टेनिस स्टार जोकोविच याच्यावर विषप्रयोग झाला होता?
२०२२मध्ये मेलबर्नमधील घटना, दस्तूरखुद्द जोकोविच यानेच केला दावा

टेनिस स्टार जोकोविच याच्यावर विषप्रयोग झाला होता?
मेलबर्न, ११ जानेवारी २०२५
आपल्यावर २०२२ मध्ये मेलबर्न येथे विषप्रयोग झाल्याचा दावा नोव्हाक जोकोविच याने एका मासिकाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत केला आहे. २०२२मध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने जोकोविचला मेलबर्न विमानतळाहून ताब्यात घेतले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे जोकोविचचे म्हणणे आहे.
त्या कालावधीत ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकास करोना लसीकरणाचे बंधन होते. मात्र जोकोविच अशा लसीकरणाच्या विरोधात होता. यामुळे नियमानुसार त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारला गेला अन् मेलबर्न येथील हॉटेलात इतर आश्रितांसह ठेवण्यात आले होते.
काय आहे दावा?
- करोना लसीकरण नसल्याने जोकोविचला २०२२मध्ये ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारला होता
- विमानतळाहून त्याला ताब्यात घेत आश्रीतांच्या हॉटेलात ठेवण्यात आले होते
- तेथील अन्नातून विष देण्यात आल्याचा टेनिसपटूचा दावा
- त्या अन्नपदार्थांत मोठ्या प्रमाणात शिसे, धातूंचे प्रमाण असल्याचे निष्पन्न झाले होते, असे जोकोविचचे म्हणणे
‘त्या मेलबर्नमधील हॉटेलातील वास्तव्यादरम्यान मला जे अन्नपदार्थ देण्यात आले होते त्यांत विष असल्याचे माझ्या लक्षात आले’, असे जोकोविच म्हणाला. आपला आहार, व्यायाम अन् नियमीत चाचण्या याबाबत जोकोविच कायमच सजग असतो. ‘तेथून मी सर्बियात परतल्यानंतर नियमीत चाचण्या केल्या होत्या. त्यातून हा प्रकार निष्पन्न झाला. याची वाच्यता मी याआधी कधीच सार्वजनिक व्यासपिठावर केली नव्हती. मात्र त्यावेळी माझ्या पोटात खूप जड धातू (हेवी मेटल) असल्याचे निष्पन्न झाले होते. माझ्या शरीरात शिसे आणि पाऱ्याचे प्रमाण खूप म्हणजे खूपच जास्त होते’, असे जोकोविच ठामपणे सांगतो.
दरम्यान संबंधित मासिकाने याबाबत ऑस्ट्रेलियात विचारणा केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाने गोपनीयतेच्या कारणास्तव या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
टेनिस मोसमातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेस १२ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी जोकोविच काही दिवसांपूर्वीच येथे दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील सरकार बदलल्यानंतर करोना लसीकरणाचे नियमही बदलले आहेत. तसेच जोकोविचवरील ऑस्ट्रेलियातील प्रवेशाची बंदीही उठविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मेलबर्न येथील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीतही जोकोविचने २०२२मधील व्हिसा प्रकरणाबाबत सांगितले होते. त्यावेळी जोकोविचचा ऑस्ट्रेलियन व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियात येण्याबद्दल मनात बसलेली भिती आजही कायम असल्याचे जोकोविचने कोणताही आडपडदा न ठेवता मान्य केले होते. ऑस्ट्रेलियातील विमानळावर दाखल झाल्यानंतर या ३७ वर्षीय टेनिसपटूला अजूनही धास्ती वाटते. कुणीतरी मागून हाक मारत थांबवेल अन् ताब्यात घेण्यात येईल, असे विचार जोकोविचच्या मनात घोळवत राहतात.
तुझ्या शरीरार आढललेले शिसे, धातू तेथील अन्नपदार्थांतूनच आले असतील, असे का वाटते? या प्रश्नावर जोकोविचचे उत्तर असते, ‘अर्थातच… तो एकमेव मार्ग होता’.
मात्र आपल्या मानात ऑस्ट्रेलिया किंवा त्यांच्या नागरिकांबद्दल अजिबात कटूता नाही, असे जोकोविचने लागलीच स्पष्ट केले आहे. कारण त्याच्या दुसऱ्याच वर्षी जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मेलबर्नमध्ये हजेरी लावली होती. ‘गेल्या काही वर्षांत स्पर्धा, कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या अनेक नागरिकांच्या भेटीगाठी झाल्या. त्या प्रत्येकाने संबंधित प्रकाराबद्दल माझी मनापासून माफी मागितली आहे. त्यावेळच्या सरकारने मला जी वागणूक तिला त्याचे प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकास वाईट वाटते आहे. तो सगळा प्रकार लाजिरवाणा होता, असे ते मला सांगतात’, असेही जोकोविचने सांगितले.
‘… अन आता तेथील सरकार आणि व्हिसाचे नियम बदलले आहेत. माझ्यावरील बंदी उठवल्याने व्हिसाही मिळाला आहे अन् या सगळ्यासाठी मी ऑस्ट्रेलियाचा ऋणी आहे. ऑस्ट्रेलियातील वास्तव्य मला भावते. त्या देशातील माझे यश पाहून तुमच्या लक्षात येतच असेल’, असे १० ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदांचा धनी जोकोविच अभिमानाने सांगतो.
‘काही वर्षांपूर्वी मला ऑस्ट्रेलियाच्या बाहेर काढणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांशी पुन्हा भेट झाली नाही. त्यांना भेटण्याची मला इच्छाही नाही. अन् कधी भेट झालीही, तरी ठीक आहे. त्यांना हस्तांदोलन करून माझी वाट धरेन…’, असे जोकोविच म्हणाला.