काय आहे बॅझबॉल क्रिकेट?
काय आहे बॅझबॉल (Bazball) क्रिकेट? बॅझबॉल क्रिकेटची सुरुवात कधी झाली? टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या बॅझबॉल शब्द सातत्याने कानी पडत आहे. विशेषत: इंग्लंड संघाच्या कसोटी सामन्यांत या नावाचा सातत्याने गजर होतो. जाणून घेऊया बॅझबॉलशी संबंधित काही महत्त्वाची माहिती…
बॅझबॉल (Bazball)वर सुनील गावस्कर यांनी एक टिपणी केली होती… ते म्हणाले होते, की भारताविरुद्ध जर इंग्लंडचा बॅझबॉल असेल, तर आमच्याकडे विराटबॉल आहे.. गावस्कर यांची ‘विराटबॉल’ची टिपणी हवेतच विरली. कारण विराट कोहली या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.
बॅझबॉल (Bazball)ने कशी बदलली क्रिकेटशैली?
जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ एकापाठोपाठ कसोटी मालिका गमावत होता. इंग्लंड जागतिक कसोटी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातच संघर्ष करताना दिसत होता. पहिल्या टप्प्यात इंग्लंड संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. फक्त भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इंग्लंड संघाला ॲशेस मालिकेतही धोबीपछाड मिळाली. एवढेच नाही, तर इंग्लंड संघाला वेस्ट इंडीज संघाविरुद्धही पराभवाची नामुष्की ओढवली. सद्य:स्थितीत क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज दुबळा ठरत आहे. तरीही इंग्लंड विंडीजकडून पराभूत झाला.
यावरून जो रूट याचं नेतृत्व टीकेचं लक्ष्य ठरलं. अखेर जो रूटने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. जो रूट याच्या निर्णयानंतर 28 एप्रिल 2022 रोजी बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. बेन स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर काही दिवसांतच न्यूझीलंडचे माजी कर्णधार ब्रँडन मॅकलम यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. थोडक्यात, त्यांनी ख्रिस सिल्व्हरवूड यांची जागा घेतली. एकीकडे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले, तर दुसरीकडे इंग्लंड संघाने क्रिकेटची नवी व्याख्या लिहिली.
ब्रँडन मॅकलम यांनी प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ‘बॅझबॉल’ शब्द सर्वांच्या कानी पडू लागला. ब्रँडन मॅकलम इंग्लंडचे प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर संघाने कसोटीमध्ये आपल्या खेळात बरेच बदल केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातही जो कसोटी सामना झाला, त्यात बॅझबॉल या नावाचीच चर्चा अधिक झाली. टीम इंडिया कसोटी सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे ‘बॅझबॉल’ (Bazball) पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
अर्थात, बॅझबॉलची मात्रा दक्षिण अफ्रिका संघाविरुद्ध चालली नाही. इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केले. हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. त्यामुळे बॅझबॉल (Bazball)वरून इंग्लंड संघ प्रचंड ट्रोल झाला.
बॅझबॉल (Bazball) शब्द नेमका आला कुठून?
कदाचित तुम्हाला बॅझबॉल शब्दाबाबत फारशी माहिती नसेल. या शब्दावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये बरेच प्रश्न आहेत. हा शब्द नेमका आला कुठून? आणि या शब्दाचा नेमका अर्थ काय? चला तर या शब्दाविषयी विस्ताराने चर्चा करूया…
इंग्लंड क्रिकेट संघाला ‘बॅझबॉल गेम’मुळे (Bazball Game) बरंच यश मिळालं आहे. विशेषत: कसोटी प्रारूपमध्ये…
खरं तर इंग्लंड क्रिकेट संघ कसोटी क्रिकेटमध्ये टी 20 थाटात बॅटिंग करतो. त्यामुळे कसोटी प्रारूपची पद्धत बरीच बदलली.
बॅझबॉलची श्रीलंकेशी तुलना?
1996 च्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेनेही अशीच काहीशी पद्धत जगासमोर आणली होती. असं म्हणतात, की 1996 च्या विश्व कप स्पर्धेद्वारे श्रीलंकेने जगासमोर क्रिकेटमध्ये नवा वाक्प्रचार शिकवला होता. श्रीलंकेने संपूर्ण स्पर्धेत जी रणनीती स्वीकारली होती, तिचा यापूर्वी कोणत्याही संघाने विचारही केला नव्हता. पहिल्यांदा या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने जगाला विचार करण्यास भाग पाडले. वनडे सामन्यात सुरुवातीची 15 षटके हाणामारीची असतात हे श्रीलंकेमुळे जगाला कळलं. कारण सुरुवातीच्या 15 षटकांत केवळ दोन क्षेत्ररक्षक 15 यार्डाबाहेर असतात. ही पद्धत फक्त वन-डेपुरती मर्यादित होती. बॅझबॉलची तुलना श्रीलंकेच्या या शैलीशी होऊ शकत नाही. आक्रमकतेचे साम्य वगळता बॅझबॉल बराच वेगळा आहे. बॅझबॉल (Bazball) सर्वच प्रारूपांमध्ये खेळला जातो. विशेषत: कसोटी सामन्यांत. विशेष म्हणजे या शैलीत षटकांची कोणतीही मर्यादा नसते.
