2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय बॉक्सिंग फेडरेशन वाद
जुलैच्या अखेरच्या आठवड्यात (25 ते 29 जुलै 2022) वादग्रस्त बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि भारतीय बॉक्सिंग फेडरेशन यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले. ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळविणारी लवलिना हिने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर छळवणुकीचा गंभीर आरोप केला. हा आरोप तिने 25 जुलै 2022 रोजी केला आणि त्याच्या तीनच दिवसांनी 28 जुलै रोजी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा होती. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनमधील राजकारणामुळे माझ्या सरावावर परिणाम झाल्याचा आरोपही तिने केला. सरत्या वर्षाला (2022) निरोप देताना भारतीय बॉक्सिंग हे कटू प्रसंग विसरून वाटचाल करील अशी आशा आहे.
आयर्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय बॉक्सिंग संघाचे सराव शिबिर झाले. भारतीय संघ 24 जुलै रोजी रात्री बर्मिंगहॅमला दाखल झाला. मात्र, लवलिनाची खासगी प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना क्रीडानगरीत प्रवेश नाकारण्यात आला. गुरुंग यांच्याकडे स्पर्धेचे ‘अॅक्रिडिएशन’च नव्हते. लवलिनाचे खासगी प्रशिक्षक अमेय कोळेकर यांचीही स्पर्धेसाठी निवड झाली नाही. त्यामुळेच लवलिना भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर संतापल्याचे सांगितले जाते.
लवलिनाने बॉक्सिंग महासंघावर ठोसे देताना जागतिक स्पर्धेच्या वेळीही आपल्याला त्रास दिल्याचा दावा केला. ‘प्रशिक्षकांची साथ नसताना सराव कसा करणार? स्पर्धेच्या पूर्वतयारीवर लक्ष एकाग्र कसे होणार? जागतिक स्पर्धेच्या वेळीही हेच घडले होते. त्या वेळी पूर्वतयारीवर परिणाम झाला होता. या राजकारणाचा माझ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीवर परिणाम होणार नाही, अशी आशा आहे. या राजकारणावर मात करून देशासाठी पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे लवलिना म्हणाली होती. विशेष म्हणजे लवलिनाने आपल्यावरील अन्यायावर वाचा फोडण्यासाठी ट्विटरचे माध्यम निवडले.
‘मला सातत्याने खूप त्रास दिला जात आहे. हे सांगतानाही मला खूप वेदना होत आहेत. ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मला साथ दिलेल्या प्रशिक्षकांना कायम स्पर्धेच्या वेळी दूर ठेवले जात आहे. त्याचा माझ्या सरावावर परिणाम होत आहे. यापैकी एक द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या संध्या गुरुंग आहेत. माझ्या प्रशिक्षकांची संघात निवड करा, असे मी हात जोडून कायम सांगते. हे सर्व पाहून मला खूप त्रास होतो. संध्या गुरुंग राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. स्पर्धेला आठ दिवस आहेत आणि माझ्या प्रशिक्षकांना घरी पाठवण्यात आले आहे,’ अशी तिने कैफियत मांडली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने याची दखल घेत भारतीय बॉक्सिंग फेडरेशन आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेला लवलिनाने उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्याची सूचना केली.
लवलिना बोर्गोहेन हिच्या आरोपांनंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाचा प्रतिदावा
- निवडलेल्या खेळाडूंच्या 25 टक्के सहाय्यक वर्ग असल्याचा निर्णय
- भारतीय संघात 12 बॉक्सर. त्यामुळे चार जणांचा सहाय्यक वर्ग
- अतिरिक्त सहाय्यक वर्गाची मागणी केल्यावर चौघांना मंजुरी; पण त्यांना क्रीडानगरीत प्रवेश नसणार हे स्पष्ट
- आम्ही दोन पुरुष आणि दोन महिला राष्ट्रीय प्रशिक्षकांना निवडले. त्याच्यासोबत डॉक्टर आणि मसाजर
- संध्या यांच्या अॅक्रिडिएशनसाठी वारंवार विनंती; पण अद्याप मंजुरी नाही.
