वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण
वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण
टेनिसविश्वात 2022 हे वर्ष सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याचा कोरोना लसीकरण विरोध यामुळे प्रचंड गाजलं. कोरोना महामारीचा कहर 2022 च्या सुरुवातीपर्यंत संपलेला नव्हता. संपूर्ण विश्वाने लसीकरणाला प्राधान्य दिलं. मग ते खेळ असो वा नोकरीचे ठिकाण… लसीकरणाशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. एका देशातून दुसऱ्या देशात जायचे असेल तरीही लसीकरण, अँटिजेन चाचणी अनिवार्य करण्यात आली. जगाने कोरोनाची धास्ती किती घेतली होती, ते यावरून स्पष्ट होतं. अशातच नोव्हाक जोकोविच याने जगाच्या विरोधात भूमिका घेतली. ती म्हणजे लस न घेण्याची. एप्रिल 2020 मध्ये ज्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वोच्च होता, त्या वेळीही नोव्हाक जोकोविच याने प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. कोरोनामुळे टेनिस स्पर्धा एकामागून एक रद्द होत असताना जोकोविचने सर्बिया व क्रोएशियामध्ये प्रदर्शनीय टेनिस लढती घेतल्या होत्या. तेथे कोरोना नियमांचे पालन झाले नाही. मास्कही वापरण्यात आले नव्हते. या स्पर्धेनंतर जोकोविचसह सहभागी इतर खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. अर्थात, त्याने लस घ्यावी किंवा नाही, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्याला जर स्पर्धा खेळायची असेल तर लसीकरण अनिवार्य होतं. तसा नियमच करण्यात आला होता. जोकोविच याची नेमकी याउलट भूमिका होती. मी लसीकरण करणार नाही, हा हेका त्याने अखेरपर्यंत सोडला नाही. जोकोविच याला 16 डिसेंबर 2021 रोजी कोरोना झाला होता. त्यातून बरा झाल्यानंतर मात्र त्याने लसीकरणविरोध कायम ठेवला. त्यातून ज्या घडामोडी घडल्या त्यावर टाकलेला हा प्रकाश.
लसीकरणविरोधाच्या वादाची पहिली ठिणगी
नोव्हाक जोकोविच आणि त्याचा कोरोना लसीकरण विरोध खऱ्या अर्थाने गाजला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेपासून. मेलबर्नमध्ये 17 जानेवारी 2022 रोजी ही स्पर्धा होती. टेनिसविश्वात अव्वल दर्जाचा टेनिसपटू असला तरी जोकोविच बेधडक वागणारा, कुणाचीही पर्वा न करणारा खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळण्यासाठी त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक केले होते. मात्र, त्याने ही माहिती देण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियाचा एक नियम होता. तो म्हणजे लस घेतलेल्या खेळाडूंनाच स्पर्धेत खेळण्यास परवानगी मिळणार होती. म्हणूनच जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील प्रवेश अनिश्चित मानला जात होता. याआधी त्याने गेल्या आठवड्यात सिडनी येथे झालेल्या एटीपी कपमधून सर्बियाच्या संघातून माघार घेतली होती. मात्र, या वेळी त्याला 4 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलियाने वैद्यकीय सवलत दिली. कारण या स्पर्धेतला तो प्रमुख खेळाडू होता. शिवाय त्याला अग्रमानांकनही होतंच. सवलत मिळाल्यानंतर जोकोविचने सोशल मीडियावर ही माहिती शेअर दिली. नववर्षाच्या सुरुवातीला ही आनंदाची बातमी शेअर करताना त्याने विमानतळावरील आपल्या बॅगसह फोटोही शेअर केला. जोकोविचचा हा दुहेरी आनंद होता. एक तर त्याला सवलत मिळाली आणि दुसरे म्हणजे विक्रमी 21 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधीही. विशेष म्हणजे जोकोविचने नऊ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचने वैद्यकीय सवलतीसाठी अर्ज केल्यानंतर त्याला ही मंजुरी मिळाली होती. त्यासाठी दोन सदस्यीय समितीने तपासणी केल्याची माहिती ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांनी दिली. इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. जोकोविचला सवलत मिळाल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. कोणत्या कारणास्तव त्याला ही सवलत देण्यात आली, याचा खुलासा करावा, अशी मागणीही जोर धरू लागली. जर त्याला सवलत मिळाली तर मग ऑस्ट्रेलियात त्याला विलगीकरणात राहावे लागणार की नाही, हेही स्पष्ट करण्याची मागणीही सोशल मीडियातून सुरू झाली. एका खेळाडूमुळे सर्वांचा जीव धोक्यात घातला जात असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटू लागल्या.
