कोरोना संकटकाळात काय आहेत शारीरिक शिक्षणासमोरील आव्हाने?

कोरोना संकटकाळात काय आहेत शारीरिक शिक्षणासमोरील आव्हाने?
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सध्याचे एकंदरीत सर्वच विश्व बदलले आहे. 2020 च्या मार्चपासून आतापर्यंत सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. अजूनही कोरोना संक्रमणाची तीव्रता वाढत चालली आहे आणि इथून पुढेही त्याची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक संस्था कधी सुरळीतपणे सुरू होतील हेदेखील सांगता येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि त्यामुळे मोबाइल, संगणक आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. मुलांचे शिक्षण खंडित होऊन शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यूट्यूब, गुगल मीट, गुगल क्लासरूम, मीडिया, मोबाइल फोन, ई-लायब्ररी, दूरदर्शन आदी माध्यमांतून तातडीने वरील प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. शाळा बंद, पण शिक्षण सुरू या अंतर्गत विद्यार्थ्यांना रोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे शाळांकडून दिले जात आहेत. असे असताना या ऑनलाइन शिक्षणात शारीरिक शिक्षण या विषयासाठी अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण हा विषय नेहमीच मैैदानावर शिकवला जातो आणि कोरोनामुळे तर सर्व शिक्षण घरातच द्यावे लागत आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण (physical education) शिक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
या काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्याला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शारीरिक हालचाली करण्यावर मर्यादा आल्या. व्यायाम हा फक्त घरातल्या घरात करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. जून 2020 पासून ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू असल्या तरी शारीरिक शिक्षण या विषयाबाबतच्या शिक्षणाबाबत आजही ही उदासीनता दिसत आहे. कारण शारीरिक शिक्षण या विषयासाठी तेवढा प्राधान्यक्रम मिळत नाही. काही ठिकाणी काही शाळांमध्ये ऑनलाइन शारीरिक शिक्षणाचा तास होत आहे, पण हे चित्र सर्व ठिकाणी दिसत नाही.
शारीरिक तंदुरुस्तीचे प्रॅक्टिकल ऑनलाइन शिकवताना…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात खेळ व तंदुरुस्तीचे महत्त्व सांगितले होते. 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून मुलांना संगणक किंवा मोबाइलवरील गेम्स न खेळता मैदानात घाम गाळा, असा संदेशही दिला होता. त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये राष्ट्रीय क्रीडादिनाच्या दिवशी ‘फिट इंडिया’ चळवळ उभारली गेली. 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक मान्यता मिळवून दिली. अशी सर्वत्र जागरूकता निर्माण केली याचा निश्चितच खूप चांगला परिणाम झाला होता. त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या घरातच व्यायाम करण्याची वेळ आली. तरीही शारीरिक शिक्षण शिक्षकाने हे आव्हान स्वीकारले आणि ऑनलाइन शारीरिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. याच काळात रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व लक्षात घेता शाारीरिक शिक्षण शिक्षकाने पुढाकार घेतला.
ऑनलाइन शिक्षण देताना तंदुरुस्तीचे महत्त्व आणि गरज विद्यार्थ्यास आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगत व्यायाम शिकवण्यात येऊ लागले. विद्यार्थांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगून योग हा आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा आहे. त्यामुळे आजच्या कोरोनाच्या काळातही मानसिक ताण दूर होऊन मन व शरीर तंदुरुस्त ठेवता येणे शक्य आहे. योगाभ्यासाद्वारे शरीर, मनाला तंदुरुस्त ठेवतो, असेही शारीरिक शिक्षण शिक्षक ऑनलाइन पद्धतीने शिकवत आहेत. मात्र, हे शिकवताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. कारण इथे प्रॅक्टिकलही घरातल्या घरात विद्यार्थ्यास शिकवावे लागते.
