अलविदा चुन्नीदा!!!
Subimal Goswami | Chunni | |
चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला 30 एप्रिल 2020 रोजी काही तास उलटत नाही तोच आणखी एक वृत्त धडकले. ‘चुन्नीदा’ गेले! क्रीडाविश्व सुन्न झालं होतं. भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले चुन्नीदा अर्थातच सुबीमल गोस्वामी Subimal Goswami | यांचं जाणं चटका लावून गेलं. क्रिकेटचा धर्म जपणाऱ्या देशात एका फुटबॉलपटूच्या प्रती उदासीनता असणे आश्चर्याची बाब मुळीच नाही; पण इरफान खान, ऋषी कपूर यांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करणारे अभिनेते, क्रिकेटपटू, लेखकांकडून ‘चुन्नीदा’ दुर्लक्षित होणे नक्कीच अस्वस्थ करणारे आहे. तरीही ‘चुन्नीदा’ कधीही विस्मरणात जाणार नाहीत, तर त्यांची उणीव सतत भासत राहील… चुन्नीदा महान फुटबॉलपटू होतेच, पण तेवढेच उत्तम क्रिकेटपटूही होते. फुटबॉल ते क्रिकेट हा त्यांचा प्रवासच थक्क करणारा आहे. केवळ अलविदा चुन्नीदा म्हणून त्यांना निरोप देता येणार नाही. त्यांच्या या पैलूंवर टाकलेला हा प्रकाश…
अष्टपैलू चुन्नीदा
चुन्नीदा हे थक्क करणारं व्यक्तिमत्त्व होतं. काय नव्हतं त्यांच्याजवळ! कौशल्य, तंदुरुस्ती, नेतृत्वगुण आदी सर्व काही होतं. ही गुणसंपदा आपल्याकडेही असावी, असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असायचं. मात्र, चुन्नीदांकडे ही प्रतिभा नैसर्गिक होती. याच अंगभूत गुणांमुळे ते महान खेळाडूंच्या यादीत जाऊन पोहोचले. सहा फुटी चुन्नीदा अखेरचे कर्णधार आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
चुन्नीदांनी आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक केवळ फुटबॉलमध्येच दाखवली नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेट संघाचेही कर्णधारपद भूषविले आहे. क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी कोणीही दुर्लक्षित करू शकणार नाही. कारण दस्तूरखुद्द सर गॅरी सोबर्सने आपल्या आत्मकथेत चुन्नीदांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
गौरवशाली आणि थक्क करणारा प्रवास
अखंड बंगालच्या किशोरगंज जिल्ह्यात 15 जानेवारी 1938 रोजी उच्च मध्यमवर्गीय गोस्वामी कुटुंबात चुन्नी यांचा जन्म झाला. आता हा जिल्हा बांग्लादेशात आहे. चुन्नी हे टोपणनाव. त्यांचं खरं नाव सुबीमल. मात्र, ते चुन्नी या टोपणनावानेच क्रीडाविश्वात अजरामर झाले. आपलं संपूर्ण आयुष्य दक्षिण कोलकात्यातील पॉश अशा जोधपूर पार्क परिसरात व्यतित केलं. कलकत्ता विद्यापीठात ‘ब्लू’ (क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळणारे) म्हणून गणले गेलेले चुन्नीदा यांचा प्रवास इतर खेळाडूंसारखा संघर्षपूर्ण अजिबात नाही; मात्र गौरवशाली आणि थक्क करणारा नक्कीच आहे.
फुटबॉलविश्वातले सोनेरी पान
भारतीय फुटबॉलविश्वातले सोनेरी पान असलेले चुन्नीदा यांनी १९५६ ते १९६४ दरम्यान 50 आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यापैकी अधिकृत सामने होते ३६. यात रोम ऑलिम्पिकचाही समावेश आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 13 गोल केले. भारतीय फुटबाल संघाच्या कर्णधारपदी असताना त्यांनी 1962 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि इस्रायलमध्ये 1964 मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. ही भारतीय संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. अशी कामगिरी आताच्या पिढीतल्या भारतीय फुटबॉल संघाला अद्याप साधता आलेली नाही.
