निळावंती ग्रंथामागचे रहस्य काय?

(ता.क. खेळियाड ब्लॉग कोणत्याही अंधश्रद्धांना खतपाणी घालत नाही. जे वाचलं, त्यातलं वास्तव मांडण्याचा हा एक प्रयत्न)
असं म्हणतात, की ‘निळावंती’ ग्रंथामुळे पशु-पक्ष्यांची भाषा अवगत होते. कारण या ग्रंथात अशी अघोरी विद्या आहे, जी आत्मसात केल्याने एक तर ती व्यक्ती ठार वेडी होते किंवा त्याचा वंशच खुंटतो. त्यामुळेच ‘निळावंती’ हा भारतातील सर्वांत कुप्रसिद्ध ग्रंथ म्हणूनच ओळखला जातो. ज्यांचा मंत्रातंत्रावर विश्वास आहे, त्यांनी हे वाचून वेगळ्या कल्पनांना जन्म घालू नये. कारण या ग्रंथाने आधीच इतक्या गूढ, अगम्य कल्पना जन्माला घातल्या आहेत, की ‘निळावंती’चं एखादं पानही हाती लागलं तरी लोकांमध्ये अद्भुत आणि कुतूहल दोन्ही भावना जागृत होतात..
मुळात या ग्रंथाविषयी माहिती असणारा एकही माणूस या पृथ्वीतलावर नाही. जी माहिती सांगितली जाते, ती खरी आहे किंवा नाही, याच्या सत्यतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे निळावंती ग्रंथामागचे रहस्य काय, या प्रश्नाभोवती मन घुटमळत राहिलं. आजवर अनेक लेखकांनी ‘निळावंती’वर बरंच काही लिहिलं आहे. बाळासाहेब सरनोबत यांनी ‘निळावंती’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. अर्थात, त्याचं त्यांनी संकलन आणि संपादन केलेलं आहे. थोडक्यात, ‘निळावंती’ या नावाने अनेकांवर गारूड केलं आहे. हा इतका कुप्रसिद्ध ग्रंथ आहे, की भारत सरकारने 1932 मध्ये या ग्रंथाचं मुद्रणच थांबवलं. याला अधिकृत दुजोरा कुठे मिळत नाही. मुद्रण बंद केलं असेल तर त्या ग्रंथाच्या परिणामामुळे नाही तर अंधश्रद्धेमुळे बंद केले असेल. कारण या अघोरी विद्येच्या अंधश्रद्धेपायी पक्ष्यांचे बळी घेतले जात असत. कदाचित याचमुळे या ग्रंथाच मुद्रण थांबवले असेल. या ग्रंथाच्या मूळ प्रती काही जणांकडे आहेत, पण तेही बोटावर मोजण्याइतकेच असतील कदाचित. आंतरजालावर या ग्रंथाची माहिती घेत असताना एका व्यक्तीने या ग्रंथाची मूळ 25 पाने आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. ज्याला हवी त्याला ती ईमेलवर पाठवायची. मी त्यात अजिबात रस दाखवला नाही; पण ज्यांना या पानांची कॉपी मिळाली, त्यांनी काही पाने अस्पष्ट असल्याची तक्रार केली होती.
आंतरजालावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरून असं समजलं, की या ग्रंथाविषयी कोणालाच काहीही माहिती नाही. कुणी म्हणतं, हा पौराणिक ग्रंथ आहे, तर कुणाला तो प्राचीन असल्याचे वाटते. या ग्रंथाविषयी इतकं कुतूहल का, तर पक्ष्यांना गुप्तधन कळतं. म्हणजे ज्यांना पक्ष्यांची भाषा कळते त्यांना गुप्तधन सापडतं. डोंबलाचं गुप्तधन! जर ही ‘निळावंती’ची विद्या आत्मसात केल्याने ती व्यक्ती ठार वेडी होत असेल तर त्याच्यासाठी ते धन आणि दगडं सारखीच. आणि जर या विद्येने त्याचा संपूर्ण वंशच संपत असेल तर ते गुप्तधन सापडूनही काय उपयोग, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. त्यामुळे हा ग्रंथ वाचला काय नि न वाचला काय, दोन्हींचे सारखेच परिणाम.
या ग्रंथाने इतक्या सुरस कथा रचल्या, की स्वामी विवेकानंदांनाही त्यात नाहक गोवले. म्हणे, स्वामी विवेकानंदांनी हा ग्रंथ वाचला म्हणून ते वयाच्या 39 व्या वर्षी अकाली हे जग सोडून गेले. हे साफ चुकीचे आहे. त्यांनी समाधी घेतली होती.
निळावंती ग्रंथामागचे रहस्य काय?