सवलतीवरून ऑस्ट्रेलियातही रणकंदन
जोकोविचला मिळालेल्या वैद्यकीय सवलतीवरून नाराजीचा सूर दुसऱ्या दिवशी 5 जानेवारी 2022 रोजीही सुरूच राहिला. या वेळी ऑस्ट्रेलियात यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे अग्रमानांकित नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत भाग घेण्यास सज्ज झाला होता, तर दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाचे नागरिक, तसेच टेनिस वर्तुळातून यावर नाराजीचे सूर उमटू लागले. दस्तूरखुद्द पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनीही तीव्र शब्दांत या सवलतीचा समाचार घेतला हे विशेष. कारण ऑस्ट्रेलियात लसीकरण अनिवार्य करण्यात आले होते. शिवाय लॉकडाउन, निर्बंध, मार्गदर्शक तत्त्वे याचे सर्व निकष कटाक्षाने पाळले जात होते. एवढे करूनही कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच होता. यामुळे ऑस्ट्रेलियात कमालीची चिंता पसरलेली होती. अशा परिस्थितीत जोकोविचला लसीकरणातूनच सवलत देण्यात आल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांचा पारा चढला होता.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा इशारा
नागरिकांचा वाढता विरोध, संताप पाहता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना आपली भूमिका मांडावी लागली. ते म्हणाले, की जोकोविचचा सहभाग अद्याप निश्चित नाही. त्याला या प्रवासासाठी अजूनही सरकारच्या नियमांची पूर्तता करावीच लागेल. सीमा आणि व्हिसा केंद्राच्या अखत्यारीतील विषय असला तरी जोकोविच याला सहभागाची मुभा देण्याच्या प्रक्रियेत सरकारचा कोणताही सहभाग नव्हता. असं असलं तरी प्रामाणिकपणे नियमांची पूर्तता करणाऱ्यांना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर पालन करणाऱ्यांना सवलती दिल्याही जातात. या खुलाशानंतर जोकोविच याचा स्पर्धेतला प्रवास आणखीच खडतर बनला. या घडामोडींंनंतरही जोकोविच आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. नोव्हाक जोकोविच याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण नियमाला उघडपणे विरोध केला. त्याच्या वक्तव्याचे पडसाद मात्र ऑस्ट्रेलियात तेवढ्याच तीव्रतेने उमटू लागले. तेथील सरकारी अधिकाऱ्यांनी जोकोविचवर तीव्र टीका केली. मेलबर्नच्या नागरिक ख्रिस्टिन वॉर्टन यांची यावर नोंदवलेली प्रतिक्रिया अधिक टोकदार होती. त्या म्हणाल्या होत्या, ‘जोकोविचला सवलत मिळण्याचा प्रकारच लाजीरवाणा आहे. आम्ही नियमानुसार आरोग्यासाठी लस घेतली. बूस्टर मात्राही घेतली अन् अचानक जोकोविचसारखी लस न घेतलेली व्यक्ती वैद्यकीय सवलत मिळवत आमच्या देशात खेळायला येते. ही एकप्रकारे आमची मानहानीच आहे. मी तर त्याचे सामने अजिबात बघणार नाही.’ विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील पत्रकार आणि माजी खेळाडूंनीही निषेधाचे सूर आळवले. दैनिकांचे रकानेच्या रकाने भरू लागले.
ज्या सवलतीवरून गदारोळ माजला, त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या…
- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा येणारे प्रेक्षक (परवानगी दिल्यास) यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या स्वतंत्र पॅनलतर्फे सवलत लाभलेली व्यक्ती स्पर्धेच्या ठिकाणी येऊ शकते. या सवलतीमुळे जोकोविचला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार नव्हता. मात्र, असे असले तरी त्याला तेच स्वातंत्र्य लाभेल, जे लसीकरणाचा नियम पाळणाऱ्या व्यक्तींंना असेल.
- स्वतंत्र तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये डॉक्टरांचा समावेश आहे. हे डॉक्टर इम्युनोलॉजी, ससंर्गजन्य आजार आणि सर्वसामान्य उपचार अशा क्षेत्रांतील तज्ज्ञ आहेत.
यावरून ऑस्ट्रेलियनांचा संताप अनावर झाला. कारण ते स्वतः कडक निर्बंधांमध्ये राहत होते. मात्र, जोकोविचला सर्व निर्बधांतून फाटा देण्यात आला होता. दुहेरीतील तज्ज्ञ टेनिसपटू जॅमी मरे याने जोकोविचवर उपहासात्मक टीका केली. तो म्हणाला, ‘‘जोकोविचला मिळणाऱ्या सवलतींबद्दल काय बोलावे तेच कळत नाही. मी त्याच्या जागी असतो, तर मला अशी ‘प्रेमळ’ वागणूक मिळाली नसती. जोकोविच फारच छान… तू इथे येत स्पर्धेत भाग घेत आहेस.’’
मेलबर्नमधील प्रसिद्ध प्रसारक अँडी माहेर यानेही या सवलतीला विरोध दर्शवला. तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियातील नागरिकांना गेली दोन वर्षे जणू मुक्त जगण्यापासून रोखले जात आहे. संसर्गच तसा आहे; पण नोव्हाक जोकोविचला सवलत मिळते. तो सर्वकालीन महान टेनिसपटू आहे; पण म्हणून त्याला ही सवलत मिळणे योग्य नाही.’’