‘‘खरोखर निराशाजनक दिवस आहे. आधी ऋषी कपूर आणि आता चुन्नीदा आम्हाला सोडून गेले. दोघेही आपापल्या क्षेत्रातील चॅम्पियन. त्यांचं असं अचानक निघून जाणं पोकळी निर्माण करणारं आहे.’’ – सुनील गावसकर, माजी क्रिकेटपटू
चुन्नीदा सेंटर फॉरवर्डवर (1960 च्या दशकात या जागेला राइट-इन म्हंटलं जायचं) खेळायचे. मात्र, मैदानावर खेळाडूंच्या स्थितीची समज थक्क करणारी होती. प्रतिस्पर्धी खेळाडूंना चकवा देण्याचं कौशल्य तर अफाट होतं. गोलपोस्टच्या बॉक्समधील किनाऱ्यावरून किक मारण्याची त्यांची क्षमता प्रतिस्पर्ध्यांना पेचात टाकणारी होती. चुन्नीदांच्या कौशल्यावर एकदा पीके P K banerjee | म्हणाले होते, ‘‘माझा मित्र चुन्नीजवळ सगळं काही होतं. दमदार किक होती, ड्रिबलिंगचं कौशल्य होतं, ताकदीचा हेडर होता, अफाट वेग होता आणि खेळाडूंची स्थिती जाणून घेण्याची समज होती.’’
फुटबॉलची तिकडी
फुटबॉलचा सुवर्णकाळ ज्यांनी लिहिला त्या तिकडीमध्ये चुन्नीदांसह पीके आणि तुलसीदास बलराम यांचा समावेश होता. पीके नावाचा तारा निखळल्यानंतर ४१ दिवसांनी चुन्नीदांनीही या जगाचा निरोप घेतला. आता या तिकडीतील फक्त तुलसीदास हयात आहेत. या तिकडीच्या जोरावर आशियात भारत फुटबॉलची महाशक्ती बनला होता.
मोहन बागान क्लबशी घट्ट नातं
चुन्नीदांचं मोहन बागान क्लबशी घट्ट नातं होतं. बंगाल आणि मोहन बागान हे त्या काळी जसं समीकरण होतं, तसंच चुन्नीदा आणि मोहन बागान असंही एक समीकरणच झालं होतं. त्या वेळी हा क्लब परमोच्च शिखरावर होता. चुन्नीदांचा पहिला आणि अखेरचा हाच क्लब. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ते या क्लबशी जोडले गेले. या क्लबशिवाय ते अन्य कोणत्याही क्लबमधून कधीच खेळले नाहीत. अखेरपर्यंत ते मोहन बागान क्लबशी एकनिष्ठ राहिले. वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजे 1968 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. कमाल म्हणजे ते पाच सत्र या संघाचे कर्णधार राहिले आणि 2005 मध्ये मोहन बागान क्लबच्या गळ्याचा कंठा बनले.
Chunni Goswami with Pele |
चुन्नीदांच्या चाहत्यांमध्ये अभिनेते दिलीप कुमार, प्राण
मुंबईतील रोव्हर्स कप स्पर्धेत मोहन बागानकडून खेळताना चुन्नीदा फुटबॉलप्रेमींचं विशेष आकर्षण असायचे. त्याचा अनुभवही त्यांना आला. चुन्नीदांनी 1968 मध्ये जेव्हा मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती, तेव्हा दोन चाहते त्यांना भेटायला आले आणि निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. हे दोन चाहते दुसरेतिसरे कुणी नाही, तर बॉलिवूडचे स्टार दिलीप कुमार आणि प्राण होते. चुन्नीदांनी खेळलेला कूपरेज मैदानावरील असा एकही सामना नाही, जो या दोघांनी पाहिला नसेल. या प्रसंगावरून चुन्नीदा किती महान खेळाडू होते याची प्रचीती येते.