एकूणच या ‘निळावंती’ने इतक्या अनाकलनीय कथा जन्माला घातल्याने या ग्रंथाविषयी गूढ वाढतच आहे. असं म्हणतात की ‘निळावंती’ची कथा एका बैठकीत संपूर्ण ऐकू नये आणि सांगणाऱ्यानेही ती सांगू नये. मात्र, हाही एक भ्रम आहे. हा ‘निळावंती’ ग्रंथ कुणाच्या हाती लागला नाही, पण त्याच्याविषयी ज्या चुकीच्या गोष्टी पसरल्या त्यामुळे अनेक पक्ष्यांचे नाहक बळी गेले आहेत. असं म्हणतात, की कबूतरे पायाखाली चिरडली जायची. असे केल्याने कबूतर विव्हळले की त्या आवाजाने निळावंती येईल, अशीही मूर्खपणाची भावना लोकं बाळगत असायची. खरं काय माहीत नाही. कुणाला वाटतं, निळावंती एक मासा आहे. त्यावरूनही अनेकांनी अतर्क्य गोष्टी रंगवल्या आहेत.
मुळात ‘निळावंती’ | Nilavanti | नावाचा ग्रंथ अस्तित्वात नाही. किंबहुना असेल तर त्याच्या पत्रावळ्या इकडेतिकडे विखुरल्या असतील. समजा, तो ग्रंथ संपूर्ण मिळालाही, तरी त्यातून कोणतीही विद्या आत्मसात होणार नाही. केवळ वाचनानंद मिळेल. काही अभ्यासकांनी या ग्रंथाचा अभ्यास केला, पण त्यातून त्यांना काहीही झालेलं नाही. म्हणजे ना मृत्यू झाला, ना वेडे झाले. तरीही प्रश्न उरतोच… मग निळावंती ग्रंथामागचे रहस्य काय?
काय आहे निळावंती कथा?
याची कथा माझ्या वाचनात आली. ज्याने ही कथा ऐकली त्यानेही ही कथा त्याच्या स्मृतीप्रमाणे दिली आहे. या कथेतून निळावंती ग्रंथामागचे रहस्य उलगडते का बघूया…
तर ही कथा अशी : पूर्वी बैलगाडीशिवाय दुसरं वाहन नव्हतं. त्या वेळी व्यापारी मंडळी बैलगाडीनेच मजलदरमजल प्रवास करायचे.
असाच धनवान तरुण प्रवास करीत होता. रात्र होते आणि नेमकी त्याची बैलगाडी मोडते.
रात्रीचा किर्रर्र अंधार आणि त्यात बैलगाडीने दगा दिला. तेवढ्यात दरोडेखोर त्याच्यावर हल्ला चढवण्यासाठी धावतात. तरुणाची तर पाचावर धारण बसते.
जीव वाचवण्यासाठी तो जंगलाच्या दिशेने बेफामपणे पळत सुटतो. दरोडेखोर दिसेनासे झाले तरी तो पळतच राहतो. तो प्रचंड भेदरलेला असतो.
अखेर धाप लागून तो मूर्छित होऊन जमिनीवर कोसळतो. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांनी त्याला जाग येते.
पाहतो तर काय, एक सुंदर तरुणी त्याची शुश्रूषा करीत होती. तिचं आरसपानी सौंदर्य पाहून तो तिच्यावर मोहित होतो.
तिला विचारतो, माझी काळजी घेणारे हे सुंदर मुली, तुझं नाव काय?
ती म्हणते, मी निळावंती.
कालांतराने तो धनवान तरुण ठणठणीत होतो. या दरम्यान तो तिच्यात प्रेमात पडतो.
त्याला ती इतकी आवडते, की तो तिला लग्नाची गळ घालतो. निळावंती लग्नास तयार होते, पण तिच्या काही अटी असतात.
ती अट सांगते, रात्री मी तुझ्यासोबत झोपणार नाही. दुसरे म्हणजे रात्री मी कुठेही जाईन. माझा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा नाही.
तो या सगळ्या अटी मान्य करतो.
मग दोघेही गावात येतात. ती होतीच कमालीची रूपवान. ही या पृथ्वीतलावरचीच का, असाही प्रश्न अनेकांना पडला असेल.
लग्नाच्या पहिल्या रात्री अटीप्रमाणे निळावंती त्याच्यासोबत झोपली नाही.
शयन कक्षातून थेट बाहेर पडली. ती दुसरीतिसरी कोणी नाही, तर एक यक्षिणी होती.
अशी यक्षिणी जी पृथ्वीवर रेंगाळलेली असते.
कदाचित शापाने असेल किंवा अन्य काही कारणाने, पण ती या पृथ्वीवरून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती.