जोकोविच ताटकळला
वैद्यकीय सवलतींवर अतिलक्ष देण्याचा मोह जोकोविचच्या अंगलट आला. गाफील राहिल्याने व्हिसाच्या तरतुदी पूर्ण करण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे त्याला विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. हे वृत्त ऑस्ट्रेलियातील एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर जोकोविचच्या चाहत्यांचा जीव मात्र भांड्यात पडला. त्याच्या व्हिसाच्या कागदपत्रात चुका असल्याचे निदर्शनास आल्याने हा खोळंबा झाल्याचे समोर आले.
लसीकरण नसल्याने भारतीयास प्रवेश नाकारला
जोकोविचचा पवित्रा तसा भारतीयांनाही रुचला नव्हता. मात्र, तरीही भारतीयांची मते फारशी टोकदार नव्हती. मात्र, त्याच वेळी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कुमार स्पर्धेस पात्र ठरूनही 17 वर्षीय अमन दहिया या टेनिसपटूला प्रवेश नाकारण्यात आला, तेव्हा मात्र भारतीयांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर जोकोविचच्या प्रकरणावर भारतीयांच्याही प्रतिक्रिया टोकदार बनल्या. कारण कोरोना महामारीत भारत चांगलाच पोळून निघाला होता. नुकतंच कुठे भारतात 18 वर्षांखालील युवकांसाठी लसीकरण सुरू झाले होते. गरीब घरातील असलेल्या अमनला परदेशात लस घेणे परवडणारे नव्हते. ऑस्ट्रेलियन स्पर्धा संयोजक दुटप्पी आहेत. त्यांनी जोकोविचला प्रवेश दिला, पण अमनला नाकारला, अशी टीका अमनचे प्रशिक्षक जिग्नेश रावल यांनी उघडपणे केली. भारतात 18 वर्षांखालील गटाचे लसीकरण सुरू झालेले नाही, याकडे अमनच्या प्रशिक्षकांनी स्पर्धा संयोजकांचे लक्ष वेधले. एवढेच नव्हे, तर हे लसीकरण सुरू झाल्यावर संयोजकांना पत्रही पाठवले. त्यात प्रशिक्षकांनी आवर्जून नमूद केले, की अमन करोना प्रतिबंधक लशीचा एक डोस घेऊन ऑस्ट्रेलियात सात दिवस विलगीकरणात राहील. मात्र, या प्रस्तावावर ऑस्ट्रेलियन संयोजकांनी फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यांनी नियमावर बोट ठेवत लशीचे दोन डोस घेतले असल्यासच प्रवेश देण्यात येईल हे स्पष्ट केले. अमनच्या प्रशिक्षकांनी भारतीय टेनिस संघटना, भारतीय क्रीडा प्राधिकरण, तसेच गुजरात क्रीडा प्राधिकरणाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्यांना साथ दिली नाही.
जोकोविचचा ऑस्ट्रेलियन व्हिसा रद्द
वैद्यकीय सवलत मिळाल्याच्या आनंदात जोकोविच व्हिसाबाबत मात्र गाफील राहिला. कोरोना नियमांतून पळवाट काढण्याची सवलत मिळाली खरी, पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींंची पूर्तता करण्यात जोकोविचला 6 जानेवारी 2022 रोजी अपयश आले. 5 जानेवारी 2022 पर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल होऊ, असे सोशल मीडियावरून सांगणाऱ्या जोकोविचची मात्र विमानतळावरच कोंडी झाली. त्याला जी वैद्यकीय सवलत मिळाली होती, त्याचा फायदा हाच होता, की जोकोविचला व्हिक्टोरिया राज्य सरकारच्या लसीकरणासंदर्भातील नियमांचे पालन करणे बंधनकारक नव्हते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सीमेवरील अधिकाऱ्यांनी ही सवलत मान्य केली नाही. ‘‘वैद्यकीय सवलत लाभल्यानंतर ज्या अटींंची पूर्तता करावी लागते, त्यात जोकोविच अपयशी ठरला,’’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाच्या सीमेवरील अधिकाऱ्यांनी दिली. जोकोविच आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वादाची चर्चा आता जगभरात चवीने चघळली जात होती. अशातच ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या, त्यात आता सर्बिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचे संबंधही पणाला लागले होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांना एकूणच या प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी लागली. ते म्हणाले, की ‘‘नियम खूप स्पष्ट आहेत. लसीकरण नसेल, तर वैद्यकीय सवलत आवश्यक आहे. ती जोकोविचकडे नव्हती.’’ ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी यावर प्रकाश टाकला. ‘‘जोकोविच विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याला देण्यात आलेली वैद्यकीय सवलत, संबंधित कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात त्रुटी असल्याने जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला. आमच्या या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार जोकोविचला आहे; पण व्हिसा रद्द झाल्याने त्याने सध्या ऑस्ट्रेलियातून निघून जायलाच हवे,’ असे हंट म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिस यांनीही आपला मुद्दा स्पष्ट केला. ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याचे पुरावे सादर केले असते तर नोव्हाक जोकोविच याच्यावर ही वेळ आलीच नसती. व्हिसाऐवजी त्याने वैद्यकीय सवलत मागितली. देशबांधवांची टीका सहन करीत आम्ही त्याला वैद्यकीय सवलतही दिली. मात्र, नियमांतून पळवाट काढता येत नाही अन् नियम देशाच्या सीमेसंदर्भातील असतील, तर त्यांची पूर्तता होणे आवश्यकच असते. हे कठोर नियम असल्यानेच ऑस्ट्रेलियातील मृत्यूदर कमी आहे. आम्हाला सजग राहावेच लागणार आहे,’ असे ट्विट मॉरिसन यांनी केले.