पीकेंना धीर देणारे चुन्नीदा
आणखी एका प्रसंगातून माजी फुटबॉलपटू फ्रँको फोर्टुनाटो Franco Fortunato | यांनी चुन्नीदांच्या आठवणींना उजाळा दिला. फोर्टुनाटो यांनी चुन्नीदांना गोल्डन बॉय संबोधले आहे. 1962 च्या आशियाई स्पर्धेत ज्या भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते, त्या संघातला एक शिलेदार फ्रँको होते. ‘‘1962 च्या आशियाई स्पर्धेचाच तो काळ होता. त्या वेळी संघातील आघाडीचा खेळाडू पीकेला (पी. के. बॅनर्जी) प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी चुन्नी कर्णधार होता. त्याने रहीम यांचा संताप शांत करीत बॅनर्जी यांना धीर दिला होता. झाले काय, की पहिल्या हाफमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर रहीम प्रचंड नाराज होते. पीकेही काहीसे आजारी दिसत होते. मध्यांतरात ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी उलटीही केली होती. त्यामुळे रहीम यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते संतापातच बॅनर्जी यांना म्हणाले, ‘‘माझ्या संघात 18 खेळाडू आहेत आणि तुझी तब्येत ठीक नव्हती तर मला सांगायचं होतं. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.’’ प्रशिक्षक रहीम यांना संतप्त झालेले पाहून संपूर्ण संघ स्तब्ध झाला होता. कुणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता; पण चुन्नीने बाजू सांभाळली. तो पीकेजवळ गेला आणि त्याला धीर दिला. तो रहीम यांना म्हणाला, ‘‘रहीम साहेब, तो आमचा हुकमी खेळाडू आहे; पण आज त्याची तब्येत ठीक नाही. तुम्ही धीर धरा, तो दणक्यात पुनरागमन करेल.’’ रहीम यांनी चुन्नीकडे पाहिलं आणि तेथून बाहेर पडले. घोंगावणारं वादळ अचानक शांत व्हावं तसा माहोल ड्रेसिंग रूममध्ये आम्ही अनुभवला. असे होते चुन्नी..’’ अशा अनेक आठवणींतून जगाला अलविदा करणारे चुन्नीदा उलगडत जातात..
चुन्नीदांच्या क्रिकेटकौशल्याने गॅरी सोबर्सही थक्क
फुटबॉलला अलविदा केल्यानंतर त्यांनी आपलं दुसरं प्रेम जपलं, ते म्हणजे क्रिकेटचं. हे गल्ली क्रिकेटसारखं प्रेम नव्हतं. विश्वास बसणार नाही, पण रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली बंगाल संघाने १९७२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. एवढेच नाही, तर १९६७ मध्ये गॅरी सोबर्सच्या वेस्ट इंडीज संघालाही एका सराव सामन्यात धूळ चारली होती. आपल्या मध्यमगती गोलंदाजीवर त्यांनी विंडीजचे आठ फलंदाज तंबूत धाडले होते. सत्तरच्या दशकातला विंडीज साधासुधा नव्हता, तर अनेक संघांना घाम फोडणारा हा संघ होता. सोबर्सने फटकावलेला एक चेंडू हवेत उडाल्यानंतर चुन्नीदांनी 25 यार्डाचे अंतर मागे धावत जाऊन हा अवघड झेल टिपला होता. सोबर्स थक्कच झाले. चुन्निदांच्या या कामगिरीचे सोबर्सनेही तोंडभरून कौतुक केले.
चुन्नीदा आपल्या मित्रांना गमतीने सांगायचे, ‘‘अरे त्या सोबर्सला माहीत नाही, की मी कधी काळी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूही होतो. मागे 25 यार्डाचे अंतर धावत जाणे माझ्यासाठी फार काही विशेष नाही.’’
‘‘चुन्नीदा फुटबॉलमधून क्रिकेटमध्ये आले होते. त्या वेळी ते खूपच तंदुरुस्त होते. आता क्रिकेटचे रूपडे पालटले आहे, पण 70 च्या दशकात एक फुटबॉलपटू क्रिकेटपटूपेक्षा अधिक तंदुरुस्त असायचा. चुन्नीदा क्रिकेटमध्ये आले तेव्हा त्यांनी क्रिकेटमध्ये फिटनेसची समजही आणली. या सगळ्यात त्यांचा एक गुण सगळ्यात वेगळा होता, तो म्हणजे लढावू वृत्ती. कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर टिकून राहायचे. हे सगळंच आमच्यासाठी प्रेरणादायी होतं.’’ – सुनील दोशी, माजी फिरकी गोलंदाज
चुन्नीदांनी क्रिकेटपटू म्हणून १९६८ ते १९७३ दरम्यान बंगाल संघाकडून ४६ प्रथमश्रेणी सामने खेळले. रणजी करंडक स्पर्धेत बंगालच्या संघाचे कर्णधारपदही चुन्नीदांनी भूषविले. 1971-72 मधील रणजी करंडक स्पर्धेत त्यांच्याच नेतृत्वाखाली बंगाल संघाने अंतिम फेरी गाठली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगालला बॉम्बे संघाकडून (आताची मुंबई) पराभव स्वीकारावा लागला.