तिला आपल्या लोकांत पोहोचण्यासाठी मार्ग शोधायचा होता. त्यासाठी गूढ ज्ञान आत्मसात करायचे होते.
हेच तिचं अंतिम ध्येय होतं. याच ध्येयासाठी ती रात्रभर भटकायची.
अतृप्त आत्मे, भुतंखेतं, यक्षांशी ती संवाद साधायची. ते जे काही सांगतील ते लिहून ठेवायची.
हे ती हजारो वर्षांपासून करायची. त्यामुळे तिच्याकडे अनेक गूढ तंत्रमंत्रांची जंत्री जमा झालेली असते.
अनेक विद्या तिने आत्मसात केलेल्या असतात. हे सगळं ज्ञान तिला काही सहज मिळालेलं नसतं.
त्यासाठी तिला भूतं, सिद्ध पुरुष, आत्म्यांना काही तरी द्यावे लागायचे. काही तरी त्याग करावा लागायचा.
मग त्यासाठी एखाद्या प्राण्याचा बळी असो वा एखादे हवन. कधी कधी तर स्वतःचे रक्तही काढावे लागायचे.
निळावंतीच्या या गूढ रहस्यमयी जीवनामागे एक सत्य दडलेले होते.
एका सिद्ध पुरुषाने तिला सांगितले होते, की तुला अमुक गावात ज्ञान मिळेल.
ते गाव धनवान तरुणाचं असतं, ज्याच्याशी निळावंती लग्न करून आलेली असते.
या गावात प्रवेश करण्यासाठीच तिने हा धनवान तरुण हेरला होता. एकूणच तिच्या योजनेप्रमाणे सगळे जुळून आले होते.
आता गाव म्हंटलं म्हणजे तिथं कुचाळक्या आल्याच.
मग तिच्याविषयी तिच्या नवऱ्याला काहीबाही सांगायचं, त्याचे कान भरायचे असे उद्योग सुरू झाले.
गावातल्या जनावरांच्या मृत्यूमागे हीच निळावंती आहे, असाही तिच्यावर आळ घेण्यात आला.
निळावंतीवर याचा काहीही परिणाम होत नव्हता.
कारण तिला हे गाव म्हणजे बाहेर पडण्याचा एक मार्ग होता.
निळावंतीला आपल्या लोकांमध्ये परतण्याची ओढ लागलेली होती. अखेर तिला मार्ग सापडला.
इथून बाहेर पडायचं असेल तर एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे. ही नदी पार करायची असेल शेवटी निळावंतीला समजते कि आपल्या लोकांत जाण्यासाठी तिला एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे. ही नदी पार करण्यासाठी तिला एका नावेची गरज होती.
ही अशी नाव असते जी फक्त दिव्य आत्म्यांनाच दिसू शकेल. आता हे दिव्य आत्मेही तिला नाव देण्यास तयार होतील, पण त्यासाठीही तिला काही तरी त्याग करणे आलेच. म्हणजे तिला काही तरी भेटवस्तू द्यावी लागेल. ही भेटवस्तू देण्याचंही ज्ञान आता तिला प्राप्त झालेलं होतं.
एका घुबडाकडून तिला माहिती मिळते. अमावास्येच्या रात्री गावातील नदीतून एक प्रेत वाहत येणार आहे, अशी माहिती घुबड तिला देते. हे घुबड दुसरंतिसरं कोणी नाही तर दिव्य आत्मा असतं. नदीच्या उगमस्थानाकडे एक युद्ध सुरू असतं. या युद्धात एक सैनिक धारातीर्थी पडतो.
मात्र, प्राण सोडण्यापूर्वी तो आपल्या चिमुकल्या मुलीची आठवण म्हणून एक ताईत हाताला बांधतो. त्या ताईताला धरूनच तो प्राण सोडतो. हा ताईत साधासुधा नसतो, तर त्यातही दिव्य दडलेलं असतं. निळावंतीने हा ताईत त्या घुबडाला दिला तरच तिला दिव्य नावेतून पैलतीरी जायला मिळणार होतं.
त्या अमावास्येच्या रात्री निळावंती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडते. प्रत्येक रात्री निळावंती नेमकी बाहेर जाते कुठे, या प्रश्नाने तिचा नवरा नेहमीच अस्वस्थ असतो. या वेळी मात्र तो तिच्या मागे मागे जातो. तिला त्याची चाहूल लागते, पण ती त्याला थांबवत नाही.