जोकोविच प्रकरणावरून सर्बिया- ऑस्ट्रेलिया संबंधात तणाव
आता प्रश्न जोकोविचचा राहिला नव्हता, तर तो सर्बियाच्या स्वाभिमानाचा विषय झाला. या प्रकरणात सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुचिच (Aleksandar Vucic) यांनीही उडी घेतली. आपला भूमीपूत्र जोकोविच याच्यावर अन्याय झाल्याचे म्हणत वुचिच यांनी ऑस्ट्रेलियावर टीका केली. जगात अव्वल असणाऱ्या जोकोविचला मात्र रात्रभर मेलबर्न विमानतळावर ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार की नाही हे समजेपर्यंत वीस ग्रँड स्लॅम विजेतीपदे पटकावणाऱ्या जोकोविचला तब्बल आठ तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर पुढील विमानाची वेळ आणि कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याला हॉटेलात पाठविण्यात आले. एवढे सगळे रामायण घडत असताना जोकोविचने मात्र आपल्या लसीकरणाबाबतची माहिती कायमच लपवली. एका वेब पोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेत त्याचे वडील एस. जोकोविच म्हणाले, ‘‘माझ्या लेकाला विमानतळावरील अशा खोलीत ठेवले होते, जिथे इतर कुणालाच प्रवेश नव्हता. त्या खोलीबाहेर दोन पोलिसांचा पहारा होता.’’
व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध जोकोविच न्यायालयात
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेपूर्वीची नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यातील लढतीत चांगलेच रंग भरण्यास सुरुवात झाली होती. लसीकरण घेतले आहे किंवा नाही याचा उल्लेख जोकोविच याने व्हिसाच्या कागदपत्रांमध्ये नमूद केला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने त्याचा व्हिसाच रद्द केला होता. जोकोविचचा दावा होता, की मी 16 डिसेंबर 2021 रोजी कोरोना बाधित होतो. त्यामुळे लसीकरणाच्या सक्तीतून सवलत मिळण्यास आपण पात्र आहोत. जोकोविचचं प्रकरण आता न्यायालयात गेलं. जोकोविचच्या वकिलांनी ऑस्ट्रेलियातील फेडरल, तसेच कौटुंबिक न्यायालयात व्हिसा रद्द करण्याच्या ऑस्ट्रेलिया सरकारच्या निर्णयास 8 जानेवारी 2022 रोजी आव्हान दिलं. जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनपासून रोखण्याचा ऑस्ट्रेलिया सरकारचा डाव असल्याचा आरोप जोकोविचच्या वकिलांनी केला. याबाबतची सुनावणी 10 जानेवारी 2022 रोजी झाली. जोकोविच 30 डिसेंबरपर्यंत कोरोनातून पूर्ण बरा झाला होता. ऑस्ट्रेलियात आल्यापासून त्याच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. तापही नव्हता. जोकोविचचा मुक्काम आता मेलबर्नमधील हॉटेलमध्ये 4 जानेवारी 2022 रोजी सकाळपासून होता. त्याला स्थलांतरित स्थानबद्ध करण्यात आलं होतं. व्हिसा नाकारल्याचं त्याला विमानतळावर सांगण्यात आलं. त्या वेळी जोकोविचने टेनिस ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची विनंती केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं याचिकेत म्हटलं होतं. आपल्याला नुकताच कोरोना झाला होता. त्यामुळे आपण लस घेतली नाही, हा जोकोविचचा दावाही फेटाळण्यात आल्याचं त्याचं म्हणणं होतं. जोकोविचचं प्रकरण आता कायद्याच्या कचाट्यात सापडलं होतं. त्याच्या चाहत्यांनी हॉटेलजवळ गर्दी केली. जोकोविचचा मुक्काम असलेल्या हॉटेलजवळ चाहत्यांनी तळ ठोकला होता. वाढत्या पाठिंब्यामुळे जोकोविचने इन्स्टाग्रामवर चाहत्यांचे आभारही मानले. याच हॉटेलमध्ये जोकोविचने ख्रिसमस डेही साजरा केला.