शारीरिक शिक्षण शिक्षक हा सध्याच्या काळात योगासन व सूर्यनमस्कार, याची माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक ऑनलाइन पद्धतीने शिकवत आहेत. रोजच व्यायाम करणे शक्य नसेल तर जास्तीत जास्त शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत, याकडे लक्ष केंद्रित करावे. आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक असलेली शारीरिक हालचाल, तसेच व्यायामासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, याचे मार्गदर्शन केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषांनुसार आपली शारीरिक स्थिती योग्य आहे का हे तपासून पाहण्याची गरज का आहे हेही समजावून सांगितले जात आहे. व्यायामाबरोबरच योग्य त्या आहाराचे महत्त्व इ. अनेक गोष्टी शारीरिक शिक्षण शिक्षक शिकवत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीची महत्त्वाची जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान शारीरिक शिक्षण शिक्षकाने स्वीकारले आहे.
घरातच राहून व्यायामाचे महत्त्व सांगण्याचे आव्हान
पंतप्रधानांपासून सगळेच खेळांचे महत्त्व या विषयावर जागरूकता निर्माण करीत आहेत. शाळा व महाविद्यालयीन स्तरावर विविध क्रीडा प्रकारात प्रोत्साहन दिले गेले. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत खेळांची स्थिती सुधारत आहे. किंबहुना त्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक खूप मेहनत घेऊन खेळाडू तयार करीत आहेत. यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक शाळेतील मुलांना लहानपणीच खेळात गोडी निर्माण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतो. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यापूर्वी शारीरिक शिक्षण शिक्षक विद्यार्थ्यांना मैदानाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन देत होते. आता मात्र शारीरिक शिक्षण शिक्षक विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. हे एक खडतर असे आव्हान आजच्या काळात शारीरिक शिक्षण शिक्षकास ठेवावे लागत आहे.
संवादातून खेळाडूचे मनोबल वाढविणे…
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिथे सर्व जगच जवळपास सहा महिने बंद झाले तिथे त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालादेखील बसला आहे. जगभरातील सर्वच खेळाडूंना सराव बंद करावा लागला. कारण कोरोनाचे संकट फार मोठे आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षक या काळात खेळाडूशी नियमितपणे संवाद ठेवून खेळाडूंच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. वर्षानुवर्षे खेळाडू नियमित सराव करीत आले आहेत. मात्र, अचानक सराव बंद केला तर त्याचे मनोधैर्य खचू नये, यासाठी त्या खेळाडूस धैर्याने परिस्थितीस सामोरे जाण्यास मदत करण्याचे आव्हानसुद्धा शारीरिक शिक्षण शिक्षक पेलत आहे. What are the challenges facing physical education in the Corona crisis?
शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
शारीरिक शिक्षण आणि खेळ हा शालेय अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाचा विषय आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील एक आवश्यक विषय आहे. शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक कौशल्य अथवा क्षमतांचा विकास होतो असे नाही, तर शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शाळेतील मुलांच्या वाढीकडे, त्यांच्या तंदुरुस्तीकडे, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संतुलनाकडे शारीरिक शिक्षकांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येते. कोरोना आता शहरी व ग्रामीण भागात फैलावला आहे. आतापर्यंत सर्वांना कोरोना या आजाराची लक्षणे, परिणाम, तीव्रता आणि त्यावर होणारे उपचार आणि घ्यावयाची काळजी हे सर्व ज्ञात झाले आहे. अनेक देशांतील तज्ज्ञांच्या मते, या आजाराला बळी पडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती, आहार शारीरिक व्यायाम, आपला आत्मविश्वास हेच उपाय आहेत.
स्थुलत्व रोखण्याचे आव्हान
एका अभ्यासानुसार, लॉकडाउनमुळे स्थुलतेचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणा हा केवळ आजार नसून, तो इतर अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. घेतलेल्या कॅलरीज आणि न खर्च केलेल्या कॅलरीज यातील असमतोलामुळे लठ्ठपणा वाढत आहे. विद्यार्थी एकाच जागी सतत बसून ऑनलाइन तास करीत आहेत. म्हणजेच यातून बाहेर पडण्यासाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे आणि हेच महत्त्व शारीरिक शिक्षण शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवत हे अवघड आव्हान पेलताना दिसत आहेत.
- आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य ए, बी, सी, डी जीवनसत्त्व असलेला आहार नियमितपणे सेवन करणे
- दररोज सकाळी, सायंकाळी किमान 30 मिनिटे योगासने, प्राणायाम, शारीरिक हालचालींवर आधारित व्यायाम प्रकार करणे
- विद्यार्थ्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कामसुद्धा शारीरिक शिक्षण शिक्षकांसमोर आव्हान आहेच
स्क्रीन टाइमशी समन्वय साधण्याचे कसब साधणे…
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांचा धोकाही वाढला आहे. डोळ्यांवर ताण येणे, पाठदुखीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पूर्वीपेक्षा सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणा वाढत चालला आहे. हे स्थुलतेचे प्रमाण टाळण्यासाठी आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत शाळेत शारीरिक शिक्षणाची आवश्यकता आहे. इतर विषयांचा जसा ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे, तसाच शारीरिक शिक्षण या विषयासाठीपण देणे गरजेचे आहे. मुळात सरकारने विद्यार्थ्यास आरोग्याच्या दृष्टीने बनवलेल्या वेळापत्रकात एकूण किती वेळ स्क्रीन टाइम असावा, याचेही धोरण ठरवून दिले आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण या विषयासाठी शारीरिक शिक्षणाच्या तासांवर मर्यादा आल्या आहेत. दररोज 180 मिनिटे इतका स्क्रीन टाइम दहावी व बारावीकरिता असावा, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मग दहावी, बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहेच. शिवाय शारीरिक शिक्षणाचे तास वेळापत्रकात बसवून ऑनलाइन पद्धतीने शिकविण्याचे अवघड कसब शारीरिक शिक्षकांनी आत्मसात केले.
शारीरिक शिक्षण महासंघाचा उपक्रम
आपल्या इतर शारीरिक शिक्षण शिक्षकांना मदत करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण या विषयाची गोडी निर्माण करणयासाठी आपल्या शारीरिक शिक्षण महासंघाचे कामदेखील वाखाणण्याजोगे आहे. दररोज शाळा, महाविद्यालयांतील विविध शारीरिक शिक्षण शिक्षकांनी एकत्र येऊन राबवलेल्या विविध उपक्रमांद्वारे शारीरिक शिक्षण या विषयासाठी सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांनी एकत्र येऊन वेगवेगळे व्हिडिओ, पीपीटी तयार करून एक नावीन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवला गेला. हेसुद्धा एक नवीन आव्हान पेलले. शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या एकजुटीचे एक उत्तम उदाहरण ठरले. हा उपक्रम आजही अव्याहतपणे सुरू आहे. या उपक्रमात व्हिडीओच्या माध्यमातून शिकवले जाते, तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक प्रोत्साहन देणारे व्हिडीओ गुगल क्लासरूमवर पोस्ट केले जात आहेत, तसेच विविध खेळ व त्याचे नियम, पुरस्कारविजेते खेळाडू व त्यांच्या खेळातील कारकिर्दीची माहिती, त्यांना मिळालेले पुरस्कार इत्यादी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली जावी, यासाठी आजचा शारीरिक शिक्षण शिक्षक शारीरिक शिक्षण महासंघाच्या मदतीने जागरूकता निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारत आहे.
शारीरिक शिक्षण : काळाची गरज
बहुतेक सर्व खेळाडूंचा, खेळाडू म्हणून कारकिर्दीचा पाया हा शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षकाद्वारे रचला जात असतो. ते काम तो प्रामाणिकपणे करीत असतो. आता इतकी वर्षे अशा पद्धतीने खेळ, क्रीडा स्पर्धा आणि सांघिक खेळाचे महत्त्व, व्यायामाची आवड निर्माण करणे, व्यायाम करणे का आवश्यक आहे इत्यादी अनेक गोष्टी शिकवणाऱ्या शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी मात्र या कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती ही प्रचंड आव्हानात्मक ठरली आहे. आजही आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष दिले जाते. शारीरिक शिक्षण तासाकडे त्या मानाने कमी लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी शारीरिक सुदृढता अत्यंत गरजेची आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको. उद्याच्या भारताची पिढी सुदृढ, निरोगी, निरामय आरोग्यदायी घडवण्यासाठी शारीरिक शिक्षणास महत्त्व देणे ही काळाची गरज आहे.