पुरस्कार आणि गौरव
1962 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या संघात चुन्नीदांना सर्वोत्कृष्ट स्ट्रायकरच्या बहुमानाने गौरविण्यात आले होते. 1963 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1983 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय टपाल विभागाने जानेवारी २०२० मध्ये म्हणजे तीनच महिन्यांपूर्वी चुन्नीदांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल विशेष टपाल तिकीट काढले होते. चुन्नीदा १९७० च्या दशकातील भारतीय फुटबॉल संघाच्या निवड समितीतही होते. ज्या वेळी १९९६ मध्ये राष्ट्रीय फुटबॉल लीग सुरू झाली, तेव्हा ते सल्लागार समितीत होते.
फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर चुन्नीदांनी क्लब स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षकाची भूमिका कधीच वठवली नाही. असे असले तरी भारतीय फुटबॉलची सर्वांत मोठी नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा अकादमीच्या (टीएफए) निदेशकपदासाठी दिवंगत रुसी मोदी यांची पहिली पसंती चुन्नीदाच होती. ते कोलकात्याचे शेरिफही राहिले आहेत आणि वृत्तपत्रांमध्येही भारतीय फुटबॉलवर विपुल लेखन केले आहे. साउथ क्लबमध्ये टेनिस खेळणे आणि स्कॉच घेणे हे त्यांचे शौक होते.
माझ्या यशाचं श्रेय चुन्नीच ः तुलसीदास बलराम
मी जे काही घडलो ते चुन्नीमुळेच, अशी भावना भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू तुलसीदास बलराम यांनी व्यक्त केली. 83 वर्षांचे तुलसीदास बलराम चुन्नी गोस्वामी यांच्यासोबत दीर्घकाळ भारतीय संघाचे शिलेदार राहिले आहेत. चुन्नीदांची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘‘चुन्नीमुळेच मी घडलो. मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याला लोकांचा गराडा पडलेला होता. संतोष ट्रॉफी (1955) जिंकल्यानंतर त्याने खूप नाव कमावलं. मी माझ्या वरिष्ठ खेळाडूंना त्याच्याविषयी खोदून खोदून विचारायचो. त्याच वेळी मी मनाशी ठरवलं, की जर तो इतका चांगल्या प्रकारे खेळू शकतो तर मी का नाही? मी हे आव्हान स्वीकारलं. पुढे आम्ही दोघेही भारतीय संघाकडून खेळू लागलो, तेव्हा मीडियात चर्चा झडायची, की दोघांमध्ये कोण उत्तम? आम्ही चांगले मित्र होतो आणि खेळाचा आनंद लुटायचो.’’
फुटबॉलच्या इतिहासातलं हे सुवर्णपान जीर्ण झालं. आपल्या अष्टपैलू खेळीने फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने गाजवणाऱ्या या लढवय्याच्या हालचाली वयोपरत्वे अलीकडे फारच मंदावल्या होत्या. अशातच करोना विषाणूच्या थैमानाने संपूर्ण विश्वच लॉकडाउन झाले. क्रीडाविश्वही थांबलं होतं. चुन्नीदा मधुमेह आणि प्रोस्ट्रेटसह अनेक व्याधींशी एकाच वेळी लढा देत होते. त्यांना रोज इन्शुलीन घ्यावे लागत होते. मात्र, लॉकडाउनमुळे मेडिकल सुपरवायजर रोज येऊ शकत नसल्याने त्यांच्या पत्नी बसंती यांनी त्यांची काळजी घेतली. अर्थात, ही अखेरची निरवानीरव होती. जाण्याची वेळ निश्चित होती. हृदयविकाराने दस्तक दिली आणि वयाच्या 82 व्या वर्षी या क्रीडायोद्ध्याने जगाचा निरोप घेतला. अलविदा चुन्नीदा…