जोकोविचने एक लढाई जिंकली, पण…
व्हिसा रद्द करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्णयास जोकोविचने आव्हान दिल्यानंतर 10 जानेवारी 2022 रोजी यावर सुनावणी झाली. संपूर्ण जगाचं लक्ष या निर्णयाकडे लागलं होतं. ऑस्ट्रेलियातील फेडरल, तसेच कौटुंबिक न्यायालयाने जोकोविच अखेर जिंकला. इमिग्रेशन नजरकैदेतून जोकोविचची त्वरित सुटका करण्याचे कोर्टाने आदेश दिले. या निर्णयाने त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. मात्र, सरकारी वकिलाने सांगितले, की जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यासाठी मंत्रीस्तरावरून अधिकाराचा वापर केला जाऊ शकतो.
जोकोविचला वाढता पाठिंबा
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=KVYOfn-EZnI” column_width=”4″]जोकोविचच्या पाठीशी संपूर्ण सर्बिया तर होताच, शिवाय जगभरातील चाहत्यांनीही त्याचे समर्थन केले होते. जोकोविचच्या कुटुंबीयांनी सलग तिसऱ्या दिवशी सर्बियात रॅली काढली. सर्बियाच्या पंतप्रधानांनीही या प्रकरणी जोकोविचला खंबीर पाठिंबा देणार असल्याचे आश्वासन दिले. आमच्या दिग्गज खेळाडूला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेत, जेतेपद राखण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सर्बियाच्या पंतप्रधान एना बर्नाबिच (Ana Brnabic) यांनी सांगितले. स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलेल्या जोकोविचसाठी सर्बियाने ऑस्ट्रेलियाला सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. या मागण्यांप्रमाणे ऑस्ट्रेलियाने हॉटेलमध्ये जोकोविचला ग्लुटेनविरहित आहार, व्यायामासाठी साधने, लॅपटॉप, तसेच कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी सिमकार्डही पुरवण्यात आले.
हॉटेलबाहेरही समर्थन
जोकोविचचे समर्थन करण्यासाठी मेलबर्नमधील पार्क हॉटेलबाहेर 9 जानेवारी 2022 रोजी चांगलीच गर्दी उसळली होती. व्हिसासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असल्याने जोकोविचला या हॉटेलात ठेवण्यात आले आहे. जोकोविच्या समर्थकांनी त्याच्या सर्बियाचा झेंडा असणारी टोपी परिधान करीत हॉटेलबाहेरच नृत्यही केले.
…तरी प्रवेशाची खात्रीच नाहीच!
जोकोविचला वैद्यकीय सवलत मिळाली असली, तरी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाशिवाय त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्याची खात्री देता येत नाही, असे ऑस्ट्रेलिया सरकारच्या वकिलांनी 9 जानेवारी 2022 रोजी कोर्टात याचिका सादर करताना सांगितले होते.
जोकोविच पुन्हा ‘स्थानबद्ध’च
कोरोना प्रतिबंधक लसीकरण न केल्यामुळे जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा व्हिसा दोन वेळा रद्द झाला. त्यामुळे शनिवारी , 15 जानेवारी 2022 रोजी सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. आता या प्रकरणावर 16 जानेवारीला उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्याची पुन्हा प्रतिबंधित स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये रवानगी करण्यात आली. आणखी काही काळ जोकोविचला तिथेच राहावे लागले. या प्रकरणाचा वाढलेला गुंता पाहता, जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सहभाग जवळजवळ धूसर झाला होता.
या प्रकरणाचे गांभीर्य अन् माध्यमांचे आकर्षण पाहता ऑस्ट्रेलियन पोलिसांनी जोकोविचचे वकील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, त्या हॉटेलचा रस्ताच रहदारीसाठी बंद केला होता. जोकोविचने 15 जानेवारी 2022 पर्यंतच्या चार रात्र हॉटेलमध्येच काढल्या होत्या. जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉके यांनी विशेषाधिकार वापरला. त्यांनी त्याचा व्हिसा जनहिताच्या आधारे रद्द केल्याचे जाहीर केले होते. याच दरम्यान जोकोविचने सोशल मीडियावर आपल्याकडून चूक झाल्याचे सांगितले होते. ‘करोनाबाधित असतानाही आपण विलगीकरणात नव्हतो, ही आपली चूक झाली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी दोन आठवडे प्रवास केला नव्हता, हे व्हिसा अर्जात चुकीचे नमूद केले,’ अशी कबुली जोकोविचने दिली होती. मात्र, हीच चूक ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील त्याच्या सहभागाला मारक ठरली.
एकूणच हे प्रकरण जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तब्बल सात महिन्यांनंतर स्पेनचा दिग्गज टेनिसपटू रफाएल नदाल ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार होता. त्याने 15 जानेवारी 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, प्रश्न नदालच्या कामगिरीविषयी कमी आणि जोकोविच प्रकरणावरच अधिक रंगणार होती हे स्पष्टच होते. हे प्रश्न सुरू होण्यापूर्वीच नदाल म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर या स्थितीचा आणि प्रश्नांचा आता मला उबग आला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे महत्त्व एका खेळाडूपेक्षाही नक्कीच मोठे आहे. जोकोविचचा सहभाग असले तर छानच असते, पण तो नसला तरी स्पर्धेचे महत्त्व कमी होत नाही. या प्रश्नांना उत्तरे देताना आता मी थकलो आहे.’ प्रश्न फक्त नदाललाच विचारले जात होते असे नाही, तर प्रत्येक टेनिसपटूसमोर पत्रकारांचे प्रश्न फक्त जोकोविचभोवतीच फिरत राहिले. महिला टेनिसपटू गार्बाइन मुगुरुजा, पुरुष टेनिसपटू स्टेफानोस सितसिपास यांनाही आता या प्रश्नांची सवय झाली. ‘मी टेनिसबद्दल बोलायला आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण टेनिसबाबत बोललेलोच नाही अन् ये खूप लज्जास्पद आहे,’ अशी प्रतिक्रिया या टेनिसपटूंनी दिली.
