एशियाडच्या नौकानयनमधील यशाची पुनरावृत्ती ऑलिम्पिकमध्येही होणार?
आशियाई स्पर्धेत भारताने नौकानयनमध्ये यश मिळवले होते. आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा भारतीय नौकानयन संघाचे मुख्य प्रशिक्षक इस्माईल बेग यांना आहे. ऑलिम्पिकच्या नौकानयन स्पर्धेतला भारताचा दोन दशकांचा प्रवास इस्माईल बेग यांनी पाहिला आहे. मात्र, ते तितके सोपेही नाही, याचंही भान बेग यांना आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन खेळाडूंना कामगिरी आणखी उंचवावी लागणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन
भारताने एशियाडमध्ये (आशियाई स्पर्धा) दोन सुवर्णपदकांसह 23 पदकं जिंकली आहेत. ही उत्तम कामगिरी असली तरी ऑलिम्पिकचं महायुद्ध वेगळंच आहे. कारण 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकपासून भारताचे हात रिकामेच राहिले आहेत. रियो ऑलिम्पिकमधील कामगिरी सोडली तर भारताने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. रियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा दत्तू भोकनळ पुरुषांच्या सिंगल स्कलमध्ये 13 व्या स्थानी राहिला होता. दोन दशांतली ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन संघात अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंह लाइटवेट डबल स्कलमध्ये सहभागी होणार आहेत. मे 2021 मध्ये त्यांनी टोकियोतील एशिया ओशियाना उपखंडात रेजेटाच्या अंतिम शर्यतीत दुसरे स्थान मिळविले होते. हे दोन्ही खेळाडू पुण्यातील आर्मीच्या नौकानयन केंद्रावर सराव करीत आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक खेळांवर गंडांतर आले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी भारतीय नौकानयनपटूंचा सराव समाधानकारक सुरू असल्याचे बेग यांनी सांगितले. टोकियोतच पात्रताफेरी पार केल्याने तिथल्या अनुभवाचा फायदा भारतीयन नौकानयन खेळाडूंना नक्कीच होईल, असा विश्वासही बेग यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारीमुळे जपानने सध्या कडक निर्बंध लागू केले आहेत. भारतात कोरोना महामारीचा उद्रेक पाहता, जपानने भारतीय खेळाडूंबाबत कडक धोरण अवलंबले आहे. त्याचा अनुभव भारतीय नौकानयन संघाने एशिया ओशियाना स्पर्धेत घेतला आहे. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये फारशा अडचणी येणार नाहीत, असा आशावादही बेग यांनी व्यक्त केला.
पुण्यात सराव, जपानमध्ये स्पर्धा
भारतीय नौकानयन खेळाडू पुण्यात सराव करीत आहेत. ती अपरिहार्यता आहे. कोरोना महामारीमुळे भारतीय नौकानयन खेळाडूंना सरावासाठी विदेशात जाता आलेले नाही. जपान आणि पुण्यातील परिस्थितीत मोठा फरक आहे. जपानमध्ये खेळायचे असेल तर तिथल्या वातावरणात सराव करणे अधिक उत्तम झाले असते. तसंही भारतीय नौकानयन खेळाडूंना पोर्तुगालमध्ये सराव करण्यास मंजुरी मिळालीही होती. मात्र, तिथे विलगीकरणाचे नियम खूपच कडक आहेत. त्यामुळे हा पोर्तुगाल दौरा रद्द करावा लागला. जपानमध्ये समुद्रात नोड बांधण्यात आले आहेत. कारण तिथे वारे वेगाने वाहतात. पुण्यात अशी परिस्थिती नाही. पुण्यात पाणी संथ वाहतं. ऑलिम्पिकमध्ये कामगिरी उंचवायची असेल तर भारतीय नौकानयन खेळाडूंना अशा ‘फ्लॅट वॉटर’मध्ये सराव पुरेसा ठरणार नाही. जपानच्या समुद्रात वेगवान हवेमुळे आव्हान आणखी कठीण होऊ शकतं. मात्र, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे, हे तिथं गेल्यावरच कळेल.
एशियाडमध्ये 1982 पासून २३ पदके
भारतीय नौकानयन खेळाडूंची एशियाडमधील कामगिरी अलीकडे चांगली राहिली आहे. बजरंगलाल ताखड़ याने 2010 च्या ग्वांग्जू एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जाकार्तामध्येही 2018 च्या एशियाडमध्ये स्वर्ण सिंह, दत्तू भोकनळ, ओम प्रकाश आणि सुखमीतसिंग या चौकडीने सांघिक स्कल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती. एशियाडमधील कामगिरीचा विचार केला तर भारताने 1982 पासून आतापर्यंत नौकानयनमध्ये 23 पदके जिंकली आहेत.
2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारतीय नौकानयन संघ
2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन संघाने पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. त्या वेळी कासम खान आणि इंदरपाल सिंह या दोघांनी कॉक्सलेस पेयरमध्ये ऑलिम्पिक पात्रता गाठली होती. त्या वेळीही इस्माईल बेग हेच कोच होते. बेग म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकमध्ये एशियाडमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वेळी भारतीय नौकानयन खेळाडूंची कामगिरी उंचावत आहे. आणखी थोड्या मेहनतीची गरज आहे. त्यासाठी सरकारची अशीच मदत मिळत राहिली तर भारत नक्कीच ऑलिम्पिक पदक जिंकेल. त्यासाठी देशात नौकानयनचे जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्याची गरज आहे.’’ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन संघाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे यात दुमत नाही. कारण ऑलिम्पिकचे मापदंड पाहिले तर त्या तुलनेत भारतीय नौकानयन खेळाडूंचा वेग कमी आहे. थोडा आणखी वेग वाढविण्याची गरज असल्याचे मत बेग यांनी व्यक्त केले.
लक्ष्य बी फायनलचं
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानयन खेळाडूंचं लक्ष्य बी फायनलमध्ये जागा मिळविणे आहे. एकूण ऑलिम्पिकमधील 18 संघांपैकी सात ते बारावे स्थान मिळविणारा संघ बी फायनलमध्ये जातो. त्यावर बेग म्हणाले, ‘‘ऑलिम्पिक नौकानयनमधील चौदा स्पर्धांपैकी एकमेव लाइटवेट प्रकाराची स्पर्धा असते. भारत या प्रकारात सहभागी झालेला आहे. ही स्पर्धा आव्हानात्मक असते. यात खेळाडूचं वजन 70 किलोपर्यंत राखावं लागतं. आम्ही बी फायनलमध्ये पोहोचण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. यात एकूण 18 संघ सहभागी झाले आहेत. ‘बी’मध्ये स्थान मिळविणे म्हणजे सात ते बारावे स्थान मिळविणे. जर बी फायनलमध्ये पोहोचलो तर ती मोठी कामगिरी मानता येईल.’’ एशियाडमध्ये सुवर्ण जिंकणारा स्वर्ण सिंह 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सिंगल स्कल प्रकारात 16 व्या स्थानी राहिला होता. डबल स्कलमध्ये मनजितसिंग आणि संदीप कुमार 19 व्या स्थानी राहिला होता.