इंग्लंड संघाचा प्रयत्न हाच असतो, की कोणतीही लढत बरोबरीत सुटण्याऐवजी ती निकाली निघावी. इंग्लंड संघाच्या या भूमिकेमुळेच ‘बॅझबॉल’ची जगभर चर्चा होत आहे.
बॅझबॉल नावामागचे गुपित
इंग्लंड क्रिकेट संघात ‘बॅझबॉल गेम’ (Bazball) आणण्याचं क्रेडिट इंग्लंडचा प्रशिक्ष ब्रँडन मॅकलम याला जातं. असं म्हणतात, की ब्रँडन मॅकलम इंग्लंड संघाचे प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर संघाने कसोटीमध्ये आपल्या शैलीत मोठे फेरबदल केले.
ब्रँडन मॅकलम यांनी आपल्या कारकिर्दीत नव्या प्रकारचं क्रिकेट खेळण्यास उद्युक्त केलं होतं. न्यूझीलंड संघातही हा बदल पाहायला मिळतो. अशात ब्रँडन मॅकलम इंग्लंड संघाच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले, तेव्हा त्यांनी हा बदल इंग्लंडमध्येही आणला.
या नव्या बदलामुळे गेल्या 13 कसोटी सामन्यांत इंग्लंड संघाने 11 विजय मिळवले आहेत. यामागे ‘बॅझबॉल गेम’चा मोठा वाटा आहे.
प्रश्न हा आहे, की कुठून आलं ‘बॅझबॉल’ नाव?
पहिल्यांदा ‘बॅझबॉल’ (Bazball) शब्दप्रयोग कोणी केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. मात्र, असं म्हंटलं जातं, की आक्रमक खेळासाठी ओळखले जाणारे ब्रँडन मॅकलम यांना त्यांचे सहकारी बॅझ (Baz) या टोपणनावाने हाक मारायचे. त्यालाच ‘बॉल’ (Ball) शब्द जोडल्याने ‘बॅझबॉल’ या नव्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती झाली.
आता महत्त्वाचा मुद्दा…काय आहे बॅझबॉल?
बॅझबॉल केवळ आक्रमकतेने खेळणे किंवा निश्चित रणनीतीबाबत अजिबात नाही. हा एक ॲप्रोज आहे. या ॲप्रोचनेच इंग्लंड संघ खेळत आहे. इंग्लंडचे अनेक खेळाडू बॅझबॉल खेळाला ‘फ्रीडम’ असंही म्हणतात. स्टोक्स आणि मॅकलम या जोडीने संघाची कमान सांभाळल्यानंतर इंग्लंड संघात महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. फलंदाजीच्या वेळी संघाचा प्रयत्न हाच असतो, की वेगाने धावा कशा करता येतील आणि जेव्हा गोलंदाजी असते तेव्हा त्यात वेगाने विकेट कशा मिळतील हा प्रयत्न असतो.
इंग्लंड संघाच्या बॅझबॉल खेळाची पहिली चुणूक न्यूझीलंड संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळाली. संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत तिन्ही लढती जिंकल्या. त्यानंतर इंग्लंडने भारतालाही पराभूत केले, नंतर ते दक्षिण आफ्रिकेला सामोरे गेले.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर इंग्लंड संघाला ‘बॅझबॉल गेम’वरून टीकेचा सामना करावा लागला. मात्र, त्यांच्या बॅझबॉल खेळाच्या समर्थकांची संख्याही कमी नाही. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ‘बॅझबॉल गेम’चे कौतुक केले आहे.
Visit Us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
#bazballcricket #cricket #englandvsindia #indiacricket #cricketers #testcricket #bazball #baz #bazballgame
इतिहासात डोकावताना… पाकिस्तान महिला क्रिकेट
बॅझबॉलच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पाहा…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://youtu.be/Wx8XjIjEO6I?si=y19CMIcCygArz4a5″ column_width=”4″] [jnews_block_8 first_title=”Read more at” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ exclude_category=”65″]