- कोणत्याही स्पर्धेसाठी वैयक्तिक प्रशिक्षक पाठवणे अवघड
- लवलिनाच्या आग्रहामुळे संध्या गुरुंग यांच्या अॅक्रेडिटेशनसाठी प्रयत्न
नाराजी नाट्यानंतर प्रशिक्षकांना प्रवेश
लवलिना बोर्गोहेन हिच्या नाराजीनाट्यानंतर अखेर प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना अखेर 28 जुलै रोजी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे ‘अॅक्रेडिटेशन’ मिळाले आणि त्यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश देण्यात आला. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननेही प्रशिक्षकांना प्रवेश दिल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून, संध्या गुरुंग यांना राष्ट्रकुलचे ‘अॅक्रेडिटेशन’ही मिळाल्याची माहिती माध्यमांना दिली. आयर्लंडमधील 15 दिवसांचे सराव शिबिर आटोपल्यानंतर भारतीय बॉक्सिंग संघ 24 जुलै रोजी रात्री राष्ट्रकुलच्या क्रीडाग्राममध्ये दाखल झाला होता. त्या वेळी ‘अॅक्रेडिटेशन’ नसल्याने लवलिनाच्या खासगी प्रशिक्षक संध्या यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरून लवलिनाने लगेचच ट्विटरवरून नाराजी व्यक्त केल्याने क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) यांनी दखल घेत प्रशिक्षक संध्या यांना ‘अॅक्रेडिटेशन’ मिळवून दिले. ‘संध्या यांना मंगळवारी सकाळी क्रीडाग्राममध्ये प्रवेश देण्यात आला. ‘अॅक्रेडिटेशन’ सह क्रीडाग्राममध्ये त्यांच्या राहण्याची सोयही करण्यात आली आहे’, असे आयओएच्या अधिकाऱ्याने सांगितले.
लवलिनाच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या कामगिरीत प्रशिक्षक संध्या गुरुंग यांच्या मार्गदर्शनासह भावनिक आधाराचाही महत्त्वाचा वाटा आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या लवलिनाला संध्या यांनी सावरले होते. तिचे बौद्धिक घेत तिला वरिष्ठांप्रमाणे मानसिक आधारही दिला. याचा फायदा लवलिनाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाला. अशा प्रशिक्षकांना महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान दूर ठेवले जात असल्याने लवलिनाने नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रकुल क्रीडाग्रामचे नियम काय सांगतात?
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) या वेळी राष्ट्रकुल क्रीडाग्रामचे नियम स्पष्ट केले. नियमानुसार, संघाच्या तुलनेत सपोर्ट स्टाफची संख्या एक तृतीयांश असावी. भारतीय बॉक्सिंग संघात 12 खेळाडू आहेत (आठ पुरुष बॉक्सर, चार महिला बॉक्सर). त्यानुसार प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची संख्या चार असणे बंधनकारक आहे, असा नियम आहे. ‘बॉक्सिंगमध्ये एकामागोमाग एक लढतींचे आयोजन होत असते. त्यामुळे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ पुरेसे असतील तर खेळाडूंना सोयीचे जाते. आयओएने मध्यस्थी करीत 12 बॉक्सरचा सहभाग असलेल्या संघांसाठी सपोर्ट स्टाफची संख्या चारवरून आठ केली’, अशी माहिती बीएआयतर्फे देण्यात आली.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षांची खंत
