करण्यात आले आहेत. आता इतकी गंभीर परिस्थिती असतानाही राष्ट्रपती बोलसोनारो यांना जर फुटबॉल स्पर्धा घ्यावीशी वाटत असेल तर त्याला पराकोटीचं फुटबॉलप्रेम म्हणावं की विनाशकाले विपरित बुद्धी म्हणावं, काही कळायला मार्ग नाही.
राष्ट्रपति बोलसोनारो यांनी नुकतेच रेडियो गुइबावर सांगितले, की फुटबॉलपटूंना कोविड-19 चा गंभीर आजार होण्याची अजिबात शक्यता नाही. हा जावईशोध लावताना बोलसोनारो म्हणाले, ‘‘कारण फुटबॉलपटू खेळाडू असतात. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूंनी विळखा घातलाच तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी आहे.’’
coronavirus-football-brazil | बोलसोनारो यांनी यापूर्वी मार्चमध्ये दावा केला होता, की मी माजी खेळाडू राहिलो आहे आणि जर मला हा संसर्ग झाला तर मला फार तर साधी सर्दीच होईल. ते म्हणाले, की फुटबॉलच्या पुनरागमनामागे मुख्य उद्देश बेरोजगारी आणि त्याच्याशी निगडित समस्यांना दूर करणे हे आहे. आघाडीच्या खेळाडूंकडे पैशांची कमी नाही; मात्र छोट्या भागातील लीगमधील खेळाडूंना कुटुंब चालविण्यासाठी खेळणे आवश्यक आहे. मार्चमध्ये जेव्हा फुटबॉल सामने थांबविण्यात आले, तेव्हा क्षेत्रीय स्तरावर सामने सुरू होते. राष्ट्रीय चॅम्पियनशिप मेमध्ये सुरू होणार होती; मात्र अद्याप त्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. बोलसोनारो आणि त्यांच्या मुलाने 19 मेमध्ये रिओतील आघाडीचे क्लब वास्को दि गामा आणि फ्लेमेंगोच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. रिओचे महापौर मार्सेलो क्रिवेला यांनी जूनमध्ये सराव सुरू करण्याची परवानगी दिली आणि त्यांना वाटते, की जुलैमध्ये कोणत्याही रिकाम्या स्टेडियममध्ये सामने सुरू करता येऊ शकतील.