ऑस्ट्रेलियात 15 जानेवारी 2022 पर्यंत…
- ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांवरील नागरिकांचे 89 टक्के लसीकरण झाले असून ज्येष्ठांचे लसीकरण शंभर टक्के झाले होते.
- लसीकरणच न झालेला जोकोविच अन् त्याचा दृष्टिकोन अद्याप लस न घेतलेल्या नागरिकांसाठी घातकच ठरेल.
- जोकोविचमुळे संसर्ग वाढण्याची भीती खूपच कमी, हे मात्र आरोग्य विभागाने कबूल केले आहे.
फ्रेंच स्पर्धेचे दरवाजेही जोकोविचसाठी बंदच
कोरोना लसीकरण न केल्यामुळे नोव्हाक जोकोविच याला 17 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलियातून सक्तीने सर्बियाला रवाना करण्यात आले. त्याच्या चाहत्यांनी सर्बियात जल्लोषात स्वागत केले. अर्थात, हा अध्याय इथेच संपला नव्हता. कारण लसीकरण न केल्यास कोणालाही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार नाही, असे फ्रान्सच्या सरकारने 17 जानेवारी 2022 रोजी स्पष्ट केल्यामुळे जोकोविचसमोरील पेच आणखीच वाढला. लसीकरण न केलेला जोकोविच ऑस्ट्रेलियात नको, अशी आग्रही भूमिका ऑस्ट्रेलियातील नागरिकांनी घेतली होती. लसीकरण न करता ऑस्ट्रेलियात जाण्याचा जोकोविचचा निर्णय चुकीचा होता, असे मत सर्बियातही अनेकांनी व्यक्त केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने सक्तीने पाठवणी केल्यामुळे मायदेशातील नागरिक जोकोविचच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. ऑस्ट्रेलियातीलही मूळ सर्बियावासीयांचा जोकोविचला पाठिंबा होता. कोण जिंकते याचा आम्हाला आता फरक पडत नाही, असे त्याचे चाहते म्हणायचे. जोकोविचची सक्तीने पाठवणी केल्यामुळे त्याला आता तीन वर्षे ऑस्ट्रेलियात येता येणार नाही. मात्र पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जोकोविचच्या खेळणयाबाबत नक्कीच विचार करण्यात येईल. सरकारने व्हिसा रद्द केला तरी तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्या व्यक्तीला देशात परत प्रवेश देण्यासाठी तरतूद आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण ऑस्ट्रेलियाही ताणणार नसल्याचे स्पष्ट झाले.
कोणालाही सवलत नाही
लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच फ्रान्समध्ये प्रवेश असेल, या नियमातून खेळाडूंनाही सूट देण्यात येणार नाही, असे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात फ्रान्सचे क्रीडामंत्री रोक्साना मॅरासिनेआनू यांनी फ्रेंच ओपनसारख्या स्पर्धांना लसीकरणाच्या नियमातून सवलत देण्याबाबत नक्कीच विचार होईल, असे सांगितले होते. कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धाही फ्रान्समध्ये फेब्रुवारीत सुरू होणार होती.
जोकोविच नाट्यानंतर अखेर ऑस्ट्रेलियन ओपनला सुरुवात
नोव्हाक जोकोविच याच्या ‘घरवापसी’नंतर 17 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी मिळाल्याने पहिल्या दिवशी प्रेक्षकसंख्या मर्यादित होती. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी संकुलाच्या संरक्षक प्रवेशद्वारातून 25,206 प्रेक्षकांनी प्रवेश केला होता. फेडरर, नदाल आणि जोकोविच यांनी प्रत्येकी वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांची कमाई केली आहे. मात्र, लसीकरण नसल्याने जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आला, तर गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे फेडररने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पुरुष गटात नदाल हे एकमेव आकर्षण या स्पर्धेत उरलं होतं. जोकोविचची उणीव मात्र चाहत्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लसीकरणास विरोध करणाऱ्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या परिसरात जोरदार निदर्शने केली. लसीकरणाच्या सक्तीस त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता. जोकोविचला स्पर्धेत प्रवेश नाकारल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
टेनिस ऑस्ट्रेलियाने घेतला जोकोविच प्रकरणाचा आढावा
नोव्हाक जोकोविच याच्या सक्तीच्या घरवापसीमुळे तब्बल 11 दिवसांनंतर प्रकरण शांत झाले. मात्र, निदर्शनांमुळे हे प्रकरण कुठे ना कुठे तरी धगधगतच राहिले. त्याच्या व्हिसा रद्द करण्याच्या प्रकरणातील पराभवाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे टेनिस ऑस्ट्रेलियाने मंगळवारी, 18 जानेवारी 2022 रोजी पत्रकाद्वारे जाहीर केले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झाल्यानंतर या प्रकरणाचा विस्तृतपणे आढावा घेण्यात येईल, असेही टेनिस ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. ‘प्रत्येक प्रसंगांतून काही तरी धडा मिळतोच. आम्ही आमच्या तयारीच्या सगळ्या पैलूंचा पुन्हा आढावा घेणार आहोत. असे दरवर्षी केले जाते. ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला करंडक बहाल केल्यानंतर या आढाव्याला सुरुवात होते,’ असे ऑस्ट्रेलियन ओपनने पत्रकात नमूद केले होते.