घुबडाने सांगितल्याप्रमाणे गावातील नदीकिनाऱ्यावर प्रेत वाहत येते. निळावंती नदीत उडी घेते आणि ते प्रेत किनाऱ्यावर आणते. हा सगळा प्रकार तिचा नवरा पाहतो. त्याला तिची किळस येते. न राहवून तो तिला विचारतो, हे काय करतेस? निळावंती त्याच्या प्रश्नांना अजिबात उत्तर देत नाही.
तिला फक्त त्या प्रेताच्या हातातलं ताईत हवा असतो. ती तो ताईत घेऊन पळणार, तोच तिच्या नवऱ्याकडून अनपेक्षितपणे विरोध होतो. तो तिच्यावर तंत्रमंत्राचा प्रयोग करतो.
हा तिला मोठा धक्का असतो. ज्याला एक सामान्य माणूस समजली होती तो तर राक्षस होता. त्याला सगळे जादूटोणे माहीत होते. तो ताईत घेऊन पळून जातो. ती संतप्त होते. या संतापातच ती एका पक्ष्याचे रूप घेऊन जंगलात निघून जाते.
निळावंतीने जे काही लिहून ठेवलेलं असतं, ते सगळं सामान गावातील एक माणूस गोळा करतो. त्यात तिने लिहिलेली पाने असतात. त्याला त्यातली काहीही माहिती नसते. त्यात जे लिहिलेलं असतं त्या ज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो. निळावंतीने लिहिलेली थोडीथोडकी नव्हे तर हजारो पाने असतात.
त्याला सूत्रबद्ध अशी कोणतीही रचना नसते. प्रत्येक पानावर वेगवेगळी भाषा असते. त्याची माहिती फक्त निळावंतीलाच ठाऊक असते. काही पानांवरची भाषाही कुणाला ठाऊक नसते. जेवढी माहिती मिळते त्या माहितीवर जो ग्रंथ जन्माला येतो, तो म्हणजे निळावंती.
तर अशी आहे या निळावंतीची कहाणी. जी मला आंतरजालावर आढळली, आकलन झाली ती मी सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथेचा खरे-खोटेपणा कुणालाही माहिती नाही. जिथं जिथं निळावंती या ग्रंथावर लिहिलं आहे, तिथं सगळ्यांनीच ऐकीव माहितीच्या आधारावरच तर्क मांडले आहेत.
ठोस असे कोणीही काहीही सांगितलेले नाही. थोडक्यात म्हणजे जे हाती लागले त्यात मंत्रतंत्रच आहेत, त्यात कोणतीही सूत्रबद्ध मांडणी नाही, हेही मी नाही, तर वाचलेल्या माहितीच्या आधारावर सांगत आहे. यात अनेक पक्ष्यांच्या बोलण्याचे मंत्र असल्याचेही म्हंटले जाते.
यातला एकही मंत्र काम करीत नाही. या कथेवरून एक तर्क असाही असू शकतो, की ज्या दिव्य आत्म्यांशी निळावंतीने संवाद साधला, त्याची माहिती या ग्रंथात असावी किंवा तो संवाद कसा साधावा, याची माहिती असावी. त्याच्या सत्यतेचा मी कोणताही दावा करीत नाही, तर माझ्या वाचनात जे आलं तेच इथं नमूद केलं आहे.
निळावंती | Nilavanti | ग्रंथाची विद्या अवगत असल्याचा अनेकांनी दावा केला आहे, तर काहींनी अमुक व्यक्तीला निळावंतीची विद्या कळते, असे दावे केले आहेत. प्रत्यक्षात कुणालाही याची प्रचीती आलेली नाही. असं म्हणतात, की जळगाव जामोदजवळील भेंडवळ येथे वाघ गुरुजी नावाची व्यक्ती आहे.
तिला ही विद्या अवगत आहे. फुनवाडी बाजारजवळ बुकडी बुद्रुक येथे रस्तंभा नदीसंगमाजवळ कनकरनाथ भेंडोळे गुरुजी यांच्याकडे हा ग्रंथ असल्याचा दावा आहे.
त्यांना या ग्रंथाचे ज्ञान असल्याचेही म्हंटले जाते.
खेड शहराजवळील चाकदेव येथील घारनाथ गुरुजींकडे या ग्रंथाची दोन जुनी ताडपत्रे आहेत, ज्यावर निळावंतीने लिहिले आहे. ती आता वाचता येत नाही.
अनेक मांत्रिक अशा निळावंतीची भीती दाखवतात. पण खरे काय याची प्रचीती कोणालाही आलेली नाही.
तर या निळावंतीची कथा अशी आहे. महाभारतातील कहाण्या जशा असतात, अगदी त्याच ढंगात.
याबाबत कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…
निळावंतीवर ॲनिमेशन चित्रपट
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#81d742″ header_line_color=”#81d742″ include_category=”1634″]