बर्मिंगहॅम : ऑलिम्पिक, राष्ट्रकुल यांसारख्या बहुविध क्रीडा स्पर्धांच्या वेळी खेळाडूंच्या गरजा पुरवणे खूपच अवघड आहे, अशी टिप्पणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी केली. ऑलिम्पिक ब्राँझ पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) हिने वैयक्तिक प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना क्रीडानगरीत प्रवेश नाकारल्याने टीका केली होती. त्यानंतर खन्ना यांची टिप्पणी अधिक महत्त्वाची मानली जाते. आपली सातत्याने मानसिक छळवणूक होत आहे. गुरुंग यांना प्रवेश नाकारल्याने आपल्या पूर्वतयारीवर परिणाम झाला आहे, असा आरोप करताना गुरुंग यांना तातडीने अधिस्विकृती देण्याची मागणी लवलिनाने केली होती. गुरुंग यांना प्रवेश दिला खरा, मात्र भारतीय बॉक्सिंग महासंघाला संघासोबत असलेले डॉ. करणजीत सिंग यांची अधिस्विकृती (अॅक्रेडिटेशन) रद्द करावी लागली. भारतीय खेळाडूंच्या गरजा पुरवणे अवघड होत आहे. इतरांच्या तुलनेत त्या जास्तच आहेत. खेळाडूंमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावनाच अनेकदा नसते. लवलिना ऑलिम्पिक पदक विजेती आहे. तिची विनंती आम्हाला मान्य करावी लागली. संघासोबतचे डॉक्टर खूपच अनुभवी आहेत. ते क्रीडानगरीबाहेरील हॉटेलमध्ये राहत आहेत. भारतीय संघासोबतचे अनेक पदाधिकारी, प्रशिक्षकांचा मुक्काम हॉटेलमध्ये आहे. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे, असे खन्ना यांनी सांगितले.
लवलिनामुळे पुन्हा वादाचा अंक
बर्मिंगहॅम : लवलिना बोर्गोहेन हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अर्ध्यातच सोडला. त्यावरून भारताचे पथकप्रमुख राजेश भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. हा उद्घाटन सोहळा 28 जुलै रोजी रात्री रंगला. हा सोहळा दोन तास सुरू होता. लवलिना आणि भारतीय बॉक्सिंग संघातील सदस्य महंमद हुसामुद्दीन यांनी अलेक्झांडर स्टेडियमवरून अर्ध्या तासावर असलेल्या क्रीडा ग्राममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी उद्घाटन सोहळा अर्धवट सोडला. याबाबत लवलिना म्हणाली, ‘आम्हाला सरावासाठी लवकर उठायचे होते. कारण लगेचच दुसऱ्या दिवशी आमची लढत आहे. सोहळा आणखी काही वेळ चालणार होता. म्हणून आम्ही स्टेडियम सोडण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमबाहेरून आम्ही टॅक्सी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला टॅक्सी मिळालीच नाही.’ सोहळा अर्धवट सोडूनही या खेळाडूंना फायदा झाला नाही. कारण त्यांना टॅक्सीच मिळत नव्हती. अखेर त्यांना नॅशनल एक्झिबिशन सेंटरवरून क्रीडाग्रामकडे जाणारी पहिली बस घ्यावी लागली. आयोजकांनी भारतीय पथकाला तीन कार उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व भारतीय खेळाडू बसने आले असल्याने कारचे ड्रायव्हर उपलब्ध नव्हते. भारताचे पथकप्रमुख आणि भारतीय बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष राजेश भंडारी या घटनेने नाराज झाले. ते म्हणाले, ‘आम्ही सोहळ्यात होतो. दोन्ही बॉक्सर सोहळा अर्धवट सोडून निघून गेल्याचे मला नंतर कळले. आम्ही बसने आलो असल्याने टॅक्सीचा पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यांना लवकरच जायचे होते, तर त्यांनी सोहळ्याला यायचेच नव्हते. सकाळी स्पर्धा असलेले आणि सरावासाठी लवकर उठावे लागणारे अनेक खेळाडू या सोहळ्यासाठी आलेच नव्हते. ते समजण्यासारखे होते. याबाबत मी बॉक्सिंग संघाशी बोलणार आहे.’ भारताच्या एकूण १६४ अॅथलीट आणि अधिकाऱ्यांनी उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला. भारतीय महिला क्रिकेट संघाची लढत सकाळीच असल्याने त्यांनीही हॉटेलमध्येच राहणे पसंत केले. प्रत्यक्ष लढतींंना सुरुवात होण्यापूर्वीच लवलिना या ना त्या कारणाने प्रकाशझोतात येत होती.