ऑस्ट्रेलियन ओपननंतर जोकोविचचा फ्रेंच अध्याय
ऑस्ट्रेलियन ओपननंतर जोकोविचचा नवा अध्याय सुरू झाला होता. तो म्हणजे फ्रेंच अध्याय. ‘फ्रेंच ओपन, विम्बल्डनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य असेल, तर त्या स्पर्धांवर पाणी सोडेन; पण लस घेणार नाही,’ असा रोखठोक पवित्रा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने 15 फेब्रुवारी 2022 रोजी घेतला. लसीकरण न झाल्यामुळे जानेवारीत जोकोविचचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असणाऱ्या जोकोविचने मंगळवारी लंडनमध्ये एका वृत्तसमूहाशी संवाद साधताना आपला पवित्रा स्पष्ट केला होता. ‘माझे लसीकरण झालेले नाही अन् मी पुढेही ते करणार नाही. भले त्यासाठी मला जेतेपदांवर पाणी सोडावे लागले तरी चालेल. तशीच वेळ आली तर मी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धांची जेतीपदे राखायलाही जाणार नाही. मी लस अजिबात घेणार नाही’, असे जोकोविचने स्पष्टपणे सांगितले.
नोव्हाक जोकोविच याचे कोरोना लसीकरणावर काय आहे मत?
नोव्हाक जोकोविच याने आपली भूमिका स्पष्टपणे मांडतानाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण विषयावरही मत मांडले. तो म्हणाला, ‘‘माझा लसीकरणाच्या धोरणास विरोध नाही. मात्र, आपल्या शरीरास काय योग्य आणि अयोग्य याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असायला हवे. मला माझ्या शरीराला कोणतीही लस टोचून घ्यायची नाही. लसीकरण न केल्याचे परिणाम मला ठाऊक आहेत.’’ ऑस्ट्रेलियाने आपला व्हिसा लसीकरणाअभावी रद्द केला नसून आपल्याबाबतच्या गैरसमजामुळे रद्द केल्याचा आरोपही जोकोविचने केला. ‘माझ्यामुळे लसीकरणविरोधी भावना निर्माण होऊ शकते, असे कारण देत ऑस्ट्रेलियाने माझा व्हिसा रद्द केला. त्यांच्या या आरोपांशी मी अजिबात सहमत नाही,’ असेही तो म्हणाला.
पूनावाला यांची जोकोविचला विनंती
गंमत पाहा, जोकोविचने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्या दोनच दिवसांनी सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी जोकोविचला कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची विनंती केली. ‘लस न घेण्याच्या तुमच्या वैयक्तिक मताचा मी आदर करतो. मात्र, मला तुम्हाला खेळताना पाहायला आवडते. आशा आहे, तुम्ही तुमचे मत बदलणार,’ असे ट्वीट पूनावाला यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी केले होते. अर्थात, ही विनंती जोकोविचने फारशी विचारली घेतली नाहीच.
