रणजी स्पर्धा का खेळणार नाही रोहित शर्मा?
रोहित शर्माने आपण मुंबई वि. जम्मू-काश्मीर या सामन्यात खेळणार असल्याचे सांगितले. यामुळे तो २०१५च्या नोव्हेंबरनंतर प्रथमच रणजी लढत खेळणार आहे.

रणजी स्पर्धा का खेळणार नाही रोहित शर्मा?
रोहित शर्माने आपण मुंबई वि. जम्मू-काश्मीर या सामन्यात खेळणार असल्याचे सांगितले. यामुळे तो २०१५च्या नोव्हेंबरनंतर प्रथमच रणजी लढत खेळणार आहे.
19 January 2025
‘रणजी स्पर्धेला आम्ही कधी कमी लेखण्याचा प्रश्न येत नाही. आंतरराष्ट्रीय सामने लागोपाठ खेळत असताना ताजेतवाने होण्याचीही गरज असते. त्यामुळे या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणे भाग पडते,’ असे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. चॅम्पियन्स करंडक वन-डे स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितने हे मत व्यक्त केले.
रोहितने आपण मुंबई वि. जम्मू-काश्मीर या सामन्यात खेळणार असल्याचे सांगितले. यामुळे तो २०१५च्या नोव्हेंबरनंतर प्रथमच रणजी लढत खेळणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत स्पर्धा खेळण्याची सक्ती केल्यामुळेही आपण खेळणार असल्याचे सुचित केले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोसम बघितल्यास देशांतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला वेळच कुठे असतो, अशीही विचारणा केली.
‘सहा-सात वर्षांचा भारतीय क्रिकेटचा कार्यक्रम बघितलात तर मी फार दिवस घरीही नव्हतो, हे तुमच्या लक्षात येईल. सातत्याने सामने सुरू होते. आता आयपीएल संपल्यावर वेळ मिळतो; पण त्या वेळी कोणतीही देशांतर्गत स्पर्धा नसते. देशांतर्गत स्पर्धेतील सामने सप्टेंबरला सुरू होतात आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये संपतात. त्याच कालावधीत भारतीय संघ खूपच सामने खेळत असतो,’ याकडे रोहितने लक्ष वेधले.
‘सर्वच खेळाडू सर्वच प्रकारात खेळत नाहीत. त्यांना देशांतर्गत स्पर्धेत खेळता येते. गेल्या सहा-सात वर्षांत काय झाले ते तुम्हीच बघा. मी २०१९पासून नियमितपणे कसोटी संघात आहे. त्या वेळी देशांतर्गत स्पर्धेसाठी वेळच मिळत नाही. खेळाडूला ताजेतवाने होण्यासही वेळ हवा असतो. नव्या मोसमासाठी, मालिकेसाठी तयार होण्यासाठी हे आवश्यक असते,’ असाही मुद्दा रोहितने मांडला.
‘देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याकडे आता जास्त लक्ष वेधले जात आहे. कोणीही ही स्पर्धा दुर्लक्षित करीत नाही, गृहीत धरून चालत नाही. एखादा खेळाडू मोसमात किती सामने खेळला आहे. त्याला किती विश्रांती हवी, त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. आता वेळ असेल तर देशांतर्गत स्पर्धेत खेळणे सक्तीचे केले आहे,’ असे रोहित म्हणाला.
यशस्वी जयस्वाल खेळणार
मुंबईच्या आगामी लढतीत यशस्वी जयस्वालही खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यशस्वीने हे मुंबईचे प्रशिक्षक ओमकार साळवी यांना कळवले आहे. रोहित तसेच यशस्वीने मुंबई संघासह सराव केला आहे. दरम्यान, सर्फराझ खान या सामन्यात खेळणार नाही. ऑस्ट्रेलियात सरावाच्या वेळी तो जायबंदी झाला होता. तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही.
कोहली, राहुल अनुपस्थित
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी मात्र रणजी लढतीत खेळणार नसल्याचे कळवले आहे. विराट कोहलीची मान दुखावली आहे. त्याने ८ जानेवारीस इंजेक्शन घेतले आहे, त्यानंतरही आपणास वेदना होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे तो दिल्ली संघातून राजकोट येथील सौराष्ट्रविरुद्धची लढत खेळणार नाही. कोपर दुखावलेले असल्यामुळे राहुलने आपण पंजाबविरुद्धच्या लढतीत कर्नाटक संघाकडून खेळणार नाही, असे कळवले आहे. देशांतर्गत स्पर्धेत न खेळण्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेण्यास खेळाडूंना सांगितले आहे. कोहली आणि राहुल ३० जानेवारीपासून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात खेळू शकतात. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिली लढत ६ फेब्रुवासी आहे. ऋषभ पंत (दिल्ली), शुभमन गिल (पंजाब) आणि रवीद्र जाडेजा (सौराष्ट्र) यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.