इंडियन वेल्स, मायामी स्पर्धेतूनही माघारीचा निर्णय
‘मी लस घेतलेली नाही. त्यामुळे माझ्या लसीकरणाचा प्रश्नच येत नाही. नियमांमुळे मी अमेरिकेत येऊ शकत नाही. परिणामी, इंडियन वेल्स, कॅलिफॉर्निया किंवा मायामी या स्पर्धांमध्ये भागही घेता येणार नाही,’ असे नोव्हाक जोकोविच याने स्पष्ट केले. कोणताही आडपडदा न ठेवता, आपल्या लस न घेण्याचा दृष्टिकोन कायम ठेवत सर्बियाच्या या महान टेनिसपटूने पुन्हा स्पर्धांमधील सहभागावर पाणी सोडले. वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असणाऱ्या जोकोविचने 10 मार्च 2022 रोजी ट्वीट करीत ही माहिती दिली. ‘अमेरिकेतील लसीकरणाचे नियम काटेकोर असल्याने स्पर्धेसाठी तेथे जाता येणार नाही’, असे जोकोविच म्हणतो. करोनाप्रतिबंधक लस न घेतल्यामुळे जोकोविचला यंदाच्या टेनिस मोसमात आतापर्यंत फक्त एकाच स्पर्धेत भाग घेता आला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्यावेळी तर यजमान ऑस्ट्रेलियाने लसीकरणाअभावी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेले, पण जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद राखता आले नाही. स्पर्धांमधील सहभागच नसल्यामुळे जोकोविचला जागतिक टेनिस रँकिंगमधील अव्वल क्रमांकही गमवावा लागला. रफाएल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून कारकिर्दीतील 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. आता सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या शर्यतीत फेडरर, जोकोविचला मागे टाकून नदाल एक पाऊल पुढे गेला आहे. कॅलिफोर्निया स्पर्धेच्या ड्रॉमध्ये जोकोविचच्या नावाचा सहभाग होता. मात्र, परदेशी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरण सक्तीचा नियम असल्याने जोकोविचचा मार्ग बंद झाला. अमेरिकेतील इंडियन वेल्स स्पर्धेनेही लसीकरण असेल तरच स्पर्धेच्या आवारात प्रवेश मिळेल, असे धोरण जाहीर केले. ‘कॅलिफोर्निया आणि मायामी स्पर्धांमध्ये माझे नाव आपोआप ड्रॉमध्ये आले. मात्र, तेथील लसीकरणाच्या नियमामुळे मला अमेरिकेत जाता येणार नाही, याचीदेखील कल्पना आहे’, असेही जोकोविच म्हणाला. स्पर्धा संचालक जेम्स ब्लेक यांनीही या वृत्तास दुजोरा दिला होता.
सिनसिनाटी ओपनमधूनही माघार
लसीकरण न झाल्यामुळे जोकोविच अमेरिकेत जाऊ शकणार नाही हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे त्याला सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेला मुकावे लागेल. म्हणूनच त्याने 13 ऑगस्ट 2022 रोजी या स्पर्धेतूनही माघार घेतली. एवढेच काय; पण लसीकरण न झाल्याने जोकोविचला 2022 च्या मोसमातील अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही भाग घेता आला नाही. अमेरिकन ग्रँडस्लॅमला 29 ऑगस्ट 2022 रोजी होती. त्याच्या तीन दिवस आधीच जकोविचने या स्पर्धेत न खेळण्याचे जाहीर केले. करोना प्रतिबंधक लस घेणार नाही, असे जोकोविचने आधीच जाहीर केले होते. जोकोविचला माँट्रियल आणि कॅनडा स्पर्धेतही भाग घेता आला नाही. कारण तेथेही करोना प्रतिबंधक लस अनिवार्य होती. दुखापतीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गेल मॉनफिल्स, रीली ओपेल्का, ऑस्कर ओट आणि डॉमिनिक थीम यांनीही सिनसिनाटी स्पर्धेतून माघार घेतली होती.
अमेरिकन ओपनमध्येही जोकोविचसाठी निदर्शने
2022 च्या मोसमातील अखेरच्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेस 29 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात झाली. मात्र, दिवसाच्या पहिल्या सत्राच्या पूर्वार्धात लक्ष वेधून घेतले ते एका छोट्या समूहाने. फारसे सदस्य नसलेला हा समूह माजी विजेत्या नोव्हाक जोकोविचला पाठिंबा देत होता. लसीकरण न झाल्याने यंदा जोकोविचला अमेरिकन ओपनमध्ये भाग घेता आला नाही. लसीकरण नसणाऱ्या परदेशी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जात होता. लससक्ती मागे घ्या, जोकोविचला स्पर्धेत भाग घेऊ द्या… अशा घोषणा हा समूह करीत होता. एकवेळ स्पर्धांवर पाणी सोडेन, पण लस घेणार नाही, या आपल्या निर्णयावर जोकोविच ठाम होता.
जोकोविचला अखेर मिळाला ऑस्ट्रेलियाचा व्हिसा
मेलबर्न : अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळण्याचे संकेत 15 नोव्हेंबर 2022 रोजी मिळाले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण न झाल्याने जोकोविचला जानेवारी 2022 मध्ये या स्पर्धेत भाग घेण्य़ापासून रोखण्यात आले होते. त्याच्यावर तीन वर्षांची संभाव्य ऑस्ट्रेलियाबंदीही होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार नव्हता. मात्र, एका वृत्तपत्राने 15 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या माहितीनुसार ही बंदीही उठविण्यात आल्याचे संकेत मिळाले. अखेर त्याला 17 नोव्हेंबर 2022 रोजी व्हिसा देण्यात आला. कितीही अटी लादल्या, नियम लादले तरी लससक्ती असेल तेथे खेळणार नाही, या भूमिकेवर तो कायम राहिला. कोरोनाचं मळभ 2022 च्या अखेरपर्यंत निवळल्याने आता लसलक्तीचं महत्त्व फारसं उरलं नाही. त्यामुळे जोकोविचचा मार्ग मोकळा झाला खरा, मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहताना त्याला त्याची जी ‘किंमत’ मोजावी लागली, त्याचे हिशेब त्याने कधी ठेवले नाही. मात्र त्याचे चाहते नक्कीच ठेवतील.
[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]